अस्सल खवय्यांना बांगडय़ा म्हटले की बांगडय़ाची आठवण होणे साहजिक आहे; पण चिरंजीव खरोखरच गोंधळले होते. त्यात बांगडय़ा फुटल्या असे न म्हणता वाढल्या असे त्याची आई म्हणाल्याने चिरंजीव पुरते गारद झाले होते. त्याला समजावताना ती म्हणाली, ‘‘अरे नचिकेत या नुसत्या बांगडय़ा नाहीत हे आमचे सौभाग्यलेणे आहे, यांच्यामध्ये आमचे भावविश्व सामावले असते.’’ तिचे बोलणे माझ्या कानावर पडले व मला लिखाणाला एक विषय सापडल्याचा आनंद झाला.
पण लेखाची मनात जुळवाजुळव करताना मला असे प्रकर्षांने जाणवले की बांगडय़ांचे भावविश्व हे इतके गुंतागुंतीचे आहे की त्याचे चित्रण या एका लेखात करणे सर्वस्वी अशक्य आहे.
बांगडय़ा म्हटले की रसिकांच्या मनामध्ये खूप सारी रोमँटिक गाणी फेर धरू लागतात. ‘चुडी नहीं मेरा दिल है, देखो देखो तुटे ना’, किंवा ‘बिंदिया चमकेगी चुडी खनकेगी’ अशा गाण्यांमधूनच प्रियकर व प्रेयसीच्या पहिल्यावहिल्या प्रेमाची साक्षीदार असणारी ती; म्हणजे चुडी अर्थातच बांगडी आपल्याला भेटते.
प्रेयसीचा हात सदैव आपल्या हाती असावा, लवकरात लवकर तिने आपल्या नावाचा हिरवा चुडा भरावा, अशी गुलाबी स्वप्ने, उतावीळ प्रियकर, दिवस-रात्र बघत असतो, पण तशी संधी त्याला जंग जंग पछाडूनदेखील मिळत नसते. पण जेव्हा आपली हीच प्रेयसी, तिच्या मैत्रिणीच्या लग्नामध्ये, तिचा हात स्वखुशीने बांगडय़ा भरण्यासाठी कासाराच्या हातामध्ये देते तेव्हा क्षणभर या प्रियकराला त्या कासाराची असूया वाटते. अशा असूयेची साक्षीदार असतात त्या फक्त बांगडय़ा. खूप चित्रपटांमध्ये म्हणूनच प्रेयसीला चोरून भेटण्यासाठी प्रियकर चुडीवाला बनून जातो, असा प्रसंग हमखास आढळतो.
लग्नामध्ये हिरवा चुडा हातामध्ये भरल्यावर प्रेयसीच्या चेहऱ्यावर जो लालिमा पसरतो त्याला कशाचीच उपमा देता येणार नाही. बांगडय़ा या ऐश्वर्याच्या उतरंडीवर सर्वात खालच्या पायरीवर असतात; मग चढय़ा क्रमाने आपल्या समोर येतात त्या पाटल्या, तोडे, पिछोडी अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या बांगडीच्या भगिनी. लग्नामध्ये याच भगिनींचा गवगवा असतो. किती तोळ्याच्या घालणार, किती घालणार, किती कॅरेटच्या यावरून मग महाभारत होण्याचे चान्सेस खूप असतात. हळव्या रेशीमगाठी जुळून येत असताना, भविष्यात निर्माण होणाऱ्या नात्यांमध्ये गाठी पाडण्यास याच बांगडय़ा व तिच्या भगिनी मंथरेची भूमिका अगदी चोख निभावतात.
पण कधी कधी याच बांगडय़ा, पाटल्या वारसा पुढे नेण्याचे भावनिक कामदेखील तितक्याच तन्मयतेने करतात. वरमाय जेव्हा मोठय़ा विश्वासाने आपल्याला, (आपल्या सासूकडून) मिळालेल्या बांगडय़ा, पाटल्या तिच्या सुनेकडे सुपूर्द करते तेव्हा तिला एक मोठे काम तडीस नेल्याचे समाधान मिळते.
बांगडय़ा फक्त कासारालाच रोजी रोटी देतात असे नाही, तर अनेकांना रोजगार पुरवितात. असे म्हणतात सोनार आपल्या बायकोच्या बांगडय़ा घडवितानादेखील सोने मारतात. सोन्यात पितळेची किती भेसळ केली आहे हे अंधारातील पाप फक्त ती बांगडीच जाणे आणि यदाकदाचित बांगडय़ा बावनकशी असतील तर अडीअडचणीच्या वेळी त्या सावकाराच्या तिजोरीत जाऊन बसतात. स्वत:चा मालक येऊन मला सोडवून जाईल या आशेवर जगत असताना या बांगडय़ा, पाटल्यांना गोरगरिबांची सावकाराकडून होणारी पिळवणूक याची देही याची डोळा पाहावी लागते.
खरे तर राजकारण्यांनादेखील या बांगडय़ांची आवड व भीती एकाच वेळी असते. विरोधात असताना सत्ताधाऱ्यांचा माज उतरविण्यासाठी विरोधकांना मंत्र्याच्या हातात बांगडय़ा भरण्याची फार खुमखुमी असते; तर हेच विरोधक जेव्हा सत्ताधारी बनतात तेव्हा आपल्याला कोणी बांगडय़ा तर आहेर देणार नाहीत या चिंतेत सदैव असतात.
शब्देविना संवादू साधण्यातदेखील बांगडय़ांचा हात कोणी धरू शकणार नाही. मित्रांच्या किंवा घरातील थोरामोठय़ांच्या संगतीमध्ये रमलेल्या आपल्या अहोंना ‘बायकोचा विसर तर पडला नाही ना?’ असे सुचविण्यासाठी कित्येक गृहिणींनी बांगडय़ांचा किणकिणाट आयुष्यात एकदा तरी केलाच असेल नाही का? किंवा आपल्याला न विचारता घेतल्या गेलेल्या निर्णयाला आपली नापसंती दर्शविण्यासाठी, पण हाच मार्ग काही जणी संयुक्त कुटुंबामध्ये अजूनही वापरतात.
चुगली करण्यामध्ये बांगडय़ा माहीर असतात; याचा एक सुंदर किस्सा एका प्रथितयश मराठी नटाने एका मुलाखतीमध्ये रंगवून सांगितला होता. ऐन उमेदीच्या काळात छोटय़ा घरात एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहताना या कलाकाराला व त्याच्या बायकोला स्वयंपाक घरात झोपावे लागत असे. रात्री प्रणयाराधन करताना बांगडय़ांची किणकिण ऐकू येऊ नये म्हणून मग हा कलाकार बायकोच्या बांगडय़ा रुमालाने बांधून ठेवायचा.
बांगडय़ांचा रंगदेखील खूप काही सांगून जातो. लाल व पांढऱ्या रंगाच्या बांगडय़ा बंगाली कन्येच्या हातामध्ये हटकून दिसतातच. काही राजस्थानी आदिवासी जमातींमध्ये पार कोपरापर्यंत लाखेच्या व काचेच्या तुकडय़ांनी सजलेल्या लाल बांगडय़ा घालण्याचा रिवाज दिसून येतो; तर एखाद्या मॅचिंगच्या बाबतीत जागरूक असणाऱ्या ललनेसाठी, तिच्या हातातील बांगडय़ांचा रंग, कानातल्या व गळातल्या आभूषणाचा रंग तिच्या साडीप्रमाणे सदैव बदलत राहतो.
पण बांगडय़ांच्या नशिबी फक्त सुखच नाही तर अपार दु:खही येते. सौभाग्याचे प्रतीक असल्याने एके काळी वैधव्य आल्यावर याच बांगडय़ा बळजबरीने फोडल्या जात. आपण आपला खंबीर अधिकार कायमचा हरवला या दु:खाची दाहकता स्त्रीला आतून जाळत असते व तिच्या या दु:खाचा हुंकारच जणू तुटणाऱ्या बांगडय़ा जगासमोर आणत असत.
बलात्कारासारख्या घृणास्पद कृत्याच्या साक्षीदार होण्याचे भोगदेखील याच बांगडय़ांच्या नशिबी असतात. त्यामुळे ‘वाटेवर काचा गं!’ असे बोल त्यांच्या तोंडून वेळोवेळी निघत असतात.
फाळणीचे चटके, पानिपतमधील नृसंहार वगैरेंचे वर्णन करताना किती लाख बांगडय़ा फुटल्या, प्रेते व फुटलेल्या बांगडय़ांच्या काचांनी किती ट्रक सीमेपलीकडून आले याचे वर्णन वाचताना अंगावर शहारे आले नाही तरच नवल.
कधी कधी एखादा भीषण अपघात झालेला असतो. जखमींना वेळेवर उपचार देण्यापेक्षा काही समाजकंटक, मृतांच्या किंवा जखमींच्या हातातील सोन्याच्या बांगडय़ा खेचून घेऊन माणुसकीला काळे फासण्याचे कृत्य करतात. या वेळी बांगडय़ांना आपण बहुमोल असल्याची लाज वाटते. कधी कधी तर जबरी दरोडय़ाच्या वेळी बांगडय़ा हातातून निघत नाहीत म्हणून हातच कापून नेण्याचे क्रौर्य दरोडेखोरांनी दाखविले व बांगडय़ांचे काळीज रक्ताने माखल्याची उदाहरणे आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा