जगण्यातला संघर्ष कुणालाही चुकलेला नाही. पण तो करताना आपलं आयुष्य जास्तीत जास्त आरोग्यवान, दीर्घायुषी कसं असेल, आनंदी कसं असेल याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे.
दीर्घायू ही सर्वाचीच इच्छा असते. जन्म आपल्या हातात नाही, पण मृत्यू कोणाला चुकलेला नाही. मात्र प्राणिमात्राने ठरविले तर मृत्यू त्याला लांब ठेवता येतो. मृत्यूचे भय, भीषणता, दैन्य, दु:ख वाटू नये अशी जीवनाची अखेर आखता येते. मनाचा पक्का निर्धार केला तर निरामय अशी जीवनाचे नियोजन करता येते. बहुतांशी चाकरमानी, सुशिक्षित मंडळी, नोकरी करणारे बडे साहेब, लहानमोठे स्वयंरोजगारवाले, डॉक्टर, वकील, इंजिनीअर लोक, आपापल्या परीने विमा, मुदत ठेवी, भविष्यनिर्वाह निधी, रोख रक्कम, दागदागिने इत्यादी स्वरूपात उद्याची बेगमी करून ठेवतात. पण आपल्या प्रकृतीचा स्वास्थ्याचा, निरोगी जीवन मिळविण्याकरिता करावयाच्या यम-नियमांचा विचार फार उशिरा म्हणजे पन्नाशी-साठीनंतर सुरू होतो. तोपर्यंत काही प्रमाणात उशीर झालेला असतो. त्याकरिता सुजाण लोकांनी अगोदरपासून पुढील विचार दिशा वाचून आपणास लागू पडतील अशा गोष्टी अमलात आणल्या तर ‘नाबाद शंभर’ आकांक्षा करावयास हरकत नाही.
रोग होतो म्हणजे काय? शरीराचे संतुलन बिघडते. शरीरातील तीन दोष वात, पित्त व कफ यांच्या कार्यात वैगुण्य येते. त्याच्या प्राकृत कार्यात कमी-जास्त व्यत्यय येतो. काहींच्या मते सर्व रोग अग्नी मंद होतो म्हणून होतात. या रोगांच्या चय, प्रकोप, प्रसार, व्यक्त व भेद अशा पाच पायऱ्या आहेत. या पाच पायऱ्यांतून रोग घर करून राहिला की बऱ्याच काळाने तो योग्य वेळ येताच शरारीचा बळी घेतो. त्याकरिता अत्ययिक अवस्था यावी लागते. मानवाची ‘प्रकृती व धातुसारता’ माणूस किती काळ जगणार हे ठरवते. वातप्रधान व्यक्तीच्या आयुष्याचा नेम नसतो. पित्त प्रकृतीची व रक्तसार व्यक्ती तुलनेने कमी आयुष्य जगते. कफप्रवृत्ती, अस्थिसार व्यक्ती दीर्घायुषी ठरतात.
माणसाला आपल्या आयुष्याला धोका आहे, असू शकतो याची जेव्हा जाणीव होते तेव्हा साहजिकच आपल्या पथ्यापथ्याचा, औषधपाण्याचा विचार करतो. श्वास, मधुमेह, हृद्रोग, लघवी कोंडणे, लघवी वारंवार होणे, प्रोस्टेट ग्लँड वाढणे, यकृतवृद्धी, प्लीहावृद्धी, मलावरोध, ग्रहणी, आमांश, पांडू, वजन घटणे, वजन खूप वाढणे, गर्भाशय विकार, किडनी व मूत्राशयाचे विकार, मेंदू व इतर नाना विकारांची चाहूल लागल्याबरोबर माणसाने, विचारी व्यक्तीने काही गोष्टींवर मनन, चिंतन व त्याप्रमाणे वागणूक सांभाळली पाहिजे. मला खात्री आहे की, पुढील आयुर्वेद मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच रोगांना प्राथमिक अवस्थेच्या पुढे जाऊ देणार नाही.
बहुधा सर्व रोग अग्निमांद्यामुळे होतात. ‘अग्नी’ म्हणजे नुसती भूक असा अर्थ नसून आम्ही जे खातो-पितो त्याची रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा व शुक्र या धातूंत व मल, मूत्र व स्वेद या तीन मलांत रूपांतर होत असते. याला आपण खाल्लेले अंगी लागले आहे असे म्हणतो. नेहमीचे दोन किंवा तीन वेळचे खाणे खाऊन ज्याची भूक नीट राहते त्याने कशाचीच पर्वा करू नये. अग्नीच्या एका कामाचे वर्णन – ‘समान अग्नी’ अन्न ग्रहण, पचन, विवेचन व पुढे पाठवणे असे केलेले आहे. हे काम नीट चालले तर महास्रोतस, यकृत, प्लीहा यांचे कार्य उत्तम चालणार आहे असे समजावे.
‘प्राणवायू’ सर्व शरीरभर रक्ताबरोबर फिरत असतो. त्याचे कार्य नाक-तोंडापासून श्वसननलिका, फुप्फुस, हृदय, दशधमनी, वृक्क थोडक्यात सर्व शरीरभर त्याचे अविरत, निरंतर कार्य चालू असते. त्याच्या कार्यात अडथळा येऊन चालत नाही. त्याच्या कार्याची जाणीव अजिबात न होणे हे आरोग्याचे मोठे लक्षण आहे. झोप लागणे, रक्त कमी असणे, थकवा, वजन घटणे, किडनीचे विकार यांच्याकरिता प्राणतत्त्वावर जय मिळवावा लागतो. फां फू होता कामा नये. थोडय़ाफार श्रमाने विश्रांती घ्यावयास लागू नये.
शरीरातून मलरूपाने लघवी व विष्ठा बाहेर टाकण्याचे कार्य ‘अपान वायू’ करतो. गर्भाशय, आम, आर्तव, शुक्र यांच्यावरही त्याचे नियंत्रण असते. या अपानाच्या कार्याची पावती सकाळी पोट नीट साफ झाले तर मिळते. रात्री लघवीला उगाच उठावे लागले नाही तर किडनी, मूत्रेंद्रीय, प्रोस्टेट या विकारांचा प्रश्नच उभा राहत नाही.
सर्व धातूंचे सार म्हणजे ओज. शरीराचे सर्व सामथ्र्य अष्टबिंदू रूपात्मक ओजात आहे. ओज हृदयापाशी आहे. तरीपण सर्व शरीरावर त्याची हुकमत चालते. शरीर-व्यापार नीट चालणे म्हणजे आत्मा, इंद्रिय व मन हे प्रसन्न राहावयास पाहिजेत. ते कार्य ओजामुळेच होते. ओजावर आघात म्हणजे सर्वनाश. माणूस म्हणजे यांत्रिक मानव किंवा कळसूत्री बाहुले नव्हे. त्याला मेंदू आहे, व्यक्तिमत्त्व आहे, स्मृती आहे, बुद्धी आहे, सारासार विवेक आहे, निर्णयशक्ती आहे, चेतना आहे. हे सर्व ओजामुळे चालते. हृद्रोग, वजन घटणे, मेंदूचे विकार यांच्या कारणात ओजक्षय हा मोठा घटक आहे.
‘रक्त जीव इति स्थिती:!’ हे नव्याने सांगावयाची गरज नाही. रक्त कमी असणे, रक्तात चरबी, क्षार, साखर वाढणे किंवा खूप कमी होणे, रक्ताचे अभिसरण मंदावणे, यावर आयुष्यमान अवलंबून आहे. त्याकरिता सतत रक्त तयार होणे, पुरवठा व त्याच्यातील दोष यांवर सतत लक्ष ठेवावे लागते.
तात्त्विक चर्चा बरीच झाली, मग दीर्घायुष्य आणि शतायुषी जीवनाकरिता ठोस उपाय काय? या उपायांचा तपशील सांगण्याअगोदर काही कुपथ्य टाळावयास हवे. त्याला जास्त महत्त्व आहे. शौचाला कधीही चिकट होता कामा नये. त्याकरिता साखर, तेलकट, तुपकट, मिठाई, आंबवलेले पदार्थ, चहा, कोल्ड्रिंक्स, कृत्रिम औषधे टाळावयास हवी. मांस, मटण, अंडी, धूम्रपान, मद्य यांचा मोह सोडून द्यावा. प्राणवायूचे कार्य नीट चालावे म्हणून कफकर आहार, विहार, रात्री उशिरा जेवण व दुपारची झोप कटाक्षाने टाळावे. केळे, दही, मिसळ पदार्थ, मिठाचे फाजील प्रमाण वज्र्य करावे. समान वायूचे कार्य बिघडू नये म्हणून जेवणावर जेवण जेवू नये. भूक नसताना वेळ झाली आहे म्हणून पोट भरणे हे साठीनंतर तरी टाळावे. त्यामुळे समान वायू, समान अग्नी, यकृत यांचे कार्य चांगले राहते. आतडय़ांना आपले तुंबलेले काम करावयास थोडी संधी द्यावी. समान वायूचे कार्य सुधारले की, रक्तपुरवठा नीट होतो. कारण रक्ताची कमतरता भासत नाही. अपानाचे कार्य सुधारण्याकरिता एखादे लंघन, सायंकाळी लवकर जेवणे, चहा पूर्णपणे वज्र्य करणे आवश्यक आहे. अपान वायूचे कार्य सुधारले की, रात्री लघवीला उठावे लागत नाही. प्रोस्टेट ग्रंथी वाढत नाही. म्हातारपणात पंचवीस टक्के लोकांना पौरुष ग्रंथीची वाढ हा विकार फार त्रास देतो. मलमूत्रांचे वेग अडवू नयेत. अपान वायूचे प्रकोप व्हायला संधी देऊ नये. फुप्फुसाचे, दमणुकीचे, थकण्याचे, हृदयाचे विकार टोकाला जाऊ नयेत म्हणून, मिताहार, कमी बोलणे, पूर्ण विश्रांती, प्रदूषण किंवा गर्दीच्या ठिकाणी न जाणे, फ्रिजमधील पदार्थ टाळणे हे नियम पाळावेत. ओजक्षय होऊ नये म्हणून थोडे हलके-फुलके जीवन, मनाला खोलवर लावून न घेणे, बिनधास्त राहणे आवश्यक आहे. घरगुती लहान-मोठय़ा कटकटींपासून लांब राहायचा प्रयत्न करावा. ज्यांना लाभेल त्यांनी संत एकनाथ महाराजांसारखे जीवन जगावे, अनुभवावे.
कुपथ्याव्यतिरिक्त दीर्घायुष्या-करिता काय खाल्ले, काय प्याले तर आयुष्याला धोका राहणार याचा विचार करावयास हवा. या विचारांत प्रथम पदार्थ जल आहे. शक्यतो उकळलेले कोमट पाणी प्यावे. त्याने समाधान होत नसेल तर गार पाणी प्यावे. सर्वात हितकर पाणी म्हणजे उकळलेल्या पाण्यात सुंठ टाकून घेणे. त्यामुळे आमांश, उदरवात, अपचन हे रोग वाढत नाहीत. सकाळी गाईचे वा शेळीचे दूध काळजीपूर्वक गाळून प्यावे. सोबत दोन खजूर बिया किंवा एक खारीक वा पंधरा-वीस मनुका खाव्यात.
दुपारच्या जेवणात ज्वारी किंवा तांदळाची भाकरी, सबंध मुगाची लसूण-आलेयुक्त उसळ, पुदिना-आले-लसूणयुक्त चटणी, माफक प्रमाणात भात व ताजे ताक, फळभाज्यांत दुध्या, कार्ले, पडवळ तसेच चाकवत, पालक, मेथी, मुळा या पालेभाज्या आलटून पालटून खाव्यात. गहू म्हातारपणी टाळावा. जडान्न म्हणून मेवामिठाई, हरभरा वज्र्य करावा. सायंकाळचे जेवण शक्यतो टाळावे. नाही तर राजगिरा लाह्य़ा, भाताच्या लाह्य़ा, तांदुळाचे कमी तेल असलेले धिरडे, तांदूळ भाजून त्याची जिरेयुक्त पेज असा रात्रीचा लघू आहार हवा. फळामध्ये पपई, अननस, संत्रे, वेलची केळे, जुन्या बाराची मोसंबी, माफक प्रमाणात गोड डाळिंब यांना प्राधान्य द्यावे.
विहारामध्ये किमान फिरणे, दीर्घश्वसन, रात्री लवकर झोपणे, झोपण्यापूर्वी तळपाय, कानशिले, डोके यांना तुपाचे मसाज या गोष्टी कटाक्षाने कराव्या.
औषध नव्हे पण औषधी गुण देणारा आवळा, सुरण, सुंठ, कोहळा, सातू, सोयाबीन, मध, एरंडेल, मेथ्या, ओली हळद, धने, जिरे, तुळशीची पाने, मिरी असे पदार्थ भिन्न भिन्न तक्रारींना धरून आपल्या वापरात हवेत. आवळा सर्वानाच उपयुक्त आहे. मधुमेहींना आवळा व मेथ्या आवश्यक आहेत. कफाच्या विकारात मध, तुळस, मिरी, पुदिना, हळद, आले कोणत्या तरी स्वरूपात पोटात जावी. रक्तवर्धक, प्राणवह स्रोतसाकरिता ओली हळद हवी. कृश व्यक्तीकरिता सोयाबीन व कोहळा मित्र आहेत. मधुमेहींनी सातूची संगत सोडू नये. गुदविकारात सुरण व मिरी वापरावी. समस्त वातविकार, सांधेदुखी, मलावरोध याकरिता एरंडेल तेल, सुंठ यांना जवळ करावे. एरंडेलावर परतलेली सुंठ किंवा एरंडेलाची चपाती अर्धागवात, संधिवात, सायटिका, कटिशूळ या विकारांचा इतिहास असणाऱ्यांनी खावी. लघवी व आर्तवाच्या उष्णतेचे विकार असणाऱ्यांनी धने, जिरे, कोहळा कोणत्या तरी स्वरूपात खावा. पोटाच्या, आमाशयाच्या तक्रारींकरिता आल्याचा स्वरस जरूर वापरावा. हृद्रोगांकरिता लसूण वरदान आहे.
मगजमारी कोणालाच चुकलेली नाही, पण ही मेंदूची मगजमारी आतपर्यंत न पोचवणे हे कौशल्य ज्याला जमेल त्याला मृत्यूला नक्कीच लांब ठेवता येईल. त्याकरिता गाढव, बैल, डुक्कर, गाय, म्हैस या पशूंच्या बिनधास्त जीवनाकडे पाहावयास शिकावे. कोणी बोलले तर शर्ट झटकावा, धूळ झटकल्यासारखे करावे. वार झाला असे वाटू देऊ नये. ‘मौनं सर्वार्थ साधनम्।’ आपण पडलो तर फरशीला खड्डा पडला पाहिजे, आपणाला काहीच वाटू नये अशी धारणा ठेवावी.
मनाला औषध नाही, मनाला बरे करेल असा डॉक्टर आजपर्यंत जन्माला आला नाही, हे सत्य असले तरी त्याच्या पलीकडे षड्रिपूंना ताब्यात ठेवणारे रामनाम आहे. मनात भ्या, क्रोध, मोह, मद, मत्सर, द्वेष हे आले तर त्यांना लगाम घालण्याकरिता मेडिटेशन करावे. मन साफ होते, ताळ्यावर येते.
वैद्य प. य. खडीवाले वैद्य