३० एप्रिल हा राज्य पुरस्कार सोहळ्याचा दिवस. त्यानिमित्त एक आढावा, मराठी चित्रपटांना राज्य पुरस्कार द्यायला सुरुवात झाली तेव्हापासून आत्तापर्यंतच्या बदलत्या संस्कृतीचा…
‘‘अरे, थेट दुबईवरून तू मराठी चित्रपट आणि नाटक यांच्या ‘मिक्ता’ सोहळय़ावरून परतताना चित्रपटाकडे गांभीर्याने पाहण्याची ‘दृष्टी’ देणारी काही पुस्तके आणलीस की नाहीस? काही जुन्या दुर्मीळ चित्रपटाची व आताच्या काही वेगळय़ा चित्रपटाची बुकलेटस् तू तरी निश्चितच आणली असशील. बरं, काही जुन्या पिढीतले काही कलाकारांना भेटून त्यांच्या काही जुन्या भावपूर्ण आठवणी जाणून घेतल्यास की नाही? तेवढीच तुझ्या ज्ञानात आणखी भर पडली असेल, जुन्या मराठी चित्रपट गीत-संगीताचही तेथे कार्यक्रम रंगला असेल ना?..’’
खूप मागील पिढीच्या एका चित्रपट अभ्यासकाचे हे प्रश्न मला कमालीचे भाबडे तर वाटले, पण त्यापैकी एकाही प्रश्नावर माझ्याकडे उत्तर नाही. कारण आजचे मराठी चित्रपट पारितोषिक सोहळे म्हणजे, गुलछबू मंडळीचे खेळ, नाचकाम, पेज थ्री पार्टीज, मनोरंजन, एकमेकांना मिठय़ा देऊ-घेऊ यांचे झक्कास पॅकेज असते.
अर्थात, हा बदलत्या सामाजिक-सांस्कृतिक-आर्थिक- लैंगिक (होय, हे देखील) या साऱ्याचा परिपाक आहे. याच निमित्ताने मराठी चित्रपटाच्या महोत्सवाच्या ‘फ्लॅशबॅक’मध्ये जायची संधी का घेऊ नये? तेवढाच आठवणींना उजाळा.
महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली. तर १९६२ साली मराठी चित्रपटांना पारितोषिके देण्यास राज्य शासनाने सुरुवात केली. तेव्हा प्रादेशिक भाषेतील चित्रपट पारितोषिके सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते. कर्नाटक, केरळ, आंध्र, तामीळनाडू यांनी त्यानंतर आपापल्या राज्यातील प्रादेशिक भाषांतील चित्रपटांना पारितोषिके देण्यास सुरुवात केली.
अशा पद्धतीने मराठी चित्रपटांना पारितोषिके देण्यामागे राज्य शासनाचे काही सद्हेतू होते. मराठी चित्रपटांना उत्स्फूर्त प्रोत्सासन देणे, त्यातील आशयपूर्ण कलाकृतींच्या वाढीला चालना देणे असाच त्यावेळी राज्य शासनाचा प्रमुख उद्देश होता. तो स्तुत्य होता.
राज्याचा पहिला चित्रपट महोत्सव दक्षिण मुंर्बतील लिबर्टी चित्रपटग्रहात सकाळी दहा वाजता रंगला. व्ही. शांताराम हे या सोहळय़ाचे प्रमख पाहुणे होते. पहिल्या वर्षी मधुकर पाठक दिग्दर्शित ‘प्रपंच’ या चित्रपटाने सहा पुरस्कार पटकावून बाजी मारली. सवरेत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन, तसेच अभिनेत्री सुलोचना, उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री कुसुम देशपांडे, उत्कृष्ट गीते ग. दि. माडगूळकर, संगीत सुधीर फडके, छायालेखन के. बी. कामत घाणेकर असे पहिले विजेते होते. तर गजानन जागीरदार यांनी शाहीर परशुराम या चित्रपटातील भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार पटकावला. पहिल्या वर्षी पारितोषिकांचे स्वरूप असे होते, सवरेत्कृष्ट चित्रपट पहिले तीन, सवरेत्कृष्ट दिग्दर्शन पहिले तीन, अभिनेता, अभिनेत्री, सहाय्यक अभिनेता, सहाय्यक अभिनेत्री, पटकथा, संवाद, गीते, संगीत दिग्दर्शन, पाश्र्वगायक, पाश्र्वगायिका, छायालेखन, कला-दिग्दर्शक, ध्वनिमुद्रण व संकलन.
विशेष म्हणजे १९८३ सालापर्यंत पारितोषिकाचे हे प्रमाण कायम होते. त्यानंतरच त्याच वेशभूषा, रंगभूषा, ध्वनिमुद्रण, संकलन, जाहिरात व माहितीपट अशा पुरस्कारांची भर पडली. १९९४ साली चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार तर १९९८ साली राज कपूर पुरस्कार असे आणखी दोन मानाचे पुरस्कार सुरू करून या वाटचालीला व्याप्ती मिळाली. चंद्रकांत मांढरे यांना पहिल्या व्ही. शांताराम पुरस्काराने गौरवण्यात आले, तर रामानंद सागर यांना पहिला राज कपूर पुरस्कार देण्यात आला.
राज्य शासनाचा हा पुरस्कार सोहळा दादासाहेब फाळके यांच्या ३० एप्रिल या जन्मदिनी आयोजित केला जाऊ लागला. बरीच वर्षे धोबीतलावचे रंगभवन हेच या सोहळय़ाचे प्रमुख स्थान होते. राज्य शासनाचे तत्कालीन मुख्यमंत्री अथवा सांस्कृतिक मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा आयोजित केला जातो. प्रमुख पाहुणे म्हणून मराठी, हिंदी तर झालेच, पण अन्य भाषेतील चित्रपटसृष्टीतील मान्यवरानांही प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाऊ लागले. त्यामुळे शिवाजी गणेशन, सत्यजित राय, गिरीश कर्नाड, दिलीप कुमार, नौशाद, राजेश खन्ना, सुनील दत्त, देव आनंद अशा किती तरी मान्यवरांची राज्य शासनाच्या या सोहळय़ाला उपस्थिती लाभली.
१९९३ साली कमल हसनने सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. त्याने चक्क एकेक शब्द हळूहळू उच्चारत मराठीत भाषणाला सुरुवात करून प्रचंड टाळय़ा मिळवल्या. फार पूर्वी आपण महाराष्ट्रात वास्तव्यास असताना शिकलेलो मराठी आपण अद्यापही विसरलेली नाही, असे कृतज्ञतापूर्वक उद्गार त्याने काढले. अर्थात, मग तो इंग्रजीत बोलू लागला.
धोबीतलावचे रंगभवन हे या महोत्सवाचे हुकमी स्थान. म्हणूनच तर राजेश खन्नाला भाषणाच्या ओघात आपले पूर्वीचे गिरगावचे दिवस सहज आठवले..
शासनाच्या वतीने होणारे हे सोहळे शिस्तबद्ध व आटोपशीर असत. विजेत्यांना पुरस्कार देताना अधेमधे मनोरंजनासाठी नृत्याचे कार्यक्रम व अखेरीस प्रोत्साहन देणारी भाषणे व मंत्र्यांकडून काही आश्वासने!
१९९३ पर्यंत राज्य शासनाच्या या सोहळय़ाचा सरळमार्गी, साधेपणा, अत्यंत खरेपणा कायम होता. बदलत्या काळानुसार त्यात आता पूर्वीची अगोदरच सर्व पुरस्कार जाहीर करण्याची पद्धत मागे पडली व प्रत्येक विभागात तीन नामांकने असा खेळ सुरू झाला. त्यामुळे सोहळय़ाला कलाकारांची गर्दी वाढली. अन्यथा, तोपर्यंत फक्त विजेतेच तेवढे हजर राहत. आता गीत-नृत्य-विनोद यांचाही तडका वाढला. त्यात विनोदाच्या नावाखाली मराठी चित्रपटाचीच भन्नाट व भरपूर टवाळी/थट्टा-मस्करी का केली जाते हे कोडे कोणी सोडवेल का?
चित्रपटांची संख्या वाढत जाताना राज्य शासनाच्या पारितोषिकांमधील चुरस वाढली, पण या दशकात अशा पारितोषिकांचे प्रमाणही वाढले, त्याचे काय? पूर्वी केन्द्र शासनाचे राष्ट्रीय पुरस्कार व राज्य शासनाचे पुरस्कार यांना विश्वासार्हता व प्रतिष्ठा होती. हे पुरस्कार पटकावणे मानाचे मानले जाई. सत्तरच्या दशकात ‘रसरंग’ साप्ताहिक मराठी चित्रपटसृष्टीचे मुखपत्र मानले जाई, त्यांनीही दिलेला पुरस्कार मराठी चित्रपट सृष्टीच्या आनंदात भर टाकणारा ठरला.
आता काही उपग्रहवाहिन्या, प्रकाशन संस्था, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, वृत्तपत्रे असे अनेक जण जवळपास वर्षभर पुरस्काराचे वाटप करतात. म्हणून तर एखाद्या ठिकाणी तरी नामांकन अथवा पुरस्कार मिळण्याचा अनेकांना खात्री असते. तर एका ठिकाणी पुरस्कार मिळवणाऱ्याला अन्यत्र कुठेही साधे नामांकनही न मिळण्याचा प्रकार (की चमत्कार?) घडतो.
आजच्या पिढीचे बरेचसे कलाकार घाऊक बाजारातील पुरस्कार कितपत गंभीरपणे घेतात याचीही कधी कधी शंका येते. कारण, पुरस्काराच्या मूल्यापेक्षा त्यांना त्याच सोहळय़ातील नाचकामाच्या सुपारीची मोठी किंमत सुखावते. पुरस्काराच्या एका ‘बाहुली’ने आपल्या घरातील जागा व्यापण्यापेक्षा त्याच पुरस्कार सोहळ्यातील एक लाखाची सुपारी घेऊन घर छान खुलवता येईल असा एखाद्याचा दृष्टिकोन असू शकतो. हे बदलत्या काळाचे व बदलत्या जीवनशैलीचे लक्षण आहे. एकूणच जगण्यात पैसाच महत्त्वाचा झाल्याने तो ‘पुरस्कार संस्कृती’मधून मिळत असेल तर का सोडा?
अरे हो, पण तमाम पुरस्कारात सुपारी, ग्लॅमर, प्रसिद्धी व बाहुली मिळते (हा क्रम योग्य आहे का?) पण शासनाच्या पुरस्कारात बाहुलीसह रक्कमेचाही पुरस्कार मिळतोय.
मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास लिहिला जाताना त्यात केंद्र व राज्य शासनाच्या पुरस्काराची नोंद होत असते, त्यामुळे ‘पेज थ्री पार्टी प्रसिद्ध’त कदाचित स्थान मिळणार नाही, हा भाग वेगळा. अर्थात, काळ बदलला, मोकळे वातावरण आले, तशी मराठी चित्रपटाच्या पारितोषिकाची संस्कृती बदलून त्याला नवे कल्चर आले. बदल हे जिवंतपणाचे लक्षण आहे असे मानले तर सगळे सहज स्वीकारता येईल.
कृष्णधवल मराठी चित्रपटाच्या काळातील पुरस्कार व त्याचे सोहळे जास्त रंगीत होते, म्हणूनच तर ते आजही केवळ आठवणीनेही दिपवतात. आजचाही रंग काही वेगळा…
दिलीप ठाकूर