मेष सभोवतालच्या व्यक्तींच्या वागण्या-बोलण्याचा नेमका अर्थ तुम्हाला न कळल्यामुळे तुमचे धोरण ठरविणे तुम्हाला अवघड जाईल. व्यवसाय-उद्योगात खूप पैसे मिळणार असे सकृद्दर्शनी आभास निर्माण करणारे काही प्रस्ताव तुमच्यापुढे असतील. पण त्याची ताळेबंदी कागदावर मांडून बघा. मग निर्णय घ्या. नोकरीमध्ये इतरांनी केलेल्या चुकीचा भरुदड तुम्हाला सहन करावा लागेल. घरामध्ये किरकोळ कारणावरून इतरांशी गैरसमज होईल. विद्यार्थी कोडय़ात पडतील; हितचिंतक मार्गदर्शन करतील.
वृषभ माणसांविषयी किंवा पैशाविषयी तुमचे अंदाज अडाखे चुकत नाहीत. पण या सप्ताहात असा अनुभव आला तर आश्चर्यात पडू नका. व्यापार-उद्योगात कितीही मोह झाला तरी पैशाचे मोठे व्यवहार घाईने करू नका. नोकरीमध्ये सहकाऱ्यांच्या बाबतीत भरवशाच्या म्हशीला टोणगा असा अनुभव येण्याची शक्यता आहे. म्हणून स्वयंभू राहा. घरामधल्या व्यक्तींकडून एखाद्या कल्पनेला विरोध होईल. हितशत्रूंच्या कारवायांकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांनी मित्रांवर अवलंबून न राहता स्वत:चा अभ्यास स्वत:च करावा.
मिथुन दिसते तसे नसते म्हणून जग फसते याची आठवण करून देणारे ग्रहमान आहे. व्यापार-उद्योगामध्ये एखादे काम मध्यस्थांवर सोपवले असेल तर अधूनमधून त्याचा आढावा घ्या. म्हणजे त्यातील त्रुटी लक्षात येतील. नवीन करार विचारपूर्वक करा. नोकरीमध्ये सहकाऱ्यांवर विसंबून न राहता स्वत:चे काम पूर्ण करा आणि मगच इतर गोष्टींमध्ये लक्ष घाला. घरामध्ये प्रिय व्यक्तीच्या स्वास्थ्याविषयी किंवा प्रगतीविषयी चिंता वाटेल. योग्य ती दक्षता घेण्यासाठी जागरूक राहा. विद्यार्थ्यांनी फाजील आत्मविश्वास टाळावा.
कर्क ग्रहस्थिती मृगजळ निर्माण करणारी आहे. करिअरमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळे आणि नावीन्यपूर्ण करावेसे वाटेल. परंतु त्यातील यश, सांसारिक चिंता आणि जबाबदाऱ्या यांवर अवलंबून असणार आहे. घरामध्ये अशी एखादी जबाबदारी तुमच्यावर येऊन पडेल की ज्यामुळे तुम्ही पूर्वी ठरविलेले बेत तुम्हाला बदलावे लागतील. व्यापार-धंद्यामध्ये नेहमीपेक्षा जास्त काम मिळाल्यामुळे तुमची धावपळ होईल. नोकरीमध्ये आवश्यक सवलती न मिळाल्याने तुमचे मन मधूनच बंड करून उठेल.
सिंह इतरांवर अवलंबून राहण्याचा तुमचा स्वभाव नाही. पण या आठवडय़ात तशी वेळ आली तर दुसऱ्यावरी जो विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला या म्हणीची आठवण ठेवा. ज्यांचा देशात किंवा परदेशात व्यवहार आहे, त्यांनी मिळालेल्या बातमीची शहानिशा करून मगच निष्कर्ष काढावा. कोणताही करार घाईने करू नये. नोकरीमध्ये सहकारी त्यांच्या स्वार्थाकरता तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील. घरामध्ये लांबची भावंडे, नातेवाईक यांच्याशी वागताना अतिरेक टाळा.
कन्या अत्यंत विचारपूर्वक वागणारी आणि शांतपणे काम करणारी तुमची रास आहे. परंतु तुमच्या घरामध्ये आणि व्यावसायिक जागेत ज्या घडामोडी घडणार आहेत त्यामुळे तुमचे मन सैरभैर होण्याची शक्यता आहे. व्यापार-उद्योगात कोणालाही घाईने आश्वासन देऊ नका. नोकरीमध्ये सहकारी आणि वरिष्ठांशी जपून बोला. घरातील एखाद्या सदस्याच्या प्रगतीमुळे किंवा स्वास्थ्यामुळे चिंता वाटेल. त्यांना दिलासा देणे हे तुमचे कर्तव्य होईल. स्वत:च्या प्रकृतीस जपा. विद्यार्थ्यांनी मित्रांवर अवलंबून राहू नये.
तूळ माणसाचे मन विचित्र असते. जी गोष्ट ज्या वेळी करायची नसते नेमकी त्या वेळी तीच करायचा मोह अनावर होतो आणि नंतर पस्तावण्याची वेळ येते. ही परिस्थिती टाळण्यासाठी तुमच्या मनाचा तोल ढळू देऊ नका. व्यवसाय-धंद्यात जादा पैशाच्या लोभाने हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे धावावेसे वाटेल. पण त्यापेक्षा जे काम चालू आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. नोकरीमध्ये संस्थेमधल्या राजकारणात लक्ष न घालता आपण बरे आणि आपले काम बरे असा दृष्टिकोन ठेवा.
वृश्विक व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून जे तुम्हाला योग्य वाटते ते तुम्ही करता. सभोवतालची माणसे व परिस्थिती याचा तुमच्यावर बराच परिणाम असेल. त्यांच्याकडून कसा प्रतिसाद मिळतो यावर तुमचे यश व मन:स्वास्थ्य अवलंबून असणार आहे. व्यवसाय-धंद्यामध्ये पूर्वी तुमच्या हातून काही चुका झाल्या असतील तर त्याची आता जाणीव होईल. जी देणी द्यायची आहेत त्याची मागणी संबंधित व्यक्तींकडून केली जाईल. नोकरीमध्ये सहकारी आणि वरिष्ठ तुमच्याशी अशा पद्धतीने वागतील की तुम्ही कोडय़ात पडाल.
धनू ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’ अशी तुमची स्थिती होण्याची शक्यता आहे. नवीन कल्पनांच्या मागे धावण्यापेक्षा जे काम तुमच्या हातात आहे, त्यातच काहीतरी नावीन्यपूर्ण केले तर त्याचा तुम्हाला जास्त उपयोग होईल. व्यवसाय-उद्योगामध्ये हातातले पैसे जपून खर्च करा. नोकरीमध्ये महत्त्वाची कामे सहकाऱ्यांवर न सोपवता स्वत: पूर्ण करणे चांगले. कोणत्याही अनोळखी व्यक्तींशी उधार उसनवारीचे व्यवहार करू नका. तरुणांना थट्टामस्करी महागात पडेल. विद्यार्थ्यांनी नवीन मित्रांवर एकदम विश्वास टाकू नये.
मकर तुमच्या कल्पना सहसा तुम्ही इतरांसमोर व्यक्त करत नाही, पण योग्य वेळ आली की त्याची कार्यवाही करून अपेक्षेनुसार काम करता. तुमचे विचार आणि कृती याचा अर्थ सभोवतालच्या व्यक्तींना न कळल्यामुळे ते बुचकळ्यात पडतील. इतर वेळेला व्यवसाय-धंद्यातील गुंतवणूक करताना तुम्ही खूप विचार करता. पण या आठवडय़ात भावनेच्या आहारी जाऊन घाईने एखादा निर्णय घेण्याचा मोह होईल. घरामध्ये दोन पिढय़ांतील तफावत जाणवेल. वयोवृद्ध व्यक्तींच्या स्वास्थ्याकडे लक्ष ठेवा.
कुंभ कर्तव्याला प्राधान्य देणारी तुमची रास आहे. स्वप्नात रमणे तुम्हाला आवडत नाही. नेहमीप्रमाणे चांगले काम करायचे तुम्ही ठरवाल. परंतु मनाची एकाग्रता लाभणे कठीण आहे. व्यवसाय-धंद्यात नवीन व्यक्तींशी हितसंबंध जोडताना आणि पैशाचे व्यवहार करताना एकदम विश्वास टाकू नका. नोकरीमध्ये सहकारी तुम्हाला भूलभुलैया निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. घरामध्ये नातेवाईक आणि आप्तेष्टांच्या अती जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर गैरसमज व्हायला वेळ लागणार नाही.
मीन ग्रहमान बदलले की माणसाच्या आचारविचारामध्ये फरक पडत जातो. तुमची रास पापभीरू आणि सरळमार्गाने जाणारी आहे. पण चंचल मनोवृत्तीमुळे कधी कधी तुम्ही व्यवस्थितपणे चाललेल्या कामात फेरफार करता आणि त्यामध्ये गोंधळ झाला की बिथरून जाता. या आठवडय़ात व्यापार-उद्योगात जास्त धोका पत्करू नका. नोकरीमध्ये संस्थेच्या आणि वरिष्ठांच्या नियमानुसार वागा. घरामध्ये किरकोळ कारणावरून वादविवाद उपस्थित होतील.