सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष चंद्र-हर्षलचा नवपंचम योग हा स्फूर्तिदायक योग आहे. हर्षलच्या अद्ययावत तंत्रज्ञानाला चंद्राच्या नावीन्याची जोड मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या विश्वासास पात्र ठराल. नव्या कार्याला नवी उमेद मिळेल. सहकारी वर्गाकडून अपेक्षित साहाय्य मिळाल्याने कामाला वेग येईल. जोडीदाराच्या कामातील आखीवरेखीवपणा विशेष उल्लेखनीय असेल. त्याच्या गुणांचे जरूर कौतुक करावे. मुलांचा आत्मविश्वास वाढेल. वडीलधाऱ्या व्यक्तींच्या इच्छा पूर्ण कराल. अपचनाचा त्रास होईल.

वृषभ चंद्र-बुधाचा युतियोग हा तारतम्यदर्शक योग आहे. व्यवहार आणि भावना यांच्यात समतोल राखाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली योग्य असे निर्णय घ्याल. कामातील बदल उपयोगी ठरतील. सहकारी वर्गाच्या मदतीने मोठय़ा जबाबदाऱ्या पार पाडाल. मुलांच्या निर्मितीक्षमतेचे कौतुक वाटेल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. कुटुंबातील ज्येष्ठांप्रति आदर व्यक्त कराल. युरिन इन्फेक्शनची शक्यता आहे. काळजी घ्यावी.

मिथुन शुक्र-गुरूचा नवपंचम योग हा प्रगतिकारक योग आहे. शुक्राच्या कलात्मक दृष्टीला गुरूच्या दूरदृष्टीची जोड मिळेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. नोकरी-व्यवसायात आपल्या पदाचा मान राखाल. गरजवंतांना संधी उपलब्ध करून द्याल. सहकारी वर्गाच्या बाबतीत महत्त्वाचे निर्णय जाहीर कराल. मातृतुल्य व्यक्तींकडून आपुलकी मिळेल. मुलांच्या समस्या सुटतील. लहानमोठे प्रवास कराल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. आतडय़ाचे विकार दुर्लक्षित करू नका.

कर्क चंद्र-बुधाचा लाभ योग हा नावीन्यवर्धक योग आहे. मनाचा कारक चंद्र आणि बुद्धिमत्तेचा कारक बुध यांच्यात सुसूत्रता दिसेल. आप्तेष्टांची मनं जिंकाल. नोकरी-व्यवसायात नव्या संकल्पना अमलात आणण्याचा विचार मांडाल. सहकारी वर्गाच्या बाबतीत अनुभवाशिवाय मते व्यक्त करू नका. जोडीदाराच्या कष्टाचे चीज झाल्याने त्याचा ताण कमी होईल. मुलांना नव्या संधी उपलब्ध होतील. त्यांना पुष्टी द्याल. मानसिक तणाव जाणवल्यास वैचारिक विश्रांती घ्यावी.

सिंह चंद्र-मंगळाचा लाभ योग हा आशादायक योग आहे. मंगळाच्या ऊर्जेला चंद्राच्या कृतिशीलतेची साथ मिळेल. नोकरी-व्यवसायात कामाचा उत्साह वाढेल. वरिष्ठांच्या काटेकोर प्रश्नांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. सहकारी वर्गाची महत्त्वाच्या बाबतीत खूप मदत होईल. त्यांच्या कामाची त्यांना पोचपावती द्याल. जोडीदारासह विचार छान जुळतील. गतकाळातील आठवणीत मन रमेल. मुलांना प्रेमासह शिस्तीचे धडे द्याल. गुडघे, पाठ आणि कंबरदुखी बळावल्यास उपचार घ्यावेत.

कन्या बुध-शनीचा नवपंचम योग हा योग्य न्याय देणारा योग आहे. बुधाची कुशाग्र बुद्धी आणि शनीची धोरणी वृत्ती यांचा योग्य संगम दिसून येईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी सांभाळून आपली मते मांडाल. सरकारी कामांची गती वाढेल. सहकारी वर्ग अपेक्षित कामे पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ घेईल. जोडीदाराच्या कलेने घ्यावे लागेल. वाद टाळावेत. मुलांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांची प्रगती होईल. ज्येष्ठ व्यक्तींची मनं संभाळाल. मोठय़ा आतडय़ाचे काम मंदावेल.

तूळ चंद्र-शुक्राचा लाभ योग हा अनुभवसंपन्न योग असेल. पेरलेले नक्की उगवेल. हाती घेतलेली कामे जिद्दीने पूर्ण कराल. वरिष्ठांच्या सूचनांचे तंतोतंत पालन कराल. सहकारी वर्गाची विशेष मदत मिळेल. गरजवंतांना मार्गदर्शन कराल. आपले छंद जपताना सामाजिक बांधिकलीचे भान ठेवाल. मातृतुल्य व्यक्तींच्या स्मरणाने भावुक व्हाल. जोडीदाराच्या समस्या चर्चेने सोडवाल. मुलांच्या प्रगतीचा विचार करून चांगला निर्णय घ्याल. त्वचाविकारांवर औषधोपचार घ्यावा लागेल.

वृश्चिक रवी-हर्षलचा नवपंचम योग हा बदलाचा कारक योग आहे. निर्मितीचा कारक रवी आणि संशोधनाचा कारक हर्षल यांच्या या शुभ योगामुळे बंधनकारक नियम झुगारून द्याल. नोकरी-व्यवसायात अन्यायाविरुद्ध वाचा फोडाल. सहकारी वर्गाच्या कार्यकौशल्याचे कौतुक कराल. जोडीदाराच्या कामातील नेमकेपणामुळे त्याच्या कार्यात त्याची दखल घेतली जाईल. मुलांवरील संस्कार कामी येतील. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर कराल. अपचन आणि पित्त बळावेल.

धनू शनी-चंद्राचा नवपंचम योग हा नियमांचे काटेकोरपणे पालन करायला लावणारा योग आहे. शनीची शिस्त आणि मेहनत चंद्राच्या कृतिशीलतेला योग्य दिशा देईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या विश्वासास पात्र ठराल. मेहनत फळास येईल. सहकारी वर्गाची कामातील गुंतवणूक वाढेल. जोडीदार त्याच्या कामात प्रावीण्य दाखवेल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. ज्येष्ठांना मान द्याल. मुलांच्या कामातील, शिक्षणातील अडचणी दूर होतील. अन्नपचनाच्या तक्रारी वाढतील.

मकर चंद्र-शनीचा समसप्तम योग धैर्य वाढवणारा योग आहे. चंद्राच्या चंचलतेला शनीच्या शिस्तीचा लगाम बसेल. हाती घेतलेली कामे धीम्या गतीने पुढे सरकली तरी प्रयत्नातील सातत्य टिकेल. नोकरी-व्यवसायात आपल्या विशेष गुणांची चुणूक दाखवाल. सहकारी वर्गासह काम करताना वरिष्ठांच्या सूचनांची शहानिशा करून घ्यावी. जोडीदाराच्या कामकाजाची गती वाढेल. दोघे मिळून कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाल. मुलांमधील कलागुणांना वाव मिळेल. बौद्धिक कामामुळे दमणूक वाढेल.

कुंभ चंद्र-गुरूचा समसप्तम योग हा मार्गदर्शक योग आहे. प्रयत्नांना यश मिळेल. आपल्या वागणुकीतील लहानसा बदल चांगला परिणाम दाखवेल. नोकरी-व्यवसायात अपेक्षित लाभ मिळाले नाहीत तरी आत्ता पेरलेले काही काळातच जरूर उगवेल. सहकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. महत्त्वाची कामे पूर्ण कराल. जोडीदाराची पत वाढेल. अधिकार योग येतील. मुलांच्या बाबतीत हळवे न होता व्यावहारिक पातळीवरून निर्णय घ्यावेत. मातेच्या उपकारांचे स्मरण कराल. डोळ्यांची काळजी घ्यावी.

मीन चंद्र-मंगळाचा युतियोग हा उत्साहवर्धक योग आहे. खिलाडू वृत्ती अंगी बाणवाल. शारीरिक क्षमतेला मानसिक बळाची साथ मिळाल्याने कामाला गती येईल. काही कामे मात्र रखडतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांना आपले मुद्दे समजावून देताना अतिरिक्त ऊर्जा खर्ची पडेल. सहकारी वर्गाला मदत कराल. जोडीदाराच्या साथीने वडीलधाऱ्या मंडळींची शुश्रूषा कराल. उष्णतेचे विकार बळावतील. आहारात बदल आवश्यक! पाठीचे दुखणे बळावेल.

Story img Loader