सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष चंद्र-गुरूचा नवपंचम योग हा आर्थिक नियोजनाला पूरक ठरणारा योग आहे. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. नोकरी-व्यवसायात नव्या योजना आखताना पर्यायी मार्गाचाही विचार कराल. वरिष्ठांसह झालेल्या चर्चाचे फलित चांगले मिळेल. सहकारी वर्गाला कामे समजावून देताना त्यांच्या अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागेल. जोडीदाराच्या बुद्धिमत्तेला नवी आव्हाने पेलावी लागतील. मुलांच्या विचारांचा गुंता अलगद सोडवाल. पचन संस्था, उत्सर्जन संस्था यांचे आरोग्य सांभाळावे.
वृषभ रवी-चंद्राचा लाभयोग हा सत्याची कास धरणारा योग आहे. मेहनतीला यश मिळेल. नोकरी-व्यवसायात स्वत:ला सिद्ध करताना आपला स्पष्टवक्तेपणा उपयोगी पडेल. वरिष्ठांना आपली मते समजावून द्याल. सहकारी वर्गाला मदत मिळाल्याने त्यांच्या कामाची दिशा निश्चित होईल. जोडीदाराला सकारात्मक दृष्टिकोन दिल्यास तो संकटालाही संधी मानून कामाचा उरक पाडेल. कौटुंबिक मतभेद चर्चेने मिटवावेत. आहारावर नियंत्रण ठेवावे. अन्यथा अपचनाचा त्रास बळावेल.
मिथुन चंद्र-बुधाचा लाभयोग हा व्यवहार आणि नाती यांच्यात समतोल राखणारा योग आहे. बुद्धिमत्तेला कलात्मकतेची जोड मिळेल. नोकरी-व्यवसायात परिस्थितीचा आढावा घेऊन पुढच्या कामाची आखणी सुरू कराल. सहकारी वर्गाची साथ मिळेल. जोडीदारासह झालेले वाद तात्पुरते असून त्यात कटुता नाही. वैचारिक भिन्नतेमुळे भावनिक दुरावा येऊ देऊ नका. कामाचा ताण न घेता समस्या सोडवण्याकडे लक्ष केंद्रित कराल. चिडचिड आणि संताप यावर ताबा मिळवणे आवश्यक!
कर्क रवी-चंद्राचा नवपंचम योग हा यशकारक योग आहे. मेहनतीचे चीज होईल. नोकरी-व्यवसायात अपेक्षित लाभ मिळाले नाहीत तरी नव्या संधी उपलब्ध होतील. वरिष्ठांची अतिचिकित्सा तापदायक ठरेल. सहकारी वर्गाच्या साहाय्याने योग्य प्रकारे परिस्थितीला सामोरे जाल. संयम सोडू नका. जोडीदाराला त्याच्या कार्यक्षेत्रात बरीच मेहनत घ्यावी लागेल. त्याची चिडचिड वाढेल. नातेवाईकांसाठी धावपळ करावी लागेल. पोटाचे विकार उद्भवल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.
सिंह चंद्र-मंगळाचा लाभयोग हा मरगळ झटकून उत्साह देणारा योग आहे. चंद्राच्या कृतिशीलतेला मंगळाच्या ऊर्जेची जोड मिळेल. नोकरी-व्यवसायात नव्या जोमाने स्वत:ला कामात झोकून द्याल. वरिष्ठ आणि सहकारी वर्गाच्या पाठबळामुळे आपली आगेकूच सुरू राहील. जोडीदाराच्या साथीने कौटुंबिक प्रसंगातून सामंजस्याचा मार्ग काढाल. मुलांना आत्मनिर्भर बनवाल. कंबर, मणका आणि सांधे यांची विशेष काळजी घ्यावी. योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घ्यावा.
कन्या चंद्र-गुरूचा लाभयोग हा उचित मार्गदर्शक योग आहे. अनुभवी व्यक्तींकडून योग्य दिशा मिळेल. राष्ट्राबद्दलचा अभिमान बाळगून मोठे कार्य कराल. नोकरी-व्यवसायात परदेशासंबंधित कामे मार्गी लागतील. अडचणींवर मात कराल. सहकारी वर्गाच्या समयसूचकतेमुळे मोठे संकट टळेल. त्यांच्याप्रति आभार व्यक्त कराल. जोडीदार त्याच्या कार्यात अधिक व्यस्त असेल. कौटुंबिक जबाबदारी आपणावरच जास्त प्रमाणात असेल. ती चांगली निभावून न्याल. आरोग्य चांगले राहील.
तूळ गुरू-चंद्राचा नवपंचम योग हा यशकारक योग ठरेल. नव्या वाटेने जाताना साहाय्य करणाऱ्या व्यक्ती भेटतील. देशाला अभिमानास्पद ठरेल असे कार्य हातून घडेल. संशोधनाचा उपयोग होईल. नोकरी-व्यवसायात मानाचे स्थान भूषवाल. सहकारी वर्ग आणि वरिष्ठांच्या कौतुकास पात्र ठराल. जोडीदाराच्या कामात यश येईल. मुलांकडून आनंदवार्ता समजतील. कौटुंबिक वाद मर्यादेत ठेवाल. अपचन आणि पित्तविकार बळावतील. योग्य आहार आणि व्यायाम आवश्यक!
वृश्चिक गुरू-चंद्राचा केंद्रयोग कौटुंबिक आनंद देणारा योग आहे. अनपेक्षित सुखदायक घटना घडतील. नोकरी-व्यवसायात आपल्या अधिकारपदाचा योग्य उपयोग कराल. देशाभिमान जागृत ठेवाल. सहकारी वर्गाला सकारात्मक दृष्टिकोनाचे धडे द्याल. कायदेविषयक कामांना गती येईल. जोडीदाराच्या कामातील अनुभव चांगला येईल. मुलांच्या बाबतीत समाधानकारक निर्णय घेता येतील. लहानमोठे प्रवासयोग येतील. ताप, अंगदुखी आणि पित्ताशयाचे विकार यांच्याकडे दुर्लक्ष करू नका.
धनू चंद्र-नेपच्यूनचा नवपंचम योग उत्साहवर्धक असेल. लेखन, वाचन, सादरीकरण यात प्रगती कराल. नवनवीन संकल्पनांचा विचार डोक्यात घोळत राहील. योग्य निर्णय घेऊन विचारांवर अंमलबजावणी कराल. नोकरी-व्यवसायात उल्लेखनीय कामगिरी पार पाडाल. देशाचा अभिमान बाळगाल. जोडीदाराच्या साथीने पुढच्या पिढीवर चांगले संस्कार कराल. समाजात नावलौकिक मिळवाल. पथ्य न पाळल्यास छातीत जळजळ होईल. हातापायांची आग होईल. काळजी घ्यावी.
मकर शनी-चंद्राचा लाभयोग कामात नेमकेपणा देईल. शनीच्या शिस्तीला आणि मेहनतीला चंद्राच्या उत्सुकतेची साथ मिळेल. हाती घेतलेल्या कामांना अपेक्षित गती नाही मिळाली तरी धिम्या गतीने मार्गी लागतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या अपेक्षांचे ओझे वाढेल. सहकारी वर्ग मदतीस धावून येईल. शब्द जपून वापरा. कौटुंबिक नाती जपणे महत्त्वाचे! जोडीदार त्याच्या अधिकाराचा योग्य उपयोग करेल. देशाचे नाव गाजवाल. श्वसन वा छातीचे विकार दुर्लक्षित करू नका.
कुंभ चंद्र-मंगळाचा केंद्रयोग हा कामात यश देणारा योग आहे. नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी आनंदी आणि उत्साही वातावरण निर्माण होईल. वरिष्ठांना आपले मुद्दे समजावून द्याल. काही रखडलेल्या, अडकलेल्या गोष्टींची परवानगी मिळेल. सहकारी वर्गावर सगळा भार न सोपवता पर्यायी योजना तयार ठेवण्यातच शहाणपण ठरेल. जोडीदार आपल्या कामात यश मिळवेल. त्याच्या कष्टाचे चीज होईल. अतिरिक्त कामे इतरांवर सोपवल्याने कामाचा भार हलका होईल. डोळ्यांची काळजी घ्यावी.
मीन चंद्र-शुक्राचा लाभयोग हा कल्पकतेला व्यवहाराची जोड देणारा योग आहे. एखाद्या रोजच्या रटाळ कामातील रंजकता वाढवाल. नोकरी-व्यवसायातही नित्याच्या गोष्टींमध्ये रस निर्माण कराल. वरिष्ठांच्या आणि सहकारी वर्गाच्या साहाय्याने इतरांच्या हिताचा विचार कराल. जोडीदाराच्या प्रगतीच्या वार्ता समजातील. मुलांच्या बाबतीत चर्चा करून प्रश्न सोडवाल. कौटुंबिक वाद मिटवण्याचा प्रयत्न कराल. पायाची जळजळ होईल. छातीत कफ दाटेल. वैद्यकीय उपचार घ्यावेत.