ऋषिकेश बामणे, अन्वय सावंत – response.lokprabha@expressindia.com
‘‘..आणि हो, एकदविसीय भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माची नेमणूक करण्याचा निर्णय वरिष्ठ राष्ट्रीय निवड समितीने घेतला आहे.’’
सारे काही सांगून संपल्यानंतर अगदी जाता जाता काही सांगून जावे, त्या पद्धतीने बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवार, ८ डिसेंबर रोजी हा निर्णय जाहीर केला. खरे तर या प्रकाराला ‘जाहीर केला’ असे म्हणणेही अयोग्य ठरावे. कारण जाहीरच करायचे तर तो निर्णय सुरुवातीला सांगणे आवश्यक होते. हा निर्णय रोहित शर्मा कर्णधारपदी आला यापेक्षा नामोल्लेख न करताच विराट कोहलीची उचलबांगडी केल्याचे सांगणारा होता. रोहितची निवड करताना विराटला अनुल्लेखाने मारण्याचा हा प्रकार होता. अधिक तपशील येईलच.. असे सांगणाऱ्या ट्वीटनंतर जारी करण्यात आलेल्या अगदीच किरकोळ स्वरूपात असलेल्या प्रसिद्ध पत्रकामध्येही अखेरच्या ओळीत या निर्णयाची माहिती देण्यात आली. देशाच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद हे काही अगदी जाता जाता सांगण्याची किंवा जाहीर करण्याची गोष्ट निश्चितच नाही. अशा प्रकारचे निर्णय पूर्वी थेट पत्रकार परिषदांमध्ये जाहीर केले जात आणि त्याची सांगोपांग चर्चा होत असे, कारणमीमांसाही केली जात असे. आता घडलेला हा सारा प्रकार देशभरातील तमाम क्रिकेटप्रेमींसाठी मोठाच धक्का ठरला. क्रिकेट हा भारतात सर्वाधिक खेळला जाणारा, चर्चा होणारा व अर्थकारणाचे सर्वाधिक फेरे असलेला क्रीडाप्रकार आहे. त्यामुळे अशा प्रकारे कर्णधारपद जाहीर होणे हा धक्कादायक असाच प्रकार होता.
साहजिकच, तुफान लोकप्रियता लाभलेल्या विराटचे चाहते त्यामुळे नाराज झाले आणि बीसीसीआयला फक्त विराटच्या चाहत्यांच्याच नव्हे तर तमाम क्रिकेटप्रेमींच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यामुळे हे प्रकरण अधिकच तापत गेले. दुसऱ्या दिवशी सायंकाळी बीसीसीआयचे अध्यक्ष असलेल्या सौरव गांगुलीने निवड समितीची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. कोहलीला ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंतीही केली होती. परंतु त्याच्याकडून काहीही प्रतिसाद न आल्याने तसेच मर्यादित षटकांच्या प्रकारांत एकच कर्णधार असावा, या हेतूने मुंबईकर रोहितकडेच एकदिवसीय प्रकारातील नेतृत्वही सोपवण्यात आले, असे सांगून या प्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न गांगुलीने केला.
हा सारा प्रकार इथे थांबता तर नवलच! या घडामोडींना बरोबर आठवडा पूर्ण होत असतानाच बुधवार, १५ डिसेंबर रोजी विराट कोहलीनेच पत्रकार परिषदेदरम्यान गुगली टाकून बीसीसीआयचा त्रिफळा उडवला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघाची निवड करण्याला सुमारे ९० मिनिटे शिल्लक असतानाच ‘तू यापुढे एकदिवसीय संघाचा कर्णधार नसशील’, असे निवड समितीच्या अध्यक्षांनी आपल्याला सांगितले, असे कोहली म्हणाला. वरिष्ठ राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्षपद भारताचे माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा भूषवत असून यामध्ये अॅबी कुरुव्हिला, देबाशिष मोहंती, हरविंदर सिंग आणि सुनील जोशी यांचाही समावेश आहे. कोहली पुढे म्हणाला, संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या विश्वचषकानंतर ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय त्याने स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वीच जाहीर केला होता. त्यावेळी बीसीसीआयने निर्णयाचे स्वागत केले होते. किंबहुना बीसीसीआयच्या एकाही पदाधिकाऱ्याने त्या निर्णयाबाबत पुनर्विचार करण्याचे सुचवले नाही, असा गौप्यस्फोटही कोहलीने केला. हे सौरव गांगुलीवर थेट शरसंधान होते. कारण ‘निर्णयाचा पुनर्विचार कर’ असे सुचविल्याचे गांगुलीने सारवासारव करताना सांगितले होते. याचा अर्थच असा की, दोघांपैकी कुणा एकाचे खरे आहे आणि कुणा दुसऱ्याचे खोटे. मात्र एकूणच घटनाक्रम पाहता सौरव गांगुली आणि बीसीसीआयच्या निर्णयप्रक्रियेमध्येच संशयाला वाव असल्याचे सकृद्दर्शनी तरी दिसते.
एकुणात या साऱ्या घटनाक्रमानंतर भारतीय क्रिकेटमधील मतभेद आणि राजकारण चव्हाटय़ावर आले आहे. प्रचंड मोठे अर्थकारण असलेल्या कोणत्याही मोठय़ा संस्था, संघटनांच्या बाबतीत एखादी गोष्ट घडते त्या वेळेस निमित्त तात्कालिक असले तरी त्याचे धागेदोरे त्याहीपूर्वी घडलेल्या घटनांच्या मालिकेमध्ये दडलेले असतात. या घटनेसही तेच लागू होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. २०१७ मध्ये कोहलीने भारताच्या तिन्ही प्रकारांतील नेतृत्वाची सूत्रे स्वीकारली. (महेंद्रसिंह धोनीने निवृत्ती जाहीर केल्यामुळे कसोटीचे कर्णधारपद कोहलीकडे २०१४ मध्येच देण्यात आले होते.) त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २०१७च्या चॅम्पियन्स करंडकाची अंतिम फेरी, २०१९च्या एकदिवसीय विश्वचषकाची उपांत्य फेरी आणि २०२१मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपदाची अंतिम फेरी, अशी आयसीसी स्पर्धामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. खेळी उल्लेखनीय असल्या तरी एकही आयसीसी जेतेपद कोहलीला मिळवता आले नाही. कोहलीची हकालपट्टी करण्यामागे हेसुद्धा एक प्रमुख कारण आहे, असे म्हटले जाते. त्यातच ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताला साखळीतच गाशा गुंडाळावा लागला. पाकिस्तान, न्यूझीलंडविरुद्ध मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागल्याने कोहली टीकेचा धनी ठरला.
असे असले तरी कोहलीची कर्णधार म्हणून एकूण टक्केवारी नक्कीच कौतुकास्पद आहे. फलंदाज कोहली मैदानावर असला की प्रतिस्पर्धी संघ नेहमीच दडपणाखाली असतो. गेल्या दोन वर्षांपासून कोहलीने एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकवलेले नाही. तरी त्याचा मैदानावरचा दरारा अद्यापही कायम आहे. क्षेत्ररक्षण करतानाही कोहलीची देहबोली आणि वर्चस्व गाजवण्याची वृत्ती संपूर्ण संघाचे मनोबल उंचावते. भारताच्या सर्वाधिक यशस्वी कर्णधारांच्या यादीत कोहलीचा तिसरा क्रमांक लागतो. अप्रतिम फिटनेस, आक्रमकता आणि मैदानावरचा आत्मविश्वासपूर्ण वावर या त्रिसूत्रीच्या बळावर कोहलीने गेल्या चार वर्षांपासून भारताचे यशस्वी नेतृत्व केले. मात्र संघ आणि क्रिकेट यापेक्षा त्याचे स्वतचे वलयच अधिक प्रबळ होत असल्याची टीका त्याच्यावर होऊ लागली होती. अखेरीस त्या त्याच्या वैयक्तिक लोकप्रियतेला लगाम घालण्यासाठीही हा निर्णय घेण्यात आला, अशी चर्चा आहे.
दरम्यान, एखादी व्यक्ती क्षेत्रापेक्षाही मोठी झाली की, त्यांची एकाधिकारशाही वाढू लागते आणि संवाद कमी होत जातो. तसेच काहीसे विराटच्याही बाबतीत झाले; त्याची आक्रमकता संघातील सहकाऱ्यांसोबत असलेल्या संवादाच्या आड येऊ लागली आणि विसंवाद हेच लक्षण दिसू लागला.
काही महिन्यांपूर्वी भारताच्याच एका फिरकीपटूने कोहलीच्या आक्रमक स्वभावामुळे त्याच्याशी संवाद साधताना भीती वाटत असल्याचे सांगितले होते. विदेशातील कसोटींमध्ये या फिरकीपटूला प्रथम प्राधान्य दिले जाईल, असे २०१८-१९च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या वेळी भारताचे तत्कालीन मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले होते. मात्र २०१९च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर त्या खेळाडूने संघातील स्थानच गमावले. आपल्याला कोणत्या कारणांमुळे संघाबाहेर ठेवण्यात आले, याची त्याला अद्यापही पुरेशी माहिती नाही. अमिरातीत झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात काही खेळाडूंची संघात अनपेक्षितपणे झालेली निवड हाही चर्चेचा विषय ठरला. धोनीला प्रेरक म्हणून नेमूनही भारतीय खेळाडूंचा योग्य ताळमेळ साधणे बीसीसीआयला जमले नाही. मुळात गांगुली हा स्वत: एक आक्रमक कर्णधार होता. तीन वर्षांपूर्वी बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्याने भारतीय क्रिकेटमध्ये काही आमूलाग्र बदल केले. त्याशिवाय कसोटी क्रिकेटच्या प्रसारासाठीही चांगली पावले उचलली. त्यामुळे कोहलीशी त्याचे ऋणानुबंध सुरळीत असतील, असे सर्वानाच वाटले होते. परंतु ट्वेन्टी-२० विश्वचषकातील अपयशानंतर कोहली-गांगुलीमध्ये बिनसल्याचे सातत्याने जाणवू लागले होते.
याशिवाय कोहली आणि रोहित यांच्यातील वादांची मालिकाही गेल्या काही वर्षांपासून चर्चेत होती. मात्र कोहलीने आपल्या बेधडक शैलीत उत्तरे देत त्या चर्चेला पूर्णविराम दिला होता. आपल्यात कोणतेही वितुष्ट नाही, असे दोघांनीही अनेकदा सांगितले. पण असे सांगण्याची वेळही अनेकदा आली, हे वास्तव होते. रोहितकडे ट्वेन्टी-२० पाठोपाठ एकदिवसीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवल्यामुळे या दोघांमधील संबंध बिघडल्याच्या चर्चाना पुन्हा उधाण आले आहे. अर्थात या वावडय़ांमध्ये तथ्य नाही, असे कोहलीने पुन्हा एकदा ठणकावून सांगितले आहे.
‘‘मागील अडीच वर्षांपासून मला अनेकदा हा प्रश्न विचारला गेला आहे. माझ्यात आणि रोहितमध्ये सारे आलबेल असल्याचे मी वारंवार सांगितले आहे. आता असे स्पष्टीकरण देत राहण्याचाही कंटाळा येऊ लागला आहे. माझ्या कोणत्याही कृतीमुळे संघांचे नुकसान होणार नाही, हे मी खात्रीने सांगू शकतो. ही माझी भारतीय क्रिकेटशी असलेली बांधिलकी आहे,’’ असे कोहली म्हणाला. दुसरीकडे कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळण्याचा अनुभव खूप छान होता, असे रोहितने काही दिवसांपूर्वी म्हटले होते. भारतीय संघ यशस्वी ठरण्यासाठी फलंदाज म्हणून कोहलीची महत्त्वाची भूमिका असेल, असेही त्याने नमूद केले. या दोघांच्याही या स्पष्टीकरणानंतर पडद्यामागचे किंवा क्रीडांगणाबाहेरचे वास्तव वेगळेच असल्याची चर्चा आता पुन्हा मूळ धरू लागली आहे.
कोहली-रोहित हे दशकभरापासून भारतीय संघाचे आधारस्तंभ आहेत. ३४ वर्षीय मुंबईकर रोहितने २००७मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तर ३३ वर्षीय दिल्लीकर कोहली त्याच्याच पुढच्या वर्षी भारतीय संघात दाखल झाला. कोहलीने सुरुवातीपासून सातत्यपूर्ण कामगिरी करत भारतीय संघातील स्थान पक्के केले. रोहितला मात्र स्थिरस्थावर होण्यासाठी २०१३ सालापर्यंत वाट पाहावी लागली. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना आणि तत्कालीन कर्णधार धोनी याच्या पाठिंब्यामुळे रोहितच्या कारकीर्दीला योग्य दिशा मिळाली.
२०१३च्या चॅम्पियन्स करंडकात धोनीने मधल्या फळीत खेळणाऱ्या रोहितला सलामीवीराची भूमिका बजावण्याबाबत विचारले. त्यानेही यासाठी होकार दिला आणि त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. तो सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम सलामीवीर मानला जातो.
२०१३ सालीच ‘आयपीएल’मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रिकी पाँटिंगला त्याच्या सततच्या अपयशानंतर वगळण्यात आले. त्याच्या जागी युवा रोहितकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आणि मुंबईने पहिल्याच प्रयत्नात जेतेपदाला गवसणी घातली. त्यानंतर दर हंगामागणिक रोहित कर्णधार म्हणून अधिक परिपक्व होत गेला. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने आतापर्यंत विक्रमी पाच वेळा ‘आयपीएल’चे जेतेपद पटकावले.
दुसरीकडे भारताचा कर्णधार म्हणून कोहलीने क्रिकेटच्या कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या तिन्ही प्रकारांत सातत्यपूर्ण यश प्राप्त केले. मात्र, त्याला ‘आयसीसी’ची जागतिक स्पर्धा जिंकण्यात अपयश आले. तसेच ‘आयपीएल’मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचे नेतृत्व करतानाही कोहलीची जेतेपदाची पाटी कोरीच राहिली. त्यातच मागील दोन वर्षांत फलंदाजीत त्याला अपेक्षित कामगिरी करता न आल्याने त्याच्यावरील दडपण वाढत गेले.
विशेषत: २०१९च्या एकदिवसीय विश्वचषकात रोहितने तब्बल पाच शतके झळकावण्याची विक्रमी कामगिरी केली, तर कोहलीच्या नावे पाचच अर्धशतके होती, त्याला एकही शतक करता आले नाही. भारताला उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. या लढतीत कर्णधार म्हणून कोहलीचे काही निर्णयही चुकले. न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाची अवस्था बिकट असताना संघ व्यवस्थापनाने ऋषभ पंत, दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंडय़ा यांना अनुभवी धोनीच्या आधी फलंदाजीला पाठवले. या निर्णयाला रोहितचा विरोध होता अशीही त्या वेळी चर्चा झाली. इथूनच कोहली-रोहित वादाच्या चर्चानी जोर धरला.
आता कोहली कसोटी संघाचा कर्णधार असतानाच रोहितची एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्याने दोघांच्या मैदानातील वावरावर चाहत्यांचे बारीक लक्ष असेल. या काळात प्रशिक्षक राहुल द्रविडची भूमिकाही महत्त्वाची असणार आहे. शिस्तबद्ध द्रविड हा तत्व आणि नियमांना धरून वागणारी व्यक्ती आहे. आरोप-प्रत्यारोप, वादविवादाची चर्चा मुळीच त्याच्या पचनी पडणार नाही. त्यामुळे द्रविडने प्रशिक्षकपदी दीर्घकाळ राहावे असे वाटत असल्यास कोहलीसह रोहित, गांगुली आणि निवड समितीने एकत्रित सामंजस्याने काम करणे गरजेचे आहे. अन्यथा भारतीय क्रिकेटच्या चढत्या आलेखावर याचा परिणाम होईल, हे निश्चित!
वादांची परंपरा
एकाच पिढीतील दोन आघाडीच्या खेळाडूंमधील वाद भारतीय क्रिकेटसाठी नवा नाही. सुनील गावस्कर आणि कपिल देव यांच्यापासून ते महेंद्रसिंह धोनी आणि युवराज सिंग यांच्यातील वाद, मतभेदांचीही चर्चा अनेकदा रंगली. १९८४ साली इंग्लंडविरुद्ध कोलकाता येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी कपिल देवला भारतीय संघाबाहेर ठेवण्यात आले. दिल्ली येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत चुकीचा फटका मारून बाद झाल्याने निवड समितीने हे पाऊल उचलल्याची चर्चा त्या वेळेस होती. त्या वेळी कर्णधार असलेला गावस्कर निवड समितीचा भाग होता. त्यामुळे कपिल यांनी त्यांना संघातून वगळण्याच्या निर्णयाला गावस्कर यांना जबाबदार धरण्यात आले.
आक्रमक वि. संयमी
कोहलीच्या तुलनेत संयमी रोहितला कोहलीच्या अनुपस्थितीत संधी मिळाली त्या त्या वेळेस कर्णधार म्हणून यश प्राप्त झाले. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने २०१८चा आशिया चषक पटकावला. त्यामुळे कोहली आणि रोहित यांच्यात सातत्याने तुलना होऊ लागली.