सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष चंद्र-गुरूचा समसप्तम योग हा उत्साहवर्धक योग आहे. गुरूचे ज्ञान आणि चंद्राचे कुतूहल यांचा योग्य मेळ जुळेल. काही गोष्टींचा अतिविचार करणे टाळा. नोकरी-व्यवसायात नवी उमेद निर्माण होईल. वरिष्ठांच्या पाठबळामुळे मेहनतीचे चीज होईल. सहकारी वर्गाकडून अपेक्षित कामे पूर्ण करून घेताना अतिरिक्त ऊर्जा खर्ची पडेल. मुलांच्या शिक्षणाची गती वाढेल. जोडीदाराच्या साथीने कौटुंबिक जबाबदाऱ्या निगुतीने पार पाडाल. पित्त व वाताचे विकार बळावतील. पाठीचे आरोग्य सांभाळावे.
वृषभ शुक्र-नेपच्यूनचा समसप्तम योग हा स्फूर्तिदायक योग आहे. लिखाण, वाचन, सादरीकरण यात चांगली मजल माराल. यश प्राप्त कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करणे कठीण जाईल. कामाचा ताण घेऊ नका. सहकारी वर्गाचे साहाय्य मिळेल. रखडलेल्या कामांना गती देण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. मुलांचा आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक समस्या चर्चेने सुटतील. नातेवाईकांच्या बाबींमध्ये आपले मत प्रदर्शित करू नका. मूत्रविकार होऊन जळजळ होण्याची शक्यता!
मिथुन चंद्र-नेपच्यूनचा नवपंचम योग हा नव्या संकल्पनांना पूरक असा योग आहे. आपल्या उत्स्फूर्त बोलण्याचा लोकांवर प्रभाव पडेल. नोकरी-व्यवसायात सादरीकरण उत्तम प्रकारे कराल. सहकारी वर्गावर पूर्णपणे विसंबून राहू नका. पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी. मुलांचे प्रश्न समजून घेताना त्यांच्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहाल. लहान-मोठा प्रवास कराल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. मणका, हाडे व शिरा यासंबंधित त्रास दुर्लक्षित करू नका.
कर्क चंद्र-हर्षलचा नवपंचम योग यशकारक योग आहे. ध्यानीमनी नसताना आनंद वार्ता कानी येतील. नोकरी-व्यवसायात नव्या समस्या मोठे रूप धारण करण्यापूर्वीच दूर कराल. वरिष्ठांकडून चांगले मार्गदर्शन मिळेल. सहकारी वर्गाची साथ मिळाल्याने कामाची पत सुधारेल. मुलांच्या हिताच्या गोष्टी पूर्ण करण्यात पुढाकार घ्याल. जोडीदाराच्या कामातील ताण वाढेल. मानसिक स्वास्थ्य जपाल. आपल्या नियंत्रणापलीकडे असलेल्या गोष्टींचा त्रास करून घेऊ नका.
सिंह चंद्र-बुधाचा युतीयोग हा विवेकी बुद्धीचा प्रणेता आहे. भावनांच्या आहारी न जाता नात्यातील गुंता अलगद सोडवाल. नोकरी-व्यवसायात अधिकाराच्या पदाचा मान राखाल. ज्येष्ठ वरिष्ठांचा आपल्यावरील विश्वास खरा करून दाखवाल. सहकारी वर्गाची कामात जोड मिळाल्याने मर्यादित काळात आपले ध्येय गाठाल. मुलांना आपली कर्तव्ये पटवून द्याल. जोडीदाराच्या कामातील प्रगती उल्लेखनीय असेल. हातापायांच्या बोटांची हाडे दुखतील. वैद्यकीय सल्ला घ्यावा.
कन्या चंद्र-शनीचा नवपंचम योग कामाचा उत्साह वाढवणारा योग आहे. शनीच्या शिस्तीला आणि सातत्याला चंद्राच्या उत्सुकतेची जोड मिळेल. नोकरी-व्यवसायात लाभदायक घटना घडतील. वरिष्ठांकडून पाठिंबा मिळाल्याने हुरूप वाढेल. सहकारी वर्गातील काही व्यक्तींकडे दुर्लक्ष केलेलेच बरे! मुलांच्या मेहनतीचे चीज होईल. त्यांच्या चिकाटीचे कौतुक कराल. जोडीदाराचे कष्ट अजून संपलेले नाहीत. एकमेकांचा आधार बनाल. दातांसंबंधित त्रास उद्भवल्यास वैद्यकीय मदत घ्यावी लागेल.
तूळ चंद्र-शुक्राचा लाभ योग यशकारक आणि उत्साहवर्धक योग आहे. कल्पकता वापरून नव्या गोष्टी करण्यास सुरुवात कराल. नोकरी-व्यवसायात बुद्धिचातुर्याने कामातील नेमक्या बाबी समजून घ्याल. वरिष्ठ आणि सहकारी वर्गापुढे आपले निर्णय ठामपणे मांडाल. मुलांच्या मेहनतीला आपल्या भावनिक सोबतीची जोड द्याल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात आपली कामगिरी गाजवेल. कुटुंबाला आपला आधार वाटेल. पित्ताशयाचे आजार विकार बळावण्याची शक्यता आहे.
वृश्चिक चंद्र-मंगळाचा युतियोग हा आत्मविश्वास वाढवणारा योग आहे. ऊर्जेचा कारक मंगळ आणि मनाचा कारक चंद्र यांचा युतियोग उत्साहवर्धक ठरेल. नोकरी-व्यवसायात हिरिरीने नव्या जबाबदाऱ्या स्वीकाराल. कामातील सातत्याने त्या पूर्णही कराल. वरिष्ठांच्या अपेक्षा खऱ्या करून दाखवाल. सहकारी वर्गाच्या मदतीला पुढे असाल. मुलांसह विचारांची देवाणघेवाण होईल. जोडीदाराचा प्रभाव त्याच्या कार्यक्षेत्रात दिसून येईल. गुडघ्यातील शिरा आखडण्याची शक्यता!
धनू चंद्र-शुक्राचा युतियोग हा कलात्मकतेचा उपयोग करून आनंद निर्माण करणारा योग ठरेल. नोकरी-व्यवसायातील समस्यांवर लवकरच उपाय शोधून काढाल. वरिष्ठांना आपल्या मताचा पडताळा येईल. सहकारी वर्गावर रखडलेल्या कामातील काही भाग सोपवल्याने ताण कमी होईल. आवडत्या छंदामुळे वेळ सत्कारणी लागेल. जोडीदाराच्या अडचणींवर मात करण्यास त्याला आपल्या आधाराची गरज भासेल. पडणे, झडणे, मार लागणे, हाड मोडणे याबाबत सावधान!
मकर चंद्र आणि शनीचा समसप्तम योग हा बिनचूक अंदाज बांधणारा योग आहे. शनीच्या दूरदर्शीपणाला चंद्राच्या कृतिशीलतेची साथ मिळेल. काही कामे लांबणीवर पडतील. नोकरी-व्यवसायात अन्यायाविरुद्ध लढा द्याल. वरिष्ठांची संमती मिळवणे कठीण जाईल. सहकारी वर्गाच्या साथीमुळे समतोल साधाल. मुलांच्या हिताच्या गोष्टी आत्ता त्यांना पटल्या नाहीत तरी त्यांच्या कलेने मुद्दे मांडाल. जोडीदाराच्या आनंदात सहभागी व्हाल. कफ, सर्दीसह हृदयाचे आरोग्य सांभाळा. पथ्ये पाळा.
कुंभ चंद्र-नेपच्यूनचा समसप्तम योग हा नवनिर्मितीला पूरक असा योग ठरेल. कल्पकतेला वाव मिळेल. लेखन, वाचन, सादरीकरण यात बाजी मारून न्याल. नोकरी-व्यवसायातील साचेबद्ध कामात नावीन्य आणण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. वरिष्ठांकडून वाहवा मिळवाल. सहकारी वर्गाच्या तक्रारींकडे फारसे लक्ष न देता आपल्या कामावर लक्ष केंद्रित कराल. जोडीदाराच्या कामात नवी आव्हाने येतील. एकमेकांना साथ दिल्याने मानसिक बळ मिळेल. कफ व वातविकार बळावतील.
मीन बुध-गुरूचा समसप्तम योग हा बुद्धिमत्तेला ज्ञान आणि विज्ञानाची जोड देणारा योग आहे. आपल्या ज्ञानाचा व्यावहारिक पातळीवर योग्य उपयोग होईल. नोकरी-व्यवसायात रखडलेली कामे धीम्या गतीने मार्गी लागतील. धीर सोडू नका. सहकारी वर्गाची मेहनत कामी येईल. कौटुंबिक खर्चावर नियंत्रण ठेवा. मुलांच्या बाबतीत निर्णय घेताना त्याच्यासह चर्चा करणे आवश्यक! जोडीदाराच्या चिंता, ताण-तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा. छाती, पाठ आणि मणका यांचे आरोग्य सांभाळावे.