‘‘आम्हाला घरामध्येही फुलझाडेच हवीत’’ असे सांगणारे अनेक भेटतात. फुलझाडे सर्वानाच आवडत असली तरी घरात, सावलीत ठेवण्याजोगी फुलझाडे त्या मानाने कमीच असतात. परंतु फुलांएवढीच मनमोहक, रंगीत पानांची छोटेखानी वनस्पती म्हणजे बिगोनिया रेक्स. या वनस्पतीला फुले असतात, परंतु ती काही फारशी सुरेख नसतात. बऱ्याच वेळा ती पानांखाली दडलेली राहतात. या वनस्पतीची मुळे तंतूमय असतात; तसेच ती फार खोलवर न जाता मातीच्या वरच्या थरातच वाढत असतात. म्हणून यांना उथळ व पसरट कुंडय़ाच जास्त उपयुक्त ठरतात. हँगिंग बास्केटमधूनही शोभून दिसतात. रोपे जसजशी वाढत जातात तसतशी ती पसरत जाऊन आपल्या पसरट, मोठाल्या, शोभिवंत पानांनी सर्वच कुंडी व्यापून टाकतात. जणू काही पानांचा गालिचाच पसरला आहे असे वाटते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या वनस्पतीचे सर्वच भाग अतिमृदू असतात; त्यामुळे हाताळताना जराही धसमुसळेपणा झाला तर पाने फाटू शकतात. बिगोनिया रेक्सला दमट हवामान खूपच मानवते. त्यामुळे वातानुकूलित खोलीत ती मुळीच टिकू शकत नाही. कोरडय़ा वातावरणात पानांच्या कडा सुकून जातात. तसेच पंख्याखाली कुंडी ठेवल्यास तेही या वनस्पतीला मानवत नाही. इतर अनेक झाडांच्या कुंडय़ांच्या घोळक्यात ठेवल्यास ते फायदेशीर ठरू शकते. कारण कुंडय़ांतील ओल्या मातीतून आणि पानांतूनही बाष्प बाहेर पडत असते. हवा स्तब्ध असल्यास ते बाष्प सर्वच कुंडय़ांसभोवार टिकून राहून, एकप्रकारे कृत्रिम दमट वातावरण बनते. आपण ज्यांना इनडोअर प्लांट्स म्हणतो त्या बहुतेक सर्वच झाडांना दमट वातावरणच मानवते. अशी झाडे एकटीदुकटी ठेवायची असल्यास त्यांच्या कुंडय़ा पसरट थाळीत पाणी भरून त्यात ठेवल्यासही त्यांना चालू शकते.
बिगोनिया रेक्सला मातीचे मिश्रण भुसभुशीतच असावे; कारण चिकण, कडक मातीत हिची तंतूमुळे चांगल्या प्रकारे वाढू शकत नाहीत. लागवडीसाठी बागकामाची माती आणि शेणखत किंवा कंपोस्ट मातीएवढेच घ्यावे. हल्ली नारळाच्या सालपटांपासून काढलेला भुसा ‘कोकोपीट’ नावाने मिळतो; तोसुद्धा काही प्रमाणात मिसळण्यास हरकत नाही. परंतु मातीत कोकोपीट मिसळल्यास शेणखत/ कंपोस्टची मात्रा मात्र त्या प्रमाणात कमी करावी.
दमट वातावरण करणे म्हणजे कुंडीत जास्त पाणी टाकणे नव्हे. बिगोनिया रेक्सला कमी पाण्याने जितके नुकसान होते तितकेच जास्त पाण्याने होऊ शकते. म्हणून जोपर्यंत मातीत ओलावा दिसतो तोपर्यंत पाणी घालू नये. तसेच माती पूर्ण कोरडीही होऊ देऊ नये.
बिगोनिया रेक्सची खोडे आखूड व जाडसर असतात. अभिवृद्धी खोडाचे तुकडे लावून करू शकत असलो तरीही तसे केल्यास मूळ झाडाची शोभा नष्ट होते; परंतु पानांपासूनही याची अभिवृद्धी सहज करता येते. अभिवृद्धीसाठी अगदी कोवळे किंवा जून पान घेऊ नये. पानाचा देठ साधारण एक इंच लांब ठेवावा. तीन भाग वाळू आणि प्रत्येक एक भाग माती व कोकोपीट मिसळून ती पसरट, उथळ कुंडीत भरावी. तयार मिश्रणात फक्त पानांचे देठ पुरावेत. पाने शक्यतो मातीस समांतर ठेवावीत. साधारण एक महिन्यात प्रत्येक पानापासून ३ ते ४ रोपे उगवतात. रोपांना सधारण चार ते पाच पाने फुटली की त्यांचे निरनिराळ्या कुंडय़ांत पुनरेपण करावे.
लेखन, छायाचित्रण : नंदन कलबाग
(समाप्त)
नंदन कलबाग

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Begonia rex