आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनशैलीचा आपल्या शरीरावर मोठा परिणाम होत असतो आणि त्यातून वेगवेगळ्या विकारांना तोंड द्यावं लागतं. त्यांची पथ्यं आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाच-पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत तुमचे आमचे; शहर व ग्रामीण जनतेचे दैनंदिन जीवन खूप खूप आरोग्यदायी होते. गेल्या दोन तपात, विशेषत: या पाच वर्षांत, सर्वाचेच जीवन खूप फास्ट झाले आहे. खूप खूप श्रीमंत, भांडवलदार, सरकारी कर्मचारी, व्हाइट व ब्ल्यू कॉलरवाले, हातावर पोट असणारे कामगार सर्वच खूप घाईत असतात.

प्रत्येकाचे चोवीस तास, प्रत्येकाला कमी पडत आहेत. आठवडय़ांच्या सात दिवसांबरोबर आणखी एक दिवस ‘पेंडिंग कामाकरिता’ असला, तर प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. या अशा अति रोजच्या भयानक धावपळीत, बहुसंख्यकांचे आपले वेळेत व व्यवस्थित जेवण व्हायला पाहिजे; पुरेसा व्यायाम व झोप विश्रांतीचा लाभ घेतला पाहिजे याकडे शंभर टक्के दुर्लक्ष होते. त्यामुळे तुम्हा आम्हा सर्व लहानमोठय़ांना पुढील सहा षड्रिपूंचा सामना केव्हा ना केव्हा करावा लागतोच. मूत्रपिंडविकार, हृद्रोग, मेंदूविकार, पोटाचे आजार, उष्णता वा वाढते पित्ताचे आजार व अनेकानेक वातविकार.

अशा या वाढत्या विकारांच्या विळख्यामुळे वैद्य व डॉक्टर, हॉस्पिटल, विविध लॅब यांचा धंदा जोरात चालतो. संबंधित रुग्ण माझे दवाखान्यास आले की म्हणतात, ‘पैसे घ्या, पथ्यपाणी न सांगता, आम्हाला झटपट बरे करा!’ रुग्णमित्रांनो जवळपास सर्वच रोग-अनारोग्य समस्यांकरिता पुढील पथ्यपाणी जर आपण पाळले, तर आपले वैद्यकीय बजेट वाचेल. आपण चांगल्या आरोग्याने दीर्घायुष्याचा लाभ घेऊ!

मूत्रपिंडविकार –

या विकारामुळे अर्धागवात, हृद्रोग इत्यादी रोगांचा जन्म होतो. त्याकरिता आपल्या आहारातील मिठावर नियंत्रण आणावे. लेखणीबहाद्दर लोकांनी शक्यतो आळणी जेवावे. गरजेप्रमाणे पाणी भरपूर जरूर प्यावे. पण अतिस्थूल व्यक्तींनी तारतम्याने पाणी प्यावे. बारीक बिया असणारे टोमॅटो, काकडी, भेंडी, तीळ, पालेभाज्या, चहा, मांसाहार व मिठाई टाळावी.  मधुमेही व्यक्तींनी ज्वारीची मदत घ्यावी. नियमितपणे बेलाच्या दहा पानांचा काढा घ्यावा. जेवण विभागून जेवावे. गोक्षुरादि गुग्गुळ, रसायनचूर्ण, गोक्षुर काथ, आम्लपित्त वटी यांची योजना तज्ज्ञांचे सल्ल्याने करावी.

हृद्रोग –

मधुमेही, स्थूल व कृश अशा तीन प्रकारे हृद्रोग समस्येचा विचार करायला लागतो. या रोगात ‘रक्त जीव इति स्थिती:’ हे सूत्र सतत लक्षात ठेवायला लागते. किमान तीन महिन्यांनी मधुमेह व रक्तातील चरबीत कोलेस्टिरॉल, ट्रायग्लिसराइडकरिता रक्ततपासण्या काही काळ आवश्यक असतात. सारख्या ईजीसी तपासण्याऐवजी, आपण जास्त जिने चढ-उतार केली किंवा खूप बोललो तर धाप लागते का यावर लक्ष द्यावे.  सायंकाळी कटाक्षाने लवकर व कमी जेवावे.  स्थूल व मधुमेही रुग्णांनी हार्ट अटॅक येऊ नये म्हणून कटाक्षाने ज्वारीची भाकरी, मूग, उकडलेल्या भाज्या, आळणी जेवण, मांसाहार वज्र्य असा आहारसंयम ठेवावा. बेलाच्या पानांचा काढा जरूर घ्यावा.  अकारण ब्लडप्रेशरच्या गोळ्या घेऊ नयेत. किमान दोन वेळा दहा मिनिटे दीर्घश्वसनाचा अभ्यास करावा. कटाक्षाने परान्न टाळावे. सुमादि, शृंगभस्म, लाक्षादि व गोक्षुरादि गुग्गुळ, अभ्रकमिश्रण व अर्जुनारिष्ट यांची मदत घ्यावी. अतिस्थूल व्यक्तींनी आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, गोक्षुरादि त्रिफळा गुग्गुळ, अम्लपित्तवटी व रसायन चूर्णाची मदत घ्यावी. अतिकृश हृद्रोगी व्यक्तींनी अश्वगंधारिष्ट, आस्कंध चूर्ण, पुष्टिवटी, चंद्रप्रभा, सुमादि, शृंग भस्म यांचा सहारा घ्यावा. निद्रा समस्या असणाऱ्यांनी निद्राकरवटीची मदत घ्यावी.

मेंदूविषयक आजार –

या विकाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस भूमितीश्रेणीने वाढत आहे.  बुद्धिमांद्य, विस्मरण, अपस्मार, फिट्स, ताणतणाव सहन न होणे, आत्मविश्वासाचा अभाव, याउलट खूप आदळआपट, हिंसकपणा, अकारण राग असे मेंदू संबंधित रोग असणारे रुग्णांना सल्ला मसलत व औषध देणारे वैद्यकीय चिकित्सकही हैराण होतात. मेंदूच्या वाढत्या विकारांची परिणिती, ‘अचानक आत्महत्या’ या रोजच्या बातम्या आपण वाचत असतोच. सर्व सामान्यपणे ब्राह्मीवटी, लघुसुतशेखर, निद्राकरवटी व जेवणानंतर सारस्वतारिष्ट या औषधांचा उपयोग बहुतेक मेंदू संबंधित विकारात नक्की होतो. खूप मेंदूविकार छळत असेल तर पंचगव्यघृत व नस्याकरिता अणुतेल, नस्यतेलाची मदत घ्यावी.  रात्री कानशिले, कपाळ, तळहात, तळपाय यांना शतधौत घृत जिरवावे.  रात्रौ जेवणानंतर कटाक्षाने किमान अर्धा तास फिरून यावे. शक्यतो उशी टाळावी. मेंदूविकारांमुळे व्यसनाधीन होऊ नये. मद्यपान, धूम्रपान यांना कटाक्षाने लांब ठेवावे. दीर्घश्वसन, प्राणायाम व सत्संगांचा लाभ घ्यावा.

पोटाचे आजार –

पोटाच्या आजारांची व्याप्ती खूपच आहे. अतिसार, मलावरोध, आमांश, आम्लपित्त, भूक नसणे, उदरवात अशा सहा लक्षणांकरिता वेगवेगळी पथ्ये व औषधांची योजना आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘संयमसे स्वास्थ्य’ हा मंत्र सतत जपावा. परान्न, हॉटेल, मांसाहार, मेवामिठाई, बेकरी पदार्थ, शिळे अन्न, शंकास्पद अन्न व उशिरा रात्री जेवण टाळावे, जेवणात पुदिना, आले अशी चटणी असावी. फ्रिजचा वापर बंद करावा. सुंठयुक्त पाणी घ्यावे. अतिसार समस्येकरिता कुटजवटी, शमनवटी, संजीवनी वटी, कुटजारिष्टाची मदत घ्यावी.  मलावरोध विकारात आरोग्यवर्धिनी, त्रिफळा गुग्गुळ, आम्लपित्तवटी, कपिलांदि वटी, गंधर्व हरितकी व अभयारिष्ट यांची योजना करावी.  आमांश विकारात कटाक्षाने साखर बंद करावी. फलत्रिकादि काढा, कुटजारिष्ट, कुटजवटी, आम्लपित्तवटी, त्रिफळा गुग्गुळ, आरोग्यवर्धिनी व सुंठ चूर्णाची मदत घ्यावी. आम्लपित्त विकारात कटाक्षाने वेळेतच जेवावे, जेवणाची वेळ मागे-पुढे नको. साळीच्या, राजगिरा, ज्वारीच्या लाह्य़ांची मदत अवश्य घ्यावी. रात्रौ जेवणानंतर फिरून यावे व त्रिफळा चूर्ण आठवणीने घ्यावे.  सकाळी व सायंकाळी लघुसूतशेखर, गणेशप्रसाद, गणेशकृपा, आम्लपित्तवटी यांची मदत घ्यावी.  कृश व्यक्तींनी शतावरी घृत, कुष्मांडपाक, गोरखबिचा व लोहाची मदत घ्यावी. भूक लागत नसल्यास कुमारी आसव, आरोग्यवर्धिनी, त्रिफळा गुग्गुळ व आम्लपित्तवटीची योजना उपयोगी पडते. उदरवात विकारात अभयारिष्ट, प्रवाळपंचामृत, आम्लपित्तवटी, त्रिफळा गुग्गुळ, गंधर्व हरितकी यांची मदत घ्यावी.

उष्णता व गरमी विकार –

खाण्या-पिण्यात संयम पाहिजे.  कटाक्षाने मांसाहार, दही, लोणची, पापड, तिखट, मीठ, उशिरा जेवण, हॉटेलमधील शंकास्पद अन्न टाळावे.  व्यसनांपासून लांब राहावे. नियमितपणे मौक्तिकभस्म किमान अर्धा ग्राम रोज दोन वेळा घ्यावे. लघुसुतशेखर, प्रवाळ, कामदुधा, चंदनादिवटी, उपळसरी चूर्ण, शतावरी घृत, महातिक्त घृत व त्रिफळा चूर्णाची तारतम्याने योजना करावी. साळीच्या, ज्वारीच्या किंवा राजगिरा लाह्य़ांची मदत घ्यावी. चांगल्या दर्जाच्या काळ्या मनुका अवश्य द्याव्यात,  चहाऐवजी कॉफी, कोको, शतावरी कल्प असे पेय घ्यावे.

विविध वातविकार –

वातविकारांची व्याप्ती खूप खूप आहे. या रोगात तीन लक्षणांकडे लक्ष असावे.  मलावरोध, उदरवात व स्थौल्य.  अनेकानेक गुग्गुळ कल्पांचे योगदान खूपच मोठे आहे. गोक्षुरादि त्रिफळा, लाक्षादि, सिंहनाद, संधिवातारि, आभांदिर, गणेश गुग्गुळ वातादि, वातगजांकुश, सौभाग्य सुंठ इ. अभयारिष्ट काढा, गंधर्व हरितकी, त्रिफळा गुग्गुळ यांचीही मदत घ्यावी.  कटाक्षाने अभ्यांगाकरिता महानारायण तेल, चंद्रनबला तेल यांची मदत घ्यावी. कृश व्यक्तींनी आस्कंध चूर्ण, अश्वगंधापाकाची योजना करावी.

संयमसे स्वास्थ्य! शुभं भवतु!

वैद्य प. य. खडीवाले वैद्य – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व औषधाविना उपचार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six big illness and diet