माणसाने शेतीचा, अग्नीचा शोध लावला आणि त्याचा आहार आणि त्याबरोबरच सगळी मानवी संस्कृती बदलत गेली. त्याआधी तो निसर्ग देत होता तेच सेवन करत होता. त्यामुळे अन्नाच्या गरजेचे नैसर्गिक तत्त्व आपण लक्षात घेतले पाहिजे.

निसर्ग- पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पाच तत्त्वांनी बनलेली सृष्टी मनुष्यप्राण्याला, एवढेच नव्हे तर, सर्व जीवसृष्टीला त्यांच्या त्यांच्या गरजेप्रमाणे काल, देश, हवामानातील कमीअधिक चढउतार याला धरून ‘अन्न’ म्हणजे जगण्याकरिता लागणारा किमान आहार विविध स्वरूपांत देत असते.
मनुष्येतर जीवसृष्टी- प्राणी व वनस्पती या नैसर्गिक अवस्थेत आपापल्या गरजेप्रमाणे अन्न शोधतात, मिळवितात. कमीअधिक प्रमाणात निसर्गाशी प्राणी व वनस्पती जीव सांभाळून घेत आपले अन्न मिळवताना दिसतात. पक्षी थंडी सहन होईनाशी झाली, पाहिजे ते भक्ष्य मिळेनासे झाले की, हजारो मैल स्थलांतर दरवर्षी नियमित करताना दिसतात. ‘दाने दाने पे लिखा है खानेवाले का नाम।’ त्याप्रमाणे निसर्ग जन्माला घातलेल्या जीवसृष्टीला त्यांचे त्यांचे खाद्य देतच असतो. कमीअधिक पावसाच्या व जमीन मगदुराच्या प्रदेशांत सूर्यप्रकाश वेगवेगळा असताना वनस्पतींची अन्न, पाणी, जीवनरस व सूर्यप्रकाश मिळविण्याकरिता चालविलेली स्पर्धा जमिनीखालील व जमिनीवर आपण नेहमीच पाहतो. गमतीचे एक उदाहरण अलीकडेच संशोधनात लक्षात आले ते असे. उल्हासनगर विभागात उल्हास नदीच्या पात्रात सोडल्या जाणाऱ्या केमिकल्स कारखान्यांच्या सर्व तऱ्हेच्या धातुमिश्रित, गंधकमिश्रित पाण्यावर वाढत असलेल्या वनस्पती, त्या खराब पाण्यातील केमिकल्स यत्किंचितही शोधून घेत नाहीत असे सिद्ध झाले आहे. त्या नदीकाठच्या वनस्पतींची मुळे त्यांना नेमके हवे तसे अन्न जमिनीमधून कसे ना कसे ग्रहण करताना किंवा मिळालेल्या अन्नातून वेगळय़ा तऱ्हेने परिणमन करून घेताना दिसतात.
मानवाच्या बाबतीत अन्नदाता म्हणून निसर्गाचा विचार करावयाचा झाल्यास आपणास ठामपणे माहीत नसलेल्या, पण मानवाच्या पहिल्यावहिल्या व त्याला मिळालेल्या अन्नाकडे कल्पनेनेच पाहावे लागेल. पहिल्या मानवाला ज्या क्षणी भुकेची जाणीव झाली असेल, त्याच वेळेस त्याच्या समोर त्याच्या अगोदर कदाचित शेकडो वर्षे जन्म घेतलेल्या झाडांना रसरसलेली फळे लटकत असतील. भूक लागल्याबरोबर त्या मानवाला त्याच निसर्गाने फळ खाण्याची प्रेरणा दिली असेल. याच प्रकारे, समोर फळ उपलब्ध नसताना मानवाच्या तुलनेने अत्यंत लहान असा एखादा जीव किंवा प्राणिमात्र त्याच्या समोर वळवळताना किंवा जिवंत दिसत असल्यास त्याला मारण्याची, खाण्याची किंवा गिळून टाकण्याची प्रेरणा निसर्गाने तत्क्षणी दिली असावी.
ज्या निसर्गाने, ईश्वराने, ब्रह्मदेवाने, सृष्टिनिर्मात्याने माणसाला जन्माला घातले, त्याने त्या माणसाची भूक जशी उत्पन्न केली त्याचप्रमाणे त्या भुकेकरिता उत्तर म्हणून अन्नाचीही योजना केली आहे. माणसाची मूलभूत गरज दोनच प्रकारची आहे. अन्न व निद्रा. निद्रा आपोआपच येते. अन्न या शब्दात आहार व पाणी या दोहोंचा समावेश मी एकत्र अपेक्षित करतो. निसर्ग व माणूस यांचा लढा किंवा माणसाचा निसर्गाचा वापर, जगाच्या सुरुवातीपासून चालू आहे. निसर्गाने जड व चेतना यांच्याकरिता खरे पाहिले तर समान न्याय ठेवला आहे; पण मनुष्यप्राणी हा बुद्धिमान आहे. तो जगाच्या सुरुवातीपासूनच विनाकष्ट, विनाश्रम अन्न मिळवू पाहात आहे. सुरुवातीच्या काळात माणूस निसर्गदत्त फळे, सहज मिळणाऱ्या जनावरांचे दूध किंवा आपोआप उगविणाऱ्या धान्यावर समाधानी असे; पण जसजशी इतिहासाची पाने उलटली जाऊ लागली, मानवाची उत्क्रांती होत गेली, तसतसे तो कदाचित मिळणाऱ्या फळांच्या बियांपासून नवीन झाडे उगवतात हे पाहू लागला असेल. त्या निरीक्षणातून धान्याची लागवड त्याला सुचली असेल. जे पशू दूध देतात त्यांचा संग्रह करून आहाराकरिता योजनाबद्ध दूध मिळविण्याचा त्यांनी प्रयत्न केला असेल. एका प्राण्याच्या मांसाहाराने जिभेला चव व चटक निर्माण झाल्यावर त्याने आपल्या सभोवती याच स्वरूपाच्या मांसाहाराकरिता अन्य प्राण्यांचा शोध व वेध घेतला असेल. हे करीत असताना काही वेळेला माणसाने माणसालाही खाल्ल्याचे इतिहासाचे दाखले आहेत. आजही नरमांसभक्षक जाती या पृथ्वीवर आढळून येतात.
आपण गेले काही हजार वर्षांचा विचार करताना असे लक्षात येईल की, अन्नदाता निसर्ग तोच आहे. शंभर वर्षांपूर्वी ज्या प्रकारे पृथ्वीच्या विविध भागांत पाऊसपाणी पडत होते, वारे वाहात होते, थंडी पडत होती, कडाक्याचा उन्हाळा होता किंवा बर्फ पडत होते वा तुफानी वारे वाहात होते, त्याच प्रकारे आजही सृष्टिक्रम चालू आहे. गेल्या काहीशे वर्षांत नद्या, नाले, समुद्र, महासागर यांचेही स्वरूप फारसे बदललेले नाही. लहान टेकडय़ांपासून डोंगर, मोठाले पर्वत वा हिमशिखरे काहीशे वर्षे तशीच आहेत; पण महाप्रचंड बदल मानव, त्याची राहणी, त्याची भूक, निसर्गाकडून त्याच्या अपेक्षा यांच्यात मात्र फार झपाटय़ाने- वेगाने बदल झालेला दिसत आहे.
अन्नदाता निसर्गाच्या कालाचे कालखंड करावयाचे झाल्यास पहिल्या वा दुसऱ्या महायुद्धापर्यंत जगातील लाखातील एका माणसाच्यासुद्धा डोक्यात अन्नदाता निसर्ग तो देत असलेले अन्न, हवा, पाणी किती काळ देणार? मनुष्यमात्राला ते नेहमी पुरणार का? किती लोकसंख्येला हा निसर्ग पोसणार? असे प्रश्न आले नसतील.
आता मात्र गेली पाच-पंचवीस वर्षे निसर्ग व त्याने देऊ केलेले अन्न यांची चर्चा लहान-मोठा, सामान्य तसेच खूप शिकलेले असे जगभर करताना लोक दिसतात. एक काळ जीवन फार साधे सोपे, फार धकाधकीचे नसलेले असे जगभर होते. जगाच्या सर्व भागांत त्या त्या परिस्थितीप्रमाणे त्या त्या देशातील, प्रांतातील, गावातील, लहानमोठय़ा प्रजेला त्यांच्या त्यांच्या गरजेप्रमाणे निसर्ग अन्न देत होता.
एस्किमोच्या प्रदेशात रेनडिअर प्राणी, तिबेटियन लामांसाठी याक प्राणी, आफ्रिकेच्या मध्य भागातील जंगलात सिंह, हरीण वा इतर प्राणी, ऑस्ट्रेलियासारख्या प्रदेशात मेंढय़ा, रशियात डुक्कर वा अन्य प्राणी व त्याच प्रकारे नाना तऱ्हेचे धान्य, फळफळावळ, दूध असा आहार किंवा अन्न निसर्गाकडून जसे मिळेल तसा मानव-सृष्टीचा चरितार्थ चालत होता असे दिसते. एखाद्या भू-भागात नुसती ज्वारीची भाकरी खाऊन लोक काबाडकष्ट करताना व आपले देवाने दिलेले जीवन बऱ्यापैकी जगताना दिसतात, तर काही भागांत नुसत्या भातावर राहणारे लोक दिसतात. काहींना नुसते मासे किंवा एखाद्या प्राण्यांचे दूध एवढेच अन्न निसर्ग देत असताना दिसतो व त्यावर त्यांची नुसतीच गुजराण होते असे नाही, तर आपल्या शरीराचा कारभार उत्तम प्रकारे चालविताना दिसतात.
मला नेहमी आश्चर्य हे वाटते की, आधुनिक आहारशास्त्रात प्रोटीन्स, काबरेहायड्रेट, शुगर, फॅट, स्टार्च, सॉल्ट असा आहार किंवा असे अन्न माणसाला हवे, असे मोठमोठे शास्त्रज्ञ, आहारतज्ज्ञ, वैद्यकीय तज्ज्ञमंडळी सांगताना दिसतात. आयुर्वेदशास्त्रातही भोज्य, लेहय, चोष्य, खाद्य असे प्रकार आहाराचे दिसतात. चरकचार्यानी आशित, पीत असे वर्गीकरण केलेले दिसते. निसर्गाच्या मनात अन्न म्हणून अशा प्रकारची अपेक्षा आहे का? निसर्गाने खरे म्हणजे वेगळीच व्यवस्था आपल्याकरिता केली होती. निसर्ग आपल्यापेक्षा अधिक शहाणा आहे. झाडाला आलेली फळे पिकायला किमान महिना-पंधरा दिवस लागतात व त्यानंतर ते फळ मानवी आहाराला योग्य असे होते. अशी निसर्गाने योजना केली होती. आम्ही मात्र पंधरा-वीस मिनिटांत, अध्र्या तासात, अन्न पचवून ते अन्न म्हणून खाऊ, पचवू इच्छितो. निसर्गाने खुली हवा, खुले पाणी, प्राकृती स्थितीतील पालेभाज्या, रसरसलेली फळे, धान्याची ताजी कणसे असा आहार आमच्या शरीररक्षणाकरिता केला असावा.
अन्नाचे शरीरावर कार्य तीन प्रकारे आहे. १) शरीरवृद्धी व रक्षण  २) शरीरकार्याकरिता ऊर्जा तयार करून तापमान राखणे व ३) शरीरातील रासायनिक तसेच भौतिक चयापचय व त्याचे नियमन. शरीरातील विविध संस्था दर क्षणाला जे कार्य करतात त्या कार्यात त्यांची, त्यांच्या अणुरेणूंची जी झीज वा फाजील वृद्धी होत असते त्याच्या नियमनाकरिता अन्नाची गरज आहे. निसर्गाने शरीराचे स्वास्थ्य, सौंदर्य हे शेतात, डोंगरात, मातीत, पाण्यात ठेवलेले आहे. अलीकडच्या मानवाने ते दवाखान्यात वा औषधात ठेवलेले दिसते. व्हिटॅमिनच्या जंजाळात आम्ही गुंतलेलो दिसतो. आम्ही आमचे सर्व अन्न व्हिटॅमिन्सच्या हिशेबात विचार करतो. तळपणारा सूर्य, वाहणारे वारे, मोजता येणार नाही असे अफाट आकाश, अथांग सागर व अपार पृथ्वी हे काय ए, बी, सी, डी अशा स्वरूपाच्या व्हिटॅमिनयुक्त अन्न देण्याकरिता का कार्य करीत आहेत? निसर्ग हा मानवी जीवनातील समतोल राखण्याकरिता नक्कीच काम करीत असतो. निसर्ग आमचे कळत-नकळत आमच्या गरजेप्रमाणे आम्हाला खऱ्या अर्थाने आवश्यक असणारे अन्न उपलब्ध करून देण्याची योजना करीत असणार. त्याच्या न्यायाने आम्ही चाललो तर या अन्नदाता निसर्गाकडून आम्हाला शरीराच्या गरजेप्रमाणे लागणारे अन्न निसर्गाचा समतोल न बिघडविता नक्कीच मिळविता येईल. माणूस आपला पैसाअडका, जमीनजुमला यांच्या सुरक्षिततेकडे खूप दूरदृष्टीने पाहताना दिसतो. मुलाबाळांचे, नातवंडांचे, सग्यासोयऱ्यांचे कल्याण पाहण्याकरिता धडपडतो. आपण राहत असलेला परिसर, समाज वा देशाकरिता धडपडताना दिसतो; पण स्वत:च्या आहाराकडे तितक्याच दूरदृष्टीने तो पाहतो आहे असे तुलनेने फारच क्वचित दिसते. आपला देह पंचभौतिक आहे. त्याची कमीअधिक झीज वा भर पाच महाभूतांचा आहे. त्याच्याकरिता या पृथ्वीवरून आपल्याला पंचभौतिक गुणांचे- पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या गुणांचे अन्न मिळावयास हवे. त्याकरिता या अतिविशाल सृष्टीच्या पंचभौतिक जडणघडणीकडे लक्ष देऊन आमच्या अन्नाची व्यवस्था आपण करावयास हवी, हे त्याच्या अजूनही लक्षात येत नाही. निसर्ग खूप देऊ शकतो. ते नेमके कसे मिळवावे याकरिता सध्याच्या कठीण काळात, ज्या काळात सर्व तऱ्हेच्या नैसर्गिक साधनसंपत्तींची टंचाई भासू लागली आहे. या पिढीला किंवा पुढच्या एक-दोन पिढय़ांना पुरेसे अन्न-पाणी मिळू शकेल की नाही, अशा चिंतेने जगभरचे विचारवंत, ज्ञानी, शास्त्रज्ञ, समाज, शासन व सर्वसामान्य माणूसही त्रस्त झालेला दिसतो.
पन्नास-पाऊणशे वर्षांच्या मागे निसर्ग मानवाला आज जसे विविध स्वरूपांचे अन्न देत आहे तसेच त्या वेळेसही देत होता; पण त्या वेळेस तुलनेने माणसांची, पशूंची संख्या कमी होती. आज मानवाची भूक- उपभोगाची भूक वाढलेली आहे. उपभोगाची भूक कॅलरीच्या हिशेबात मोठय़ा अभिमानाने सांगितली जाते. पाश्चात्त्यांच्या तुलनेत आम्ही किती कमी खातो याचे चित्र समाजशास्त्रज्ञ रंगविताना दिसतात. ‘दर डोई उत्पन्न’ व तेल, तूप, साखर, धान्य, कापड, जळण, पेट्रोल इ. जागतिक खपाचा विचार करताना, तुलनेने भारत किती मागासलेला आहे असे चित्र तथाकथित समाजशास्त्रज्ञ, प्रगत शेतकरी, कारखानदार, व्यापारउदिमातील तज्ज्ञ, सरकारी अधिकारी व राजकीय पुढारी रंगविताना दिसतात. या पृथ्वीवर उपलब्ध असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती ‘उपभोगाच्या’ स्पर्धेत एकमेकांवर मात करून या राष्ट्रांनी संपवून टाकावी की काय, असाच विचार ही मंडळी मांडताना दिसत आहेत. प्रजेची अमाप संख्या वाढली आहे त्याकडे संततिनियमनाच्या दृष्टिकोनातून तर पाहावयास हवेच, पण त्याचबरोबर या मर्यादित भूमीवर, जमिनीवर ताण किती द्यावयाचा, जमिनीचा कस नष्ट न होता तो टिकवून माणसाच्या ‘गरजे’पुरते अन्न कसे मिळविता येईल याचा विचार सगळय़ाच विचारवंतांनी करावयास हवा.
ऋ षी-शेती ही कल्पना निसर्गाने देऊ केलेले अन्न व मानवी जीवनाची गरज यांचा समतोलपणा राखण्याकरिता नुसतीच आदर्श आहे असे नसून, त्याची नितांत गरज आहे. आज आपण आपल्या गरजेप्रमाणे अन्न मिळविण्याकरिता जे करतो आहे ते या हतबल भूमीवर अत्याचार करण्यासारखे आहे. आम्हाला भरपूर मांस खावयास हवे म्हणून मांस देणाऱ्या पशूंची अमाप संख्या तयार करावयाच्या मागे माणूस लागत आहे. शेळय़ा, मेंढय़ा, डुकरे, गाय, बैल किंवा बदके, कोंबडय़ा व मासे यांची प्रचंड संतती निर्माण करत आहोत. या प्राण्यांना पोसण्याकरिता स्वाभाविकपणे भरपूर चारा, गवत किंवा त्यांना लागणारा आहार मिळावा म्हणून उपलब्ध असलेल्या जमिनीतून नाना तऱ्हेचे गवत वा धान्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या मागे आम्ही आहोत. सहजपणे भरपूर गवत वा धान्य मिळत नसेल, तर रासायनिक खतांचा वारेमाप वापर आम्ही करणार, मग भले जमिनीचा कस काही कालाने गेला तरी आम्हाला त्याची पर्वा नाही. राजस्थान, पंजाब, हरयाणा अशा काही भागांमध्ये केवळ गवताच्या मागे लागून खूप मोठय़ा प्रमाणावर जमिनी उजाड होत आहेत. पाळीव प्राण्यांची संख्या वाढविताना त्यांच्या भावनांचा तर आम्ही विचार करत नाहीत; पण अन्नदाता निसर्गाकडून किती लुबाडायचे याचा विवेक माणसाजवळ राहिलेला नाही. ऋ षी-शेतीमागे मूळ कल्पना अशी आहे. आपले एकूण जीवन संयमी असावे, प्रजा मर्यादित असावी, जमिनीचा मगदूर बघून जमिनीला न दुखाविता, जमिनीतील कीटक, गांडुळे वा अन्य किडा-मुंगींचा नाश न करता, नांगर न लावता अन्नधान्याचे उत्पादन घ्यावे. या जगात किडा-मुंगीलाही जगण्याचा अधिकार आहे. त्यांचा हक्क नाकारून ‘बळी तो कान पिळी’ किंवा ‘मोठय़ा माशाने लहान माशाला गिळावे’ तसे इतर जीवसृष्टीला हटवून आमच्या उपभोगाकरिताच आजचा मानव विचार करताना दिसत आहे. निसर्गदत्त फळे पुरेशी पडत नसली, तर आम्ही ‘टिश्यू कल्चर’च्या मागे लागलो आहोत. निसर्गापेक्षा किंवा ब्रह्मदेवापेक्षा मानव मोठा होऊ पाहत आहे. निसर्गाचा समतोलपणा बिघडवून आपल्या फाजील गरजा भागविण्याकरिता जमिनीवर खूप भार द्यावयास लागलो, की आपणास नको असलेले कीटक, विषाणू, व्हायरस यांना आपण जन्म देणार आहोत हे लक्षात ठेवावयास हवे. फळे भरपूर मिळावी, लवकर पिकावी, त्यातील बियांमुळे आमच्या दातांना कष्ट पडू नयेत असे नाना प्रयोग आपण पाहतो, करतो; पण त्यामुळे मूळ उत्तम चव व फळांमधील रसरशीतपणा आपण गमावून बसत आहोत. पाण्याचा अमाप वापर करावयाला लागल्यामुळे सागराचे खारे पाणी पिण्याकरिता गोडे पाणी करावयाच्या अवाढव्य खर्चाच्या योजना मानवाला आखाव्या लागत आहेत. जगभर पिण्याकरिता गोडय़ा पाण्याचे साठे निसर्गाने काही कमी ठेवलेले नाहीत. नद्या, ओढे, विहिरी, तळी आहेत तशीच आहेत; पण आम्ही आमच्या महाप्रचंड गरजांकरिता भूगर्भातील खोलवर असलेले पाणीही झपाटय़ाने संपवीत आहोत व ते पाणी संपल्यामुळे समुद्राचे पाणी हा मानव कधीकाळी संपवून बसेल की काय, अशी स्वाभाविक भीती वाटत आहे. पुणे- मुंबई रस्त्यावर पनवेलच्या आसपास माणसाने विटा, दगड, मातीकरिता डोंगरच्या डोंगर संपविलेले दिसतात. शेवटी निसर्ग किती देईल यालाही मर्यादा असतात. म्हणून काही काळ आपल्या गरजांवर नियंत्रण आणून ऋ षी-शेतीचा काही प्रमाणात प्रयोग करणे नितांत गरजेचे आहे. निसर्ग आम्हाला अनंत काळ अमर्यादित अन्न देईल या भ्रमात आजचा माणूस दिसून येत आहे. शेवटी कुठे तरी मर्यादा घालणे ऋ षी-शेतीसारख्या कल्पनेतूनच शक्य आहे.
मानवी जीवन जसजसे ‘समृद्ध’ होत जात आहे तसतशी त्याची आहाराची व्याख्या बदलत आहे. माणूस आहाराचा विचार करताना शारीरिक ताकद, बौद्धिक विकास, रोगप्रतिकारशक्ती, व्यक्तिमत्त्व, सौंदर्य, स्वच्छता, रंग, थोडय़ा श्रमात भरपूर अन्न, टिकविण्याचे कृत्रिम उपाय अशा वेगवेगळय़ा दृष्टिकोनांतून विचार करताना दिसतो. माणसाची वेगळय़ा तऱ्हेने एक व्याख्या केलेली आहे. ती म्हणजे माणूस काय खातो यावरून त्याचे स्वरूप ठरविता येते. या भूतलावरील प्राणिसृष्टीत माणसाच्या आहाराची निवड ही सर्वात खालच्या पातळीची आहे. लहानसहान किडा-मुंगीला किंवा मोठय़ा प्राण्यांना निसर्गदत्त आहाराची जी देणगी आहे ती आम्ही केव्हाच गमावून बसलेलो आहोत. निसर्ग आम्हाला खूप देत आहे किंवा भरपूर अन्नपाणी देणार आहे. पण त्यातील आमच्या हिताचे नेमके घेऊन आम्ही अन्न हे आमचे मित्र करावयाचे, की अहितकारी अन्नाच्या मागे लागून आमच्या अन्नाला आमचे शत्रू बनवायचे, याचा विचार हवा. जंगलातील पशू-पक्षी व अन्य कीटक यांना निसर्ग त्यांच्या गरजेप्रमाणे अन्न देत असतो. त्याक रिता त्या प्राण्यांची काळजी, रक्षण निसर्गच करतो. प्राण्यांना आपला विचार करावा लागत नाही. याउलट आजच्या मानवाला आहाराबरोबरच श्रम, विश्रांती, भूक, तहान, चैन, व्यसन, झोप अशा नाना अंगांनी विचार करावा लागून व ते सर्व निसर्गाकडून कसे मिळवावे याचाच विचार करावा लागतो व ते करीत असताना भले निसर्गदत्त संपत्ती झपाटय़ाने ऱ्हास पावत आहे याचा विचार फारच थोडे लोक करत आहेत.
मानवाच्या काही हजार वर्षांच्या संस्कृतीत, उत्क्रांतीमध्ये काही खूप चांगल्या गोष्टीही दिसून येत आहेत. गवतापासून ऊसापर्यंत उत्क्रांती किंवा कापसाच्या वा भाताच्या व नवनवीन सुधारलेल्या जाती या गोष्टी, निसर्गाचा योग्य उपयोग मानव करून घेत आहे याची आदर्श उदाहरणे आहेत. पण इथे ‘निसर्ग सर्वाकरिता आहे’ हे सूत्र सुटलेले नव्हते. पण आत्ताचे हायब्रिड शेतीचे प्रयोग किंवा कृत्रिम अन्नाची निर्मिती हे ऐकूण निसर्गाच्या ‘अन्नदाता’ या व्यापक भूमिकेच्या विरुद्ध आहे.
आजचे मानवी जीवन धकाधकीचे, प्रदूषणाचे, मानसिक ताण-तणावाचे, नवनवीन रोगांचे आपणच निर्माण केलेले आहे. आपणच प्रश्न निर्माण करावयाचे व ते सोडविण्याकरिता अन्नदाता निसर्गाला  वेठीला धरावयाचे असे किती दिवस चालणार? ‘इट वेल, थिंक वेल, फील वेल असे एका इंग्रजी सुभाषितात मानवी जीवनाचे थोडक्यात सार सांगितले आहे. आम्ही फक्त खाण्यापुरताच विचार करून चाललेलो आहोत. मानवी शरीर ही नुसती केमिकल लॅबोरेटरी आहे व ती चालू ठेवण्याकरिता काही ना काही खाद्य आपण त्या बॉडीला भरवत आहोत. पण ते ज्या निसर्गातून द्यावयाचे त्या निसर्गामध्येसुद्धा ती ती खाद्ये निसर्गनियमांनी तयार झाली पाहिजेत याचा विचार आपण करताना दिसत नाही.
युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु।
युक्तस्वप्नावबोश्च योगे भवति दु:खदा॥
आहार प्रीणन: सद्यो, बलकृत देहधारक:।
आयु : तेजस समुत्साह स्मृत्योजोग्नि विवर्धत:॥
काही अश्रद्ध व स्वत:ला बुद्धीवादी समजणारे, श्रद्धेला विरोध करणारे तथाकथित पंडित लोक सोडले, तर सर्वसामान्यांपासून मोठमोठय़ांपर्यंत ‘आपले जीवन’ प्राकृतिक व ईश्वरी न्यायाने चालत आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. प्राकृतिक व ईश्वरी न्यास निसर्गाला सोडून नाही. निसर्गाकडून या जगात जड व चेतन सर्वाना समान न्यास आहे. आम्ही माणसांनी आमचे जीवन दिवसेंदिवस अधिक कृत्रिम व वेगवान बनविण्याचे ठरविले आहे. आम्ही वेगाने अधोगतीकडे जात आहोत हे लक्षातच येत नाही. त्यामुळे आम्हाला अनंत हस्ते स्थळ-काळपरत्वे नानाविध अन्न द्यावयाला निसर्ग सिद्ध असताना आम्ही असमाधानी, दु:खी-कष्टी असे आहोत. जीवनाच्या रोजच्या झगडय़ात आमच्या वाटय़ाला आलेल्या कार्यातला आनंद आम्ही गमावून बसत आहोत. आम्ही कुठे जावयाचे, साधी राहाणी पत्करावयाची का विलासी जीवन पत्करावयाचे यावर विचार करून वाटचाल केली तर निसर्गाकडून कोणत्याही स्वरूपाच्या अन्नात कधीच कमतरता येणार नाही.
वदनी कवल घेता,
नाम घ्या श्रीहरीचे।
सहज हवन होते
नाम घेता पुकाचे॥
जीवन करी जीवित्वा,
अन्न हे पूर्ण ब्रह्म।
उदरभरण नोहे
जाणिजे यज्ञ कर्म॥
वैद्य प. य. खडीवाले वैद्य – response.lokprabha@expressindia.com

chaturang article
स्थलांतरातून बहरलेली खाद्यसंस्कृती
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
successful journey Anushka Jaiswal vegetable cultivation farming
कुत्सित बोलणी ते ‘मॅडम के खेत की मिरची’…अनुष्का जयस्वालचा यशस्वी प्रवास
Loksatta kutuhal How minerals got their names
कुतूहल: खनिजांना नावे कशी मिळाली?
Need to reconsider the guaranteed price policy
हमी भाव धोरणाच्या पुनर्विचाराची गरज
cotton price farmers are still facing problems
कापूस उत्‍पादकांची परवड ‘सीसीआय’नेही घटवले दर…
Manjit Singh Success Story
Success Story : “शेतकरी असावा तर असा…” भाड्याने जमीन घेऊन केली हळदीची शेती; डॉक्टर ऑफ ॲग्रीकल्चर म्हणून झाला लोकप्रिय
manmohan singh
सामान्य माणूस, शेतकरी यांच्यापर्यंत आर्थिक सुधारणा पोहोचल्या का?
Story img Loader