बेबी २५ वर्षांपूर्वी माझ्या घरी धुणीभांडी करायला आलेली एक स्त्री! व्यवस्थित नेसलेली स्वच्छ नऊवारी साडी, नीट घातलेला अंबाडा व त्यावर माळलेली फुलं! पाहता क्षणी तिला मी कामावर ठेवले. समवयस्क असल्यामुळे तिचा व माझा संवाद व्हायचा. त्याच्यातून अतिशय गरिबीतून ती संसार करताना जाणवायचं. लग्न झाल्यावर एकाच चटईवर बरेच दिवस काढल्याचं ती सांगायची. तिचं स्वच्छ व न सांगता जास्तीचं मनापासून केलेलं काम पाहून मला ती जास्त आवडू लागली. हळूहळू मी तिला माझ्या परीने चादरी, मुलांचे कपडे देऊन मदत करत असे. 

आजारपणामुळे व आगाऊ पैसे मागण्याच्या तिच्या सवयीमुळे तिची बरीचशी कामे सुटली, परंतु तिच्या आगाऊ पैसे मागण्याच्या सवयीचा मला कधीच राग आला नाही. कारण मी राहत असलेले घर, फर्निचर हे मी माझ्या बँकेकडून घेतलेले आगाऊ पैसेच होते की! गरिबीमुळे होणारी आजारपणं हे मी माझ्या कोकणातल्या वास्तव्यात बघितलंच होतं, त्यामुळे तिच्या आजारपणातल्या दांडय़ा हय़ाही गोष्टींचा मला राग आलेला नाही. तिच्या या वागण्याकडे मी दुर्लक्ष केल्यामुळे तिला मी व माझी माणसे जवळची वाटू लागली. नंतर तर ती कामावर येणार नसेल तर मला आगाऊ सांगायची ‘वहिनी, तुम्ही एक चमचा पण घासू नका. भांडी तशीच ठेवा.’ कितीही भांडी असली तरी तिच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत नाही. तिच्या या गुणाची मी माझे नातेवाईक, मैत्रिणी यांना गप्पांमध्ये सांगत असे.
त्यांच्याही बेबी चांगल्या परिचयाची झाली होती. माझं घर हे ‘आपलं घर’ असाच तिच्या बोलण्यातून उल्लेख असायचा! माझ्या सासूबाईच्या आजारपणात तर ‘वहिनी, तुम्ही कामावर जा मी आजींकडे पाहते’ या तिच्या विश्वासपूर्ण बोलण्याने मी बँकेतही बिनधास्तपणे काम करू शकले. म्हणूनच माझ्या ऑफिसातल्या निरोप समारंभात तिचा उल्लेख आलाच!
माझ्या मुलाच्या लग्नात तर पाहुण्यांना घर टापटीप दिसावं म्हणून हिचा कोण आटापिटा! हॉलमधून दोन तास आधी निघून पाहुणे येण्याच्या आधी लग्नघर असूनही घर टापटीप! सर्वाना त्याचं आश्चर्य वाटलं. म्हणूनच माझ्या मुलाच्या लग्नात सर्वात मोठा मानपान झाला बेबीचा.. एक नवा कोरा फ्रिज देऊन!
आता आता वय झाल्यामुळे तिच्याकडे माझं एकच काम होतं. डोंबिवलीतल्या एका गावातून येताना बस, रिक्षाचा खर्चच ४०-५० रुपये होत होता. पण मला नोकरी करून माझ्याच घरातलं काम कसं जमणार म्हणून ती येत होती. माझ्या सेवानिवृतीनंतर ती काही दिवस येत राहिली आणि तिच्या जीवनात एक आनंदाची गोष्ट घडली. तिच्या वडिलोपार्जित पडीक जमिनी बिल्डरने घेतल्या व त्याचे तिला जवळजवळ ६५ लाख मिळाले. इतके पैसे मिळाल्यामुळे मीच तिला आता कामावर येऊ नकोस. उरलेले आयुष्य आनंदात घालव म्हणून सांगितले. अतिशय दु:खी अंत:करणानं तिनं २५ वर्षांचं माझं काम सोडलं. ती गेल्यावर मला कुठल्याच बाईला कामावर ठेवावंसं वाटलं नाही. कारण आता परत तशी बेबी मिळणं अशक्य!
माझ्या बँकेतल्या नोकरीमुळे व विश्वासामुळे तिचं बँक अकाऊंट उघडणं, पोस्टडेटेड चेक भरणं, तिनं नवीन घर बांधायला घेतल्यामुळे पैसे काढायला मदत करणं, हे काम माझ्या घरातले लोकच करत असत.
मध्यंतरी माझ्या सोसायटीतला ब्लॉक आम्ही माझ्या मुलासाठी घेतला, त्याच्या बँकेच्या कर्जाला विलंब होत असल्याचं बेबीनं आमच्या संवादातून ऐकलं. तिनं त्या दिवशी आपल्या नवऱ्याला सांगितलं, दुसऱ्या दिवशी कामावर आल्या आल्या ती आम्हांस म्हणाली, ‘वहिनी, दादा आमचे बँकेतले पैसे तुम्ही घ्या. आमच्या घराला अजून वेळ आहे. चांगला ब्लॉक हातचा घालवू नका. कुठे १०-२० रुपयासाठी व्यवहार करणारी श्रीमंत माणसं!’ आणि कुठे लाखो रुपये तुमच्या कामासाठी देऊ करणारी अशिक्षित माणसे!
म्हणूनच बेबी आमच्या इतकी जवळची होती की कुठल्याही प्रवासातून आलो की पहिली भेट बेबीचीच! मग ती कोकणातून आणलेली काजू, आमसुलं असोत की युरोपमधून आणलेली हॅण्ड बॅग.
आता गरज नसतानाही या दिवाळीत बेबीने पांच दिवस येऊन घरातल्या भिंती पुसण्यापासून घर लख्ख ठेवले तेव्हा कुठे तिचं समाधान झालं. म्हणूनच माझा मुलगा तिच्या बेबी या नावावरून म्हणतो. आमच्या आईच्या हाताशी साक्षात बिग-बी आहे.
अशा आमच्या बेबीने आमच्याबरोबर आमच्या घरावर फार प्रेम केलं. घरावर प्रेम कसं करायचं हे तिच्यापासून आम्ही शिकतो आहोत.
संगीता संभाजी सावंत

Story img Loader