आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक घटक असतात, जे वेगवेगळ्या विकारांवर उपचारक असतात. त्यांचं महत्त्व समजून घेतलं तर डॉक्टरकडे फेऱ्या माराव्या लागणार नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूज एकांग, दोन्ही बाजूस, सर्वाग, चेहरा, पाय इ.

पथ्य :

कोमट पाणी, उकळलेले पाणी, बिनसायीचे दूध, लोणी काढलेले ताक, धने, जिरे पाणी.

ज्वारी किंवा बाजरी, नाचणी, साळीच्या, ज्वारीच्या किंवा राजगिरा लाह्य़ा. मूग, कुळीथ, तूर, मसूर यांचे डाळींचे प्रमाण कमी असे वरण, नाइलाज म्हणून सुकी चपाती, मेथीपूड किंवा एरंडेल मिसळून चपाती, तांदूळ भाजून भात, शक्यतो जुना तांदूळ वापरावा. अळणी जेवण किंवा कमी जेवण किंवा कमी मीठ वापरावे, सातूची भाकरी खावी.

दुधीभोपळा, पडवळ, दोडका, टिंडा, परवल, कार्ले, घोसाळे, सुरण, पालक, मेथी, चाकवत, माठ, अळू, पुदिना, आले, लसूण, ओली हळद, कोथिंबीर, धने, मेथ्या, ताडफळ, संत्रे, काळ्या मनुका, वेलची केळी, पोपई, बोरे, जांभूळ, नाइलाज असेल तर पाव भाजून त्याचा बिनलोण्याचा टोस्ट खाणे.

सोसवेल इतपत गरम किंवा कोमट पाणी आंघोळीस घ्यावे. सकाळी फिरणे व माफक व्यायाम, रात्रौ जेवणानंतर किमान पंधरा मिनिटे फिरावे. दीर्घश्वसन व प्राणायाम सकाळी अवश्य करावा. पुरेसा सूर्यप्रकाश व मोकळी हवा आवश्यक आहे. सुती कपडे वापरावे.

कुपथ्य :

थंडगार पाणी, फ्रीजचे पाणी व इतर थंड पदार्थ, दही, कसदार दूध, पेढा, बर्फी, मलई इ. जास्त मीठ असणारी सरबते, कृत्रिम पेये, स्ट्राँग चहा, कॉफी व कोको.

गहू, नवीन तांदूळ, वाटाणा, हरभरा, मटार, चवळी, उडीद, पोहे, चुरमुरे, बटाटा, रताळे, शिंगाडा, शिळे अन्न, आंबवलेले पदार्थ, बेकरीचे पदार्थ, फरसाण, मांसाहार इ., लिंबू, कैरी, चिंच, मीठ इ. हिरव्या सालीची केळी, चिक्कू, अननस, आंबा, सफरचंद, मोसंबी. आंबट व खारट पदार्थ टाळावेत.

बैठे काम, दुपारी झोप, व्यायामाचा अभाव, कोंदट हवा, वातानुकूलित राहणी, सतत पंखा, कृत्रिम धाग्यांचे कपडे, घट्ट व तंग कपडे, मलमूत्रांचा अवरोध, अवेळी जेवण, धूम्रपान, मद्यपान, मशेरी, तंबाखू.

संधिवात, संधिगत आमवात, सांधेदुखी, सांध्याची सूज, सांधे जखडणे, स्पॉन्डिलायटिस

पथ्य :

गरम पाणी, आले, लसूणयुक्त ताक, सुंठ पाणी, एरंडेल तेल, बिनसायीचे दूध, नारळपाणी.

ज्वारी, बाजरी, मूग, तूर, मसूर, कुळीथ, भाताच्या, ज्वारीच्या किंवा राजगिरा लाह्य़ा. अळणी जेवण. जुना तांदूळ भाजून भात. भाताची जिरे घालून पातळ पेज, नाचणी किंवा सातूची भाकरी.

दुध्याभोपळा, पडवळ, दोडका, टिंडा, परवल, घोसाळे, कार्ले, सुरण, चाकवत, माठ, मेथी, पालक, शेपू, कोथिंबीर. ओली हळद, लसूण, पुदिना, आले. मेथ्या, जिरे, धने. वेलची केळे, गोड संत्रे, ताडफळ, वाफारलेले सफरचंद, शहाळे, पोपई, डोंगरी आवळा, कोहळा.

आंघोळीकरिता सोसवेल असे कोमट किंवा गरम पाणी. माफक व्यायाम व फिरणे, वेळेवर जेवण. रात्रौ कमी जेवण, रात्रौ जेवणानंतर किमान पंधरा मिनिटे फिरून येणे. थंडी, वारा यांपासून सांध्याचे पुरेसे संरक्षण हवे. मलमूत्र- वेग पाळावे, आवश्यक तर नी कॅप वापरावी.

कुपथ्य :

दही, कसदार दूध, म्हशीचे दूध, फ्रीजचे पाणी, कोल्ड्रिंक, मीठ किंवा खूप साखर घालून सरबते, ज्यूस.

गहू, नवीन तांदूळ, वाटाणा, हरभरा, मटार, उडीद, चवळी, पोहे, चुरमुरे, भणंग, बटाटा, रताळे, शिंगाडा, फ्लॉवर, कोबी, वांगे, टमाटू, आंबा, हिरव्या सालीची केळी, चिक्कू. फरसाण, मिठाई, बेकरीचे पदार्थ, केळे, मिसळ, शिळे अन्न, आंबवलेले पदार्थ, मीठ, लिंबू, चिंच, कैरी, आइस्क्रीम, लस्सी इ.

घाम येणार नाही असे कपडे, बैठे काम, दुपारी झोप, रात्रौ जागरण, सतत बैठक, शरीर अवघडेल अशी बसण्याची किंवा काम करण्याची पद्धत, मलमूत्रांचा अवरोध, खूप गार पाण्यात स्नान, सतत पंखा, वातानुकूलित राहणी, मद्यपान, धूम्रपान, मशेरी, तंबाखू

हाडांची झीज, स्लिप डिस्क, गुडघ्याचा दुर्धर विकार

पथ्य :

तापवून गार केलेले ताजे पाणी, नारळपाणी, सोयीस्कर दूध, तांदळाची किंवा रव्याची खीर, जिरेमिश्रित कोकम सरबत.

गहू, उडीद, सोयाबीन, ओटस्, हिरवे किंवा पिवळे कीड न लागलेले मूग, टरफलासकट इतर कडधान्ये, हातसडीचा तांदूळ, स्वच्छ धुऊन पालेभाज्या, सर्व फळभाज्या, सर्व फळे, डोंगरी आवळा, कोहळा.

घरी भाजलेल्या पावाचा टोस्ट, पोहे, शेंगदाणे, खोबरे, खजूर, जरदाळू, माफक प्रमाणात बदाम, बेदाणा, अक्रोड, खारीक इ. सुकामेवा तारतम्याने खावा, केमिकलविरहित गूळ.

रुची राहील व अन्नपचन नीट होईल याकरिता वेळेवर जेवण. जेवणाबरोबर आले, लसूण, पुदिना, जिरे अशी चटणी. खात्रीचे व ताजे मांस.

तारतम्याने अन्नपचन होईल इतपत हालचालीचा माफक व्यायाम; ज्या अवयवांना व्यायाम सहन होईल त्याकरिता ‘फ्रीहँड एक्सरसाइज’, मोकळी हवा, आवश्यक तेवढी विश्रांती, रात्रौ पुरेशी झोप, मलमूत्रांचे नैसर्गिक वेग वेळेवर पाळणे. सुती कपडे.

कुपथ्य :

शिळे व शंकास्पद पाणी, दही, आंबट पेये, अति पातळ पदार्थ, चहा, कॉफी, कोल्ं्रिडक, आइस्क्रीम, फ्रीजमधील पदार्थ, फळांचे ज्यूस.

बाजरी, कुळीथ, मटकी, कदन्न, नवीन तांदूळ.

शिळ्या भाज्या, चव उतरलेली शिळी फळे, आंबट, खारट, फर्मेटेड, आंबवलेले पदार्थ.

बेकरी किंवा फरसाण, मिठाई इ., डालडायुक्त पदार्थ, लोणचे, पापड, इडली, डोसा, मीठ, शंकास्पद, मांसाहार, मासे, अंडी.

व्यायामाचा अभाव, व्यायामाचा अतिरेक, बैठे काम, दुपारी झोप, रात्रौ जागरण, कोंदट हवा, घाम येणार नाही असे कृत्रिम धाग्याचे कपडे, सतत पंखा, मद्यपान, धूम्रपान, मशेरी, तंबाखू.

आमवात, गृध्रसी, अवबाहुक, खांदा जखडणे, खांदा निखळणे, स्नायूंचे विकार, उसण भरणे, वांब येणे, मुरगळा

पथ्य :

गरम किंवा उकळून गार केलेले ताजे पाणी, सुंठपाणी, एरंडेल तेल, तांदळाची जिरेयुक्त पेज, सुंठ, आले, लसूणयुक्त ताक.

ज्वारी, बाजरी, मूग, तूर, कुळीथ कढण, जुना तांदूळ, एरंडेल तेल मोहन म्हणून कणकेत मिसळून चपाती. घरी भाजलेल्या पावाचा टोस्ट, सातू.

उकडून सर्व भाज्या, शेपू, राजगिरा, माठ, तांदुळजा, ताजी सर्व फळे, अळणी जेवण, ताजे जेवण, लसूण, आले, पुदिना, जिरे अशी चटणी.

वारे लागणार नाही, पण मोकळी हवा, ओल नसेल अशा ठिकाणी निवास, कठीण व उबदार अंथरूण, कांबळे, ब्लँकेट, शाल, दिवाण, फळी इ. वेळेत जेवण. पुरेसा घाम येईल असे सुती कपडे. रात्रौ पंधरा मिनिटे फिरणे, मलमूत्रांचे नैसर्गिक वेग वेळच्या वेळी करणे.

कुपथ्य :

खराब व शंकास्पद पाणी, दही, आंबट ताक, ज्यूस, चहा व इतर पेये, फ्रीजमधील पदार्थ, कोल्ं्रिडक इ.

गहू, उडीद, वाटाणा, हरभरा, चवळी, मटकी, नवीन तांदूळ. फाजील जेवण, भूक नसताना जेवण, जेवनानंतर जेवण, हॉटेलमधील जेवण, परान्न.

बटाटा, कांदा, रताळे, टमाटू, काकडी, वांगे, फ्लॉवर, गाजर, पालक, अळू. आंबा, चिक्कू, हिरव्या सालीची केळी, फणस, जांभूळ, बोरे, सीताफळ, फेरू, शिळी फळे, चिंच, लिंबू, मीठ, खारट पदार्थ.

बेकरी पदार्थ, फर्मेन्टेड आंबवलेले पदार्थ, लोणचे, पापड, इडली, डोसा, भेळ, मिसळ, भणंग, मिठाई.

कोंदट हवा, खूप गार वारे, डायरेक्ट पंखा, वातानुकूलित राहणी, गादी, उशी, फोमची गादी, खूप मऊ अंथरूण, बैठे काम, व्यायामाचा अभाव, दुपारी झोप, रात्रौ जागरण, मलमूत्रांचा अवरोध. धूम्रपान, मद्यपान, मशेरी, तंबाखू.

गलग्रंथी, थायरॉईड, ग्रंथी, शोथ, अतिस्थौल्य व अतिकाश्र्य

पथ्य :

खात्रीचे सुरक्षित उकळलेले पाणी, गाईचे, शेळीचे दूध, नारळपाणी, धनेपाणी, ताजे ताक, मध.

ज्वारी, बाजरी, नाचणी, सातू, सुकी चपाती, लाह्य़ा, (ज्वारी, राजगिरा, भात)

मूग, तूर, मसूर, टरफलासकट कडधान्यांचा तारतम्याने वापर.

दुध्याभोपळा, पडवळ, दोडका, टिंडा, परवल, घोसाळे, मुळा, गाजर, बीट, डिंगरी, सुरण.

सर्व पालेभाज्या. तुळसपाने, आले, लसूण, पुदिना, ओली हळद, डोंगरी आवळा, कोहळा, वेलची केळे, वाफारून सफरचंद, ताडफळ, गोड द्राक्षे, अंजीर.

मनुका, सुके अंजीर, धने, जिरे, सुंठ, मिरी, मीठ व साखरेचा तारतम्याने वापर.

मोकळी हवा, दीर्घश्वसन, प्राणायाम, सायंकाळी लवकर व कमी जेवण. जेवणानंतर पंधरा मिनिटे फिरून येणे. मलमूत्रांचे वेग वेळच्या वेळी करणे.

कुपथ्य :

फाजील जलपान, फ्रिजचे पाणी व त्यातील इतर पदार्थ, दही, म्हशीचे दूध, ज्यूस, चहा, कृत्रिम पेये. गहू, वाटाणा, हरभरा, उडीद, मटार, सोयाबीन, ओट, फाजील गोड व खारट पदार्थ, तेलकट, तुपकट मिठाई, फरसाण, आंबवलेले व शिळे अन्न. शंकास्पद अन्न.

बटाटा, रताळे, साबूदाणा, पोहे, चुरमुरे, भणंग, बेकरी पदार्थ, सुकामेवा.

लोणचे, पापड, व्हिनेगार, शिरका, इडली, डोसा, ढोकळा, जिलेबी, श्रीखंड, मांसाहार.

कोंदट हवा, गर्दीच्या ठिकाणी राहणी, बैठेकाम, फाजील श्रम तसेच व्यायामाचा अभाव, अवेळी जेवण, अपुरे जेवण, कदन्न, दुपारी झोप, रात्रौ जागरण, विश्रांतीचा अभाव, मानसिक चिंता. मलमूत्रांचे वेग अडविणे. थायरॉइडची आयोडिनयुक्त औषधे दीर्घकाळ घेणे. मशेरी, तंबाखू, धूम्रपान, मद्यपान.
वैद्य प. य. खडीवाले वैद्य – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व औषधाविना उपचार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayurved dieting