मेष एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला करायची असते, त्या वेळेला त्याच्या परिणामांचा फारसा विचार न करता तुम्ही स्वत:ला  त्यामध्ये झोकून घेता. या आठवडय़ात तुमच्या या स्वभावाचे दर्शन होईल. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांना आकर्षति करण्याकरिता एखादी खास योजना जाहीर कराल. नोकरीमध्ये वरिष्ठांची तुमच्यावरती भिस्त असेल. त्यामुळे ते तुम्हाला एकामागून एक कामे सांगतील. घरामध्ये आपुलकीच्या व्यक्तीची हजेरी लागेल.

वृषभ एकंदरीत कामाचा व्याप जरी खूप असला तरी या आठवडय़ामध्ये तुम्हाला तुमचे लक्ष घरगुती प्रश्नांवर केंद्रित करावे लागेल. व्यापार-उद्योगात कामाच्या बाबतीत स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, याची तुम्हाला प्रकर्षांने आठवण येईल. तरीही तुम्ही जिद्दीने हातात घेतलेली प्रत्येक गोष्ट पार पाडाल. जोडधंद्यामध्ये नवीन कामे घाईने स्वीकारू नका. नोकरदार व्यक्तींना नेहमीच्या कामापेक्षा एखादे वेगळे काम करावे लागेल. घरामधल्या प्रत्येक व्यक्तीच्या अपेक्षा पूर्ण करता करता तुमची तारांबळ उडेल.

मिथुन काम कोणतेही असो ते पूर्ण करण्याची जिद्द तुमच्यात निर्माण होईल.  व्यवसाय-उद्योगात देशातील किंवा परदेशातील व्यवहारांना गती यायला सुरुवात होईल. नवीन कामासंबंधी बोलणी सुरू होतील, पण काही कारणाने ती लांबण्याची शक्यता आहे. जोडधंद्यातून फायदा मिळेल. नोकरीमध्ये एखाद्या चांगल्या प्रोजेक्टकरता तुमची निवड झाल्यामुळे तुम्हाला बरे वाटेल. जबाबदारीचा नीट अंदाज घ्या. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये एखादा छोटासा मेळावा ठरेल.

कर्क तुमची रास रूढीप्रिय आहे. ज्या परंपरा चालू असतात त्याप्रमाणे सर्व गोष्टी घडत आल्या पाहिजेत, असा तुमचा आग्रह असतो. त्यानुसार या आठवडय़ात तुम्ही तुमचे सर्व कार्यक्रम आखाल. व्यापारीवर्गाला चांगली कमाई करून देणारा आठवडा आहे. नोकरदार मंडळींना एखाद्या कामात शॉर्टकट मिळाल्याने सुटकेचा नि:श्वास टाकता येईल. पूर्वी वरिष्ठांनी आश्वासन दिले असेल तर ते पूर्ण केले जाईल. घरामध्ये सर्वाना उपयोगी पडेल, अशी एखादी मोठी खरेदी होण्याची शक्यता आहे.

सिंह ग्रहमान संमिश्र आहे. या आठवडय़ात एखादी स्वप्नमयी कल्पना तुमचे लक्ष आकर्षति करेल. ती पूर्ण करण्याकरिता बराच वेळ घालवाल. व्यापार-उद्योगात रात्रंदिवस काम करण्याची तयारी ठेवा. जोडधंदा असणाऱ्यांना हातात आलेल्या प्रत्येक संधीचा फायदा उठवावासा वाटेल. नोकरीमध्ये बदल होऊन तुमचे अधिकार आणि आमदानी वाढण्याची शक्यता आहे. घरामध्ये आनंदाचा माहोल असेल.

कन्या स्वत:च्या मर्यादा लक्षात घेऊन प्रत्येक गोष्ट ठरवा. कोणतेही काम करताना तुम्ही उत्तम नियोजन करता आणि त्याकरिता आवश्यक असलेल्या पशाची तरतूद करून ठेवता. व्यापार उद्योगात लक्ष्मी चंचल असते याचा प्रत्यय येईल. मिळणाऱ्या पशाची आधीच तरतूद झालेली असेल. रोखीचे व्यवहार कमी असल्यामुळे मनामध्ये एक प्रकारची चिंता राहील. नोकरीच्या ठिकाणी कामामुळे तुम्हाला क्षणाचीही उसंत लाभणार नाही. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये जोडीदाराच्या सल्ल्याचा प्रभाव जास्त असेल.

तूळ कोणतेही काम करताना आधुनिक पद्धतीचा अवलंब करायला तुम्हाला आवडतो. पण या आठवडय़ात तुमच्यामधली आधुनिकता आणि सनातनी वृत्ती या दोन्ही गोष्टी दिसून येतील. व्यवसाय-उद्योगामध्ये प्राप्तीचे प्रमाण वाढविण्या-साठी सध्या चालू असलेल्या कामाव्यतिरिक्त एखादे वेगळे काम हाती घ्यावेसे वाटेल. नोकरीमध्ये आवडता सहकारी बरोबर असल्यामुळे केलेल्या कामाचे कष्ट वाटणार नाहीत. घरामध्ये सगळ्यांना आवडेल अशी खरेदी होईल.

वृश्चिक नियोजनबद्ध प्रगती आणि योग्य वेळी केलेली कृती याचा सुरेख समन्वय तुमच्यात दिसून येईल. त्याचा फायदा तुम्हाला सर्व स्तरांवर मिळणार आहे. व्यापार उद्योगात लहान-मोठी कामे करण्यापेक्षा एक मोठा हात मारावा, असा तुमचा इरादा असेल. गिऱ्हाईकांच्या गरजेनुसार कामाच्या पद्धतीत फरक कराल. जोडधंद्यात चांगली कमाई होईल. नोकरीत संस्थेच्या आणि वरिष्ठांच्या धोरणांना तुम्ही योग्य मान द्याल. घरामध्ये तुम्ही तुमची दीर्घकाळची इच्छा पूर्ण कराल.

धनू महत्त्वाचे ग्रह तुम्हाला अनुकूल असल्यामुळे तुम्ही प्रचंड उत्साही असाल. तुमचे दिलखुलास व्यक्तिमत्त्व इतरांना दिसून येईल. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांना खूश ठेवून खूप काम कराल. नोकरीमध्ये ठरविलेले काम वेळेच्या आधी पूर्ण केल्यामुळे तुम्हाला एक प्रकारचे आंतरिक समाधान लाभेल. घरामध्ये तुमच्याविषयी इतरांना आदर वाटेल. कोणाशी मतभेद असतील तर ते मिटवायला आठवडा चांगला आहे.

मकर तुमचा मानसिक उत्साह प्रचंड असेल, पण तब्येतीचा विचार केल्याशिवाय कोणतेही बेत ठरवू नका. व्यापार-उद्योगात जितके जास्त काम तितके जास्त पसे असे समीकरण असेल. तुम्ही स्वत:च्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करून काम करीतच राहाल. कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी नेहमीच्याच कामामध्ये चूक होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांच्या आज्ञेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. घरामध्ये आधी ठरविलेले बेत काही कारणांमुळे बदलावे लागतील. मानापमानाची भावना बाजूला ठेवा.

कुंभ काही कामे अशी असतात की त्यातून फारशी कमाई होत नाही. पण एक प्रकारचा आंतरिक आनंद मिळेल. व्यापार-उद्योगात नवीन भागीदारी किंवा मत्री कराराचे प्रस्ताव पुढे येतील. व्यावसायिक व्यक्ती आणि कारखानदारांना नवीन शाखा उघडून काम वाढवावेसे वाटेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचा वेग अचाट, अफाट असेल. एखाद्या सामूहिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. घरामध्ये आवडत्या व्यक्तींची ये-जा राहील. सगळ्याचा मूड मौजमजा करण्याचा असेल.

मीन ग्रहमान थोडेसे कष्टदायक, पण आनंददायी आहे. मनातली इच्छा पूर्ण करण्याकरिता तुम्ही जिवाचे रान कराल. व्यापार-उद्योगात नवीन पद्धतीचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या व्यक्तींची साथ मिळेल.  नोकरीच्या ठिकाणी ज्यांनी पूर्वी तुम्हाला कमी लेखले होते त्यांच्या नाकावर टिच्चून तुम्ही चांगले काम कराल. घरामध्ये जी जबाबदारी तुम्ही हातात घ्याल ती पूर्ण करून दाखवाल. तुमच्यातील रसिकतेला वाव मिळेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader