‘लोकप्रभा’ (१२ जून) च्या अंकामधील नीलेश पाटील यांचा ‘सायकल एके सायकल!’ हा लेख वाचून लहानपणी खाल्लेल्या बर्फाच्या गोळय़ांची आठवण झाली आणि मन एकदम भूतकाळात गेले. परीक्षा आटोपल्यानंतर आणि विशेषत: कडक उन्हाळय़ाच्या दिवसांमध्ये गोळेवाल्याच्या गाडीसमोर उभे राहून गोळय़ाची मजा चाखली नाही अशी मुले विरळच. इथे कोणाचा उपमर्द किंवा अपमान करण्याचा प्रश्न नाही. पण या गोळे विक्रेत्याला गोळेवाले भैय्या असे म्हटले जाई. भैय्या या नावात जी खुमारी आहे ती विक्रेता या नावात नाही. गॅल्व्हनाईज पत्र्याचे छप्पर असलेली हातगाडी. या गाडीच्या लाकडी चौकटय़ांमध्ये ठेवलेल्या हिरव्या, पिवळय़ा, लाल रंगांच्या सरबतांच्या बाटल्या, या बाटल्यांवरील एकसारखी दिसणारी पत्र्याची झाकणे, गाडीवर एका बाजूला पाणी भरून ठेवलेले स्टिलचे पिंप, गाडीच्या मधोमध ठेवलेली लाकडी स्टँड असलेली बर्फाची किसणी, गाडीच्या खालच्या भागात चारही चाकांच्या मधोमध बर्फ ठेवण्याकरिता केलेली व्यवस्था, स्टीलच्या पिंपामधून पाणी काढण्याकरिता ठेवलेले स्टिलचे ओगराळे, पैशांची छोटी लाकडी पेटी असे सर्वसाधारणपणे गाडीचे स्वरूप असे. गोळेवाल्याचे कपडेदेखील ठरावीक. आकाशी रंगाचा अध्र्या बाह्यंचा आणि चार बटणांचा शर्ट, खाली दुटांगी स्वच्छ पांढरे धोतर असे त्याच्या कपडय़ाचे स्वरूप. तोंडात पानाचा तोबरा.
शहरातल्या महत्त्वाच्या चौकांमध्ये, शाळांच्या आसपास सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सात, आठ वाजेपर्यंत या बर्फाचा गोळा विकणाऱ्या गाडय़ा उभ्या असत. प्रत्येक गाडीवाल्याची गाडी उभी करण्याची जागा शक्यतो ठरलेली. ठरलेल्या वेळात बर्फाचा गोळेवाला त्याच्या ठरलेल्या जागेवर गाडी लावून उभा राहिलेला दिसणारच.
‘माझे खाद्यजीवन’ या लेखात पु.लं.नी म्हटले आहे की, भेळेची रुची भेळवाल्याच्या स्वच्छतेच्या व्यस्त प्रमाणात वाढते. हीच गोष्ट गोळेवाल्याच्या गाडीलादेखील लागू होत असे. बर्फाचा गोळा खाताना किंवा गोळेवाल्याच्या गाडीवरील सरबत पिताना तेथील स्वच्छता वगैरे या गोष्टीचा बाऊ कोणाच्याही मनात येत नसे. दहा पैशांमध्ये मिळणारा बर्फाचा गोळा किंवा २५ पैशांमध्ये मिळणारे सरबत हीदेखील शाळकरी मुलांच्या दृष्टीने चैनीची गोष्ट असे.
गोळेवाला भैय्या बर्फाचा गोळा २ प्रकारे बनवत असे. उजव्या हातात धरलेली बर्फाची लादी किसणीवर धरून काढलेला बर्फाचा किस डाव्या हातात पकडून ठरावीक प्रमाणात झालेल्या किसात लाकडी पातळ काठी रोऊन गोळय़ाचा आकार सराईतपणे गोळेवाला देत असे. या गोळय़ावर गोड चवीचा लाल भडक रंग टाकून तो गिऱ्हाईकाच्या हातात देत असे. दुसऱ्या प्रकारात बर्फाचा किस डाव्या हातातल्या काचेच्या ग्लासात घेऊन ग्लासाच्या आकाराचा जरा मोठा गोळा दिला जाई. गोळेवाल्याच्या गाडीच्या आसपासच उभे राहून गोळय़ाचा स्वाद घेतल्यास शिल्लक राहिलेल्या गोळय़ावर लाल रंग पुन्हा पुन्हा टाकून द्यायला गोळेवाला कधीही खळखळ करीत नसे. घरी नेण्याकरिता पातेल्यामधून गोळे नेल्यास थोडय़ा वेळाने पातेल्यात जमणाऱ्या गोड पाण्याची चव वेगळीच लागत असे. गोळेवाल्याच्या गाडीवर मिळणारे सरबत म्हणजे आणखी एक न्यारा प्रकार असे. काचेच्या ग्लासात गाडीत ठेवलेल्या बाटल्यांपैकी एका बाटलीतील सरबत स्टीलच्या डावेने थोडय़ा प्रमाणात ओतून त्यामध्ये सब्जा, पाणी, बर्फाचे तुकडे असे सर्व टाकून भरलेल्या काचेच्या ग्लासावर दुसरा रिकामा ग्लास ठेऊन सरबत चांगले हलवून एकजीव करणे आणि त्यावर लिंबू पिळून आणि सैंधव मीठ, मसाला टाकून समोरच्या गिऱ्हाईकाला प्यायला देणे ही कृती वैशिष्टय़पूर्णरीत्या आणि झटपटपणे गोळेवाला करीत असे. बर्फाचा गोळा आणि सरबत हे दोनच पदार्थ या गाडय़ांवर मिळत. परंतु त्याला प्रतिसाद चांगला लाभे. गोळेवाला भैय्या पहिला पाऊस सुरू झाल्यावर गाडी बंद करून मुलखाच्या गावी निघून जात असे आणि पुन्हा गणपतीच्या आसपास आपला व्यवसाय सुरू करीत असे ते पुन्हा पावसाळा येईपर्यंत. शाळकरी मुलांशी नेहमीची ओळख असल्याने गोळा, सरबत विक्रीमध्ये उधार, उसनवारीदेखील चालत असे. आजूबाजूच्या खेडय़ांमधून भाजीपाला, धान्ये इ. विकायला येणाऱ्या किंवा खरेदीला येणाऱ्या खेडूत ग्रामस्थांबरोबर बर्फाचे गोळे, सरबत देण्याच्या बदल्यात पैशांऐवजी भाजीपाला, धान्य इ. स्वीकारण्याचा व्यवहारही चालत असे.
गेल्या १०-१५ वर्षांमध्ये बर्फाचे गोळे विकणाऱ्यांच्या धंद्यावर परिणाम होण्यास सुरुवात झाली. शाळकरी तसेच महाविद्यालयीन मुलांकडे वाढलेले पॉकेटमनीचे प्रमाण, पिझ्झा, बर्गर, आईस्क्रीम पार्लर यांची वाढती संख्या यामुळे बर्फाचे गोळे, सरबत यांच्या गाडय़ा कमी-कमी होण्यास सुरुवात झाली. बहुतेकशा लहान- मोठय़ा गावांमध्ये बर्फाचा गोळा आणि सरबत विकणाऱ्यांच्या गाडय़ा हमखास असत. काही ठिकाणी हे गोळेवाले अजून असतीलही पण कालौघात या धंद्याची रया आता जात चालली आहे.
एखाद्या व्यवसायाच्या दृष्टीने बर्फाचे गोळे विकणाऱ्याचा व्यवसाय रूढ अर्थाने छोटा असेलही, पण हा व्यवसाय करणाऱ्यांनी विशेषत: शाळकरी मुलांना व इतरांनाही जो आस्वादाचा आनंद दिला तो वर्णनापलीकडचा आहे.
मोठय़ा मोठय़ा मॉलमध्ये किंवा लग्न समारंभांमधून बर्फाचे गोळे देण्याची व्यवस्था हल्ली केलेली असते. परंतु हातगाडी लाऊन माफक दरात बर्फाचे गोळे आणि सरबत गिऱ्हाईकांना देऊन खूश करणाऱ्या विक्रेत्यांची सर या पंचतारांकित बर्फाच्या गोळय़ांना नक्कीच नाही.
अ‍ॅड. सुरेश पटवर्धन response.lokprabha@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा