सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष : गुरू-बुधाचा लाभ योग हा व्यावहारीक दृष्टय़ा उपयोगी ठरणारा योग आहे. नातीगोती जपावीत. कामाच्या व्यापात कुटुंबाकडे दुर्लक्ष नको. नोकरी-व्यवसायात नव्या जबाबदाऱ्या स्वीकाराल. आपल्या प्रस्तावाला वरिष्ठांची संमती मिळेल. सहकारी वर्ग मदतीची तयारी दाखवेल. जोडीदाराचा हरहुन्नरी स्वभाव महत्त्वाच्या निर्णयप्रसंगी कामी येईल. मुलांचा प्रगतीचा आलेख उंचावेल. स्नायू आणि सांधे यांच्याशी निगडित समस्यांवर त्वरित औषधोपचार घ्यावा लागेल. डोकं शांत ठेवावे.
वृषभ : चंद्र-शुक्राचा नवपंचम योग आर्थिकदृष्टय़ा लाभदायक ठरेल. भविष्यातील योजनांची उपयुक्तता वाढेल. अंदाज खरे ठरतील. नोकरी-व्यवसायात आजच्या कष्टाचे उद्या नक्की फळ मिळेल. वरिष्ठांच्या विश्वासास पात्र ठराल. सहकारी वर्गाच्या सल्ल्यानुसार समस्येवर चर्चा होईल. जोडीदाराच्या कामकाजातील अडथळे हळूहळू दूर होतील. मुलांवर मोठय़ा जबाबदाऱ्या सोपावताना खबरदारी घ्यावी. सर्दी पडसे, कफ दाटणे, नाक चोंदणे यांसारखे त्रास होतील. डोकं जड होईल.
मिथुन : चंद्र-बुधाचा नवपंचम योग हा बौद्धिक लाभ देणारा योग आहे. चंद्राचा मनमोकळा स्वभाव आणि बुधाचे कुतूहल, चौकस वृत्ती यामुळे संबंधित व्यक्तींना व्यवहारचातुर्य दाखवाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ आपली मते विचारात घेतील. अंतिम निर्णय प्रक्रियेत आपला सहभाग असेल. सहकारी वर्गातील लोकांकडून विरोध पत्करावा लागेल. गुरूच्या साहाय्याने हा विरोध फार काळ टिकणार नाही. मुलांचे प्रश्न धीराने सोडवाल. पचन व उत्सर्जनसंस्थेत शरीरातील उष्णतेमुळे त्रास उद्भवेल.
कर्क : चंद्र-शनीचा लाभ योग हा नियंत्रण शिकवणारा योग आहे. चंद्राच्या अनावश्यक खर्चावर शनीच्या काटकसरीपणाचा अंकुश बसेल. आर्थिक गणिते सुटतील. नोकरी-व्यवसायात नवे करार करताना सावधगिरी बाळगावी लागेल. वरिष्ठांच्या तापलेल्या स्थितीत चर्चा लाभकारक ठरणार नाही. सहकारी वर्गाची अरेरावी सहन करू नका. मुलांना शांतपणे वेळेचे महत्त्व पटवून द्याल. डोकं आणि खांदे यांची काळजी घ्यावी. खांदे आखडल्यास वैद्यकीय उपचारासह व्यायामाची गरज भासेल.
सिंह : रवी-नेपच्यूनचा केंद्र योग भावनिक संघर्ष निर्माण करणारा योग आहे. अधिकार आणि नातेसंबंध यांच्यात समतोल साधणे कठीण जाईल. मानसिक स्वास्थ्य सांभाळा. नोकरी-व्यवसायात वेगळय़ा पद्धतीने स्वत:ला सादर कराल. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मोठय़ा संधीचे सोने कराल. सहकारी वर्ग द्विधा मन:स्थितीत असेल. जोडीदाराची प्रगती आणि उन्नती होईल. मुलांसाठी थोडा वेळ काढून त्यांच्या समस्या समजून घ्याल. मूत्रिपडाचे त्रास बळावतील.
कन्या : रवी-चंद्राचा नवपंचम योग हा मेहनतीचे फळ देणारा योग आहे. विलंब लागला तरी धीर सोडू नका. जुळून येणारी गोष्ट थोडक्यासाठी हुकवू नका. नोकरी-व्यवसायात बुधाच्या बुद्धिमत्तेचा योग्य उपयोग कराल. सहकारी वर्गाच्या मदतीची फारशी अपेक्षा ठेवू नका. जोडीदाराचा आर्थिक लाभ होईल. त्याचा सल्ला उपयोगी ठरेल. मुलांच्या आरोग्यासाठी विशेष जागरूक राहाल. रक्ताभिसरणासंबंधित अडचणी उदभवतील. नियमित व्यायाम आणि पथ्य पाळणे गरजेचे ठरेल.
तूळ : चंद्र-गुरूचा नवपंचम योग हा गुरुजनांकडून उत्तम मार्गदर्शन मिळणारा योग आहे. कामानिमित्त मानसन्मान मिळेल. नोकरी-व्यवसायात उन्नती होईल. कामाचा व्याप वाढेल. वरिष्ठ आणि सहकारी वर्गाच्या साहाय्याने कामे वेग घेतील. अतिचिकित्सा टाळावी. जोडीदाराच्या आर्थिक बाबी, समस्या यांचे उत्तर सापडेल. मुलांवरील संस्कार फळास येतील. शिस्त आणि मौज यांचा योग्य तो समन्वय साधाल. शिरा आखडणे, सांधे धरणे, मान लचकणे असे त्रास झाल्यास विशेष काळजी घ्यावी.
वृश्चिक : रवी-चंद्राचा केंद्र योग हा आपली ऊर्जा अधिक खर्ची पाडणारा योग आहे. निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होईल. नोकरी-व्यवसायात एखादा मुद्दा मांडल्यास त्याच्या बऱ्यावाईट दोन्ही बाजू पुन्हा एकदा तपासून बघाल. वरिष्ठ अतिबारकाव्याने आपल्या कामाची तपासणी करतील. चोख आणि नियमाला धरून अशी उत्तरे आपण तयार ठेवाल. वाद मात्र टाळावा. जोडीदाराच्या मेहनतीचे फळ मिळण्यास वेळ लागेल. त्याची चिडचिड कमी करण्याचा प्रयत्न कराल. मनस्तापामुळे डोकेदुखीचा त्रास होईल.
धनू : चंद्र-बुधाचा केंद्र योग मनोबल वाढवणारा योग आहे. धाडसी निर्णय घेताना प्रथम मन माघार घेईल. परंतु बुद्धिमत्ता आणि व्यावहारिक विचारांची साथ मिळाल्याने आगेकूच कराल. नोकरी-व्यवसायात स्वत:च्या विचारांचा पाठपुरावा कराल. वरिष्ठांची संमती मिळवाल. सहकारी वर्गाकडून कामे करून घेताना आपलीच दमछाक होईल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. एकत्रितपणे विचार करून निर्णय घ्याल. मुलांना बचतीचे महत्त्व पटवून द्याल. डोळय़ांना आराम द्यावा.
मकर : चंद्र-शुक्राचा लाभ योग हा कलात्मक वृत्तीला जोड देणारा योग आहे. आपल्यातील लहानशा बदलाने मोठय़ा लाभदायक गोष्टी मिळवाल. नोकरी-व्यवसायात कामाचा व्याप वाढला तरी मनावरील ताण कमी होईल. वरिष्ठ आपल्यावरील विश्वास व्यक्त करतील. सहकारी वर्गासह तार जुळेल. हाती घेतलेले काम मार्गी लागेल. चिंता मिटेल. जोडीदाराची साथ वाखाणण्याजोगी असेल. मुलांच्या हिताचा विचार कराल. डोळे कोरडेपणामुळे चुरचूरतील. वेळेवर खबरदारी घ्यावी लागेल.
कुंभ : चंद्र-नेपच्यूनचा युती योग हा अंत:स्फूर्तीला पूरक असा योग आहे. नव्या संकल्पना अमलात आणाल. नित्य नैमित्तिक कामांमध्ये रस निर्माण कराल. भक्तिभाव जागा होईल. नोकरी-व्यवसायात गरजवंताला मदत कराल. आर्थिक उन्नती होईल. मेहनतीचे चीज होईल. वरिष्ठांची वाहवा मिळवाल. सहकारी वर्गाची मोलाची साथ मिळेल. जोडीदाराच्या पाठीशी उभे राहाल. मुलांचे भाग्य उजळेल. कामाचा परतावा चांगला मिळेल. प्रवासात तब्येत सांभाळा. मान व खांद्यांची विशेष काळजी घ्यावी.
मीन : चंद्र-मंगळाचा नवपंचम योग हा उत्साही वृत्तीला पोषक ठरेल. गुरुचे पाठबळ कमी असले तरी मंगळाची शक्ती आणि उत्साह मिळत राहील. नोकरी-व्यवसायात नवी मोठी झेप घेताना सर्व बाजूंनी विचार करणे आवश्यक ! वरिष्ठांना आपले म्हणणे पटेलच असे नाही. सहकारी वर्गासह वाद वाढवू नका. जोडीदाराचा उत्कर्ष आनंददायक असेल. अधिकारात वाढ होईल. मुलांवर त्यांच्या लहानमोठय़ा जबाबदाऱ्या सोपवाल. त्यांचा आत्मविश्वास वाढवाल. पोटातील दाह वाढेल. अपचन होईल.