सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष चंद्र—शुक्राचा युतीयोग हा उत्साह आणि आनंद यांची पर्वणी ठरणारा योग आहे. नव्या योजनांची आखणी कराल. त्या अमलात आणण्याचा प्रयत्न कराल. नोकरी—व्यवसायात समुदायाला उद्देशून मार्गदर्शन कराल. वरिष्ठ वर्गासह वैचारिक देवाणघेवाण होईल. सहकारी वर्गाच्या समस्या समजून घ्याल. वेळेत कामे पूर्ण करण्याकडे कल असेल. जोडीदाराच्या कष्टाचे चीज होईल. मुलांच्या अतिरिक्त मागण्यांवर आळा घालावा लागेल. हवामानातील बदल अंगीकारताना श्वसन व पचनाच्या तक्रारी उद्भवतील.
वृषभ चंद्र—बुधाचा युतीयोग हा आपल्या विचारांवर ठाम राहण्यास मदत करेल; परंतु अट्टहास धरणे हितकारक नाही. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ अधिकारी आपणास पाठिंबा दर्शवतील. सरकारी कामे धिम्या गतीने पुढे सरकतील. जोडीदाराच्या कामकाजात अडथळे निर्माण होऊन विलंब होईल. आर्थिक नुकसान टाळा. मुलांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देता येतील. अंतर्गत उष्णता आणि वातावरणातील थंडी यामुळे उत्सर्जन संस्थेवर भार पडेल.
मिथुन चंद्र आणि नेपच्यून या दोन संवेदनक्षम ग्रहांचा लाभयोग हा अंत:स्फूर्तिदायक योग आहे. भावनांचा समतोल राखून निर्णय घ्याल. नोकरी—व्यवसायात अनपेक्षित लाभ जाहीर होईल. आपल्या चातुर्याला दाद मिळेल. वरिष्ठ त्यांच्या अनुभवाची शिदोरी आपणास देतील. सहकारी वर्गाकडून मदतीचा हात मिळेल. शंकाकुशंका उपस्थित करू नका. जोमाने कामाला लागा. जोडीदार चांगली साथ देईल. मुलांना त्यांच्या वाटा सापडतील.
कर्क रवी—चंद्राचा लाभयोग हा समस्या सोडवत पुढे नेणारा योग आहे. आपल्या मताचा मान राखला जाईल; परंतु त्यासाठी स्वत:ला सिद्ध करावे लागेल. नोकरी—व्यवसायात काही गोष्टींचा विचार नव्याने करावा लागेल. वरिष्ठांचा पाठिंबा न मिळाल्यास हताश होऊ नका. जोमाने कामाला लागा. आपल्यातील लहानसे बदलही कामी येतील. जोडीदाराची ओढाताण होईल. मुलांना कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या यांची जाण द्याल. कोरडय़ा त्वचेच्या समस्या सोडवण्यासाठी वैद्यकीय सल्ला घ्यावा.
सिंह बुध—नेपच्यूनचा केंद्रयोग हा तारतम्य दाखवणारा योग आहे. भावनेच्या आहारी न जाता विवेकी विचारांवर भर द्याल. नोकरी—व्यवसायात आकर्षक योजनांचा लाभ मिळेल. वरिष्ठांचा विश्वास खरा ठरवाल. हितशत्रूंचे डावपेच हाणून पाडाल. सावधगिरी बाळगाल. जोडीदाराला त्याच्या क्षमतेनुसार योग्य मोबदला मिळेल. कौटुंबिक नातेसंबंध दृढ होतील. मुलांच्या हळवेपणाचा अतिरेक त्रासदायक ठरेल. सांधेदुखी, युरिक अॅसिड या संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे .
कन्या चंद्र—बुधाचा लाभयोग हा उत्साहवर्धक योग आहे. मनात योजलेल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा खर्ची पडेल. कामानिमित्त लहानमोठे प्रवास कराल. नोकरी-व्यवसायात आपले अस्तित्व आणि वर्चस्व सिद्ध करून दाखवाल. सहकारी वर्गाला धाकात ठेवाल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. जोडीदाराच्या कामातील अडथळ्यांमुळे त्याची अस्वस्थता वाढेल. पित्तप्रकृती बळावल्याने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारूच नका. निसर्गाचा आनंद घ्याल.
तूळ गुरू—मंगळाचा केंद्रयोग महत्त्वाचे निर्णय घेताना धाडस देईल. मंगळाची जिद्द आणि गुरूची सात्त्विकता यांना समोपचाराची जोड मिळेल. नव्या गोष्टी शिकायला मिळतील. माणसांची योग्य पारख कराल. नोकरी—व्यवसायात आर्थिक व्यवहार लाभदायक ठरतील. सहकारी वर्गाचा सहभाग उल्लेखनीय असेल. जोडीदाराच्या कलेने घेतल्यास आपला त्रास कमी होईल. मुलांची उन्नती पाहून समाधान वाटेल. त्वचेचा कोरडेपणा त्रासदायक होईल. वैद्यकीय तपासण्या टाळू नका.
वृश्चिक चंद्र—गुरूचा केंद्रयोग अडचणीतून मार्ग काढत पुढे नेणारा योग आहे. रडत न बसता नव्या उमेदीने आगेकूच कराल. नोकरी—व्यवसायात मनाविरुद्ध घटना घडतील. धीर धरावा. वरिष्ठांसह संबंध चांगले ठेवाल. सहकारी वर्ग आपली मते समजून घेईल. जोडीदाराला कामानिमित्त प्रवास करण्याची संधी उपलब्ध होईल. एकमेकांच्या संमतीने महत्त्वाचे निर्णय घ्याल. मुलांना योग्य मार्गदर्शन मिळेल. हाडांची काळजी घ्यावी. पडणे, मार लागणे, हाड मोडणे या शक्यता आहेत.
धनू चंद्र—गुरूचा लाभयोग हा हितकारक निर्णय घेण्यास पुष्टी देईल. अग्नी तत्त्वाच्या राशीतील चंद्र आक्रमक न होता गुरूच्या शुभयोगामुळे अभ्यासक वृत्ती बाणवेल. नोकरी—व्यवसायात परदेशासंबंधित कामकाजाला गती मिळेल. प्रश्न सुटत जातील. वरिष्ठांकडून वाहवा मिळवाल. सहकारी वर्गाचा सल्ला उपयोगी ठरेल. जोडीदाराला अधिक मेहनत घ्यावी लागेल. कामाचा ताप व व्याप वाढेल. मुलांचे हट्ट पुरवावे लागतील. डोळे, त्वचा आणि उत्सर्जन यांची काळजी घ्यावी.
मकर चंद्र—शनीचा लाभयोग हा सातत्य टिकवणारा योग आहे. चंद्राच्या कुतूहलाला शनीची चिकाटी आणि सखोल अभ्यासू वृत्ती यांची जोड मिळेल. नोकरी—व्यवसायात कायद्याने पुढे जाल. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये रस दाखवू नका. काही गोष्टी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून द्याल. सहकारी वर्गावरील विश्वास दृढ होईल. जोडीदाराच्या मेहनतीस फळ मिळेल. मुलांना त्यांच्या कार्यात वा शिक्षणात यश लाभेल. डोकेदुखी, मणका वा सांधेदुखी यांसारखे त्रास सहन करावे लागतील.
कुंभ गुरू—चंद्राचा युतीयोग हा संधीचे सोने करणारा योग आहे. गुरूच्या ज्ञानाचा बौद्धिक राशीतील चंद्राला पुरेपूर उपयोग होईल. नोकरी—व्यवसायात अडचणीतून मार्ग निघेल. अधिकाराचा योग्य वापर कराल. वरिष्ठांचा विश्वास खरा ठरवाल. सहकारी वर्गाला आवश्यक ती मदत करण्याची तयारी दाखवाल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात स्वत:ला झोकून देईल. त्याच्या कष्टाचे चीज होईल. मुलांची रखडलेली कामे मार्गी लागतील. डोकेदुखीचा आणि खांदेदुखीचा त्रास उद्भवल्यास औषधोपचार घ्यावा लागेल.
मीन चंद्र—बुधाचा लाभयोग भावना आणि विचार यांच्यात समतोल राखणारा योग आहे. कामाच्या स्वरूपात थोडा बदल होऊन नव्या योजना राबवाल. नोकरी—व्यवसायात आपला दृष्टिकोन बदलल्याने लाभदायक स्थिती प्राप्त होईल. वरिष्ठ आणि सहकारी वर्गाकडून फारसे सहकार्य मिळण्याची अपेक्षा न ठेवणे बरे! जोडीदार कौटुंबिक पातळीवर महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. मुलांना आपले विचार पटवून द्यायचा प्रयत्न करा. मनोबल वाढवा. मणका आणि हिप बोन यांची काळजी घ्यावी लागेल.