सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष चंद्र-बुधाचा नवपंचम योग हा भावनिक आणि बौद्धिक स्थैर्य देईल. प्रसंगी मनातील भावना आणि डोक्यातील विचार यांच्यात संघर्ष होईल पण त्यातून सहीसलामत बाहेर पडाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ त्यांची बाजू स्पष्टपणे मांडतील. जोमाने काम सुरू कराल. सहकारी वर्गाच्या साहाय्याने मोठय़ा जबाबदाऱ्या पार पाडाल. जोडीदाराच्या कामातील बारकावे योग्य प्रकारे हाताळावे लागतील. मुलांच्या समस्या अलगद सोडवाल. अंतिम निर्णय घेताना घाई करू नका. युरिन इन्फेक्शनची शक्यता!
वृषभ चंद्र-शनीचा नवपंचम योग हा सकारात्मक विचार देणारा योग आहे. विचारांचा गोंधळ संपून जाईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे मार्गदर्शन उपयोगी पडेल. जुन्या समस्यांकडे नव्या दृष्टिकोनातून बघा, उकल लवकर होईल. सहकारी वर्गाच्या अडचणी न संपणाऱ्या आहेत असे वाटेल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात कामाच्या बोज्याखाली दडपला जाईल. आपली साथ त्याच्यासाठी मोलाची ठरेल. मुलांना त्यांच्या जबाबदारीची जाण करून द्याल. उत्सर्जन संस्थेबाबत विशेष काळजी घ्यावी.
मिथुन चंद्र-मंगळाचा नवपंचम योग हा उत्साह आणि उत्सुकता वाढवणारा योग आहे. मात्र अधीरता वाढू देऊ नका. मन स्थिर ठेवले तर संकट टळेल. नोकरी-व्यवसायात लाभकारक संधी उपलब्ध होतील. वरिष्ठ आपली कार्यक्षमता ओळखून असतील. जोडीदाराच्या कामातील अचूकता वाढेल. त्याच्या कष्टाचे चीज होईल. मुले आपले काम आणि अभ्यास याकडे गांभीर्याने पाहतील. कौटुंबिक गोष्टी चव्हाटय़ावर आणू नका. मानापमान सहन करून पुढे वाटचाल कराल.
कर्क बुध-गुरूचा केंद्र योग हा विवेकबुद्धीचा द्योतक ठरेल. बुधाची बुद्धिमत्ता आणि गुरूचे ज्ञान यांचा समन्वय साधला जाईल. नोकरी-व्यवसायात भविष्याचा विचार करून आगाऊ निर्णय घ्याल. वरिष्ठांना वास्तवाची जाणीव सौम्य शब्दात करून द्यावी. सहकारी वर्गाकडून फारशी अपेक्षा न ठेवता वेळेत काम उरकण्याच्या मागे लागाल. कौटुंबिक प्रश्न हाताळताना भावनांच्या जाळय़ात अडकू नका. मुलांना शिस्तीचा बडगा दाखवाल. अपचन आणि उत्सर्जनासंबधित त्रास वाढतील.
सिंह चंद्र-नेपच्यूनचा बौद्धिक राशीतून होणारा नवपंचम योग हा स्फूर्तिदायक योग ठरेल. नव्या संकल्पना राबवताना आवश्यक ते साहाय्य मिळेल. नोकरी-व्यवसायात उच्च अधिकारपद भूषवाल. कामाचा व्याप लीलया सांभाळाल. सहकारी वर्गाच्या गुणांची कदर कराल. जोडीदाराचे वैशिष्टय़ जाणून त्याला आश्चर्यकारक भेटवस्तू द्याल. कौटुंबिक वातावरणात उत्साह वाढेल. मुलांची प्रगती समाधान देईल. प्रवास योग संभवतो. मूत्रिपडाचे त्रास, विकार यांकडे दुर्लक्ष करू नका.
कन्या चंद्र-गुरूचा नवपंचम योग मेहनतीला यश देणारा योग आहे. वेळेचे गणित सांभाळणे महत्त्वाचे आहे. काही निर्णय लांबणीवर टाकावे लागतील. नोकरी-व्यवसायात नवे करार यशस्वी ठरतील. वरिष्ठांचा पािठबा मिळाल्याने कामाला गती येईल. सहकारी वर्गाच्या समस्या व अडचणी दूर करण्यात मदत कराल. कुटुंब सदस्यांची चांगली बातमी समजेल. जोडीदाराच्या कामाचे नवे स्वरूप अंगवळणी पडायला वेळ लागेल. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे! व्यायाम आवश्यक!
तूळ रवी-चंद्राचा नवपंचम योग हा मानसन्मान देणारा आणि आपली पत उंचावणारा योग आहे. मेहनतीची तयारी असेल तर चांगले फळ मिळेल. नोकरी-व्यवसायात नव्या क्षेत्रात पदार्पण कराल. नव्या विषयाच्या अभ्यासात मन रमेल. प्रगती कराल. वरिष्ठ आणि सहकारी वर्ग , नोकरवर्ग यांच्यातील मतभेद मिटवाल. आर्थिक व्यवहार करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. जोडीदाराच्या वागण्याचा अर्थ लावण्यापेक्षा मोकळेपणाने चर्चा करून गैरसमज दूर करावेत. हृदयाच्या तक्रारी उद्भवतील.
वृश्चिक रवी-चंद्राचा समसप्तम योग हा कीर्ती, प्रसिद्धी वाढवणारा योग आहे. परंतु राहू आणि केतूच्या साहचर्यामुळे कामात अडचणी येतील. अतिरिक्त ऊर्जा खर्चून आणि श्रम घेऊन हे अडथळे दूर करावे लागतील. नोकरी-व्यवसायात मोठी जोखीम स्वीकारू नका. अतिउत्साहाच्या भरात कोणालाही काही कबूल करून ठेवणे उचित नाही. सरकारी कामे रेंगाळतील. जोडीदाराला आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक वातावरणात सामंजस्य महत्त्वाचे! पित्तावर उपाय योजावेत.
धनू चंद्र-शुक्राचा समसप्तम योग हा कलात्मकतेला पोषक असा योग आहे. आपल्या इच्छेप्रमाणे वागूनच आपले मन शांत होईल. आप्तजनांचे मन दुखवू नका. नोकरी-व्यवसायात अचानक आलेल्या कठीण प्रसंगांना खंबीरपणे तोंड द्यावे लागेल. वरिष्ठ आपली परीक्षा घेतील. सहकारी वर्गाकडून साहाय्य मिळेल. आपले अंदाज खरे ठरतील. जोडीदाराच्या खर्चाचे प्रमाण वाढेल. मुलांच्या वाढत्या हट्टांवर नियंत्रण ठेवावे. रक्तदाब तसेच रक्तातील साखर यांची योग्य पातळी राखावी.
मकर चंद्र-गुरूचा केंद्र योग हा परीक्षा पाहणारा योग आहे. योग्य मेहनत आणि सातत्य राखून आपण या कसोटीस उतराल. नोकरी-व्यवसायात सत्याची कास सोडू नका. आपले मत प्रभावीपणे मांडाल. वरिष्ठ आणि सहकारी वर्गावर आपली छाप पाडाल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. आर्थिक गणिते सुटतील. मुलांचा उत्कर्ष होईल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. नातेवाईकांकडून शुभ वार्ता समजतील. वातविकार बळावतील. काळजी घेणे !
कुंभ शुक्र-हर्षलचा अग्नितत्त्वातल्या राशीतून होणारा नवपंचम योग हा संशोधनास उपयुक्त असा योग आहे. नवे विषय आत्मसात करताना आलेल्या शंका, प्रश्न, कुतूहल याचा सकारात्मकतेने उपयोग करून घ्याल. नोकरी-व्यवसायात अडथळे पार करत पुढे जाल. सहकारी वर्गाला न्याय मिळवून देताना आत्मविश्वासात भर पडेल. कुटुंब सदस्य प्रवास करतील. जोडीदाराला पािठबा द्याल. मुलांची मते ऐकून घ्याल. थकवा जाणवल्यास निसर्गाच्या सान्निध्यात आराम वाटेल.
मीन चंद्र-शनीचा समसप्तम योग हा चंद्राच्या चंचलतेला शनीच्या शिस्तीचा लगाम लावेल. आचारविचारात स्थैर्य येण्यास मदत होईल. नोकरी-व्यवसायात कामे रखडल्यास धीर सोडू नका. वरिष्ठांच्या आदेशांचे तंतोतंत पालन करावे लागेल. सहकारी वर्ग मदत करेल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. एकमेकांच्या अडचणी समजून घ्याल. मुलांना आधार द्याल. त्यांचे मनोबल वाढवाल. कुटुंबातील वाद चर्चेने मिटवाल. डोळय़ांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय सल्ला घ्यावा.