भविष्य
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

मेष ज्या व्यक्तींना तुमच्याकडून काही तरी मिळवायचे असेल त्या व्यक्ती तुम्हाला एखादे आमिष दाखवतील. व्यापार-उद्योगात जास्त पसे मिळविण्याकरिता बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करू नका. उधारीपेक्षा रोखीचे व्यवहार पसंत करा. नोकरीमध्ये सहकारी तुमची गोड बोलून दिशाभूल करण्याची शक्यता आहे. घरामध्ये नातेवाईक मित्रमंडळी यांच्याशी पशाच्या कारणावरून गरसमज होऊ देऊ नका.

वृषभ कोणताही निर्णय घेताना तुम्ही त्यावर शांतपणे विचार करता आणि मग पाऊल उचलता. या आठवडय़ात तुमचा प्रकार उलटा असेल. आधी कृती मग विचार याचा मोह होईल. व्यापार-उद्योगात तुमच्या आíथक आणि इतर मर्यादांकडे लक्ष ठेवा. कामगारांचे प्रश्न विचारपूर्वक हाताळा. नोकरीच्या ठिकाणी अनवधानाने वरिष्ठांना आश्वासन दिले तर तुम्ही तुमच्या शब्दात अडकाल. घरामध्ये  मानापमानाची भावना जागृत होईल.

मिथुन ज्या व्यक्तींवर तुम्ही अवलंबून आहात त्या व्यक्ती आयत्या वेळेला दिलेला शब्द फिरवतील. व्यापार-उद्योगात तुम्हाला खूप काही तरी करावेसे वाटेल, पण हे सर्व व्यावहारिकदृष्टय़ा योग्य आहे का याचा अंदाज घ्या. परदेश-व्यवहार करणाऱ्यांनी योग्य कागदपत्रे मिळाल्याशिवाय पुढे जाऊ नये. नोकरीच्या बाबतीत एखादा विचित्र अनुभव येईल. घरामध्ये नातेवाईक आणि इतर लोकांशी जपून वागा.

कर्क कोणतेही काम करण्यापूर्वी त्या कामाची उत्तम आखणी करता, पण या आठवडय़ामध्ये तुम्ही तुमच्या भावनेच्या आहारी जाल. आधी कृती आणि नंतर विचार असा तुमचा प्रकार असेल. व्यापार-उद्योगात आपुलकीच्या व्यक्तींनी  तुमच्याकडून उसने घेतलेल्या पैशाची परतफेड लवकर करणार नाहीत. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या हातून चूक होण्याची शक्यता आहे. घरामधल्या व्यक्ती तुमच्या विचारांनुसार वागणार नाहीत.

सिंह ज्या व्यक्तीला तुम्ही आपले म्हणता त्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवता. याच कारणामुळे कधी कधी तुमची फसगत होते. या आठवडय़ात या गोष्टीची काळजी घ्या. व्यापार-उद्योगात नवीन करार करण्यापूर्वी अटी काय आहेत याविषयी नीट माहिती काढा. नोकरीच्या ठिकाणी सहकारी तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील. घरामध्ये जोडीदाराशी विनाकारण वादविवाद होतील. तुमचा अहंकार आडवा येऊ देऊ नका.

कन्या जेव्हा एकाच वेळी खूप कामे करायची असतात. त्या वेळेला कोणत्या कामाला प्राधान्य द्यावे असा तुमच्यापुढे प्रश्न पडतो आणि त्या नादात तुमच्या हातून चूक होते या आठवडय़ामध्ये हे टाळण्यासाठी नियोजन उपयोगी पडते. व्यापार-उद्योगात ज्यांच्या बरोबर तुम्ही व्यवहार करणार आहात त्यांची व्यवस्थित माहिती काढा. नोकरीच्या ठिकाणी कामाचा तणाव वाढण्याची शक्यता आहे. सांसारिक जीवनामध्ये बोलताना शब्द जपून वापरा.

तूळ ग्रहमान तुम्हाला कोडय़ात टाकणारे आहे. आपले कोण आणि परके कोण याचा तुमच्यासमोर प्रश्न पडेल.  व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांच्या गोड बोलण्याला भुलून जाऊ नका. नोकरीच्या ठिकाणी ज्यांना तुमच्याकडून स्वार्थ साधायचा आहे त्या व्यक्ती सलगी करायचा प्रयत्न करतील. घरामध्ये प्रिय व्यक्तीचे किरकोळ कारणावरून गरसमज होतील. सत्य परिस्थिती समजल्याशिवाय कोणताही निष्कर्ष काढू नका.

वृश्चिक जे प्रश्न तुम्हाला गेल्या एक-दीड महिना त्रास देत होते त्यामध्ये काही तरी मार्ग मिळाल्यामुळे तुमच्यामध्ये एक प्रकारचा उत्साह संचारेल. प्रगतीचे अनेक मार्ग खुले झाल्यामुळे कशाला महत्त्व द्यायचे याविषयी तुमच्या मनात संदेह निर्माण होईल. अशा वेळेला मोठय़ा व्यक्तीचे मार्गदर्शन घ्या. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे म्हणणे शांत ऐकून मगच कामाला सुरुवात करा. घरामध्ये अनपेक्षित प्रश्न निर्माण होईल. गरसमज टाळा.

धनू स्वप्न आणि सत्य यामध्ये फरक असतो, हे आपल्याला माहीत असते. तरीपण आपण स्वप्न पाहायचे थांबवत नाही. व्यापार-उद्योगात नवीन सौदे करण्यापूर्वी ज्या व्यक्तींबरोबर तुम्ही सौदे करणार आहात त्यांचा हेतू नीट जाणून घ्या. नोकरीच्या ठिकाणी आपले काम पूर्ण झाल्याशिवाय इतर कोणत्याही कामामध्ये लक्ष घालू नका. व्यक्तिगत जीवनात एखादे काम थोडेसे पुढे सरकल्यामुळे तुमच्या मनाला उभारी येईल.

मकर ग्रहमान फसवे आहे. पशाच्या बाबतीत तुम्ही नेहमीच काटेकोर असता. आपल्या हातून काही चूक झालेली तुम्हाला सहन होत नाही. या आठवडय़ात याबाबतीत दक्षता घ्या. व्यापार-उद्योगातील नवीन करार करण्यापूर्वी त्यातील आíथक अटी समजून घ्या. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि सहकारी गोड बोलून तुमच्याकडून नको असलेले काम करून घेतील. घरामध्ये जुन्या प्रश्नावरून विनाकारण वादविवाद उपस्थित होतील.

कुंभ कधी कधी काही गोष्टी आपल्याला सहज साध्य होतील अशा वाटतात. पण त्यातले बारकावे बघितल्यानंतर ही गोष्ट गुंतागुंतीची आहे असे लक्षात येते. अतिआत्मविश्वास टाळा. व्यापार-उद्योगात मोठे धाडस न करता तुमच्या मर्यादेत राहून काम करा. सरकारी कामे आणि कोर्टव्यवहारांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नोकरीमध्ये वरिष्ठ काय सांगतात त्याकडे नीट लक्ष द्या. घरामध्ये छोटय़ा-मोठय़ा कारणावरून बुजुर्गाशी गरसमज होतील.

मीन कोणावरही तुम्ही पटकन विश्वास ठेवता आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे सर्व गोष्टी करता. या आठवडय़ात या गोष्टीमुळे तुमची फसगत होण्याची शक्यता आहे. व्यापार-उद्योगात गरज पडल्यास अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना पूर्वी दिलेले एखादे आश्वासन महाग पडेल. घरामध्ये छोटय़ा-मोठय़ा कारणावरून गरसमज होण्याची शक्यता आहे.

Story img Loader