मेष- ‘हौसेला मोल नसते’ हे तुमच्याकडे बघून आता प्रकर्षांने जाणवेल. सभोवतालची परिस्थिती आणि ग्रहांची साथ म्हणावी तशी नसली तरी चेहरा पाडून न बसता तुम्ही आलेला क्षण आनंदाने आणि उत्साहाने साजरा कराल. व्यापारउद्योगामध्ये जरी काम भरपूर असले तरी ते पूर्ण करण्याकरिता कामगारांना खूश ठेवावे लागेल. नोकरीमध्ये वेळ कमी कामे जास्त असा प्रकार असल्यामुळे घडय़ाळाच्या काटय़ानुसार तुम्हाला काम करणे भाग पडेल. घरामध्ये वातावरण आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न कराल.
वृषभ- एकीकडे देवधर्म करण्याची तुमची भावना तुम्हाला संवेदनशील बनवेल, तर दुसरीकडे मौजमजा करण्याचा मूड असेल. व्यापारउद्योगात तुमच्या पद्धतीने काम करा. त्याचा उपयोग होईल. आपुलकीच्या व्यक्ती तुम्हाला मदतीचे आश्वासन देतील, पण त्यावर अवलंबून राहू नका. नोकरीमध्ये नेहमीपेक्षा वेगळे काम असेल. बदली हवी असल्यास प्रयत्न करा. घरामध्ये तुमच्या आनंदी आणि रसिक स्वभावामुळे माहोल उत्साहवर्धक राहील. घराकरिता, स्वत:करिता एखादी प्रतिष्ठित वस्तू खरेदी कराल.
मिथुन- तुमचे घर, नोकरी व्यवसाय या दोन्हीकडे सारखेच लक्ष द्यावे लागल्यामुळे तुमची धावपळ उडेल, पण घरामधल्या व्यक्तींशी गोडीगुलाबीने वागलात तर त्यांच्याकडून तुम्हाला चांगले सहकार्य मिळेल. व्यापारउद्योगामध्ये मध्यस्थ आणि हाताखालच्या व्यक्तींवर अवलंबून राहणे भाग पडेल. त्यांच्यावर सतत देखरेख ठेवा. पशाची आवक सुधारेल. नोकरीमध्ये तुमच्या उत्साही स्वभावाचा तुमच्यापेक्षा संस्थेलाच जास्त फायदा मिळेल. सहकारी त्यांचा मतलब तुमच्याकडून साध्य करून घेतील.
कर्क- मौजमजा मस्ती असा एकंदरीत तुमचा छान मुड असेल. पशाची आकडेमोड न करता तुम्ही मनमानी करण्याचा निर्णय घ्याल. व्यापारउद्योगात एखादा महत्त्वाचा निर्णय झाल्यामुळे पशाची कमतरता राहणार नाही. गिऱ्हाईकांना आकर्षति करण्यासाठी विशेष योजना राबवाल. जोडधंद्यातून कमाई होईल. नोकरीमध्ये तुमच्या करियरसंबंधी चांगला संकेत मिळाल्याने तुमचा उत्साह द्विगुणित होईल. घरामध्ये तुमची कुटुंबवत्सलता आणि रसिकता यांचा सुरेख समन्वय होईल. प्रियजनांमुळे वेळ छान जाईल.
सिंह- जे तुम्हाला हवे आहे ते मिळविल्याशिवाय तुम्ही स्वस्थ आणि शांत बसू शकणार नाही. व्यापारउद्योगात भरपूर काम असेल. नवीन व्यक्तींशी करार करताना मात्र एकदम विश्वास टाकू नका. मिळणाऱ्या पशांचा ठरवलेल्या कामाकरिताच वापर करा. नोकरीमध्ये तुम्ही मनाप्रमाणे काम करू शकाल, कारण वरिष्ठ तुम्हाला आवश्यक ते स्वातंत्र्य देऊ शकतील. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामधल्या छोटय़ा मोठय़ा कार्यक्रमाच्या निमित्ताने नातेवाईक व आप्तेष्ट यांची हजेरी लागेल. वातावरण जल्लोषाचे असेल.
कन्या- तुमची ग्रहस्थिती थोडीफार सुधारल्यामुळे उत्साह वाढायला सुरुवात होईल. व्यवसायउद्योगात तुम्ही करत असलेल्या चांगल्या कामाची पशाच्या आणि इतर स्वरूपामध्ये पावती मिळाल्यामुळे तुम्हाला बरे वाटेल. नोकरीमध्ये एखादी सवलत मिळाल्यामुळे तुमची निराशा कमी होईल. महत्त्वाची कामे सहकाऱ्यांवर न सोपवता स्वत:च पूर्ण करा. बेकार व्यक्तींना तात्पुरते काम मिळेल. घरामध्ये जरी खर्च वाढले तरी तुमचा नाईलाज होईल, परंतु इतरांच्या आनंदामध्ये तुम्ही स्वत: आनंद मानाल.
तुळ- कोणतेही काम करताना ते काम चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे आणि त्याचे इतरांनी कौतुक केले पाहिजे, असा तुमचा आग्रह असेल. व्यापारी वर्गाला भरपूर काम आणि पसे मिळतील, परंतु ते त्यांना कमी वाटतील. कारण त्यांची गरज मोठी असेल. नोकरीमध्ये खास सवलतींकरिता तुमची निवड होईल. त्यामुळे तुम्ही भाव खाल. घरामध्ये सजावटीकरिता खरेदीचे बेत ठरवाल. आपुलकीच्या व्यक्तींना तुम्ही खास कार्यक्रमांकरिता आमंत्रण कराल. त्यांच्या समवेत हसत खेळत वेळ घालवाल. वृद्धांना लांबच्या व्यक्तींना भेटता येईल.
वृश्चिक- जीवनाचा आनंद घेण्याचा तुमचा इरादा असेल. त्यामध्ये कोणीही फेरफार केलेले आवडणार नाही. व्यवसायउद्योगात एखादा नवीन संकल्प कृतीत उतरावावासा वाटेल. त्यावर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी त्याच्या परिणामांचा विचार करून ठेवा. एखाद्या मोठय़ा पदाकरिता तुमची निवड झाल्यामुळे बाजारपेठेतले तुमचे वजन वाढेल. प्रसिद्धी माध्यमांचा चांगला उपयोग करून घ्याल. नोकरीमध्ये केलेल्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक ऐकायला मिळेल. त्यामुळे मूठभर मांस चढेल. घरामध्ये एखादा आनंददायी सोहळा ठरेल.
धनू- ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या ठिकाणी तुमच्या मार्मिक वागण्या-बोलण्यामुळे इतरांचे लक्ष तुम्ही आकर्षति कराल. व्यापारउद्योगात मनासारखे आणि भरपूर काम असल्यामुळे अविश्रांत मेहनत करण्याची तुमची तयारी असेल. व्यावसायिक लोकांना चांगले अशील मिळतील. नोकरीच्या ठिकाणी कठीण काम केवळ निश्चयाच्या जोरावर तुम्ही मार्गी लावू शकाल. घरामध्ये पाहुण्यांची रेलचेल असेल. सगळ्यांची तुम्ही बडदास्त ठेवाल. मेजवानीचा आस्वाद घ्याल. वाहन अथवा वास्तू खरेदीचे बेत ठरतील.
मकर- ज्या गोष्टी तुम्हाला मनापासून आवडतात त्यामध्ये तुम्ही स्वत:ला झोकून द्याल. या आठवडय़ात स्वत:ची मनमानी करण्याचा मूड असेल. व्यापारउद्योगात अपेक्षेपेक्षा जास्त पसे मिळतील, परंतु बरेचसे व्यवहार उधारीचे असतील. नोकरीमध्ये कामाचा ताण जरी वाढला तरी एखाद्या सहकाऱ्याची मदत मिळाल्याने तुम्हाला बरे वाटेल. नवीन काम मिळण्याची शक्यता आहे. घरामध्ये सगळ्यांचे हट्ट आवडीने पुरवाल. एखादी खरेदी करताना नाकापेक्षा मोती जड असा प्रकार होऊ देऊ नका.
कुंभ- या आठवडय़ात तुमच्या स्वभावाविरुद्ध जाऊन एखादे काम अतिउत्साहाच्या भरात तातडीने हाताळाल. मात्र चूक होऊ देऊ नका. व्यापारउद्योगात कोणत्या कामाला किती महत्त्व आणि वेळ द्यायचा याचे नीट नियोजन करा. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या अपेक्षा वाजवीपेक्षा जास्त असल्याने चांगले काम करूनही त्यांचे समाधान होणे कठीण आहे. घरामध्ये खोटी प्रतिष्ठा बाजूला ठेवा अन्यथा इतर सदस्य तुमच्या मोठय़ा मनाचा, उदारपणाचा गरफायदा घेतील. स्वत:च्या प्रकृतीचा अंदाज घेतल्याशिवाय मोठे बेत आखू नका.
मीन- तुमच्या आनंदी आणि उत्साही स्वभावाला आता धुमारे फुटतील. काम कोणतेही असू दे त्यामध्ये तुम्ही प्रचंड उत्साहाने सहभागी व्हाल. व्यापारउद्योगात तुम्ही केलेले एखादे चांगले काम नवीन ऑर्डर मिळवून द्यायला तुम्हाला उपयोगी पडेल. त्यावर ताबडतोब कृती करा. नोकरीमध्ये नेहमीच्या कामाव्यतिरिक्त एखादे फिरतीचे कामही तुमच्या वाटय़ाला येईल. त्यातून नवीन ओळखी करण्याचे तुमचे प्रयत्न असतील. बुजूर्ग व्यक्तींना दीर्घ काळानंतर आप्त स्वकीयांना भेटता येईल.