सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र-मंगळाच्या केंद्र योगामुळे विचारांच्या लगामाने भावनांना आवर घालावा लागेल. चिकाटीने काम करणे कठीण जाईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे अनुभवाचे बोल कामी येतील. नव्या ओळखी होतील. सहकारी वर्गाकडून अपेक्षित मदत मिळेल. राग डोक्यात घालून घेऊ नका. जोडीदारासह जुळवून घ्याल. आपले म्हणणे शांतपणे व विचारपूर्वक मांडावे लागेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. श्वसनाचे व पोटाचे विकार बळावतील. योग्य उपचारांनी आराम पडेल.

वृषभ चंद्र-बुधाच्या केंद्र योगामुळे मोठमोठय़ा विषयांवर चर्चा कराल. विचार हे अमलात आणल्याशिवाय त्यांचा उपयोग नाही हे ध्यानात असू द्यावे. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या मदतीला धावून जावे लागेल. सहकारी वर्ग इतर कामात व्यस्त असल्याने आपले काम लांबणीवर टाकतील. जोडीदार त्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना कामाच्या दबावाखाली दबेल. त्याला आपला भावनिक आधार द्याल. लघवीची जळजळ झाल्यास घरगुती उपचार सुरू करावे.

मिथुन चंद्र-बुधाच्या नवपंचम योगामुळे भाषेतील प्रावीण्याची झलक दाखवाल. बोलण्याने व ज्ञानाने इतरांवर छाप पाडाल. नोकरी व्यवसायात हाती घेतलेली कामे विलंबाने पूर्ण होतील. सातत्य सोडू नका. सहकारी वर्गाकडून मदत मिळेल. नव्या गोष्टी शिकायला मिळतील. जोडीदारासह वाद घालण्यापेक्षा त्याचे विचार लक्षपूर्वक ऐकून घ्या. विरोधाने विरोध वाढवून नका. कौटुंबिक वातावरण उत्साही ठेवाल. डोकेदुखी, पित्तविकार यांचा त्रास सतावेल.

कर्क शुक्र-मंगळाच्या लाभ योगामुळे कलेला तंत्रज्ञानाची जोड मिळेल. आप्तेष्टांचा सहवास लाभेल. नोकरी-व्यवसायात सांपत्तिक उत्कर्ष होईल. वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. अनुभवांची शिदोरी वाढेल. सहकारी वर्गातील योग्य गुणांचा उपयोग करून घ्याल. जोडीदारासह वेळ आनंदात जाईल. एकमेकांना समजून घ्याल. सल्ला देण्यापेक्षा सोबतीची ग्वाही द्याल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. सांधे आखडणे, शिरा ताठर होणे असे त्रास अंगावर काढू नका.

सिंह चंद्र-शुक्राच्या लाभ योगामुळे आपली उच्च अभिरुची जोपासाल. बौद्धिक छंदासाठी वेळ राखून ठेवाल. काम व कुटुंब यातील समतोल साधाल. नोकरी-व्यवसायात ओळखींमुळे कामांना गती येईल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. सहकारी वर्ग आपल्यासाठी चाकोरीबाहेर जाऊन मदत करण्याची तयारी दाखवेल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. त्याचा सल्ला लाभदायी ठरेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. हाडांचे दुखणे डोकं वर काढेल. योग्य व्यायाम करणे व टॉनिक घेणे!

कन्या चंद्र-बुधाच्या लाभ योगामुळे व्यवहार कुशलतेने परिस्थिती हाताळाल. बोलण्यातील चतुराई उपयोगी पडेल. नोकरी व्यवसायात विचार मुद्देसूद मांडाल. सहकारी वर्गाच्या फायद्याच्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित कराल. वरिष्ठांना आपली बाजू समजावून सांगाल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. सर्दी तापाची लक्षणे दिसल्यास योग्य खबरदारी घ्यावी.

तूळ शनी-चंद्राच्या लाभ योगामुळे भावनांवर विवेकाचा ताबा मिळवाल. विचारपूर्वक निर्णय घ्याल. नोकरी व्यवसायात आत्मविश्वासाने पुढचे पाऊल टाकाल. नवे करार करताना घाई नको. सहकारी वर्गामुळे फायदा होईल. एकमेकांची मते पटतील. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींकडून आधार मिळेल. जोडीदारासह मिळतेजुळते घ्यावे लागेल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवा. रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवा. जखम झाल्यास ती चिघळण्याची शक्यता भासते.

वृश्चिक गुरु-चंद्राच्या लाभ योगामुळे प्राचीन विद्यांच्या अभ्यासात रुची वाटेल. तसेच बौद्धिक छंद जोपासाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांबरोबर मोकळेपणाने चर्चा कराल. अनुभवातून मौलिक मार्गदर्शन लाभेल. सहकारी वर्ग इतर कामात व्यस्त असल्याने आपली कामे लांबणीवर पडतील. निर्णय घेताना फाटे फुटतील. जोडीदार कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडेल. त्याच्या सेवाभावी वृत्तीचा अभिमान वाटेल. पित्तविकार व अपचनाच्या तक्रारी  डोकं वर काढतील.

धनू चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे मनोबल व बौद्धिक क्षमता वाढेल. तंत्रज्ञानात प्रगती कराल. नोकरी व्यवसायात आíथक बाजू भक्कम कराल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. सहकारी वर्ग हर प्रकारची मदत करण्याची तयारी दाखवतील. वरवरच्या आश्वासनांना भूलू नका. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. नातेवाईक व मित्रमंडळींच्या भेटीगाठी होतील. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. मूळव्याध व उष्णतेच्या विकारांकडे दुर्लक्ष नको. औषधोपचार घ्यावा.

मकर रवी-चंद्राच्या लाभ योगामुळे कमीत कमी कष्टात कामे होतील. उदार व क्षमाशील वृत्तीमुळे लोकप्रियता वाढेल. नोकरी-व्यवसायात अंगच्या गुणांची कदर केली जाईल. वरिष्ठांना आपले विचार पटतील. सहकारी वर्ग अपेक्षित काम वेळेत पूर्ण करेल. नव्या ओळखी लाभदायक ठरतील. जोडीदारासह केलेल्या चच्रेतून बऱ्याच गोष्टींचे नियोजन करणे सोपे जाईल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. त्वचा रुक्ष होणे, अपचनाचा त्रास होणे हे त्रास सतावतील.

कुंभ बुध-शनीच्या लाभ योगामुळे बुधाच्या बुद्धीला शनीच्या चिकाटीची जोड मिळेल. शिस्त, काटकसर व व्यवहार चातुर्याने अनेक प्रश्नांची उकल शोधाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. सहकारी वर्गाने अपेक्षित सहाय्य केले नाही तरी पर्यायी व्यवस्था तयार ठेवाल. जोडीदाराचा सल्ला फारच उपयोगी पडेल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात प्रगती करेल. कुटुंब सदस्यांसह प्रवास करण्याचे बेत आखाल. आरोग्य चांगले राहील.

मीन शनी-चंद्राच्या युतीयोगामुळे हाती घेतलेल्या कामात अडथळे निर्माण होतील. सातत्याने परिश्रम घेणे आवश्यक! नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे म्हणणे मान्य करावे लागेल. विरोध न करता दृष्टिकोन समजून घ्याल. सहकारी वर्ग थोडीफार मदत करेल. परंतु जास्त अपेक्षा ठेवू नका. जोडीदारासह वाद न घालता एकमेकांचे मुद्दे ऐकून घ्याल. उत्सर्जन मार्गाची जळजळ होईल.

Story img Loader