सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष चंद्र-मंगळाचा नवपंचम योग हा परिस्थितीप्रमाणे शिस्तीचे पालन करायला लावेल. नियमाप्रमाणे वागून कामाला गती मिळेल. नोकरी-व्यवसायात उत्साह वाढेल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. सहकारी वर्गाच्या तक्रारी आपलेपणाने समजून घ्याल. कुटुंब सदस्यांमध्ये विचारांची देवाणघेवाण होईल. मुलांच्या शिक्षणातील अडथळे दूर होतील. जोडीदाराच्या कार्य क्षेत्रातील बाबी मार्गस्थ होतील. श्वसन आणि पचन संस्था यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. पथ्य पाळावे.
वृषभ रवी-बुधाचा युतीयोग वैचारिक प्रगल्भता देणारा योग आहे. नोकरी-व्यवसायात योग्य निर्णय योग्य वेळी घ्याल. अडीअडचणीच्या प्रसंगी तारतम्याने सामोरे जाल. वरिष्ठांच्या कौतुकास पात्र ठराल. सहकारी वर्गाचे साहाय्य मिळाल्याने घेतलेल्या कामाला गती मिळेल. जोडीदाराला थोडे नैराश्य जाणवल्यास त्याला भावनिक आधार, सकारात्मक दृष्टिकोन देण्याची महत्त्वाची जबाबदारी आपली आहे, याची जाण ठेवाल. मुलांची गाडी मार्गाला लागल्याने समाधान वाटेल. छातीत जळजळ होईल.
मिथुन चंद्र-नेपच्यूनचा लाभ योग हा उत्साहवर्धक योग आहे. मित्रमंडळींमध्ये वैचारिक चर्चा होतील. गरजवंतांना मदत कराल. नोकरी-व्यवसायात नव्या संकल्पना मांडाल. वरिष्ठांकडून पाठबळ मिळेल. सहकारी वर्गातील काहींना आपली मते पटणार नाहीत. सत्याची कास सोडू नका. जोडीदाराचा भक्कम आधार कुटुंबाला सावरून धरेल. अडचणींना धीराने तोंड द्याल. मुलांच्या हिताचे निर्णय घ्याल. त्यांचा आत्मविश्वास वाढेल. खांदे, मान, दंड भरून येतील.
कर्क रवी-चंद्राचा केंद्र योग समाजात मानसन्मान देईल. आपल्या अधिकारांचा योग्य उपयोग कराल. सामाजिक कार्यात हिरिरीने पुढाकार घ्याल. नोकरी-व्यवसायात अनपेक्षित घटना घडल्याने वेळेच्या नियोजनात फेरफार करावे लागतील. आपली समयसूचकता कामी येईल. मुलांच्या विचारांना वाव द्यावा. जोडीदाराच्या मेहनतीच्या मानाने त्याला त्याच्या कामाचे फळ मिळणार नाही. परंतु त्याने सातत्य सोडू नये. मानसिक ताण तणाव जाणवल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
सिंह चंद्र-गुरूचा लाभ योग हा यशकारक योग आहे. आपल्या मेहनतीचे चीज होईल. योग्य दिशेने वाटचाल कराल. नोकरी-व्यवसायात रखडलेली कामे मार्गी लागतील. वरिष्ठांच्या पाठबळामुळे आपल्या गुणांना वाव मिळेल. सहकारी वर्ग कामात विशेष लक्ष घालणार नाही. जोडीदाराला जबाबदारीचे पूर्ण भान असेल. कुटुंबासाठी त्याची धावपळ फळास येईल. मुलांच्या वागण्या-बोलण्यातील फरक लक्षात घ्यावा. त्यांना आपला सहवास द्यावा. कंबरदुखीकडे दुर्लक्ष नको.
कन्या रवी-चंद्राचा लाभ योग हा स्फूर्तिदायक योग आहे. नोकरी व्यवसायात आनंदाची बातमी मिळेल. अपेक्षित निकाल जाहीर होतील. सहकारी वर्गाकडून नेटाने कामे पूर्ण करून घ्यावीत. समाजकार्याची संधी उपलब्ध होईल. जोडीदाराच्या कामातील नेटकेपणा वाखाणण्याजोगा असेल. त्याच्या भावनांची कदर केल्याने नाते दृढ होईल. एकंदरीत कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढेल. मुलांचा कल जाणून घ्याल. तब्येतीच्या किरकोळ तक्रारींवर वेळेस उपचार घ्यावेत. प्राणायाम आवश्यक!
तूळ चंद्र-शुक्राचा नवपंचम योग हा नावीन्याची ओढ लावणारा योग आहे. घेतलेल्या कामाची कलात्मक मांडणी विशेष उल्लेखनीय असेल. नोकरी-व्यवसायात अधिकार समजुतदारीने वापराल. कार्यकारी मंडळाशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित कराल. कौटुंबिक वातावरणातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न कराल. जागेच्या व्यवहाराची बोलणी होतील. मुलांच्या प्रगतीसाठी मेहनत घ्याल. मान आणि खांदे यांचे आरोग्य जपावे. तिथल्या नसा आखडल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा लागेल.
वृश्चिक बुध-शनीचा समसप्तम योग हा वेळेचे उत्तम नियोजन करणारा योग आहे. बुधाच्या बुद्धिमत्तेला शनीच्या दूरदर्शीपणाची साथ मिळेल. हाती घेतलेले काम चिकाटीने पूर्णत्वास न्याल. नोकरी-व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील. कामाच्या स्वरूपातील बदल स्वीकारावे लागतील. सहकारी वर्गाची चांगली मदत मिळेल. जोडीदाराच्या कामात यशकारक घटना घडतील. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. पित्तविकार बळावतील. घशाशी जळजळ होईल. पथ्य पाळणे आवश्यक!
धनू चंद्र-मंगळाचा लाभ योग हा उत्साहवर्धक योग आहे. हाती घेतलेल्या कामाला गती येईल. नोकरी-व्यवसायात शांत डोक्याने विचार करूनच निर्णय घ्यावेत. सहकारी वर्ग साहाय्य करेल. धीर सोडू नका. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. जोडीदाराच्या विचारांना योग्य दिशा मिळाल्यास त्याच्या कामाला वेग येईल. मुलांचे प्रश्न सुटतील. त्यांचा आत्मविश्वास वाढेल. हृदय आणि फुप्फुसाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी व्यायाम आणि प्राणायाम करावा.
मकर चंद्र-बुधाचा केंद्र योग हा भावना आणि विचार यांत ओढाताण निर्माण करणारा योग आहे. विवेकबुद्धी जागरूक ठेवून वर्तनात आवश्यक ते बदल करावेत. नोकरी-व्यवसायात बुद्धीचातुर्याने वाईटपणा न घेता सामंजस्याने परिस्थिती हाताळाल. वरिष्ठ आणि सहकारी वर्गाकडून फारशी अपेक्षा न ठेवणेच बरे! मुलांना हिमतीने पुढे जाण्याचा मार्ग दाखवाल. छाती, पाठ आणि मणका यांचे आरोग्य सांभाळावे. व्यायामाला पर्याय नाही. वैद्यकीय सल्ला घ्यावा.
कुंभ चंद्र-गुरूचा केंद्र योग हा यशकारक योग आहे. चंद्राच्या सामंजस्याला गुरूच्या प्रगल्भतेची जोड मिळेल. सखोल ज्ञानाचा योग्य उपयोग कराल. नोकरी-व्यवसायात नवे करार करताना त्यातील बारकावे, छुपी कलमे नीट समजून घ्याल. वरिष्ठांच्या कौतुकास पात्र ठराल. सहकारी वर्गाच्या साहाय्याने मोठय़ा जबाबदाऱ्या पार पाडाल. मुलांची कामे मार्गी लागतील. जोडीदाराची कामाच्या तणावामुळे चिडचिड वाढेल. एकमेकांना समजून घ्यावे. सर्दी-तापाची शक्यता दिसते.
मीन चंद्र-बुधाचा लाभ योग हा विचारांना योग्य दिशा देणारा योग आहे. यशाकडे जाणारे नवे मार्ग उघडतील. प्रयत्न सोडू नका. नोकरी-व्यवसायात चुका होणार नाहीत याची सतर्कता बाळगाल. सहकारी वर्ग आपल्या उपकारांची जाण ठेवेल. जोडीदार आपल्या कार्यक्षेत्रात नव्या संकल्पना राबवेल. विचारांची देवाणघेवाण झाल्याने नात्यात मोकळेपणा जाणवेल. मुलांच्या प्रगतीसाठी आखलेल्या योजना कार्यान्वित कराल. पाठीचा मणका आणि उत्सर्जन संस्थेचे त्रास बळावतील. दुर्लक्ष नको.