01vijayमेष मनात आलेली इच्छा ताबडतोब पूर्ण झाली पाहिजे असा तुमचा जो आग्रह असतो, त्याला आता योग्य व्यक्ती आणि वातावरणाची साथ लाभेल. व्यापारीवर्गाला हातामध्ये चार पैसे खुळखुळल्याने बरे वाटेल. पूर्वीची काही कर्जे आटोक्याबाहेर गेली असतील तर ती नियंत्रणात आणता येतील. जाहिरात आणि जनसंपर्क याचा चांगला वापर करून उलाढाल आणि फायद्याचे प्रमाण वाढविता येईल. नोकरीमध्ये सहकारी आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे अवघड काम सोपे होईल. लांबच्या नातेवाईकांबरोबर कार्यक्रम ठरवाल.

वृषभ जे आपल्याजवळ आहे त्यामध्ये वाढ कशी होईल याचा ध्यास तुम्हाला कायम लागलेला असतो आणि त्या दृष्टीने या आठवडय़ामध्ये एखादी चांगली संधी निर्माण होईल. व्यापार-उद्योगात हातामध्ये पसे खुळखुळत राहिल्यामुळे तुम्ही खूश असाल. व्यावसायिक जागेचा विस्तार किंवा बाजारातील प्रतिष्ठित भागामध्ये एखादे शोरूम उघडणे यासारखे विचार तुमच्या मनात डोकावतील. नोकरीमध्ये कामात सुस्ती आल्यामुळे प्रत्यक्षात काम कमी, त्याचा पसारा जास्त असा प्रकार असेल.

मिथुन जे काम तुम्ही पूर्वी वाया गेले असे समजत होता, त्याच कामातून काही तरी चांगले निष्पन्न झाल्यामुळे तुम्हाला आश्चर्याचा एक सुखद धक्का बसेल. एखादी योजना किंवा स्वप्न सफल होईल. व्यापार-उद्योगात तुम्ही चांगले काम केल्याबद्दल बाजारपेठेतील तुमची प्रतिमा उंचावेल. एखाद्या महत्त्वाच्या पदाकरिता तुमची निवड होईल.  नोकरीमध्ये एखाद्या कारणाने संस्थेमधला तुमचा भाव वधारेल. परदेशात जाण्याची इच्छा साकार होईल. घरामधल्या व्यक्ती मतलबाकरिता तुमचा उदो उदो करतील. त्यामुळे तुम्ही हुरळून जाल.

कर्क स्वभावत: तुमची रास संवेदनशील आहे. कुटुंबातील कोणत्याही गोष्टींना तुम्ही महत्त्व देता. या आठवडय़ात तुमचे घर आणि नोकरी-व्यवसाय या दोन्ही आघाडय़ांवर सारखेच लक्ष द्यावे लागेल. व्यवसाय-उद्योगातील नवीन उपक्रमाला गिऱ्हाईकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. पशाची आवक तुम्हाला खूश करणारी असेल. नोकरीमध्ये एखाद्या चांगल्या प्रोजेक्टकरिता तुमची निवड होईल, पण त्याचा स्वीकार करायचा की नाही हे घरातल्या व्यक्तींवर अवलंबून असेल. पूर्वी बुकिंग केलेल्या जागेचा ताबा मिळेल/ स्थलांतर होईल.

सिंह उद्याची फिकीर न करता जो क्षण तुमच्यापुढे आहे त्याचा मनमुराद आनंद लुटाल. व्यवसाय-उद्योगात गिऱ्हाईकांची वर्दळ चांगली असल्यामुळे उलाढाल आणि फायद्याचे प्रमाण तुमच्या मनाप्रमाणे असेल. तरीही त्यात वाढ व्हावी याकरिता तुम्ही प्रयत्नशील राहाल. नोकरीमध्ये  सर्व सुविधा उपलब्ध असल्याने तणाव असा वाटणार नाही. बदली हवी असेल तर प्रयत्न करा. घरामध्ये तुमच्या शब्दाला मान मिळाल्यामुळे तुमची कळी खुललेली असेल. नातेवाईकांच्या समवेत काही क्षण आनंदात घालवाल.

कन्या जे काम आपण हातात घेऊ त्याचा दर्जा उत्तम असला पाहिजे, असा तुमचा आग्रह असेल. व्यापार-उद्योगात हातामध्ये चार पसे खुळखुळल्यामुळे त्यामध्ये वाढ कशी करता येईल, यावर लक्ष एकाग्र कराल. पूर्वीच्या विरोधकांबरोबर आता काम करावेसे वाटेल. या नोकरीमध्ये वरिष्ठांनी पूर्वी तुमच्याकडून जादा काम करून घेतले असेल तर त्याच्या बदल्यात विशेष सवलत मिळेल. नवीन नोकरीकरिता प्रयत्न करणाऱ्यांना एखादी संधी दृष्टिक्षेपात येईल. घरामध्ये काही खास कार्यक्रम ठरतील.

तूळ ‘इच्छा तेथे मार्ग आहे’ म्हणजे नेमके काय हे आता तुमच्याकडे बघून इतरांना समजेल. व्यापार-उद्योगात एखादी नवीन आणि भव्यदिव्य कल्पना तुमचे लक्ष आकर्षति करेल. त्यातील बारकावे नीट समजून घ्या आणि मगच निर्णय पक्का करा. हातामध्ये कितीही पसे पडले तरी तुम्हाला ते कमीच वाटतील. नोकरीमध्ये इतरांना न मिळणारी सवलत तुम्हाला दिली गेल्यामुळे तुम्ही फुगून जाल. सहकाऱ्यांची असूया जाणवेल. घरामध्ये जोडीदाराला खूश ठेवण्यासाठी एखादे  आश्वासन द्याल, पण ते नंतर विसरून जाऊ नका.

वृश्चिक प्रत्येक व्यक्ती जेव्हा काही काम करते त्या वेळी त्याचे श्रेय मिळण्याची अपेक्षा ठेवत असते. तुम्हीही याला अपवाद नाही. व्यापार-उद्योगात तुमच्यातील धूर्तपणा आणि दूरदृष्टी या दोन्हींमुळे कामातल्या फायद्याचे प्रमाण वाढेल. अडथळ्यातून मार्ग काढायचे उपाय तुम्ही योजून ठेवले असतील तर त्याचा उपयोग होईल. आíथक प्राप्ती वाढेल. नोकरीमध्ये जे काम तुम्हाला पूर्वी जमलेले नव्हते ते तुम्ही निश्चयाच्या जोरावर पूर्ण करून दाखवाल. घरामध्ये तुमचे मूड बदलत राहतील. पण इतर व्यक्ती त्याची काळजी घेतील.

धनू तुमची रास कष्टाला कधीच कमी पडत नाही. या आठवडय़ात कल्पकतेची चांगली जोड मिळाल्यामुळे जे काम तुम्ही कराल त्याची इतरांकडून प्रशंसा ऐकायला मिळेल. व्यवसाय-उद्योगात बाजारपेठेतील आपले महत्त्व वाढविण्यासाठी एखादी नवीन आणि चांगली युक्ती लढवाल. जाहिरात प्रसिद्धी वगरे गोष्टींचा वापर करून विक्री आणि फायदा वाढवाल. नोकरीमध्ये प्रयत्न करूनही जे काम इतरांना जमलेले नव्हते ते काम वरिष्ठ मोठय़ा विश्वासाने तुमच्यावर सोपवतील. घरामध्ये एखादे मंगलकार्य ठरण्याची शक्यता आहे.

मकर सतत उद्योगात राहायला तुम्हाला आवडते. काम नसेल तर तुम्हाला कंटाळा येतो. कामाचा पसारा वाढणार असल्याने तुम्ही आनंदी व उत्साही दिसाल. व्यापार-उद्योगात बाजारपेठेतील प्रतिष्ठा वाढविण्याकरिता काही तरी भव्यदिव्य करावेसे वाटेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कामाचे महत्त्व वरिष्ठांना पटल्यामुळे तुम्हाला एखाद्या मदतनीसाची साथ दिली जाईल.  किचकट आणि कंटाळवाणे काम संपल्याने तुम्ही सुटकेचा नि:श्वास टाकू शकाल. घरामध्ये एखाद्या प्रश्नामध्ये तोडगा निघेल.

कुंभ हातात पडलेल्या पशाचा जास्तीत जास्त संचय करण्याची तुमची वृत्ती असते. या आठवडय़ातही तुमचे विचार असेच असतील. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांची ये-जा वाढल्यामुळे कमाईचे प्रमाण चांगले असेल. तुम्ही नजीकच्या भविष्यातील विक्री आणि फायदा वाढविण्याकरिता, जाहिरात व प्रसिद्धीकरिता पसे गुंतवायला तयार व्हाल. नोकरीच्या ठिकाणी अतिआत्मविश्वास टाळा. सहज आणि सोप्या कामामध्ये विनाकारण वेळ दवडू नका. घरामध्ये तुम्ही सुचविलेली एखादी कल्पना इतरांना निश्चितच आवडेल.

मीन ज्या गोष्टी सहज आणि सोप्या वाटत होत्या त्या पूर्ण करायला गेल्यावर प्रमाणाबाहेर जास्त मेहनत पडेल, शिवाय पसेही खर्च होतील. व्यापार-उद्योगात भरपूर काम होईल. परंतु त्याकरिता पशाची जी सतत सोय करावी लागेल त्यामुळे तुमचा तणाव वाढेल. नोकरीमध्ये एखादे काम पूर्ण होईपर्यंत वरिष्ठ तुम्हाला खूश ठेवतील, पण संपल्यावर तुमच्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करतील. घरामध्ये प्रत्येक व्यक्ती आपला मतलब साध्य कसा करायचा या विचारात असेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader