आपला सख्खा शेजारी असलेल्या कर्नाटकात फेरफटका मारताना दिसले ते कोसळणारे धबधबे, हिरवीगार वनराई, डोळ्यांचे पारणे फेडणारा समुद्रकिनारा.. स्वत:चा स्वत:शीच संवाद होण्यासाठी यापेक्षा आणखी काय हवे..?
कर्नाटक म्हणजे हिरवीगार जंगले, क्षितिजापर्यंत पसरलेली दाट हिरवीगार शेते, दुथडी भरून वाहणारी शरावती नदी, जागोजागी पसरलेली तळी, मागोड, सातोड गिरसप्पा (जोग) असे अनेक रोरावत दबदबा कोसळणारे धबधबे, कुमठा होनावरजवळील डोळ्यांचे पारणे फिडणारे पिंगट वाळू पसरलेले समुद्रकिनारे! माविनकुर्वे बॅकवॉटर्स अगदी केरळची आठवण करून देतात.
हा निसर्गानंद अनुभवयाला एकाच ठिकाणी मुक्काम असेल आणि तेथून भटकायची सोय असेल तर त्यासारखे सुख नाही. नाही तर प्रवासात विंचवाच्या पाठीवरचे घर नको वाटते. कर्नाटकातील शिरसी गावाजवळ अशी जागा मिळाली. दाट जंगलातील, नारळ-सुपारीने वेढलेल्या या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कोकण रेल्वेवरील हुबळी वा कुमठा दोन्ही जागांपासून ६० ते ८० किमी अंतर. बसची उत्तम सोय. शेवटचा २० किमी रस्ता घनदाट जंगलाचा. मोबाइल रेंज नाही. निसर्गात रममाण होण्यास सुवर्णसंधी.
हुबळीपर्यंतच्या रेल्वे प्रवासात प्रकर्षांने जाणवले ते डब्यात केली जाणारी स्वच्छता, सामान उतरवताना कोणताही मोबदला न घेता मदत करणारे कर्मचारी, तिकीट चेकर शहराची उत्तम माहिती देत होते. मेडिकल, इंजिनीयरिंग महाविद्यालयांचा अतिभव्य परिसर गाडीतून दिसत असतो. हुबळी स्टेशन तर एखाद्या विमानतळासारखे. शहरातील हिल स्टेशन रोड एका उंच टेकडीवर जातो. दोन-एक किमी. परिसरात पसरलेले उद्यान. झाडांची विविधता डोळ्यात भरणारी. उंच घुमटावरून दिसणारे पसरलेले शहर. त्यात त्याच वेळी वरून कोसळणारा पाऊस, रस्त्याच्या कडेने वाहणाऱ्या पाण्यातून चालणारी बदके. नखशिखान्त भिजण्याचा मस्त अनुभव. गावातील सिद्धारूढ स्वामींचा मठ स्वच्छ शुभ्र मार्बल व रंगीत दिव्यात उजळून निघाला होता. कन्नड भाषेतील आरती आणि टाळ यांचा स्वर कानाला गोड वाटत होता.
हुबळीहून मुक्कामाच्या ठिकाणचा प्रवास घनदाट जंगलाचा. २७०० फूट उंचीवर केव्हा पोहोचतो ते कळतच नाही. मुक्कामाच्या ठिकाणाने पहिल्या भेटीतच मन खूश झाले.
१६ किमी अंतरावरील धर्म जलाशय म्हणजे शांतपणे अस्ताव्यस्त पसरलेले सरोवर. एका बाजूने एक-दीड किमी लांब उंच बंधारा, त्यावरून चालण्यास बांधलेला प्रशस्त रस्ता. जलाशयाच्या बाजूने पसरलेल्या हिरव्यागार डोंगररांगा. आकाशात पसरलेले पांढरे-काळे ढगांचे पुंजके. संध्याछायेत न्हाऊन निघालेले संथ पाणी. क्षितिजावरील काळ्या ढगांना हुलकावणी देत लालसर सोनेरी गोळा अस्ताला जात होता. दूरवर पांढऱ्या पक्ष्यांची माला जाताना दिसत होती. सोनेरी लाल छटेचा खेळ संपत आला होता, काळोख्या शांततेत जलाशय बुडून गेला होता.
धबधब्यांच्या सान्निध्यात
कुमठा, होनावर समुद्रकिनाऱ्यावरील टुमदार गाव. शिरसीपासून ११० किमी. आपण थेट २९०० फूट उंचीवरून समुद्रसपाटीवर येतो. ३० किमी लांब पसरणीचा घाट उतरताना किनारे, नदीचे पात्र आपल्या स्वागतास असते. गारवा पळतो. रणरणते ऊन त्यामुळे छत्रीचा उपयोग पावसापेक्षा उन्हात सावली मिळविण्याकरिता. अप्सरकोंडा डोंगरमाथ्यावरून शांत पसरलेला अरबी समुद्र पाहताच तळकोकणात प्रवेश झाल्यासारखे वाटते. निर्जन किल्ला, तसा ओसाडच. शरावती नदी जेथे समुद्राला मिळते त्याच्या काठावर विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय यांनी व्यापारासाठी बांधलेला हा किल्ला. तळाला ७० फूट खोल नदीच्या पाण्यातून मचवे या जागी मसाल्याचे पदार्थ उतरवीत व परदेशातून आलेला दारूगोळा, बंदुका घेऊन जात. याचा उपयोग फक्त व्यापारासाठी झाला होता. या सर्व जागांचे आता केवळ अवशेष आहेत. सर्व बाजूंनी भक्कम बुरुज, वर पसरलेले ओसाड पठार, फिरण्यास भरपूर जागा.
होनावरजवळील माविनकुर्वे बेटे तेथील शरावती नदीच्या मुखाशी तयार झालेली. बॅकवॉटर्समधील मोटर बोटीचा प्रवास म्हणजे एक विलक्षण अनुभव. दोन्ही काठाला नारळा-केळीची झाडे, शांत पसरलेले पाणी, पात्राच्या दोन टोकांना रेल्वे व मोटारींकरिता बांधलेले जवळपास चाळीसएक अजस्र खांबांचे पूल, भर दोनच्या तळपत्या उन्हात डोक्यावर छत्री, टोप्यांसह प्रवासाचा मजेदार अनुभव.
कर्नाटकची खासियत म्हणजे धबधबे! जोग वा गिरसप्पाचे चार विभाग. राजा, राणी रोअर व रॉकेट. खाली धबधबा कोसळताना त्यांच्यात चुरस लागलेली. दुधाळ पाणी खाली पडताच असे काही मातकट बनते व हे सर्व बघण्यास उत्तम रेलिंग केलेल्या अनेक जागा. पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. तळापर्यंत जाण्यास हजार एक पायऱ्या पण आजकाल तो रस्ता बंद आहे.
मागोड धबधबा गर्जत कोसळत होता. आकाश काळ्या ढगांनी व्यापलेले. एक मिनीटभर दर्शन मिळाले आणि क्षणात धुवांधार सरी कोसळू लागल्या. पावसाच्या तडाख्यात क्षणार्धात धबधबा दिसेनासा झाला. संपूर्ण दरी ढगांनी व्यापून टाकली.
भारतातील भव्य तिबेटियन मॉनेस्ट्री मुनगोड, शिरसीपासून ३० किमीवर असून ३०० ते ४०० एकर परिसरात १० ते १५ हजार तिबेटियन लोकांची वस्ती आहे. आतील मूर्ती, त्यांची सजावट, भव्य हॉल, समोरील बाग एक वेगळेच विश्व उभे केलेले आहे.
एक अविस्मरणीय संध्याकाळ
मुक्कामाच्या ठिकाणी हिरव्यागार वनश्रीतील निस्सीम शांतता अनुभविण्याची अनोखी संधी मिळाली होती. सर्व सहप्रवासी गावात मसाल्यांच्या पदार्थाच्या खरेदीसाठी गेलेले. मी एकटाच परिसरातील पाऊलवाटेवर मनमुराद भटकत होतो. सकाळी धुक्यात लपलेल्या वनश्रीचे रूप आता वेगळेच दिसत होते. निळ्याभोर आकाशात सोनेरी, तांबूस, भगव्या रंगाची उधळण चालू होती. एका कोपऱ्यात छोटे पांढरे ढग सूर्याच्या तांबूस गोळ्याला कुशीत घेत होते. तमाम वनश्री स्तब्धपणे हा सोहळा पाहण्यात मग्न झाली होती. ना पानांची सळसळ, ना डोलणे, एखादे शुष्क पानसुद्धा धरतीवर पडत नव्हते. या नि:शब्द शांततेचा भंग न करण्याचा विडाच त्यांनी उचलला होता. एकाएकी पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला आणि शांततेचा भंग झाला. एखादा कर्कश शिटीचा आवाज करीत होता. त्याला उत्तर दुसरा दीर्घ शिटीच्या आवाजाने देत होता. एखादा जोराने चीत्कार करीत पंखांची फडफड करीत झाडावर जागा शोधत होता. मधेच काही उंच स्वरात स्वागत गीत गात होते. आवाजांची मैफल रंगत चालली होती व त्यात नाना सूर मिसळत होते. हवेतील शुद्धपणा जाणवणारा होता. अशा हवेची सवयच नसते आपल्याला. अधाशासारखी छाती भरभरून घेत होतो तरी तृप्ती होतच नव्हती. दोन दिवसापूर्वीची मुंबईची गोंगाटातील संध्याकाळ आठवू लागली पण क्षणात तिला मनाच्या कप्प्यात बंद करून टाकले. नकोच ती आठवण. निसर्गातील अखंड वाहणारे चैतन्य रोमारोमांत भिनत होते. झाडाझाडामागून माझे मन पळत होते. एकटेपणा विसरलो होतो. मी माझा राहिलोच नव्हतो. मी मन व निसर्ग एकमेकांत मिसळून गेलो होतो. मनात कसलेच विचार नव्हते. त्या आनंदाची गोडी अवीट होती.. हळूहळू किलबिलाट थांबला होता. निस्सीम शांततेने माझ्याभोवती जणू फेर धरला होता. वीज गायब झाल्याने काळोखाचे साम्राज्य पसरले होते. एका बाकावर ध्यानात बसलो होतो. अशा शांततेने मनाला दिलेला आनंद वर्णनातीत होता. निसर्गाने मला वेगळ्याच विश्वात नेले होते. डोळे उघडले, सर्व बाजूचे विजेचे दिवे चमकत होते. रातकिडय़ांनी सूर लावण्यास सुरुवात केली होती. एका अभूतपूर्व अशा संध्याकाळची सांगता होत होती.
आठ दिवसांच्या वास्तव्यात जेवणखाण्याची व्यवस्था तर लाजवाबच. नीर फणस, नवलकोल, कारले यांच्या अशा काही चविष्ट भाज्या तर पुरणपोळीपासून शिरा, साखरभात व पापलेट, सुरमई, कोंबडी रस्सा, सर्व आग्रहाने वाढणे, फलाहारात पिवळी वेलची केळी, चिकू, कलिंगड, पपई ते थेट आइसक्रीमपर्यंत या साऱ्यांचा समाचार घेऊन अगदी तृप्त झालो. शेवटच्या दिवशी शांत संध्याकाळी संगीत मैफल जमवून आणलेली. कर्नाटकी भजने व त्यातही भीमसेन जोशींची काही मराठी भजने अशी दोन तास मंत्रमुग्ध करणारी बैठक रंगली. गाणारा कसलेला मुरब्बी कलाकार. सर्वानीच दाद दिली. असा हा हिरव्यागार कर्नाटकच्या शोधयात्रेचा एक अविस्मरणीयच अनुभव!
उत्सव रॉक गार्डन
दगड, माती, सिमेंटचे खांब, लोखंडी सळ्या, विविध रंग, उत्तम कलाकारांचे कसबी हात यामधून निर्माण झालेली, डोळे दिपवून टाकणारी अतिभव्य कलाकृती निसर्गाच्या सान्निध्यात पाहण्याची जागा म्हणजे उत्सव रॉक गार्डन. कल्पनाच इतकी अद्भुत. अक्षरश: मति कुंठित करणारी. चाळीस एकर परिसरात पसरलेले शिल्प, मानवी कला, संस्कृती व लोकशिक्षण यांचा अनोखा मिलाफ एक छताखाली पाहण्याची ही जागा असून जागतिक पातळीवर याला आठ पारितोषिके मिळाली आहेत. जागतिक कीर्तीचे शिल्पकार प्रोफेसर सोलाबाकनवार व त्यांचे सहकारी यांनी हे गार्डन उभारलेले असून अशा तऱ्हेची गार्डन्स इतर राज्यांत उभारली जात आहेत. उच्च दर्जाच्या कलाकृतीचे हे द्योतक म्हणावे लागेल. ही जागा पुणे-बंगलोर हायवे रस्त्याला लागून गोटागोडी गावाजवळ हवेरी कर्नाटक विभागात शिरसीपासून ८० किमी अंतरावर आहे.
दर्शनी भिंत लाल दगडाची, जणू एखाद्या किल्ल्याच्या भिंतीसारखी. आत शिरण्याचा दरवाजा रंगीत नक्षीकाम केलेल्या उत्तम लाकडाचा. आत शिरेपर्यंत आतल्या भव्यतेची कल्पनाच येत नाही. मध्यात वर्तुळाकार पाण्याचे कृत्रिम तळे, त्याच्या मध्यभागी कर्नाटकाचा प्रसिद्ध नट डॉ. राजकुमार यांचा पावा वाजवत एका पायावर उभा असलेला, त्यांच्याच एका गाजलेल्या पौराणिक सिनेमातील भूमिकेचा अतिशय हुबेहूब पुतळा, बाजूंनी अनेक सिनेमांतील त्यांनी साकारलेल्या भूमिकांचे सर्व पुतळे पाहून आपली मति गुंगच होते. त्यांच्या प्रत्येक पुतळ्यावरील विविध भाव पाहून ते कसे निर्माण केले असतील याचे कौतुक वाटते. याच नटाला प्रसिद्ध डाकू वीरप्पन याने ओलीस ठेवले होते. पुढील दालनात अनेक संत, त्यांमध्ये तुकाराम पाहून आनंद झाला. एका दालनात विविध कलाकुसरींनी रंगविलेले खांबच खांब. बसण्यास बांधलेले चौथरे, रंगांचा वापर इतका वेगवेगळा. नजर फिरवावी तर वेगळे रंग दिसत राहतात. काही भिंतीवरील रंगकाम एखाद्या काचेवर केल्यासारखे वाटते.
पुढे मोकळी जागा. मध्यातून चालण्याचा रस्ता आणि दोन्ही बाजूंनी ४० ते ५० दालने, ज्यांमध्ये कर्नाटकातील खेडय़ातील संस्कृती उभारलेली असून एखाद्या मयसभेतच गेल्यासारखे वाटते. ज्योतिष सांगणारा फेटेवाला कुडमुडय़ा पंडित, लक्ष देऊन ऐकून घेणारी गावातील बाई, तिच्या मांडीवरचे बसलेले हसरे मूल, सोनार, धान्याचे दुकान, तराजूत वजन करणारा वाणी, तराजूचा एका बाजूला कललेला मधला काटा, चांभार कुंभार, एखाद्या खेडय़ातील रस्त्यावरून चालत आहोत असे वाटते. जात्याजवळ बसलेल्या बायका, हातात मुसळ घेतलेल्या बायका. सर्व बायका नऊवारी साडीत, डोक्यावर पदर, गळ्यात दागिने, साडीच्या नेसण्यातून स्पष्ट दिसणाऱ्या चुण्या या सर्व गोष्टी सिमेंटच्या रंगविलेल्या मूर्तीवर आणण्याचे कौशल्य अचंबित करणारे आहे.
एक मजली घरे, गॅलरीच्या लोखंडी वाटणाऱ्या कठडय़ाला टेकून उभी असलेली परकर-पोलक्यातली मुलगी, सरपंचाचे घर, झोपाळ्यावर झोका घेणारा मुलगा, त्याची भिंतीवर पडलेली छाया, माजघरात पसरलेली रंगीत चौकटीची जाड फाटकी सतरंजी, असे अनेक बारकावे टिपलेले आहेत.
खेडय़ाची पंचममृथां म्हणजे ज्या गोष्टींनी खेडय़ातील लोकांची भरभराट होते, त्या म्हणजे म्हशी, गाई, मेंढय़ा, बकरे आणि कोंबडय़ा यांच्या प्रतिमादेखील येथे आहेत. या प्राण्यांच्या हालचाली, त्यांची शरीरावरील बारीकसारीक वैशिष्टय़े, चेहऱ्यावरील हावभाव हे सार कमालीच्या कौशल्याने शिल्पात उतरले आहे. त्यामुळेच जणू काही कळपातून जाणाऱ्या गाई-म्हशी खरोखरच आपल्या समोरून चालल्या आहेत की काय असे वाटते. हे सारे सिमेंटमध्ये साकारले आहे यावर क्षणभर विश्वासच बसत नाही.
एका जागी रंगीत लोलकांचा शिशमहाल, लागून लग्नाचा हॉल, स्टेजवर नवरा नवरी, गळ्यात फुलाचे भरगच्च हार, बरोबर उभे असलेले नातेवाईक, कोपऱ्यात फोटोग्राफर, केळीच्या पानावरील पंगत, पुरुष. बायका, मुले, मुली त्यांच्या चेहऱ्यावरील ते उत्साही हसरे हावभाव, अनेविध पदार्थानी भरलेलं पान, सारा लग्न सोहळाच उभा राहिला होता.
तमाम जंगली श्वापदे, जंगलाचे वातावरण, हे सर्व पार करत आपण एका तळ्याच्या काठाशी येतो. समोर एक शेताकडे जाणारा रस्ता, त्यावरून जाणाऱ्या बैलगाडय़ा, गाई-म्हशींच्या झुंडी, नांगरणी करणारा शेतकरी, तऱ्हतऱ्हेचे पक्षी, त्या कळपात जिवंत शहामृग, कोंबडय़ा फिरत असतात. दोन तास आपण वेगळ्याच विश्वात जातो. अजून अनेक नवीन शिल्पांचे काम सुरू आहे.
डॉ. अविनाश वैद्य