गंगा नदीला भारतीय माणसाच्या मनात एक आगळंच स्थान आहे. ते धार्मिक- सांस्कृतिकदृष्टय़ा महत्त्वाचं असलं तरी गंगा नदी आणि तिचं खोरं हे मान्सून आणि शेतीच्या संदर्भात भारतीय जनमानसासाठी किती आणि कसे महत्त्वाचे ठरतात हे समजून घेणं आवश्यक आहे.
गंगा नदी ही केवळ एक मोठी नदी म्हणून तिचं महत्त्व नाहीये, तर गंगेच्या अभ्यासातून आपल्याला जुने सांस्कृतिक दुवेही लक्षात येऊ शकतात. भारताचा एक मोठा भाग ही नदी व्यापत असल्याने या सर्व प्रदेशाचं राजकीय महत्त्वही कायमच राहिलेलं आहे. ही गंगा नदी, आणि गंगेला आज आहे ते स्थान मिळवून देणारा मान्सून याचा अभ्यास करण्यासाठी प्रोजेक्ट मेघदूतचा गट गंगेच्या खोऱ्यात प्रवास करणार आहे.
मानवाच्या विकासाची सुरुवात
माणसाचा जन्म नक्की कुठे झाला हे सांगता येणं अवघड आहे. या विषयावर आज जगभरातले अनेक शास्त्रज्ञ काम करीत आहेत. पण सध्याच्या माहितीनुसार माणसाचे पूर्वज सगळ्यात पहिल्यांदा आफ्रिका खंडात वावरत होते. नुकत्याच झालेल्या उत्खननात शास्त्रज्ञांना आपल्या पूर्वजाच्या जबडय़ाचा वरचा भाग मिळाला. हा अवशेष साधारण ३२ लाख वर्षांपूर्वीचा असल्याचं समोर येत आहे. हा माणूस, आफ्रिका खंडामधून भारतात ७० हजार वर्षांपूर्वी आला असंही आपल्याला शास्त्रज्ञ सांगतात. पण आपल्याला नर्मदेच्या खोऱ्यात माणसांचे पाच लाख वर्षांपूर्वीचे अवशेषही मिळाले आहेत. त्यामुळे कुठला माणूस किती जुना या प्रश्नाचं उत्तर कायमच अर्धवट मिळतं. पण हे झालं माणूस आणि त्याचे अवशेष. आपण जर एक संस्कृती म्हणून बघायला गेलो तर जगभरातील पुरातत्त्व शास्त्रज्ञाचं म्हणणं असं आहे की, साधारणपणे दहा ते बारा हजार वर्षांपूर्वी मानवी संस्कृती अस्तित्वात आली. ‘संस्कृती’ अस्तित्वात आली याचाच अर्थ, तो ‘हंटर-गॅदरर’ या स्तरातून एका ठिकाणी विसावला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेती करायला लागला. आपण बी पेरलं की ते रुजतं, वाढतं आणि आपल्याला त्याचं फळ मिळतं ही गोष्ट माणसाला कळूनही फार काळ गेला नाहीये. साधारण दहा ते तेरा हजार वर्षांपूर्वी शेती अस्तित्वात आली असं म्हटलं जातं. अशा शेती करणाऱ्या संस्कृतीचे पुरावे आपल्याला भारत, चीन, दक्षिण अमेरिका, युरोपामधल्या आणि आफ्रिकेमधल्या काही ठिकाणी सापडतात.
या शेतीच्या आणि संस्कृतीच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचे घटक ठरले ते म्हणजे माणूस एका ठिकाणी वस्ती करून राहायला लागला. आधी भटकत असलेल्या मानवाला स्थैर्य आलं. या स्थैर्याबरोबर तो त्याच्या आजूबाजूचं भौगोलिक ज्ञान गोळा करायला लागला. जो प्रदेश अस्थिर आहे, जिथे सतत नैसर्गिक बदल होत आहेत, अशा ठिकाणी तो राहीनासा झाला. सतत भूकंप, ज्वालामुखी, समुद्राची पातळी सतत सतत वाढणारे प्रदेश, तो सोडून जाऊ लागला. त्याच्याऐवजी त्याला स्थिर, भरपूर पाण्याचे, सुपीक जमीन असलेले प्रदेश राहण्यासाठी आवडू लागले. त्यामुळे आपल्याला मानवी वस्त्या या चांगल्या पावसाच्या ठिकाणी, नदीच्या जवळील सुपीक जमिनीच्या जवळ विसावलेल्या आढळून येतात.
वातावरण आणि संस्कृती
जगाच्या वातावरणाचा इतिहास पाहिला तर पृथ्वीवर हिमयुग होऊन पंधरा हजार र्वष झाली. म्हणजेच याआधी पृथ्वीवरचं सरासरी तापमान अतिशय कमी होतं अशा कमी तापमानामुळे जैवविविधताही खूप कमी होती. पण जसं हे तापमान वाढायला लागलं, तसं पावसाचं प्रमाणही वाढायला लागलं. पाऊस वाढल्यामुळे वनस्पतींच्या प्रजातीही वाढायला लागल्या, त्यामुळे कीटक, पक्षी, प्राणी, जलचर, सर्वच जीवांची लोकसंख्या वाढायला लागली. याचा परिणाम म्हणून मानवी वस्तीचाही विकास व्हायला लागला. हे सर्व पृथ्वीचं तापमान वाढायला लागलं म्हणून झालं. आज आपण पृथ्वीचं वाढणारं तापमान या घटकाकडे खूप नकारात्मक दृष्टीने बघतो. पण जेव्हा जेव्हा पृथ्वीचं तापमान वाढायला लागलं तेव्हा तेव्हा पृथ्वीवरची जैवविविधता वाढली आहे. आज मानवनिर्मित कारणांमुळे हे तापमान वाढतं आहे आणि त्यामुळे त्याचा नकारात्मक परिणाम आणि बदल आपण अनुभवत आहोत.
भारतीय उपखंडाचा इतिहास आपण पाहिला तर जेव्हा हडप्पा किंवा सिंधू संस्कृतीचा उदय झाला, तेव्हा पृथ्वीचं सरासरी तापमान वाढलेलं होतं. असंच जगात अनेक ठिकाणी तापमानवाढीमुळे जैव-विविधतेवर परिणाम होऊन संस्कृतींचा उदय होत होता. यानंतर चार हजार वर्षांपूर्वी तापमान परत कमी होऊ लागलं आणि त्याच वेळेला आपल्याला सिंधू संस्कृतीचा अस्त झालेला दिसून येतो. केवळ सिंधू संस्कृतीच नाही, तर त्याच्या समकालीन जगाच्या अनेक संस्कृतींचा अस्त साधारण याच काळात झालेला दिसतो. यानंतर इसवी सनपूर्व पाचव्या शतकामध्ये परत पृथ्वीचं तापमान वाढायला लागलं. हा काळ साधारण इसवी सनपूर्व ५०० ते इ.स. ५०० या हजार वर्षांच्या कालखंडात तापमान परत चांगलं होतं. भारतामध्ये हा काळ मौर्य राजवटीचा काळ आहे, जेव्हा भारतात सगळीकडे भरभराट होती. ज्याला आपण सुवर्णकाळही म्हणतो. त्यानंतरचा कालावधी होता तो पाचव्या शतकापासून ते दहा किंवा बाराव्या शतकापर्यंतचा. या काळात तापमान वर-खाली होत होतं. त्यानंतर बाराव्या शतकापासून ते अठराव्या शतकापर्यंत हा कमी तापमानाचा कालखंड होता. या काळात परत जगभरात सगळीकडे दुष्काळ आले. भारतातही सातत्याने दुष्काळ पडत होते. भारतावर जी आक्रमणे झाली तीही साधारण याच काळात. या काळातली आक्रमणे आणि वातावरणातले बदल यांचाही एकमेकांशी संबंध आहे का, हा एक अभ्यासाचा विषय आहे. हे कदाचित शक्यही असेल असं वाटतं. कारण युरोप आणि इतर उत्तरेचा भाग हा आपण पाहिला तर तसा कमी पावसाचाच भाग. मग जेव्हा भारतामध्ये पावसाचं प्रमाण कमी होत होतं, तेव्हा या सर्व भागाला नक्कीच दुष्काळाने ग्रासलं असणार. या भागांमध्ये भारताच्या तुलनेत सुबत्ता कमी होती. या भारताच्या सुवर्णकाळात राजवटीही भक्कम होत्या आणि त्याबरोबर शेती आणि त्यातून येणारी श्रीमंतीही होती. म्हणून उत्तरेकडून भारतावर आक्रमणे झाली असतील. इंग्रज भारतात आपलं बस्तान बसवायचं कारणही तेच. कारण पाच हजार वर्षांपासून चालू असलेल्या व्यापारी मार्गाची जशी त्यांना कल्पना होती, तशीच भारतातल्या नैसर्गिक सुबत्तेचीही त्यांना जाणीव होती. त्यामुळे नियमित पाऊस हा तेव्हाच्या भौगोलिक राजकारणाचा केंद्रबिंदू होता असं आपण नक्कीच म्हणू शकू.
या सर्व सांस्कृतिक जडण-घडणीचं, सुबत्तेचं दृश्य स्वरूप म्हणजे शेती. ही शेती घडत होती मुख्यत: भारताच्या उत्तर भागामध्ये. मुख्यत: आजच्या पंजाब, हरियाणा या भागामध्ये. त्यातला काही भाग आज पाकिस्तानातही आहे. या भागांमध्ये आपल्याला शेतीचे पुरावे मिळत आहेत. आता आपल्याला प्रश्न पडेल की जर साऱ्या भारतात चांगला पाऊस होत होता, तर मग हाच भाग इतका महत्त्वाचा का? तिथे आपण संस्कृती कोणत्या मुद्दय़ांना धरून विकसित झाल्या ते लक्षात घेतले पाहिजेत. या जागेवर तापमान अनुकूल पाहिजे, मुबलक पाणी असायला पाहिजे, नैसर्गिकदृष्टय़ा स्थिर असायला पाहिजे, व्यापाराच्या मार्गाशी जोडला असायला पाहिजे. इथे आपल्याला नद्यांचा संस्कृतीशी संबंध कसा हे लक्षात यायला सुरुवात होते.
नदी आणि संस्कृती
वर उल्लेख केलेल्या भागात सुबत्ता आणणारी नदी म्हणजे ‘सरस्वती’ नदी. या नदीचा उल्लेख हा वेदांमध्येही आढळतो. सरस्वती नदी म्हणजे खरंतर एक सामान्य नदी होती. पण तिला पाच नद्या मिळून जी एक मोठी नदी झाली तिला सरस्वती म्हटलं गेलं. या पाच नद्यांमध्ये दृश्यध्वती, गम्भिरा, घग्गर इत्यादी नद्या होत्या. या नद्यांना परत दोन मोठय़ा नद्या येऊन मिळायच्या, त्या नद्या म्हणजे यमुना आणि सतलज. या सर्व नद्यांचा समूह, म्हणजे हिमालयातून उगम पावून खाली येणाऱ्या या नद्या आणि यांच्या बरोबर नियमित मान्सून. हे सर्व नद्यांचं पाणी, आणि मान्सूनने पडणारा पाऊस, असं सगळं अरबी समुद्राला जाऊन मिळायचं. मान्सून त्या वेळेला पश्चिम भागापर्यंत आपला परिणाम दाखवत होता. या सगळ्या पाण्यामुळे निर्माण झालेली सुपीक जमीन. हिमालयाचं पाणी, मान्सून यामुळे इथे अतिशय सुपीक मैदानं तयार झाली. आणि ही सुपीक मैदाने संस्कृतीच्या उदयाचं व्यासपीठ बनली. या काळातला जर आपण ऋग्वेद पाहिला त्यात ४० ठिकाणी सरस्वती नदीचं नाव आहे आणि केवळ दोन ठिकाणी गंगेचं नाव आहे. त्यामुळे गंगेला एवढं मोठं स्थान दिलं गेलं नाहीये. तशी तुलनात्मक परिस्थिती असून गंगेच्या खोऱ्यात तेंव्हा संस्कृती का विकसित झाली नाही, तर त्याचं एक कारण तिथे असलेली जंगलं असंही असू शकेल. असं आणखीन एक संशोधन सुरू आहे, जे सांगतं की इथे हडप्पा संस्कृतीच्या उदयाच्या काळामध्ये दलदल होती.
साधारण चार ते पाच हजार वर्षांपूर्वी काही भूकंप झाले आणि यामुळे इथल्या भूगोलात बरेच आमूलाग्र बदल झाले. त्यातला एक बदल म्हणजे यमुनेचं पात्र बदललं. यमुना पश्चिम वाहिनीऐवजी पूर्व वाहिनी झाली आणि ती गंगेला जाऊन मिळाली. त्याचबरोबर सतलजचं पात्र बदललं आणि ती सिंधू नदीला जाऊन मिळाली. या दोन मोठय़ा नद्यांचा प्रवाह बदलल्याने यांच्यामधून येणारा गाळ तिथल्या जमिनीला मिळेनासा झाला. हे सरस्वतीला मिळणारे मुख्य प्रवाह बंद झाले. तरीदेखील इथे लोक राहिल्याचे पुरावे आपल्याला आजही सापडतात. हे टिकून राहण्याचं कारण हे मान्सून होतं. नंतरच्या काळात मान्सूनचं प्रभावक्षेत्रही इथून सरकू लागलं, आणि मग इथे असलेल्या मानवी वस्त्यांना तग धरून राहणं अशक्य होऊन बसलं. या बदलांमुळे इथले लोक महाराष्ट्रात, गुजरात राज्याच्या दक्षिणेला आले. काही सिंधू नदीच्या खोऱ्यात गेले आणि मुख्य म्हणजे गंगेच्या खोऱ्यात आले. या बदलांचे, स्थलांतराचे पुरावे आपल्याला उत्खननात सापडतात. त्याबरोबरच, इथली दलदलही कमी होऊ लागली. त्याचबरोबर आधी पश्चिम वाहिनी असणाऱ्या नद्या आता पूर्व वाहिनी होऊन गंगेच्या पात्रात येऊ लागल्या. या गंगेच्या पात्रात भागीरथी, मरकडा, कोसी, यमुना या सर्व नद्यांचं पाणी आहे.
‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या अभ्यासामध्ये त्यांना सरस्वती नदीची भौगोलिक रचना आणि पूर्वेकडील गंगेच्या खोऱ्यातील रचना यामध्ये खूप साम्य आढळलं. पश्चिमेकडे जे लोक सरस्वतीला मानत होते, त्यांनी हे मानाचं स्थान आता गंगेला प्रदान केलं. ज्या वेदांमध्ये सरस्वती स्तुती आहे, त्याच्या पुढच्या वेदांमध्ये गंगेचीही स्तुती दिसते आहे. त्यामुळे सरस्वतीच्या काठावर वाढलेली भारतीय संस्कृती, ही पुढे जाऊन गंगेच्या काठावर विसावते. या सगळ्यामध्ये मान्सूनचा हातभारही तेवढाच महत्त्वाचा आहे. हिमालयातून उगम पावणाऱ्या या नद्यांना हिमनद पाणी देतात. पण हे पाणी नदी समुद्रापर्यंत वाहून नेईल एवढं नसतं. त्यामुळे इथे मान्सून फायदेशीर ठरतो. मान्सूनमुळे फक्त नदीच नव्हे तर त्याच्या उपनद्या आणि त्याच्या कक्षेतील सर्व भाग व्यापतो आणि मुख्य नदीला आणखीनच श्रीमंत करतो.
हरियाणापासून सुरू होणाऱ्या या गंगेच्या खोऱ्यात दोन पद्धतींनी पाऊस पडतो. एक म्हणजे वेस्टरलीज्, म्हणजे ३० ते ६० अक्षांशावरून एक अख्खा पट्टा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहायला लागतो, त्याला वेस्टरलीज् असं म्हणतात. यामुळे पाऊस पडतो. पण गेल्या दोन वर्षी आपल्याला असं दिसतं आहे की एल निनोमुळे हा सगळा पट्टा खाली सरकून १५ अंशांपर्यंत गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रावरूनही हे वारे वाहिले आणि त्याच्यामधून मग आपल्याला अवकाळी पाऊस अनुभवयाला मिळाला. म्हणून फेब्रुवारी मार्चमध्ये पाऊस आला, तर असं समजायला हरकत नाही की हे वर्ष एल-निनोचं असणार आहे.
स्थलांतर आणि गंगेचं खोरं
या पावसाबरोबर सांस्कृतिकदृष्टय़ाही हा नद्यांमधला बदल आपल्याला दिसून येतो. पूर्वी सरस्वती नदीला मिळालेलं देवतेचं स्थान आज गंगेला मिळालं आहे. गंगेची मंदिरं आपल्याला दिसत आहेत. ज्या प्रकारची मातीची भांडी आपल्याला सरस्वती नदीच्या खोऱ्यात मिळाली, त्याच प्रकारची भांडी आपण गंगेच्या खोऱ्यातही पाहू शकतो. कोणत्याही प्रकारच्या स्थलांतरामध्ये पाहिलं तर स्थलांतर केल्यावरची पिढी आधीच्या पिढीपेक्षा अधिक गरीब असते. गंगेच्या खोऱ्यात झालेल्या स्थलांतराचं ही असंच झालं. त्यामुळे गंगेच्या खोऱ्यातील सर्व सांस्कृतिक पुरावे हे सर्व ग्रामीण भाग दर्शविणारे मिळतात. हे अर्थात मौर्य काळाच्या आधीचे अवशेष. मौर्य काळ हा परत भरभराटीचा असल्याचे दाखले आपल्याला मिळतात. या काळात अर्थातच मान्सून चांगला होता.
‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या मान्सूनच्या अभ्यासामध्ये या वेळेला हे सांस्कृतिक दुवेही शोधण्याचा प्रयत्न हा गट करणार आहे. सरस्वतीच्या काळात असणाऱ्या लोकांचं राहणीमान, वापरायच्या वस्तू, जे या गटाला २०१३ साली सरस्वतीच्या खोऱ्यात दिसलं त्याचे दुवे आत्ता गंगेच्या काठी आपल्याला मिळत आहेत का, हे हा गट पाहणार आहे. ज्या वेळेला भारतात मान्सून कमी होऊ लागला, त्या काळात भारतात या भटक्या किंवा एका विशिष्ट ऋतूमध्ये आपलं मूळ स्थान सोडून इतर ठिकाणी जाणाऱ्या जमाती वाढू लागल्या. जशी आपल्याला धनगर जमात माहीत आहे तसेच गुजरातमधले रबरी आहेत. तर अशा जमाती आपल्याला भारतात सगळीकडेच दिसतात. अगदी हिमालयातसुद्धा. हा वातावरणातल्या बदलांचाच एक परिणाम आहे. त्यामुळे या वर्षी या जमातींचं मॅपिंग असा नेहमीपेक्षा वेगळा उपक्रमही हाती घेतला जाणार आहे.
गंगेच्या खोऱ्याची व्याप्ती देशाच्या एकतृतीयांश भागात पसरली आहे. त्यामुळे गंगेला मिळणारं राजकीय महत्त्वही आपल्याला लक्षात येतं. हा भाग नीट समजून घेतला तर आपल्याला मान्सून अधिक नीट पद्धतीने समजेल, अशी भावना या वर्षी प्रवास करणाऱ्या गटाची आहे.
‘प्रोजेक्ट मेघदूत’चे सहभागी
या वर्षीच्या गटामध्ये सहभागी होणार आहेत- बँकिंग क्षेत्रात काम करणारे नितीन ताम्हणकर, गणित विषयाबरोबरच पर्यावरणाचाही अभ्यास असलेली अदिती देवधर, मायक्रोबायोलॉजीच्या शेवटच्या वर्षांला असलेली मिताली इनामदार. फोटोग्राफर किरण ठोंबरे, भूगोल अभ्यासक स्नेहा कुलकर्णी आणि ‘ए.बी.पी. माझा’चा मयूरेश कोन्नूर. या वेळेला तीन भागांमध्ये काम होणार आहे. एक गट सर्व हवामानविषयक डेटा गोळा करणार आहे, दुसरा गट लोकांशी बोलून सांस्कृतिक अभ्यास करील आणि तिसरा गट जैवविविधतेचा अभ्यास करील.
प्रज्ञा शिदोरे response.lokprabha@expressindia.com