सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेष चंद्र-बुधाच्या केंद्र योगामुळे बुद्धिमत्तेचा योग्य उपयोग कराल. कायद्यातील खाचाखोचांचा सखोल अभ्यास कराल. नोकरी-व्यवसायात सतर्क राहिल्यामुळे फसवणूक टळेल. वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगती कराल. सहकारी वर्गाकडून विशेष साहाय्य मिळेल. त्यांचे कामातील सातत्य आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी लाभकारक ठरेल. जोडीदारासह सूर जुळतील. जोडीदाराच्या शब्दांना मान मिळेल.

वृषभ चंद्र-मंगळाच्या लाभ योगामुळे एकंदर उत्साह वाढेल. कामाच्या गतीमध्ये वाढ होईल. वरिष्ठांचे साहाय्य योग्य वेळी मिळाल्यामुळे संस्थेच्या फायद्याचे ठरेल. नवे करार करताना विचारपूर्वक निर्णय घ्याल. आत्मविश्वास वाढेल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात त्याची कीर्ती पसरेल. मान वाढेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. उत्सर्जन संस्थेचे आजार बळावतील. उष्णतेचा त्रास टाळण्यासाठी आहारात बदल करावा लागेल.

मिथुन चंद्र आणि गुरू यांच्या लाभ योगामुळे शिक्षण क्षेत्रात प्रगती कराल. गुरुजनांकडून मार्गदर्शन मिळेल. नोकरी व्यवसायातील प्रयत्नांना यश मिळेल. कष्टाचे चीज होईल. कीर्ती, मानसन्मान मिळेल. सहकारी वर्गाचे वर्चस्व वाढेल. त्यांच्या कलेने घ्यावे लागेल. हितशत्रूंचे डाव हाणून पाडाल. जोडीदाराच्या अडचणींवर उपाय शोधाल. त्याची स्थिती समजून घ्याल. कुटुंब सदस्यांची प्रगती होईल. हाडे, सांधे, माकडहाड यांची दुखणी डोके वर काढतील.

कर्क चंद्र-बुधाच्या नवपंचम योगामुळे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरेल. व्यवहारज्ञान आणि हुशारीचे कौतुक होईल. नोकरी-व्यवसायात नव्या संकल्पना मांडाल. अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा उपयोग कराल. वरिष्ठांचे विचार अमलात आणाल. सहकारी वर्गाची चांगली साथ मिळेल. जोडीदाराचे त्याच्या कार्यक्षेत्रात नावलौकिक पसरेल. अधिकार योग येतील. कुटुंबासाठी चांगल्या योजना राबवाल. उष्णतेचे विकार, फोड, पुटकुळ्या यांचा त्रास होईल.

सिंह चंद्र व शुक्र यांच्या समसप्तम योगामुळे शुभ कार्यात रुबाब वाढेल. कलेच्या क्षेत्रात प्रगती कराल. नोकरी-व्यवसायात नवनवीन योजनांचा प्रस्ताव मांडाल. व्यवस्थापक आणि कामगार, सहकारी वर्ग यांच्यात मेळ घडवून आणाल. कायद्याच्या चौकटीतील कामांना गती मिळेल. जोडीदाराच्या भावनांची कदर कराल. त्याचे विचार आणि सल्ला आपल्या प्रगतीला साहाय्यकारी असेल. कुटुंब सदस्यांच्या आजारपणामुळे आठवडा व्यस्त जाईल.

कन्या आत्माकारक रवी आणि मनाचा कारक चंद्र यांच्या नवपंचम योगामुळे यश, कीर्ती, संपत्ती वाढेल. नोकरी-व्यवसायात कष्टाचे चीज होईल. उत्साही वातावरणात कामाला गती मिळेल. वरिष्ठांच्या पाठबळामुळे नव्या मोहिमेवर आगेकूच कराल. जोडीदाराचा हात सोडू नका. त्याला आपल्या मदतीची, प्रोत्साहनाची गरज भासेल. कुटुंबातील सदस्यांची चिडचिड कमी करा. सामंजस्याने वागा. कामाच्या ताणतणावाचा आरोग्यावर परिणाम होऊ देऊ नका.

तूळ चंद्र आणि नेपच्यून या भावनाप्रधान व सर्जनशील ग्रहांच्या नवपंचम योगामुळे नव्या कल्पना सुचतील. लेखन, काव्य, कला या क्षेत्रांत मोलाची भर घालाल. नोकरी-व्यवसायात आपल्या कलागुणांना वाव मिळेल. बुद्धिमत्तेचा सुयोग्य वापर कराल. सहकारी वर्गाची मदत कराल. त्यांचे हक्क त्यांना मिळवून द्याल. तंत्रज्ञानाचा विकास कराल. जोडीदाराच्या लहरी स्वभावाचा प्रत्यय येईल. रागावर संयम ठेवाल. पचनसंस्था सांभाळा. पोटाची आणि कोरडय़ा त्वचेची काळजी घ्या.

वृश्चिक शनी-बुधाच्या लाभ योगामुळे बुधाच्या जिज्ञासू स्वभावाला शनीच्या चिकाटीची जोड मिळेल. संशोधन व विकास कार्यात प्रगती कराल. कष्टाचे फळ मिळेल. नोकरी-व्यवसायात अधिकाराचे पद भूषवाल.  सहकारी वर्गाकडून फारशा अपेक्षा ठेवू नका. कामात लहान-मोठय़ा चुका होण्याचा संभव! संस्थेचे नुकसान होण्यापासून सावधान. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. पित्त व डोकेदुखीचा त्रास वाढेल. उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक!

धनू रवी-चंद्राच्या केंद्र योगामुळे हाती घेतलेल्या कामात अनपेक्षित अडचणी येतील. जिवाची घालमेल होईल. पण मानसिक स्वास्थ्य बिघडून देऊ नका. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे म्हणणे मान्य करावे लागेल. आपल्या मतांना फारशी किंमत राहणार नाही. सहकारी वर्गाचा आधार मिळेल. मित्रमंडळी साहाय्य करतील. जोडीदार खंबीरपणे पाठीशी उभा राहील. कौटुंबिक वातावरणातील ताण कमी कराल. जननेंद्रियांची विशेष काळजी घ्यावी.

मकर चंद्र-शुक्राच्या नवपंचम योगामुळे लेखन, वाचन, ललित साहित्य, कला या क्षेत्रात यश मिळेल. अडलेली कामे गतिमान होतील. नोकरी-व्यवसायात नव्या पिढीकडून नव्या संकल्पना आत्मसात कराल. सहकारी वर्गाची विशेष छाप पडेल. त्यांच्याकडून मनाजोगती मदत मिळेल. जोडीदाराच्या भावना जपा. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे ठेवण्यासाठी ज्येष्ठ मंडळी पुढाकार घेतील. रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतील. वैद्यकीय सल्ला आवश्यक!

कुंभ रवी आणि प्लुटोच्या केंद्र योगामुळे मानापमानाचे प्रसंग ओढावतील. नोकरी-व्यवसायात अडचणींवर मात करत पुढे जाल. सहकारी वर्गाकडून मिळालेल्या सडेतोड उत्तरांमुळे कामातील रस कमी होण्याची शक्यता! जोडीदाराचा भावनिक आधार मोलाचा ठरेल. त्याच्या कार्यक्षेत्रात त्याची प्रगती होईल. कुटुंबासाठी वेळ द्याल. घरातील वातावरण आनंदी ठेवाल. खांदेदुखी, खांदे आखडणे, दंड सुजणे असे त्रास सतावतील. वैद्यकीय सल्ला घ्या.

मीन गुरू-चंद्राच्या युतीयोगामुळे अधिकाराचे पद भूषवाल. कष्टाचे चीज होईल. नोकरी-व्यवसायात ज्येष्ठ मंडळींचे मार्गदर्शन व सल्ला उपयोगी पडेल. आत्मविश्वास वाढेल. सहकारी वर्गावर सोपवलेली कामे यथायोग्य पार पडतील. जोडीदाराचे प्रश्न हुशारीने सोडवाल. त्याला धीर द्याल. कुटुंब सदस्यांच्या प्रगतीतील अडथळे दूर कराल. उष्णतेमुळे डोळे तळावतील. इन्फेक्शन होईल.

मराठीतील सर्व भविष्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astrology from 10th to 16th april 2020 rashibhavishya dd70