सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष रवी-चंद्राचा लाभयोग कामाचा उरक वाढेल. समजूतदारपणा दाखवाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे ठोकताळे खरे ठरतील. सद्य परिस्थितीशी शांत डोक्याने सामना कराल. सहकारी वर्गाचा पािठबा मिळेल. जोडीदार नव्या वेळापत्रकानुसार वेगात आगेकूच करेल. मुलांचे ध्येय निश्चित होईल. वातावरणाचा सांधे, मणका यांवर परिणाम होईल. व्यायाम आणि आहारात आवश्यक बदल करावा.
वृषभ चंद्र-शुक्राच्या नवपंचम योगामुळे नव्या कल्पना सुचतील. आकर्षक पद्धतीने कामाचे आरेखन कराल. नव्या ठिकाणांना भेटी द्याल. सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. सहकारी वर्गाला आपले मुद्दे पटणार नाहीत. जोडीदाराला आपला सल्ला उपयोगी ठरेल. मुलांची कामे रेंगाळतील. काही बाबतीत सबुरीने घ्यावे लागेल. भाजणे, जळजळ होणे असे त्रास होतील.
मिथुन चंद्र-नेपच्यूनचा युतीयोग हा प्रेरणादायी योग आहे. जुने, वाईट अनुभवातून शहाणपण येईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ आणि सहकारी वर्ग यांच्याकडून साहाय्य मिळेल. कामातील उत्साह टिकवून ठेवाल. आर्थिक मोबदला चांगला मिळेल. आपल्यातील कौशल्ये कामी येतील. जोडीदार अनेक गोष्टींमध्ये रस दाखवेल. मुलांना स्वत: निर्णय घ्यायला लावाल. उष्णता बाहेर पडेल.
कर्क चंद्र-मंगळाचा नवपंचम योग नवा उत्साह देणारा योग आहे. लोक चांगुलपणाचा फायदा घेतील. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे. नोकरी-व्यवसायात अनपेक्षित गोष्टी घडण्याचा संभव आहे. धीर सोडू नका. सत्याची बाजू ठामपणे मांडाल. जोडीदार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. मुलांच्या स्वभावाला मुरड घालावी. कायद्याची कामे पुढे सरकतील. उष्णतेचे विकार बळावतील.
सिंह चंद्र-गुरूचा लाभयोग हा अधिकार पद देणारा योग आहे. समस्यांची उकल लवकरच सापडेल. नोकरी-व्यवसायात व्यक्तिगत संबंध उपयोगी पडतील. कामातील सुसूत्रता वाखाणण्याजोगी असेल. जोडीदार आपल्या कौशल्यबुद्धीने मोठी मजल गाठेल. मुलांना सद्विचारांचा ठेवा उपयोगी ठरेल. कौटुंबिक वादविवाद दुर्लक्षित करून ध्येयपूर्तीकडे लक्ष ठेवावे. सांधे जपावेत.
कन्या चंद्र-शुक्राचा केंद्रयोग हा एखाद्या गोष्टीचा आग्रह धरण्यास कारणीभूत ठरेल. निर्णय भावनेच्या भरात न घेता शांतपणे घ्यावा. नोकरी-व्यवसायात पुढचे आयोजन आधीच करून ठेवाल. वरिष्ठ आणि सहकारी वर्ग यांच्यासह असलेले संबंध आपल्या प्रगतीचे कारण ठरतील. नव्या संकल्पना विचारात घेतल्या जातील. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात व्यग्र असेल. मधुमेहावर नियंत्रण आवश्यक!
तूळ चंद्र-शुक्राचा लाभयोग कलात्मकता निर्माण करणारा योग आहे. भावविश्वात आंदोलने येतील. मन आणि चित्त स्थिर ठेवा. त्रासदायक विचार प्रकर्षांने आणि प्रयत्नपूर्वक टाळा. नोकरी-व्यवसायात परिस्थितीचा मागोवा घेऊन पुढील पाऊल टाकाल. कौटुंबिक वाद विकोपाला जाऊ देऊ नका. काही बाबतीत जोडीदाराचा दृष्टिकोन वेगळा असेल. ओटीपोटाचे दुखणे बळावेल.
वृश्चिक चंद्र-मंगळाचा केंद्रयोग उत्कर्षकारक योग आहे. नव्या क्षेत्रात पदार्पण कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या मताला मान द्याल. मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम नियंत्रित ठेवाल. कुटुंबातील सदस्य आपल्या कार्यक्षेत्रात मोठी झेप घेतील. जोडीदार हिमतीने पुढाकार घेईल. मुलांना मेहनतीचे फळ मिळेल. प्रेम आणि शिस्त यांचे गणित चांगले जुळेल. त्वचेचे प्रश्न उद्भवतील.
धनू रवी-चंद्राचा केंद्रयोग सूचित करतो की, अडचणीतून मार्ग काढत पुढे जावे. गुरूचे पाठबळ कामी येईल. नोकरी-व्यवसायात स्वत:च्या हिमतीवर मोठी जबाबदारी स्वीकाराल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. कौटुंबिक वातावरण उत्साही असेल. मुलांना शिस्तीचा बडगा दाखवावा लागेल. नातेवाईक मदतीची अपेक्षा दर्शवतील. डोळे-त्वचा रुक्ष, शुष्क झाल्यास औषधे घ्यावीत.
मकर चंद्र-शनीचा लाभयोग हा नियमबद्धता राखेल. नोकरी-व्यवसायात जागरूकतेमुळे मोठे नुकसान टळेल. वरिष्ठांची वाहवा मिळवाल. सहकारी वर्गाकडून कामात दिरंगाई होईल. जोडीदाराच्या मेहनतीचे चीज होईल. आर्थिकदृष्टय़ा सक्षम व्हाल. मुलांच्या प्रगतीचा अभिमान वाटेल. डोकेदुखीचा त्रास होईल. पित्त आणि उष्णतेचे विकार आटोक्यात ठेवा. वेळेवर उपचार करावेत.
कुंभ रवी-नेपच्यूनचा लाभयोगामुळे नवनिर्मितीचा निखळ आनंद मिळेल. नोकरी-व्यवसायात कामाच्या स्वरूपातील बदल सुलभ होतील. विरोधाला विरोध करण्यात फायदा नाही. वरिष्ठ अधिकारी अतिचिकित्सक होतील. आपल्या आंतरिक क्षमतेचा पुरेपूर उपयोग करावा. जोडीदाराची प्रगती होईल. मुलांच्या समस्या सुटतील. धाप लागणे, मान व खांदे भरून येणे असे त्रास उद्भवतील.
मीन चंद्र-बुधाचा लाभयोग हा व्यवहार व भावना यांच्यात समतोल राखणारा योग आहे. बुद्धिचातुर्य कामी येईल. नवे संकल्प केल्यास त्यात सातत्य राखावे. नोकरी-व्यवसायात अधिक लक्षपूर्वक, सतर्क असणे जरुरीचे आहे. काही सवयी बदलायच्या आहेत. जोडीदाराचे विचार समजून घ्यावेत. विरोधाभास असल्यास चर्चेने, सामोपचाराने सोडवाल. हृदयाची काळजी घ्यावी.