सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेष चंद्र-बुधाच्या युती योगामुळे भावना आणि विचार यापकी कशाला प्राधान्य द्यायचे, असा प्रश्न पडेल. नोकरी-व्यवसायात महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. परिणामांचे तारतम्य ठेवावे. सहकारी वर्गाकडून साहाय्य मिळेल. मित्रपरिवाराच्या आनंदात सहभागी व्हाल. नातेवाईकांच्या मदतीला धावून जाल. जोडीदाराच्या उपजत गुणांना पािठबा द्याल. बारीकसारीक गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ नका. अतिचिकित्सा नसावी. पोट बिघडल्यास विशेष काळजी घ्यावी.

वृषभ शुक्र-चंद्राच्या केंद्र योगामुळे कलाक्षेत्रात प्रगती कराल. तंत्रज्ञान व कलेचा उत्तम मिलाप होईल. नोकरी-व्यवसायात नव्या जबाबदाऱ्या स्वीकाराल. सहकारी वर्गाच्या त्रुटी समजून घेऊन त्यावर मात करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल. जोडीदाराचे त्याच्या कार्यक्षेत्रात वर्चस्व वाढेल. त्याच्या कामाचे कौतुक होईल. कुटुंब सदस्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल. नित्य दिनक्रमातून वेळ काढून आपले छंद जोपासाल. मानसिक समाधान मिळेल.

मिथुन भाग्य व लाभ स्थानातून झालेल्या चंद्र-रवीच्या लाभ योगामुळे अडचणीतून मार्ग काढाल. कामाचा वेग वाढेल. नोकरी-व्यवसायात सहकारी वर्गाने घेतलेले झटपट निर्णय अंगाशी येतील. जोडीदाराच्या मनाप्रमाणे सुट्टीचे आरेखन कराल. लहान-मोठे प्रवास करताना इतरांचे आरोग्य जपा. कौटुंबिक वातावरण उत्साही ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. उष्णतेचे विकार सतावतील. मूळव्याधीचा त्रास वाढेल. औषधोपचार आवश्यक!

कर्क रवी आणि शनी या शत्रू ग्रहांच्या केंद्र योगामुळे शेवटच्या टप्प्यात आलेल्या कामांमध्ये अचानक अडचणी येतील. नोकरी-व्यवसायात  सहकारी वर्गाच्या कार्यकौशल्यामुळे कामाचा भार हलका होईल. अनाठायी खर्च टाळा. मित्रमत्रिणींच्या भेटीगाठी लांबणीवर पडतील. जोडीदाराचा अहंकार दुखावल्यास त्याचा राग उफाळेल. कौटुंबिक वातावरण ज्येष्ठांच्या वर्चस्वामुळे ताब्यात राहील. उन्हाळी सर्दी, कोरडा खोकला आणि जखमेत पू होणे यापासून सावधान!

सिंह चंद्र-शुक्राच्या लाभ योगामुळे समोर आलेल्या प्रत्येक गोष्टीतील सकारात्मक बाजू विचारात घ्याल. नोकरी-व्यवसायात सहकारी वर्गाकडून चांगले साहाय्य मिळेल. विश्वासाने सोपवलेली कामे चोख पार पडतील. जोडीदाराची स्थिती समजून घ्याल. त्याच्यावर अतिरिक्त दबाव येईल. कौटुंबिक वातावरण हलकेफुलके ठेवण्याचा प्रयत्न करा. हाडे, सांधे, स्नायूबंध यांचे दुखणे अंगावर काढू नका. वैद्यकीय सल्ला घेऊन उपाय सुरू करा. पथ्य पाळा.

कन्या गतिमान चंद्र आणि मंदगती शनी यांच्या लाभ योगामुळे सातत्याने पुढे जाल. चंचलतेवर चिकाटीने मात कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. त्यांचा सल्ला अमलात आणाल. निर्णायक वेळी वैचारिक गोंधळ होईल. सहकारी वर्ग आपले कौशल्य पणाला लावेल. व्यवस्थापकांशी चर्चा कराल. धर्याने आपले मुद्दे मांडाल. नातेवाईकांच्या समस्या सोडवण्यात वेळ आणि ऊर्जा खर्ची पडेल. रोगप्रतिकारकशक्ती वाढवा.

तूळ चंद्र आणि नेपच्यूनच्या बौद्धिक राशीतील युतीयोगामुळे भावनांचा तोल राखाल. नव्या कल्पना, नवी स्वप्ने पूर्ण करण्याचा ध्यास घ्याल. नोकरी व्यवसायात नियमांचे पालन काटेकोरपणे कराल. वरिष्ठांच्या विश्वासाला पात्र ठराल. सहकारी वर्गाची मदत घेऊन कामे पूर्ण कराल. त्यांच्या कलेने घेणे गरजेचे ठरेल. जोडीदाराच्या तब्येतीच्या तक्रारी डोके वर काढतील. त्याच्यासाठी विशेष वेळ काढावा लागेल. कौटुंबिक वातावरण धावपळीचे जाईल. स्नायुबंध कमजोर होतील.

वृश्चिक गुरू-चंद्राच्या लाभ योगामुळे समाजात उद्बोधक विचारांचा प्रसार कराल. मार्गदर्शकाची भूमिका चोख बजावाल. नोकरी व्यवसायात  वरिष्ठांची मर्जी जिंकाल. सहकारी वर्गाच्या अडचणी समजून घ्याल. वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्या विचारांची सांगड घालण्यात पुढाकार घ्याल. मध्यस्थी कराल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. एकमेकांवरील विश्वासामुळे नातेवाईकांच्या मदतीला धावून जाल. ताप, डोकेदुखी, सायनस अशा त्रासांना सामोरे जावे लागेल.

धनू  चंद्र-शुक्राच्या केंद्र योगामुळे मत्री, प्रेम, आपुलकी यांना अधिक महत्त्व द्याल. मनसोक्त खरेदी कराल. नोकरी-व्यवसायात समतोल साधून व्यक्तिगत संपर्क वाढवाल. वरिष्ठांची कामे वेळेच्या आधीच पूर्ण करून द्याल. सहकारी वर्गाचा भक्कम आधार मिळेल. जोडीदाराच्या कलागुणांचे कौतुक कराल. त्याला भावनिक आधार द्याल. प्रोत्साहन द्याल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. डोकं शांत ठेवा. डोळे व घसा यांचे आरोग्य सांभाळा. औषधोपचार आवश्यक!

मकर बुध-शुक्राच्या लाभ योगामुळे अंगीभूत कला, छंद जोपासाल. यातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता. नोकरी-व्यवसायात कामामध्ये मित्रमंडळींची मदत मिळेल. निवडक मार्मिक शब्द कामी येतील. सहकारी वर्गाच्या समयसूचकतेमुळे मोठा धोका टळेल. त्यांच्या कामाची दाद द्याल. जोडीदाराच्या कामातील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न यशस्वी होईल.  कौटुंबिक वातावरण आनंदी व उत्साही ठेवावे. पाय मुरगळणे, पावले दुखणे असे त्रास होतील.

कुंभ चंद्र आणि नेपच्यून या दोन भावनाशील ग्रहांच्या युतीयोगामुळे कल्पकतेला पोषण मिळेल. कलेच्या क्षेत्रात तसेच वैज्ञानिक, तंत्रज्ञान या क्षेत्रातही नव्या संकल्पना मांडाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी राखाल. आपल्या शब्दाला मानाचे स्थान मिळेल. सहकारी वर्गावर सोपवलेली कामे अधिकाराने पूर्ण करून घ्यावी लागतील.  कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. जवळच्या नातेवाईकांकडून आनंद वार्ता मिळतील.

मीन मंगळ व बुधाच्या लाभ योगामुळे शक्ती, अधिकार आणि बुद्धी यांचा योग्य उपयोग कराल. नोकरी-व्यवसायात लाभदायक घटना घडतील. प्रगतीकडे नेणाऱ्या संधी उपलब्ध होतील. वरिष्ठांची वाहवा मिळवेल. जोडीदाराच्या गोंधळलेल्या मनाला सावरा. त्याला धीर द्या. कौटुंबिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. दातांचे दुखणे त्रासाचे होईल.

मराठीतील सर्व भविष्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astrology from 17 to 23 april 2020 dd70