सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष चंद्र-शनीचा केंद्र योग मेहनतीला यश देणारा आहे. चंद्राच्या धर-सोड वृत्तीवर शनीच्या शिस्तीचे नियंत्रण राहील. त्यामुळे हाती घेतलेले काम चिकाटीने पूर्ण कराल. वरिष्ठांच्या मतांचा आदर करा. आपले म्हणणे सौम्य शब्दात मांडा. सहकारीवर्गाच्या परिस्थितीचा साकल्याने विचार कराल. जोडीदाराला सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. मुलांच्या प्रगतीचा आलेख उंचावेल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न कराल. श्वसनाचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे.
वृषभ चंद्र-मंगळाचा लाभयोग हा उत्साहवर्धक योग आहे. काही गोष्टी अशा घडतील की त्यातून आत्मविश्वास वाढेल. संकटातूनही संधी शोधाल. वरिष्ठांचा विश्वास खरा करून दाखवाल. सहकारीवर्गाच्या साहाय्याने कामाला गती येणे अपेक्षित आहे. मुलांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण कराल. जोडीदाराचे कामकाज जोमाने पुढे जाईल. रेंगाळलेल्या कामातील अडचणी दूर होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. छाती, बरगडय़ा, खांदे यांचे दुखणे उद्भवल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.
मिथुन चंद्र-हर्षलचा समसप्तम योग संशोधक वृत्तीला पूरक ठरणारा योग आहे. प्रगत विचार मांडाल. चंचलतेला आळा घाला. नोकरी-व्यवसायात प्रगतीकारक घटना घडतील. वरिष्ठांचा सल्ला लाभदायक ठरेल. सहकारी वर्गाच्या कुवतीवर शंका घेऊ नका. अतिरिक्त जबाबदाऱ्या सहकारी वर्गावर सोपवा. जोडीदाराची मेहनत फळास येईल. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवाल. मुलांच्या आत्मविश्वासाची योग्य दाद द्याल. अपचन आणि उष्णतेचे विकार बळावतील.
कर्क रवी-चंद्राचा केंद्रयोग हा नव्या मार्गाचा सूचक योग ठरेल. हिमतीने पुढे जाल. नोकरी-व्यवसायात मात्र मोठी जोखीम पत्करू नका. वरिष्ठांचा पाठिंबा मिळवणे कठीण जाईल. कामातील काटेकोरपणा वाढवा. नियमांचे पालन करावे. सहकारीवर्ग चांगली साथ देईल. जोडीदार आपल्या कार्यात अधिक व्यस्त होईल. कुटुंब सदस्यांच्या प्रगतीसंबंधित वार्ता समजेल. मुलांच्या आरोग्याच्या किरकोळ तक्रारी उद्भवतील. मानसिक स्वास्थ्य जपा. अतिविचार टाळा.
सिंह चंद्र-मंगळाचा केंद्रयोग गतिमानता दर्शवतो. चंद्राच्या कृतिशीलतेला मंगळाच्या ऊर्जेची जोड मिळेल. एखाद्या गोष्टीचा पुरेसा विचार झाला असेल तर तो कृतीत आणा. नोकरी-व्यवसायात आपल्या गुणांचे कौतुक होईल. वरिष्ठांचा विश्वास खरा ठरवाल. सहकारीवर्गाकडून अपेक्षित कामे वेळेत पूर्ण करून घ्याल. जोडीदाराचे कामकाज जोमाने पुढे सरकेल. मुलांना आपली दिशा ठरवता येईल. उत्सर्जनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. औषधे घ्या.
कन्या चंद्र-बुधाचा केंद्रयोग मनाचा समतोल राखणारा योग आहे. विचारांना मानसिकतेची आणि भावनांची जोड मिळेल. चंचलता कमी होऊन योग्य निर्णय घेऊ शकाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळाल्याने आपले मत ठामपणे मांडू शकाल. सहकारी वर्गाच्या कामाची योग्य दाद द्याल. जोडीदाराच्या कामातील अडचणी सध्या तरी दूर झाल्यासारख्या भासतील. मुलांवर शिस्तीचा अंकुश ठेवावा. पित्ताशयाचे आरोग्य सांभाळा. आहारावरील नियंत्रण उपयोगी ठरेल.
तूळ चंद्र-शुक्राचा लाभयोग हा सकारात्मकतेला पुष्टी देणारा आहे. काही गोष्टींचा विचार कलात्मक दृष्टिकोनातून कराल. नव्या योजना मनात आखाल. नोकरी-व्यवसायात लोकप्रियता मिळेल. अधिकार मिळाला नाही तरी समाजमान्यता मिळेल. सहकारीवर्गाची मदत उपयोगी ठरेल. सरकारी कामे मार्गस्थ होतील. धीर सोडू नका. जोडीदाराच्या द्विधा मन:स्थितीत त्याला आपल्या भावनिक आधाराची गरज भासेल. मुलांना योग्य दिशा मिळेल. त्वचाविकारावर औषधोपचार घ्या.
वृश्चिक रवी-चंद्राचा नवपंचम योग यशकारक आहे. नोकरी-व्यवसायात अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन कामी येईल. सहकारीवर्गातील नाराजीचा कामावर परिणाम दिसून येईल. त्यांचे प्रश्न सोडवणे महत्त्वाचे ठरेल. जोडीदाराच्या विचारांचा मान ठेवा. कुटुंब सदस्यांसह चर्चा करणे आवश्यक ठरेल. आत्मविश्वासाने पाऊल पुढे टाकाल. मुलांच्या वागण्यात बदल आढळून येईल. त्वचेवर फोड येणे, त्यात पाणी होणे असे त्रास अंगावर न काढता वैद्यकीय सल्ला अवश्य घ्या.
धनू चंद्र-बुधाचा नवपंचम योग बौद्धिक विकासाचे प्रतीक ठरेल. आपल्या वागणुकीतील एखाद्या बदलामुळे पुढील काळात मोठा सकारात्मक बदल होईल. नोकरी-व्यवसायात कामातील बारकावे लक्षात घ्याल. वरिष्ठांच्या विश्वासास पात्र ठराल. सहकारीवर्गाच्या प्रगतीच्या व हिताच्या दृष्टीने काही निर्णय महत्त्वाचे ठरतील. जोडीदाराच्या समयसूचकतेमुळे व्यवहारात लाभ होईल. चर्चा यशस्वी होईल. मुलांची आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगतीकडे वाटचाल सुरू होईल.
मकर चंद्र-शनीचा नवपंचम योग चिकाटीदर्शक आहे. मेहनतीला नशिबाची जोड मिळेल. बऱ्याच गोष्टी जुळून येतील. नोकरी-व्यवसायात आपल्या मताला मान मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. सहकारीवर्गाचा नकार पचवावा लागेल. जोडीदाराच्या कामकाजात सहजता येईल. तो यशाकडे वाटचाल करेल. मुलांना कामाच्या नियोजनाचे धडे द्यावेत. कौटुंबिक संबंध जपा. शब्द जपून वापरा. घसा आणि छातीचे आरोग्य जपा. योग्य आहार आणि व्यायाम यांची गरज भासेल.
कुंभ गुरू-चंद्राचा नवपंचम योग यशकारक आहे. मान्यवर व्यक्तींचे मार्गदर्शन कामी येईल. नोकरी-व्यवसायात अडचणीतून मार्ग काढत पुढे जाल. सहकारीवर्ग आणि वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. जोडीदाराची त्याच्या कार्यक्षेत्रात उन्नती होईल. कौटुंबिक स्तरावर रखडलेल्या गोष्टी मार्गी लागतील. मुलांच्या बुद्धिमत्तेला नवी आव्हाने स्वीकारावी लागतील. शारीरिक ऊर्जा मंदावेल. थकवा येईल. योग्य आहार, प्राणायाम आणि विश्रांती या त्रिसूत्रीचा अवलंब करावा.
मीन चंद्र-शनीचा लाभयोग प्रयत्नांना यश देणारा आहे. चिकाटी वाढेल. नोकरी-व्यवसायात कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे याचा पुन्हा विचार करावा लागेल. सहकारीवर्गाचे कामातील सातत्य वाखाणण्याजोगे असेल. जोडीदाराच्या कामाचा व्याप वाढेल. मुलांच्या बाबतीत दोघांनी मिळून निर्णय घ्यावेत. कौटुंबिक वातावरण शैक्षणिकदृष्टय़ा पोषक असेल. रक्ताभिसरण संस्थेसंबंधित प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. कामाचा ताण घेऊ नका.