सुमारे दीड वर्षांपूर्वी राजधानी दिल्लीत चालत्या बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण देश ढवळून निघाला. महासत्ता असलेल्या अमेरिकेनेही त्याची दखल घेतली. ती बातमी जगभरात पोहोचली आणि सर्वत्र एकच हळहळ व्यक्त झाली. त्यानंतर केंद्र सरकारने कडक पावले उचलत बलात्काराच्या संदर्भातील कायदे अधिक कडक केले. विनयभंग, बलात्कार यांच्या व्याख्येमध्येही त्यासाठी बदल केला. त्यामुळे अशा घटनांना आळा बसेल, अशी अपेक्षा सर्वानीच व्यक्त केली होती. केवळ कायदे बदलून चालणार नाही, तर अशा घटनांच्या मागे असलेली बुरसट पुरुषी मानसिकता बदलण्याची मूळ गरज आहे, असे मत त्याही वेळेस आम्ही मथितार्थमधून व्यक्त केले होते. आजही पुन्हा तीच गरज अधिक तीव्रतेने जाणवावी अशा घटनांना गेल्या पंधरवडय़ात सामोरे जावे लागले आहे.
या सर्व घटना घृणास्पद आणि निषेधार्हच आहेत.
यातील उत्तर प्रदेशातील बदाऊन येथे दोन दलित मुलींवर अत्याचार करून त्यानंतर त्यांची हत्या केल्याच्या प्रकरणाची दखलही अमेरिकेने घेतली. ही आपल्यासाठीची नामुष्की आणि दुर्दैवी अशी घटना आहे. उत्तर प्रदेशातील घटना २७ मे रोजी घडली. गावातील घरांमध्ये प्रसाधनगृहाची सोय नसणे ही भारतीय गावांतील घरांसाठी तशी काही नवीन गोष्ट नाही. या एका गोष्टीमुळे महिलांवर किती नामुष्की येते आणि त्यांना किती वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो, यावरही आजवर अनेकदा लिहिले गेले आहे. मात्र त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. नाही म्हणायला घरात शौचालय असावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एक-दोन योजनाही आणल्या. फारच कमी गावकऱ्यांनी आजवर या योजनांचा फायदा घेतला आहे. ज्यांनी घेतला त्यांनी त्या पैशांत आणखी एक खोली तयार करून घेतली आहे किंवा मग घर अधिक पक्के करण्यासाठी तरी त्या पैशांचा वापर केल्याचे सरकारनेच केलेल्या पाहणीत लक्षात आले आहे. काहींनी मात्र त्यातून शौचालय बांधून घेतले. मात्र धक्कादायक बाब अशी आहे की, त्या शौचालयाचा वापर हा बहुतांश लोकांकडून साठवणुकीची खोली म्हणून केला जातो. बऱ्याच घरांमध्ये त्यात गोवऱ्या किंवा मग घरातील सामान एकत्र ठेवलेले दिसले. त्याची छायाचित्रेही आजवर अनेकदा प्रसिद्ध झाली आहेत. एक ते दीड टक्के गावकरीच फक्त त्याचा वापर शौचालय म्हणून करताना दिसतात. एरवी गावामध्ये घरात शौचालय हवे कशाला, एवढी वर्षे गरज भासली नाही तर मग आताच का, असा प्रश्न विचारणाऱ्यांची संख्याच गावागावांमध्ये अधिक आहे. त्यामुळे सरकारला लोकशिक्षणासाठीच एक व्यापक मोहीम संपूर्ण देशभरात हाती घ्यावी लागणार आहे. आजही गावातील बहुसंख्य महिलांना त्यांचे जीवन हे पुरुषसत्ताक पद्धतीमध्येच व्यतीत करावे लागते आणि त्यांच्या मूळ समस्यांकडे दुर्लक्ष होते आहे.
बदाऊन गावात घडलेल्या अत्याचाराच्या घटनांना ही पाश्र्वभूमी आहे. बदाऊन जिल्ह्यातील कटरा गावामधील दोन चुलत बहिणी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नैसर्गिक विधीसाठी बाहेर पडल्या. शौचालय नसल्याने नैसर्गिक विधीसाठी अंधार पडल्यावर बाहेर पडणे हे या गावातील महिला आणि मुलींसाठी तसे नेहमीचेच होते. पण रात्री उशिरापर्यंत त्या परतल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी दुपट्टय़ांनी एका झाडाला लटकवलेले त्यांचे मृतदेह सापडले. दोघींवरही अत्याचार झाल्याचे प्राथमिक तपासात लक्षात आले. सुरुवातीस पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात बरीच टाळाटाळ केली. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने टाळाटाळ प्रकरणात दोन अधिकाऱ्यांना निलंबितही केले. दरम्यान, हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करण्याचा निर्णय झाला. या प्रकरणाची वाच्यता साहजिकच खूप मोठय़ा प्रमाणावर झाली आणि अमेरिकेनेही त्याबाबत चिंता प्रकट केली.
घडलेली घटना ही वाईट तर होतीच, पण त्याहीपेक्षा भयानक आहेत त्या कटरा गावातील महिलांना भोगाव्या लागणाऱ्या नरकयातना. त्या आजही सुरूच आहेत. नैसर्गिक विधीसाठी महिलांना अंधाराचाच आसरा घ्यावा लागतो. पहाटेच्या अंधारात किंवा संध्याकाळी अंधार झाल्यानंतरच त्यांना मोकळे होता येते, अन्यथा अगदीच नामुष्की असेल तर मग घराच्या मागच्या बाजूस खड्डा करून त्यात मोकळे होण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. याहीपेक्षा भयानक गोष्ट म्हणजे ही परिस्थिती गावच्या पुरुषांना चांगली ठाऊक आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस हाती लोटा घेऊन निघालेल्या महिलांच्या मागे मुलांची किंवा पुरुषांची टोळकी लागतात. अनेकदा ती वाट पाहतच थांबलेली असतात.. आणि महिला खाली बसल्या की मग बॅटरीच्या साहाय्याने त्यांच्या अंगावर प्रकाशझोत टाकून त्यांना हैराण करण्याचा बेशरम खेळ खेळला जातो. या घटनेनंतर आता गावातील महिला आणि लहान मुली बोलत्या झाल्या आहेत. गावात गेलेल्या पत्रकारांसमोर त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत अनेक वर्षांचा तो घातलेला बांध मोकळा केला.. किळसवाणी बाब म्हणजे वय झालेली म्हातारी मंडळीही त्या भीषण खेळात सहभागी असतात, अशी जबानी महिलांनी दिली आहे.
ही काही फक्त एका उत्तर प्रदेशातीलच घटना नाही, तर कमीअधिक फरकाने भारतातील अनेक गावांमध्ये हे असेच होते आहे. पुरुषांना वेगळ्या शौचालयाची गरज गावामध्ये भासत नाही. शिवाय गरिबी एवढी आहे की, अनेक घरांमध्ये पक्के घर करणे याला प्राधान्य दिले जाणेही त्या पाश्र्वभूमीवर तेवढेच साहजिक वाटावे. पण या साऱ्यामध्ये कोंडमारा होतो आहे तो महिलांचा. त्यांना मात्र माणुसकीचीही वागणूक मिळेनाशी झाली आहे. नैसर्गिक विधीसारखी बाबही त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार याप्रमाणे सहन करावी लागते आहे. नैसर्गिक उत्सर्जन रोखून धरणे याचाही महिलांच्या शरीरावर वाईट परिणाम होतो आहे. अनेकींना मूत्रपिंडाच्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे. आज या गावातील महिलांमध्ये भीतीची दहशत आहे. ही काही एकाच गावातील घटना नाही, तर भारतातील अनेक गावांमधील महिला आज अशा प्रकारे दहशतीच्या वातावरणातील जीवन व्यतीत करीत आहेत.
भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत एकदा बीड, नंदुरबार, मराठवाडय़ाच्या दौऱ्यावर जाण्याचा प्रसंग आला होता. गावामधील त्यांची सभा संपवून संध्याकाळी उशिरा निघताना दरदिवशी सायंकाळी ते उद्वेगाने म्हणायचे, ‘संध्याकाळी गावातून गाडी जाताना गाडीच्या दिव्याच्या प्रकाशात अंधारात रस्त्याच्या कडेला बसलेल्या आया-बाया नजरेस पडतात. हे महाराष्ट्रातील चित्र ज्या दिवशी संपेल तो सुदिन असेल’, याची आठवण या निमित्ताने झाली.
पहिला प्रसंग होता तो उत्तर प्रदेशातील, पण महाराष्ट्रातील अगदी अलीकडच्या घटना पाहिल्या तरी परिस्थिती इथे काही वेगळी नाही हे लक्षात येईल आणि आपण महाराष्ट्रवासी असल्याची लाजही वाटेल, कारण अलीकडच्या घटनांमधील एक घटना ही कोपरखैरणे येथील म्हणजे नवी मुंबईच्या शहरातील आणि दुसरी घाटकोपर येथील मुंबई शहरातील आहे. दोन्ही ठिकाणी रात्री नैसर्गिक विधीसाठी बाहेर पडलेल्या महिलांवर अत्याचार झाले. फरक इतकाच की शहरात शौचालय होते, पण तिथे दिवे नव्हते, अंधार होता. त्याचा फायदा नराधमांनी घेतला. म्हणजेच शहर असो अथवा गाव, सर्वत्र अंधारातच महिलांना अत्याचाराला सामोरे जावे लागले आहे. याशिवाय महाराष्ट्रातील आणखी एका घटनेने राज्यातील महिलांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, ती घटना आहे कल्याणची. कल्याण एसटीमध्ये पुढच्या दरवाजाने प्रवेश करणाऱ्या प्रवाशाला हटकल्यानंतर त्या प्रवाशाने महिला कंडक्टरला बाहेर खेचून सुमारे अर्धा तास बेदम मारहाण केली. त्यात मध्ये पडणाऱ्या पुरुष चालकालाही त्याने मारले. महत्त्वाचे म्हणजे हे सारे घडत असताना षंढ असलेला समाज हे सारे पाहत होता. गर्दीतील एकही माणूस त्या महिला कंडक्टरला होणारी मारहाण थांबविण्यासाठी पुढे आला नाही. पुढच्या बसमधून आलेल्या तिच्या सहकारी महिला कंडक्टरला तिची सुटका करावी लागली. ही घटना म्हणजे निर्लज्जपणाचा कळसच होता. पुरोगामी महाराष्ट्रात, तेही कल्याणसारख्या शहरात ही घटना घडावी, हे राज्यकर्त्यांचा दराराच उरलेला नाही हे पुरते स्पष्ट करणारी आहे. पण राज्यकर्त्यांचे सोडा, समाजाचे काय? सध्या भारतभरात सुरू असलेले हे महिलांवरील अत्याचार समाजाच्या अनारोग्याचे लक्षण आहे. त्यावर वेळीच उपचार करणे आता अतिआवश्यक आहे. या घटना म्हणजे महिलांना बसलेला अगतिकतेचा विषारी विळखा आहे. हा विळखा सोडविण्यासाठी कायद्यापेक्षाही कामी येईल ती पुरुषी मानसिकता बदलाची एक व्यापक मोहीम. ही मोहीम संपूर्ण देशभरात राबवावी लागणार आहे. महिलांकडे माणूस म्हणून पाहायला शिका हे या एकविसाव्या शतकात सांगावे लागणे यासारखी दुसरी नामुष्की नाही. केवळ सरकारी पातळीवर नव्हे, तर घराघरांत स्वत:पासून, आपल्या घरापासून आणि नंतर समाजापर्यंत अशी सर्वच पातळ्यांवर त्याची सुरुवात तातडीने करावी लागेल.. तरच अच्छे दिन येतील. घराचे आरोग्य हे सर्वार्थाने घरातील महिलेवर अवलंबून असते. मुलगी किंवा महिला शिक्षित आणि सुरक्षित असेल तर देश सुरक्षित राहील हे प्राथमिक सूत्र मनात बिंबवायला हवे.. अन्यथा प्रगतीशील भारत केवळ स्वप्नातच राहील!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा