01vijayमेष स्वप्नापेक्षा सत्याला महत्त्व असते, ही गोष्ट जरी खरी असली तरी कधी कधी प्रत्येकजण स्वप्नात दंग होऊन जातो. त्या वेळेला व्यवहार बाजूला पडतो. या आठवडय़ात एखाद्या कारणाने तुमची परिस्थिती अशीच असणार आहे. व्यापार-उद्योगात दगदग आणि धावपळीतूनही तुमचे लक्ष एखाद्या नवीन योजनेवर केंद्रित कराल. नोकरीमध्ये वरिष्ठांना खूश करण्याकरिता भलतीच जबाबदारी स्वीकारू नका. घरामध्ये तुमचा आग्रही स्वभाव प्रकर्षांने दिसून येईल. खर्च वगरे गोष्टींची पर्वा न करता तुमचे बेत तडीस न्यायचे तुम्ही ठरवाल.

वृषभ एकाच वेळेला तुमचे घर आणि नेहमीचे कार्यक्षेत्र या दोन्ही आघाडय़ांवर काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. व्यवसाय-उद्योगात बरेच काम करायचे असल्यामुळे तुम्हाला वेळेचे आणि हाताखालच्या माणसांचे नियोजन योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे. नोकरीमध्ये भरपूर काम करण्याकरिता सज्ज रहा. नेहमीपेक्षा थोडेसे वेगळे काम तुमच्यावर सोपवल्यामुळे तुम्हाला चांगला अनुभव मिळेल. घरामधल्या व्यक्तींसमवेत काही खर्चीक बेत ठरतील. नवीन वाहन किंवा जागा खरेदी करावीशी वाटेल.

मिथुन ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या ठिकाणी तुमच्या वागण्या-बोलण्यामुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. व्यापार-उद्योगामध्ये जाहिरात आणि जनसंपर्क या दोन्हीतून फायद्याचे प्रमाण वाढेल. मात्र गिऱ्हाइकांना खूश करण्याच्या नादात जादा सवलती देऊ नका. नोकरीमध्ये आपले महत्त्व वाढविण्याकरिता वरिष्ठांना एखादे आश्वासन द्याल, पण त्यामुळे तुमचा कामाचा ताण वाढणार नाही ना याचा विचार करा. घरामध्ये इतरांना बऱ्याच स्वप्नमयी कल्पना सुचवाल, पण त्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी सध्याच्या खर्चाचा आढावा घ्या.

कर्क चार पसे जेव्हा आपल्या खिशात खुळखुळत असतात, तेव्हा आपल्याला बरेच काही करावेसे वाटेल. या आठवडय़ाचे ग्रहमान तुमच्या इच्छाआकांक्षा वाढविणारे आहे. एखादी स्वप्नमयी कल्पना साकार करण्याकरिता तुम्ही अथक प्रयत्न कराल. व्यवसाय-उद्योगात जे काम होईल त्यातून चांगले पसे मिळतील. त्या व्यतिरिक्त कर्ज मंजूर झाल्यामुळे खेळत्या भांडवलात वाढ करता येईल. नोकरीमध्ये भत्त्याकरिता तुमची निवड होईल. तुम्ही भाव खाल. घरामध्ये खरेदीचे बेत आखले जातील. नवीन वाहन किंवा वस्तू खरेदी होईल.

सिंह या आठवडय़ात अशाच एखाद्या स्वप्नमयी कल्पनेने तुम्ही प्रेरित झालेले असाल. त्याचा पाठपुरावा करण्यात भूषण मानाल. व्यापार-उद्योगात एखादी नवीन शाखा उघडावी किंवा नवीन कार्यपद्धतीची मुहूर्तमेढ रोवावी असा तुमचा बेत असेल. त्यादृष्टीने आवश्यक तयारी कराल.  जोडधंद्यातून फायदा मिळवाल. अर्धवट राहिलेली कामे आटोक्यात आणाल. घरामध्ये तुमच्या औदार्याचा आणि मोठय़ा मनाचा सर्वजण फायदा उठवतील. प्रतिष्ठा वाढविणाऱ्या वस्तूची खरेदी करण्याचे नियोजन होईल.

कन्या प्रत्येक कामामध्ये यश मिळविण्या-करिता तुम्ही तुमच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करायला तयार व्हाल. व्यापार-उद्योगात खूप काम करून खूप पसे मिळवावे, अशी तुमची तमन्ना असेल. त्यासाठी आवश्यक त्या खेळत्या भांडवलासाठी थोडय़ा अवधीकरिता कर्ज काढावे लागेल. नोकरदार व्यक्तींना मात्र ठरविलेली कामे ठरविलेल्या वेळेमध्ये पूर्ण करण्याकरिता वरिष्ठ आग्रह धरतील. घरामध्ये प्रतिष्ठा वाढवणारी एखादी खर्चीक वस्तू विकत घेण्याचे बेत ठरतील. ही गोष्ट तुम्हाला आवडणार नाही, पण तुमचा नाइलाज होईल.

तुळ ज्या कामात विनाकारण काही ना काही कारणाने मरगळ आली होती त्यामध्ये आवश्यक निर्णय घेऊन गती देण्याचा प्रयत्न कराल. व्यवसाय-उद्योगात एखादा नवीन कार्यक्रम हातात घ्यायचे ठरविले असेल, तर आवश्यक पूर्वतयारी करून ठेवाल. हितचिंतक आणि ओळखीच्या व्यक्तींकडून तुम्हाला चांगली साथ मिळेल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुम्हाला चांगले आमिष दाखवून तुमच्याकडून नेहमीपेक्षा जास्त काम करून घेतील. घरामध्ये सगळ्यांना खूश ठेवण्यासाठी एखादी छान घोषणा कराल.

वृश्चिक तुमचे बेत जरी खर्चीक असले तरी त्यामध्ये तुम्ही माघार घेणार नाही. व्यवसाय-उद्योगात काळाची गरज आणि बाजारातील स्पर्धा या दोन्हीचा विचार करून तुम्ही एखादा संकल्प मार्गी लावू शकाल. प्रतिष्ठित व्यक्तीची मदत होईल. नोकरीमध्ये एखादे फायदा मिळवून देणारे वेगळे काम तुमच्या वाटय़ाला आल्यामुळे ते काम तुम्हाला करावे लागेल. घरामध्ये प्रत्येक कामात तुमचा पुढाकार असेल. एखाद्या मोठय़ा खरेदीचे  नियोजन तुम्ही मनाशी कराल. त्यामुळे तुमच्या खिशावर जास्त ताण येणार नाही याची दक्षता घ्या.

धनू एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला पाहिजे असते तेव्हा ती मिळविण्याकरिता तुम्ही अथक प्रयत्न करता अशा वेळेला पसे वगरे गोष्टींचा तुम्ही विचार करत नाही. व्यापार-उद्योगात हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे न लागता, जे काम तुमच्या वाटय़ाला आलेले आहे त्यातून चांगला फायदा होईल. नोकरीमध्ये तुमच्या पद्धतीनुसार काम करण्याची मुभा वरिष्ठांनी दिल्यामुळे उत्तम काम कराल. त्यातून एखादी सवलत मिळेल. घरामध्ये प्रत्येकाला खूश ठेवणे थोडेसे कठीण वाटेल. प्रतिष्ठा वाढविणाऱ्या खरेदीचे बेत ठरतील.

मकर स्वप्न या गोष्टीमध्ये तुम्ही सहसा रमून जात नाही. पण या आठवडय़ाचे ग्रहमान तुमची मन:स्थिती द्विधा करणारे आहे. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांची मागणी सतत वाढत असल्यामुळे तुम्हाला भरपूर काम करावेसे वाटेल. पण त्या नादात भांडवलाची कमतरता पडणार नाही याकडे लक्ष द्यायला विसरू नका. नोकरीमध्ये एखादी स्पर्धा किंवा आव्हान असेल तर ते स्वीकारायला तयार रहाल. मात्र दैनंदिनीकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. घरामध्ये छान कार्यक्रम ठरतील. त्यामध्ये तुम्हाला आपुलकीच्या व्यक्ती समजावून घेतील.

कुंभ या आठवडय़ात तुमचे वेगळे रागरंग सभोवतालच्या व्यक्तींना पाहायला मिळतील. इतर वेळी ‘तुम्ही आणि तुमचे काम’ याच गोष्टीत तुम्ही आनंद मानता. व्यापार-उद्योगात तुमच्या शिस्तबद्ध , काटेकोरपणे काम करण्याच्या पद्धतीला गिऱ्हाइकांकडून प्रतिसाद मिळेल. प्रसिद्धी माध्यमांचा उपयोग होईल. नोकरीमध्ये आपले आणि आपल्या कामाचे महत्त्व वाढविण्याकरिता वरिष्ठांच्या पुढे-पुढे कराल. घरामध्ये एखाद्या प्रश्नावर इतरांना उत्तर मिळत नसेल तर त्यामध्ये तुम्ही तोडगा शोधून काढाल.

मीन या आठवडय़ात मात्र जे तुम्हाला आवडते, किंवा वाटते तेच करण्याचा तुमचा हट्ट असेल. यामध्ये कोणी विरोध केलेला तुम्हाला चालणार नाही. व्यापार उद्योगात गिऱ्हाइकांना खूश करण्याकरिता एखादी नवीन योजना कार्यान्वित कराल. ही योजना खर्चीक असल्याने कदाचित तात्पुरते कर्ज काढावे लागेल. नोकरीमध्ये सहकाऱ्यांच्या वागण्या-बोलण्याने प्रभावित न होता तुम्ही तुमच्या पद्धतीनेच काम करत रहा. घरामध्ये तुमच्या पद्धतीने सर्व कार्यक्रम तुम्ही ठरवाल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader