गेली ९९ वर्षे दाते पंचांग महाराष्ट्रात प्रकाशित होत आहे. या व्यवसायाचा मी एक भाग आहे. हा व्यवसाय जो परिवार पाहतो त्याचा मी सदस्य आहे. व्यवसाय असल्यामुळे पंचांग, ज्योतिष या विषयांचा परंपरागत अभ्यास झाला आहे. माझे शिक्षण एम्.एस्सी. (गणित) पर्यंत झाले आहे. अशा पाश्र्वभूमीवर साहजिकच वैज्ञानिक दृष्टिकोनातून भारतीय शास्त्रांकडे बघितले गेले. घरात पारंपरिक पद्धतीने पंचांग विषय होता, त्यामुळे त्याच्या मूळ स्वरूपाचा, गाभ्याचा अंदाज आला होता. असा अंदाज सहसा आधुनिक शिक्षण घेतलेल्यांना येऊ शकत नाही. मूळ स्वरूपाचा, गाभ्याचा अंदाज आणि आधुनिक गणितात शिक्षण या दोन्ही गोष्टी एकत्र आल्याने मला वैज्ञानिकांचे मुद्देही समजत होते आणि भारतीय शास्त्रांचे प्रयोजनही कळत होते. या दोन्ही दृष्टिकोनांच्या एकत्र येण्याने जी बघण्याची, माझ्यासाठी तरी नवी, अशी दिशा मिळाली ती वाचकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख. माझे व्यावसायिक हित ज्योतिष विषयाशी निगडित असल्याने काहीही झाले तरी ज्योतिष विषयाच्या बाजूनेच लिहिणार असा माझा हेतू नाही. ज्यांना तरीही माझा हेतू तसाच आहे असे वाटणार असेल त्यांच्यासाठी हा लेख नाही. ज्योतिष विषयाची वैज्ञानिकता या विषयावर लिहिताना, बोलताना अनेक वेळा दोन्ही बाजूंनी अभिनिवेशाने मते मांडली आहेत. त्यापलीकडे जाऊन वस्तुनिष्ठ संतुलित दृष्टिकोन ठेवून एक बाजू दुसरीवर कळत-नकळत अन्याय करीत असल्यास तो पुढे आणणे आणि ज्यांना यातील मुद्दे पटतील त्यांची दृष्टी या विषयांकरिता सकारात्मक करणे यासाठी हा लेख.
लेख दोन विभागांत आहे. पहिला भाग ज्योतिष हे शास्त्र आहे का याचा ऊहापोह करतो, तर दुसरा ज्योतिष आणि पंचांग यातील कालगणनेच्या संदर्भावर टिपणी करतो.
ज्योतिष हे शास्त्र आहे का नाही?
संपूर्ण विश्व कसे तयार झाले आहे, त्याच्या रचनेत कोणत्या मूलभूत तत्त्वांचा अंतर्भाव आहे, कोणते नियम या विश्वाला एवढे सुसूत्र आणि सुसंगत करतात, अशा विविध प्रश्नांमुळे कोणत्याही काळातील शास्त्रज्ञांना संशोधन करण्याची स्फूर्ती मिळालेली आहे. अशा प्रश्नांची उत्तरे वेगवेगळ्या काळात आणि भूभागात शोधली गेली. जसे भारतीय उपखंडात ५०० वर्षांपूर्वीपर्यंत संशोधन होत होते. इजिप्त आणि आसपासच्या भागातील संशोधनाचा उपयोग ग्रीक आणि रोमन संस्कृतीला झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. साधारण इ.स. १६०० नंतर युरोपमध्ये आणि सध्या पाश्चात्त्य देशात प्रामुख्याने संशोधन होताना दिसते. अशा आपल्याला संशोधन करणाऱ्या भिन्न पद्धती किंवा परंपरा दिसतात. या प्रत्येक परंपरेने संकल्पनांची देवाणघेवाण केलेली असली तरी या परंपरांची विश्वरचनेकडे बघण्याची स्वतंत्र पद्धत आहे. जेव्हा या पद्धती विश्वात घडणाऱ्या घटनांचे त्यांच्या मूळ संकल्पनांच्या आधारे तर्कशुद्ध (logical) आणि प्रयोगसिद्ध (experimentally verified)ि विवरण करतात, आधीच्या माहितीवरून भविष्यातील अंदाज अचूक करतात (accurate predictions) तेव्हा या पद्धतींना विज्ञान शाखा म्हणले जाते.
पाश्चात्त्य परंपरेतील आधुनिक विज्ञान या कसोटींवर उतरते, पण भारतीय परंपरेतील शास्त्र मात्र विज्ञान शाखा म्हणून आधुनिक वैज्ञानिकांना मान्य होत नाहीत. याचे कारण वरील कसोटींवर भारतीय शास्त्रांची परीक्षा केली गेलेली नाही अथवा केली असल्यास भारतीय शास्त्रे नापास झाली आहेत असे समजले जाते. भारतीय शास्त्रांची आधुनिक तर्कशुद्ध मांडणी असलेले, प्रयोगांचे आणि भविष्यातील अंदाजांचे संख्याशास्त्रीय विश्लेषण असलेले, अशा स्वरूपातील कुठलेही लिखित साहित्य (documentation) नाही.  सध्या लोकप्रिय असलेल्या योग, आयुर्वेद आणि ज्योतिष या भारतीय शास्त्रांचा विचार करता हा आक्षेप योग्य आहे असे वाटणे स्वाभाविक आहे, परंतु या शास्त्रांनी जो विचार मांडला तो पारतंत्र्यात परंपरा खंडित झाल्यामुळे आपल्यापर्यंत नीट पोहोचत नाही आणि ज्या परंपरा शिल्लक आहेत, त्यांना आधुनिक प्रयोगशाळा आणि संस्थांचे पाठबळ नाही. पाश्चात्त्य विज्ञान परंपरा गेली काही शतके अखंड असल्याने त्यातील विचार प्रत्येक टप्प्यासह वैज्ञानिकांना त्यांच्या विषयात पूर्ण माहीत असतो आणि मांडता येतो. तसे ज्योतिषशास्त्राचे किंवा आयुर्वेदाचे होत नाही. त्यांच्या सिद्धांतांच्या सुसंगत मांडणीची अपेक्षा करणे म्हणजे डायनोसोरचा फोटो शोधण्यासारखे आहे. डायनोसोरच्या सापडलेल्या अवशेषांवरून त्याचे काल्पनिक चित्र काढता येते, परंतु तो तसाच दिसत होता याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. भारतीय शास्त्रातील संकल्पना आधुनिक वैज्ञानिकांना मान्य असलेल्या कसोटींवर उतराव्या म्हणून पंचमहाभूत सिद्धांत इ. मूळ संकल्पनांपासून योग, आयुर्वेद, ज्योतिष इ. कसे तर्कशुद्ध पद्धतीने मांडता येतात याचे अस्पष्ट चित्र तयार करता येते, पण संशोधन परंपरा अखंड न राहिल्याने पूर्णपणे स्वीकारता येईल अशी मांडणी (logically deductive theory) करणे डायनोसोरच्या फोटोइतकेच अवघड आहे.
योग आणि आयुर्वेद यांचा प्रयोगसिद्ध अनुभव आता सहसा आधुनिक वैज्ञानिकही नाकारत नसावेत. (तर्कशुद्ध मांडणी नाही हा आक्षेप या शाखांवर आहेच.) पण ज्योतिषशास्त्राची परिस्थिती या दोन प्रचलित शाखांपेक्षा थोडी बिकट आहे. आधुनिक वैज्ञानिक ज्योतिष हे शास्त्र म्हणून मान्य करण्यास अगदीच तयार नाहीत. योग आणि आयुर्वेद या शाखांमधील सिद्धांत मोजणे हे त्या मानाने आधुनिक यंत्रांना शक्य आहे. कारण या सिद्धांतांतील परिणाम हे शरीरावर होतात आणि आधुनिक यंत्रे असा परिणाम मोजू शकतात. उदा. योग किंवा आयुर्वेदिक औषधांचा रक्तदाबावर होणारा परिणाम मोजता येऊ शकतो. ज्योतिषातील सिद्धांत सहसा मानवी मन आणि अनुभव यासंबंधी असतात. आधुनिक विज्ञानात याबद्दल विचार मांडणारी मानसशास्त्र (Psychology) ही शाखा आहे. मानसशास्त्रातील सिद्धांत अनिश्चित (inexact) स्वरूपाचे असतात. फिजिक्स, केमेस्ट्रीसारखे निश्चित किंवा थोडे कमी पण बायलॉजी इतकेही निश्चित नसतात. त्यामुळे मानसशास्त्रातील सिद्धांत संख्याशास्त्रीय पद्धतीने (Statistically) सिद्ध केले जातात. अशा संख्याशास्त्रीय परीक्षा घेताना परिणामांवर अनेक गृहीतकांचा प्रभाव पडतो याचे भान ठेवले नाही तर सिद्धांत खरा असूनसुद्धा खोटा ठरविला जाऊ शकतो. सॅम्पल पीस नीट न निवडणे, सिद्धांत खोटा आहे असे (हेतुपुरस्सर किंवा अहेतुक) गृहीत धरून प्रश्नावली तयार करणे इ. अनेक कारणांनी संख्याशास्त्रीय परीक्षांचे परिणाम आधी सिद्धांत म्हणून स्वीकारल्यावर नंतर अमान्य केले गेले आहेत. २० ज्योतिषी गोळा करून त्यांची एखादी परीक्षा घेऊन ज्योतिष हे शास्त्र नाही किंवा तशाच प्रकारे योग, आयुर्वेद यांचा अस्वीकार करणे हे आधुनिक विज्ञानाच्या प्रामाणिक साधकाला नक्कीच क्लेश देत असणार. २०० कुंडल्या मृत अथवा जिवंत व्यक्तींच्या देऊन त्यातील मृत कोण आहेत ते ओळखा, अशी परीक्षा खरेच घेतली गेली आहे. अशा प्रकारचे आव्हान देणे किंवा स्वीकारणे हे दोन्ही, संख्याशास्त्राचे प्राथमिक ज्ञान दुर्लक्षित केले तरच जमू शकते.
विज्ञान हे निरपेक्ष सत्य (Absolute truth) सांगेन असा दावा करीत नाही. विज्ञान म्हणजे जीवनात तपासता येईल आणि भविष्यातील अचूक अंदाज वर्तवण्यासाठी उपयोगी असे सत्याचे प्रारूप तयार करण्याची अखंड प्रक्रिया. (Science is an endless process of designing Model of the reality which can be practically verified and used to predict the future of any system). आधुनिक पाश्चात्त्य परंपरेतील विज्ञान, पदार्थाची रचना सूक्ष्म मूलभूत कणांपासून (इलेक्ट्रॉन, प्रोटॉनपासून नव्या हिग्ज् बोसॉनपर्यंत) होते असे मॉडेल मांडते. भारतीय शास्त्रे पंचमहाभूतांपासून सर्व पदार्थ तयार होतात असे मॉडेल मांडतात. संस्थात्मक पाठबळावर आधुनिक विज्ञान तपासणे सहज शक्य झाले आहे, पण प्रस्थापित नसल्यामुळे आणि म्हणूनच संस्थात्मक पाठबळ नसल्यामुळे भारतीय शास्त्रे नावडतीच्या मिठासारखे अळणी झाले आहेत. पुरेशी संसाधने आणि पुरेसा काळ देऊन जर भारतीय शास्त्रे कुचकामी आहेत असे सिद्ध झाले तर तो निर्णय अभिनिवेश आणि पूर्वग्रह यांनी दूषित नसेल. एक कोपऱ्यातली परीक्षा घेऊन ‘झालं, आता तुमचं आयुर्वेद, ज्योतिष काही शास्त्र नाही’ असं म्हणणं म्हणजे रडीचा डाव झाला. जोवर अशी सर्वसमावेशक परीक्षेची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोवर फारतर पुढील विधान करता येईल – आधुनिक विज्ञानाने एखाद्या विषयास शास्त्र म्हणण्यासाठी काही कसोटय़ा निश्चित केल्या आहेत. त्या कसोटय़ांनुसार ज्योतिष हे (आधुनिक पद्धतीचे) शास्त्र आहे का हे न तपासल्यामुळे कोठलेही ठोस विधान करता येत नाही.
एका परंपरेत विकसित झालेल्या विषयाला, दुसऱ्या परंपरेने ठरविलेल्या कसोटय़ा लावणे हे अनेक वेळा अन्यायकारक ठरते. भारतीय परंपरेत शास्त्र हा शब्द अनेक संदर्भात वेगळ्या अर्थाने वापरला जातो. परंपरेत शास्त्र म्हणवल्या गेलेल्या सर्व विद्याशाखांची (योग, आयुर्वेद, ज्योतिष, वास्तू इ. अनेक) जडणघडण आधुनिक विज्ञानात जशी होते तशी झालेली नाही. दोन्ही परंपरांचे स्वत:चे स्वभाव आहेत. उदाहरणार्थ, भारतीय परंपरेतील शास्त्रीय लिखित साहित्य आधुनिक विज्ञानाला अपेक्षित असे शिस्तबद्ध नाही. मुळात आधुनिक विज्ञानाला अपेक्षित असलेली शिस्तबद्धता आपल्या परंपरेत विकसित झालेल्या शास्त्राच्या, त्या त्या काळातील प्रयोजनास मारक असू शकते, यासंबंधीची चर्चा करणे या लेखाच्या मर्यादेत शक्य नाही.
ज्योतिषशास्त्रीय वैज्ञानिक कालगणना  
या भागाकडे वळण्याआधी, आधुनिक शिक्षण घेतल्यामुळे, ज्योतिषशास्त्राला नाकारणारे, पण खुल्या मनाचे जे नागरिक आहेत त्यांच्या मनाचे याकडे बघण्याचे दरवाजे किलकिले करण्यासाठी काही मुद्दे मांडतो. अनेक गोष्टी आपण रोजच्या जीवनात बोलत असतो. त्यांचे एकमेकांशी आदानप्रदान झाल्यास झाला तर उपयोगच होतो. पुढील काही संदर्भ आपण आपल्या जीवनात तपासून पाहावेत आणि पटल्यास ज्योतिषाकडे उपहासाने बघू नये ही विनंती.
चंद्राचा ठळक दिसणारा एक परिणाम म्हणजे भरती-ओहोटी. चंद्राच्या विशिष्ट स्थानांनुसार समुद्रातील पाणी चंद्राकडे ओढले जाते, त्याला आपण भरती म्हणतो. याच संदर्भात आपण वनस्पती आणि प्राण्यांचा विचार करू. वनस्पती व प्राण्यांमध्ये (बहुधा) ६० ते ७०% पाणी असते. जसा आणि ज्या प्रमाणात समुद्राच्या पाण्यावर चंद्राचा परिणाम होतो, तसा आणि तेवढय़ाच प्रमाणात तो आपल्या शरीरातील किंवा झाडाच्या विविध भागांतील पाण्यावरही होते असे मानले जाते. म्हणजेच आपली मानसिक स्थिती ज्या पेशींच्या कार्यावर अवलंबून असते त्या पेशींमधील पेशीजलावरही होत असणार. कदाचित तो नगण्यही असेल. पण मुळातच आपली मज्जासंस्था त्यांच्या कार्यात आपल्या दृष्टीने फार नगण्य असणारे इलेक्ट्रिक सिग्नल्स वापरतात. एवढे सूक्ष्म इलेक्ट्रिक सिग्नल्स मनावर परिणाम करतात तर चंद्राचा पेशिजलावर होणारा नगण्य परिणामही मनोवस्था ठरवण्याइतका प्रभावी असू शकतो. हा ठाम दावा नाही, शक्यता मांडली आहे. अशा चंद्राला भारतीय ज्योतिषात मनाचा कारक ग्रह म्हटले आहे. हजारो वर्षांच्या पारतंत्र्यात खंडित झालेल्या परंपरांमुळे असे अनेकानेक संदर्भ, सिद्धांत आपल्याला माहीत नाहीत अथवा त्यांमागची तकर्शुद्ध कारणे माहीत नाहीत.
आता आपल्या ज्योतिषात वापरली जाणारी कालगणना सुसंगत आणि वैज्ञानिक आहे का, ते पाहू.
परंपरेने भारतीय ज्योतिषशास्त्राचे तीन भाग केले जातात. सिद्धांत, संहिता आणि होरा. सिद्धांतामध्ये खगोलीय गणिताचा विचार आहे. संहितामध्ये (प्राधान्याने राजकीय, सामाजिक, नैसर्गिक) आणि होरामध्ये (प्राधान्याने जातक म्हणजेच व्यक्तिगत) फलज्योतिषाचा विचार केला आहे. सिद्धांत भागातील गणिते भारतीय ज्योतिषशास्त्रात संहिता आणि होरामध्ये वापरली जातात. परंपरेत त्याची एकत्रित मांडणी पंचांगात केली गेली. आपण पुढील भागात सिद्धांत भाग म्हणजेच पंचांग कसे तर्कसुसंगत (वैज्ञानिक) आहे आणि एका अर्थाने व्यवहार्य (practical and natural) आहे याचा विचार करू या.
सर्व विज्ञानशाखांमधील आद्य विज्ञानशाखा म्हणून खगोल गणितास मान्यता आहे. विज्ञानात शिस्तबद्ध विश्लेषणाला फार महत्त्व आहे. असे विश्लेषण इतिहासात सर्वात प्रथम खगोलीय घटनांबाबतीत झाले. त्यामुळे खगोलीय गणित ही आद्य विज्ञानशाखा आहे. भारतात अतिप्राचीन काळापासून खगोल गणितात कौतुकास्पद प्रगती झाली. या भारतीय खगोल गणिताचाच एक भाग म्हणजे भारतीय कालगणना.
कालगणना म्हणजे काळ मोजणे. या अनादी अनंत काळ संकल्पनेने तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ अशा दोघांनाही फार त्रास दिला आहे. काळ म्हणजे काय? त्याची व्याख्या करावी कशी? हे प्रश्न समाधानकारकपणे सोडविणे आजपर्यंत जमलेले नाही. संस्कृती आणि परंपरा विकसित होत असताना काळाकडे भारतीयांनी कसे पाहिले हे पाहू या.
विश्वात अखंड बदल घडत असतात. त्या बदलांच्या प्रक्रियांचे जे ठळक टप्पे असतात त्यांना आपण ‘घटना’ म्हणतो. अशा घटनांमुळेच आपल्याला काळाची जाणीव होते. या घटना काळाच्या तथाकथित मोजपट्टीवर पुढे-मागे मांडलेल्या असतात. मागे मांडलेल्या घटनांना इतिहास म्हणतात आणि पुढे मांडलेल्यांना भविष्य. कुठलीही गोष्ट पट्टीने मोजायची असेल तर त्या पट्टीचे भाग करावे लागतात. जसे फूटपट्टीचे इंचा-इंचाचे किंवा मीटरपट्टीचे सेंटीमीटरचे भाग. काळ या पट्टीचे तसे आपण दिवस, महिना, वर्ष असे भाग केले. पण जसा १०० सेंटीमीटरचा एक मीटर होतो, तसा १० महिन्यांचे एक वर्ष का होत नाही? वर्षांत बाराच महिने का? आठवडय़ाचे वार सातच का? आणि ते रवि-सोम-मंगळ.. याच क्रमाने का? राशी पण बाराच कशा? तेरा किंवा अकरा का नाहीत? नक्षत्रे २७ का? या सगळ्याला एक इतिहास आहे. तो असा –
रोज सूर्य उगवतो, डोक्यावर चढतो, मावळतो, अंधार पडतो, तारे दिसू लागतात. ते तारेही आकाशात स्थिर नसतात. तेही सूर्याप्रमाणे पूर्वेकडून उगवतात आणि पश्चिमेकडे मावळतात. असे निरीक्षण अनेक दिवस केल्यावर त्यातील नियमितपणा आपल्या पूवर्जाना लक्षात आला असेल. या नियमित चक्रात सर्वात पहिली वेगळेपणा दाखविणारी प्रक्रिया लक्षात आली असेल ती म्हणजे चंद्राच्या कला. चंद्राचे पूर्णबिंब (पौर्णिमा) किंवा चंद्र मुळीच न दिसणे (अमावास्या) या घटना साधारणपणे १५-१५ दिवसांनी होतात हे लक्षात आले असेल. यातूनच पक्ष (शुक्ल-कृष्ण) व महिना (१५ + १५ = ३० दिवस) या संकल्पना तयार झाल्या. या महिन्यास चांद्र महिना असे म्हणतात.
भारतात दर काही दिवसांनी पाऊस पडतो, काही दिवसांनी थंडी येते, उन्हाळा येतो. या चक्राला एक नाव दिले-वर्ष. या वर्षांत सूर्य नक्षत्रचक्रात एक पूर्ण फेरी मारतो हे दिसले. अंगणातून पाहताना गावातल्या देवळामागून उगवणारा सूर्य हळूहळू जागा सोडून उगवतो. देवळाच्या उजवीकडून उगवतो. असा एका टोकाला पोहोचल्यावर, परत, उगवताना देवळाजवळ येऊ लागतो. काही दिवसांनी देवळाला ओलांडून डावीकडून उगवू लागतो. आणि परत काही दिवसांनी देवळामागून उगवतो. हे दक्षिणायन-उत्तरायणाचे चक्र पूर्ण करायला तो वर्ष घेतो हेसुद्धा लक्षात आले. अशा या वर्षांत बारा वेळा चंद्र पूर्ण होतो, बारा वेळा दिसेनासा होतो. म्हणून वर्षांचे बारा भाग पडले. वर्षांत बारा महिने आले. (परंतु चंद्र सरासरीमानाने २९।। दिवसांत त्याच्या कलांचे चक्र पूर्ण करतो. त्यामुळे बारा चांद्र महिन्यांना ३५४ दिवस लागतात. हा ३६५ आणि ३५४ मधील फरक भरून काढण्यासाठी अधिक महिन्याची सोय इत्यादी विषय स्वतंत्र लेखाचे आहेत.) १२ हा आकडा आवडला म्हणून वर्षांचे १२ महिने झाले नाहीत.
आकाशातील चांदण्यांत दोन प्रकार आहेत हे निरीक्षणावरून स्पष्ट झाले. ज्या चांदण्या एकमेकांपासून विशिष्ट अंतरावर असतात आणि ते अंतर कधीच बदलत नाहीत त्यांच्यासाठी तारे, नक्षत्र हा प्रकार तयार झाला. यांच्यापेक्षा वेगळे वागणारे ‘ग्रह’ झाले. ग्रहांचे आकाशातील भ्रमण नक्षत्रांच्या पाश्र्वभूमीवर होत आहे असे वाटते. कारण नक्षत्रांची एकमेकांपासून अंतरे बदलत नसल्याने त्यांच्या न बदलणाऱ्या आकृत्या दिसतात. त्या न बदलणाऱ्या आकृत्या काढलेल्या पडद्यावरून हे ग्रह फिरताना दिसतात (ग्रह या शब्दाची एक व्युत्पत्ती ‘नक्षत्रांकडून सोम ग्रहण करून आपल्याला दणारे ते ग्रह’ अशी सांगितली जाते. व्युत्पत्तीपुरताच हा संदर्भ आहे. संदर्भ वैज्ञानिक आहे का नाही ही चर्चा येथे अपेक्षित नाही.) भारतीय खगोलशास्त्रात या व्याख्येनुसार सूर्य व चंद्रसुद्धा ग्रह होतात (ज्यांना आपण आधुनिक विज्ञानानुसार स्टार आणि सॅटेलाइट मानतो). ग्रह = प्लॅनेट हे ढोबळ भाषांतर झाले. ज्या अर्थाने ग्रह हा शब्द भारतीय परंपरेत वापरला जातो त्याला इंग्रजीत समानार्थी शब्द नाही. असे डोळ्यांना दिसणारे सात ग्रह आहेत. रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी. यांना एकेका दिवसाचे आधिपत्य दिले आणि वार तयार झाले. पण याच क्रमाने का? हा प्रश्न उरतोच.
नियमित निरीक्षणातून या सर्व ग्रहांची, नक्षत्रांच्या पाश्र्वभूमीवर गती काढता येते. या गती कायम बदलत असतात. प्रत्येक ग्रहाच्या अधिकतम गती काढल्या आणि त्या चढत्या क्रमाने मांडल्या तर शनी, गुरू, मंगळ, रवी, शुक्र, बुध, चंद्र या क्रमाने येतात. एका दिवसाचे चोवीस होरे या ग्रहांना याच क्रमाने वाटायचे (सात ग्रह संपल्यावर परत पहिला या प्रकारे) आणि पुढच्या दिवसाचा पहिला होरा, आधीच्या दिवसाच्या शेवटच्या होऱ्याच्या ग्रहाच्या पुढच्या ग्रहास (वर सांगितलेल्या क्रमाने) दिला तर ओळीने सात दिवसांचे पहिले होरे रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरू, शुक्र आणि शनी असे येतात. जो त्या दिवसाचा पहिला होरा, तोच त्या दिवसाचा वार ठरला. हा वारांच्या क्रमामागचा ऐतिहासिक संदर्भ.
संस्कृतमध्ये मोठा या अर्थाने गुरू हा शब्द वापरला जातो. आधुनिक विज्ञानही जेव्हा गुरूलाच सर्वात मोठा सूयर्मालेतील ग्रह (प्लॅनेट या अर्थाने) म्हणते त्यावेळी त्याचे भारतीय परंपरेतील गुरू हे नाव केवळ योगायोगाने आले असावे असे म्हणणे अन्यायकारक होईल.
वारांची क्रमवारी, गुरू ग्रहाचे नाव असे भारतीय खगोलशास्त्रातील अनेक संदर्भ देता येतील. यावरून असे लक्षात येते की, निरीक्षणातून समजलेल्या चक्रांचा, घटनांचा आढावा घेत, त्यांचा आपल्या कालगणना पद्धतीशी मेळ घालत भारतीय खगोलशास्त्राचा भक्कम पाया घातला गेला. हे अनंत विश्व, या विश्वातील मोहरीच्या दाण्याएवढी पृथ्वी, या पृथ्वीवरील अणुरेणूंएवढे आपण, आपल्या भोवतीचा निसर्ग हे सगळे वेगवेगळ्या कारणांनी, संदर्भानी एकमेकांशी घट्ट बांधले गेले आहेत. या बांधलेपणाचंच प्रतिबिंब भारतीय खगोल-ज्योतिष विचारांत आणि पर्यायाने कालगणनेत उमटलं आहे.
आपल्या शरीरातील आतडी, यकृत, हृदय हे स्वतंत्र अवयव नाहीत. त्याचं असणं एकमेकांवर अवलंबून आहे. या विश्वातील घटकांचे यापेक्षा वेगळे काही असण्याची शक्यता नाही. ग्रह, नक्षत्र हे या विश्वातील घटक याच भूमिकेने भारतीयांनी आपले मानले. त्यांच्या, आपल्याशी असणाऱ्या संबंधांचा शोध घेतला आणि त्यांना आपल्या जीवनात पंचांग, ज्योतिष, कुंडल्या या स्वरूपात स्थान दिले. त्यामुळेच एखाद्यास थोडी जरी भारतीय खगोलशास्त्राची ओळख असेल तर कॅलेंडर-घडय़ाळाशिवाय, पंचांगाशिवाय जंगलात किंवा समुद्रात गेल्यावरही आकाश निरीक्षणांवरून तिथी, भारतीय महिना, शक सांगता येईल. (भारतीय महिना ओळखण्यासाठी त्याची नावे कशी पडली हे पाहू या. चैत्र महिन्यात पौणिर्मेला चंद्र चित्रा नक्षत्रात, थोडय़ाफार फरकाने असतो. वैशाख महिन्यात विशाखा नक्षत्रात असतो. इ. सर्व १२ महिन्यांत होते. राम आणि कृष्ण मोठे राजे किंवा पूज्य असले तरी कालगणनेत त्यांच्या नावाचा उपयोग अशास्त्रीय झाला असता. नक्षत्रांवर महिन्याची नावे ठेवणे सुसंगत आणि निरीक्षणाकरिता सोपे. त्यामुळे ज्युलियस सीझरवरून जुलै हे नाव ठेवण्यासारखे अशास्त्रीय प्रयोग भारतीय कालगणनेत नाहीत. येथे अभिनिवेशाने पाश्चात्त्य कालगणनेला नावे ठेवण्याचा उद्देश नाही. फक्त वस्तुनिष्ठपणे अशास्त्रीयता दाखवण्याचा हेतू आहे.)
ज्या आकाशाची मदत घेऊन आपण काळ मोजतो, ते आकाश आपण आपल्या जीवनाशी असे बांधून घेतले आहे. भारतीय महिन्याची सुरुवात अमावास्येनंतरच्या (उत्तर भारतात पौणिर्मेनंतरच्या) दिवशी होते. पौर्णिमा-अमावास्या या सहज कळणाऱ्या घटनेने महिना सुरू करणे खूपच नैसर्गिक आहे. पण १ जानेवारीला (किंवा कोठल्याही इंग्रजी महिन्याच्या १ तारखेला) महिना का सुरू करायचा हे आकाश किंवा निसर्गातून कळूच शकत नाही. हीच तऱ्हा दिवस सुरू करण्याची. भारतीय परंपरेत सूर्योदयाला दिवसाची सुरुवात मानतात. सूर्योदयापासून दिवसाची पहिली घटी मोजली जाते. अशी सहज आणि ठळकपणे निसर्ग सुचवीत असलेली घटना सोडून, पाश्चात्त्य पद्धतीने अनाकलनीय अशा रात्री १२ वाजता नवा दिवस का सुरू करायचा याचे उत्तर मिळत नाही. निसर्ग-आकाशापासून तोडून वेगळ्याच पद्धतीने आपण काळ का मोजायचा? सगळ्या जगात पाश्चात्त्य पद्धत वापरली जाते. त्यामुळे व्यवहार म्हणून आपणही वापरतो हे मान्य. पण ही पद्धत कालगणनेच्या मूलभूत तत्त्वांपासून फार दूर गेलेली आहे हे निश्चित. तुलनेने भारतीय कालगणना पद्धत मूळ तत्त्वांना धरून तर आहेच आणि दैनंदिन जीवनात नैसर्गिकपणे महत्त्वाची भूमिका समर्थपणे बजावत होती.
आधुनिक घडय़ाळे आणि कॅलेंडर पद्धती बंद करून प्राचीन पद्धतीने वेळा व दिवस मोजावे असा अव्यावहारिक हेतू माझ्या मनात नाही. पण निसर्गातील अनुभवांच्या आधारे आपण विज्ञानशाखा विकसित केल्या. त्यांच्याशी योग, आयुर्वेद, पंचांग, ज्योतिष हे विषय सुसंगतपणे जोडलेले आहेत. हे पाहून त्या विषयांकडे पाहण्याची अधिक सकारात्मक दृष्टी मिळावी हा माफक उद्देश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा