क्रीडा
यंदाच्या ग्रँड स्लॅम मोसमातील पहिल्याच स्पर्धेत झाडून साऱ्या टेनिसपंडितांचे अंदाज खोटे ठरले. ऑस्ट्रेलियन ग्रँड स्लॅममध्ये स्टॅनिस्लास वॉवरिन्क व ली ना यांनी या स्पर्धेत अनेक आश्चर्यजनक विजय नोंदवीत स्वप्नवत विजेतेपद मिळविलं आहे.
टेनिसमध्ये ग्रँड स्लॅम स्पर्धाना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या स्पर्धामध्ये अजिंक्यपद मिळविण्यासाठी प्रत्येक खेळाडू धडपडत असतो. अशा स्पर्धामध्ये कोण विजेता होईल याचा अंदाज टेनिसपंडित करीत असतात. बऱ्याच वेळा त्यांचे अंदाज खरे ठरतात. मात्र यंदाच्या ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेने या पंडितांचे अंदाज सपशेल खोटे ठरविले. स्टॅनिस्लास वॉवरिन्क व ली ना यांनी या स्पर्धेत अनेक आश्चर्यजनक विजय नोंदवीत स्वप्नवत विजेतेपद मिळविले.
स्वित्र्झलंडचा खेळाडू वॉवरिन्क याने ग्रँड स्लॅम स्पर्धेत प्रथमच अंतिम फेरीत स्थान मिळविताना कारकिर्दीतील पहिले ग्रँड स्लॅम अजिंक्यपद मिळविले. हा पराक्रम करताना त्याने द्वितीय मानांकित नोवाक जोकोविच व अग्रमानांकित रॅफेल नदाल यांना पराभवाचा धक्का दिला. पहिल्या दोन मानांकित खेळाडूंना पराभूत करीत अजिंक्यपद मिळविणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. चीनची ३१ वर्षीय खेळाडू ली ना हिने जिद्दीस कामगिरीची जोड दिली तर विजेतेपदाच्या मार्गात वयाचा अडथळा येत नाही हे दाखवून दिले. यापूर्वी तिने फ्रेंच स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. ऑस्ट्रेलियन स्पर्धेत विजेतेपद मिळविणारी ती पहिलीच आशियाई खेळाडू ठरली आहे.
या स्पर्धेत जागतिक क्रमवारीतील अग्रमानांकित नदाल, जोकोविच, अँडी मरे व डेव्हिड फेरर यांच्याकडे संभााव्य विजेते म्हणून पाहिले जात होते. वॉवरिन्क याने गेल्या तीन वर्षांमध्ये ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये अनेक बलाढय़ खेळाडूंना पराभूत करण्याची किमया घडविली आहे. त्याने लंडन येथील ऑलिम्पिक स्पर्धेत रॉजर फेडरर याच्या साथीने दुहेरीचे सुवर्णपदक जिंकले होते. हे यश मिळविताना त्यांनी बॉब व माइक ब्रायन या श्रेष्ठ खेळाडूंवर सनसनाटी विजय नोंदविला होता. वॉवरिन्क याने गतवर्षी अमेरिकन स्पर्धेत टॉमस बर्डीच व विद्यमान विजेता अँडी मरे यांना पराभावाची चव चाखावयास दिली होती. असे असूनही ग्रँड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी त्याला वाकुल्या दाखवीत होती.
ऑस्ट्रेलियन स्पर्धेपूर्वी भाारतात चेन्नई खुल्या स्पर्धेत वॉवरिन्क याने विजेतेपदाला गवसणी घातली. या विजेतेपदामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला. त्याने ऑस्ट्रेलियन स्पर्धेत सातत्यपूर्ण खेळ केला. टेनिसमध्ये अव्वल दर्जाचे यश मिळवायचे असेल तर सव्र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण आवश्यक आहे. वॉवरिन्क याने उपान्त्यपूर्व फेरीत जोकोविच याला पाच सेट्सच्या लढतीनंतर पराभूत केले आणि विजेतेपदाच्या मार्गातील पहिला अडथळा दूर केला. उपान्त्य फेरीत त्याला बर्डीच याचे आव्हान परतविताना संघर्ष करावा लागला. मात्र या दोन्ही सामन्यांमधील चिवट लढतींमुळे त्याचे मनोधैर्य आणखी उंचावले. अंतिम लढतीत त्याच्यापुढे नदालसारख्या महान खेळाडूचे आव्हान होते. नदालने उपान्त्य फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी व माजी विजेत्या रॉजर फेडरर याला तीन सेट्समध्ये हरविले होते.
ली ना हिने २०११ मध्ये फ्रेंच स्पर्धेत अजिंक्यपद मिळवीत चीनचे खेळाडू एकेरीत अव्वल दर्जाची कामगिरी करू शकतात हे दाखवून दिले होते.
वॉवरिन्कविरुद्धच्या अंतिम लढतीत नदालचे पारडे जड मानले जाते. कारण नदालविरुद्ध त्याआधी झालेल्या एक डझन सामन्यांमध्ये वॉवरिन्कला विजय मिळविता आला नव्हता, एवढेच नव्हे तर एकही सेट त्याला घेता आला नव्हता. मात्र संयमास कष्टाची जोड दिली तर अशक्य गोष्टही साध्य करता येते हे लक्षात ठेवूनच वॉवरिन्क याने नदालविरुद्ध सर्वोत्तम खेळ केला. या सामन्यातील पहिले दोन सेट घेत त्याने विजेतेपदाची चाहूल निर्माण केली होती. पहिला सेट झाल्यानंतर नदालने पाठीच्या दुखण्यावरील उपचारासाठी तीन मिनिटे वेळ घेतला. त्यामुळे वॉवरिन्क हा कमालीचा अस्वस्थ झाला होता. त्याने पंचांकडे याबाबत आक्षेपही नोंदविला. मात्र त्यानंतर त्याने खेळावर लक्ष केंद्रित केले. तिसरा सेट त्याने गमावला, मात्र चौथ्या सेटमध्ये त्याने बहारदार खेळ केला व हा सेट घेत विजेतेपदावर आपली मोहोर नोंदविली. बॅकहँड परतीच्या फटक्यांबाबत तो माहीर आहे. पण त्याने फोरहँडचे क्रॉसकोर्ट फटकेही सहजतेने मारले. त्याने कोर्टच्या कॉर्नरजवळून मारलेले पासिंग शॉट्स म्हणजे त्याच्या चतुरस्र खेळाचा प्रत्ययच होता. नदाल याला पाठीच्या दुखण्याचा त्रास जाणवत असला तरी तिसऱ्या सेटमध्ये त्याने केलेला खेळ अव्वल मानांकनास साजेसा खेळ होता. मात्र पहिले दोन सेट त्याने गमावल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर आलेले नैराश्य त्याला लपविता आले नाही. त्याने पहिल्या दोन सेट्सप्रमाणचे चौथ्या सेटमध्येही खूपच चुका करीत सामना गमावला. वॉवरिन्क याने सुरेख पदलालित्य दाखवीत खेळ केला. नदालच्या चुकांचा पुरेपूर फायदा त्याने घेतला व ग्रँड स्लॅम अजिंक्यपदाचे स्वप्न साकार केले.
टेनिसमध्ये गेल्या चार-पाच वर्षांमध्ये चीनच्या खेळाडूंनी अनेकदा आश्चर्यजनक कामगिरी नोंदविली आहे. ली ना हिने २०११ मध्ये फ्रेंच स्पर्धेत अजिंक्यपद मिळवीत चीनचे खेळाडू एकेरीत अव्वल दर्जाची कामगिरी करू शकतात हे दाखवून दिले होते. आशियाई खेळाडूही ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये अव्वल यश मिळवू शकतात याचा प्रत्यय तिने घडविला. त्याआधी तिने ऑस्ट्रेलियन स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते. गतवर्षीही या स्पर्धेच्या विजेतेपदाने तिला हुलकावणी दिली होती. त्यामुळेच तिने यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा निर्धार केला होता. तिच्या मार्गात प्रामुख्याने अग्रमानांकित सेरेना विल्यम्स, मारिया शारापोवा यांचा अडथळा होता. सेरेनाने ऑस्ट्रेलियन स्पर्धेपूर्वी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकून आपण ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या विजेतेपदाच्या शर्यतीत आहोत असा इशारा दिला होता. मात्र सेरेनाची घोडदौड चौथ्या फेरीतच अॅना इव्हानोविकने संपुष्टात आणली. डॉमिनिका सिबुलकोवा हिने चौथ्या फेरीत शारापोवा या माजी विजेत्या खेळाडूवर मात करीत खळबळ उडविली. तिने पाठोपाठ इव्हानोविक व अॅग्नीझेका राडवानस्का यांच्यावर मात करीत अंतिम फेरीत स्थान मिळविले होते. खेळाच्या दृष्टीने ली ना हिच्यापेक्षा सिबुलकोवा ही तरुण खेळाडू होती. मात्र ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीचा अनुभव ली ना हिच्याकडे असल्यामुळे या लढतीत ली ना हिचे पारडे जड होते. जिगरबाज खेळाडू म्हणून ख्याती असलेल्या ली ना हिने संयमपूर्ण खेळ केला. प्रतिस्पर्धी खेळाडूला चुका करण्यास प्रवृत्त केले की आपले काम सोपे होते याचाच प्रत्यय तिने घडविला. तिने फोरहँड व बॅकहँड फटक्यांचा प्रभावी उपयोग केला. तसेच तिने नेटजवळून प्लेसिंगही सुरेख केले. अष्टपैलू खेळ करीत तिने येथे अजिंक्यपद मिळवीत आपले फ्रेंच विजेतेपद म्हणजे चमत्कार नव्हता हे दाखवून दिले.
महिलांच्या दुहेरीत सारा इराणी व रॉबर्टा व्हिन्सी या इटालियन जोडीने अजिंक्यपद मिळवीत अनपेक्षित कामगिरी केली. पुरुष दुहेरीत ल्युकास क्युबोट (पोलंड) व रॉबर्ट लिंडस्टेड (स्वीडन) यांनी विजेतेपदावर मोहोर चढविली. मिश्रदुहेरीत भारताची सानिया मिर्झा हिने रुमानियाच्या होरिया टाकेयू याच्या साथीत प्रथमच भाग घेतला होता. अंतिम फेरीपर्यंत या जोडीने मजल गाठली. मात्र अंतिम लढतीत त्यांना ख्रिस्तिना मॅलडेनोविक व डॅनियल नेस्टॉर यांच्या वेगवान खेळापुढे पराभव स्वीकारावा लागला.
सानियाचा अपवाद वगळता भारताच्या अन्य खेळाडूंची कामगिरी फारशी चमकदार झाली नाही. सोमदेव देववर्मन याला एकेरीत तर रोहन बोपण्णा, युकी भांब्री, लिअँडर पेस यांना दुहेरीत निराशाजनक कामगिरीस सामोरे जावे लागले.
ऑस्ट्रेलियन स्पर्धा ही ग्रँड स्लॅम स्पर्धाच्या मोसमातील पहिलीच स्पर्धा असते. यंदा मेलबर्न येथील कडक उन्हाचा त्रास अनेक खेळाडूंना झाला. दहाहून अधिक खेळाडूंनी स्पर्धेतील सामने सुरू असताना माघार घेतली. या स्पर्धेतील कामगिरीचा आढावा घेत पुढच्या ग्रँड स्लॅम स्पर्धासाठी अनेक मानांकित खेळाडू तयारी करीत असतात. येथील यशापयश हे त्यांच्यासाठी भावी काळाची नांदीच असते.