01vijayमेष ज्या व्यक्तींवर आपण अवलंबून राहतो त्या व्यक्तींकडून आयत्या वेळी मदत मिळत नाही. पण त्याऐवजी अनपेक्षित मार्गाने साथ लाभल्यामुळे आपल्याला वेळ मारून नेता येते, असा छानसा अनुभव या आठवडय़ात येईल. व्यवसाय-उद्योगाच्या क्षेत्रात पशाचे व्यवहार इतरांवर न सोपवता स्वत:च हाताळा. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या गोड बोलण्याकडे लक्ष न देता स्वत:चे काम स्वत: पूर्ण करा.

वृषभ जेव्हा एकापेक्षा जास्त पर्याय आपल्यापुढे असतात त्या वेळेला नेमक्या कोणत्या पर्यायाची निवड करायची असा मनात गोंधळ असतो. तसा आठवडय़ाच्या सुरुवातीला तुमचा गोंधळ असेल. व्यापार-उद्योगात केवळ फायद्यावर लक्ष न ठेवता जे काम तुम्ही करणार आहात त्यातले तांत्रिक अडथळे आणि अर्थार्जन या दोन्हींचा बारकाईने विचार करा. नवीन नोकरीचे पर्याय निर्माण होतील.  घरामध्ये सर्वाना तुमच्या सल्ल्याचा/ सक्रिय मदतीचा आधार वाटेल.

मिथुन आपल्याकडे काय नाही याचा विचार करून निराश होण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे आणि त्याचा किती चांगला उपयोग करून घेता येईल याचा विचार केलात तर तो तुम्हाला जास्त लाभदायक ठरेल. व्यापार-उद्योगात स्पर्धकांच्या हालचालींवर नजर ठेवून तुमचा पवित्रा आखा. नोकरीच्या ठिकाणी कष्टदायक कामे तुम्हाला नकोशी वाटतील. घरामध्ये तुम्ही दिलेला सल्ला इतरांना थोडाफार पटल्यामुळे काही गुंतागुंतीचे प्रश्न आटोक्यात येतील. तब्येतीकडे लक्ष ठेवा.

कर्क परिस्थिती कितीही बिकट असो, पण माणसे हाताळण्याची तुमच्यात जी कला आहे त्यामुळे तुम्ही वेळ मारून नेऊ शकता. व्यापार-उद्योगात मात्र थोडेसे सावध राहून पशासंबंधी निर्णय घ्या. नोकरदार व्यक्तींनी कोणत्या कामाला किती महत्त्व द्यायचे याचा अंदाज घेऊन नंतर कामाला सुरुवात करावी. हाताखालच्या व्यक्तींना चुचकारून त्यांच्याकडून काम करून घ्यावे लागेल. घरामध्ये सगळ्यांना उपयोगी पडण्याच्या तुमच्या वृत्तीमुळे कामाचा बोजा प्रमाणाबाहेर वाढेल.

सिंह एकीकडे प्रत्येक गोष्ट वाढवून आपल्या कामाचा दर्जा वाढविण्याची तुमची इच्छा असेल. पण नेमके कोणत्या मार्गाने जायचे याविषयी मनात गोंधळ निर्माण होईल. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात बाजारपेठेमध्ये ज्या घडामोडी घडतील त्याला अनुसरून तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुम्ही वेगळ्या प्रकारचे काम हाताळावे असा आग्रह धरतील. घरामध्ये मोठय़ा व्यक्तीच्या विचारांमुळे किंवा स्वास्थ्यामुळे थोडीशी चिंता वाटेल.

कन्या एखादी गोष्ट आपण मनात आणावी आणि त्याला अनुसरून महत्त्वाची घटना घडावी, असा योगायोग या आठवडय़ात आला तर आश्चर्यात पडू नका. व्यवसाय-उद्योगात ज्यांनी पूर्वी तुम्हाला नकारघंटा ऐकवली होती, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाल्याने तुम्हाला आता एक प्रकारचा चेव येईल. मोठय़ा प्रोजेक्टची तुम्ही आखणी कराल. नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाच्या कामावर तुमची नेमणूक होण्याची शक्यता आहे. घरामध्ये शुभकार्याची नांदी होईल.

तूळ कोणत्या कामाला किती महत्त्व द्यायचे हे या आठवडय़ात तुम्हाला ठरविणे गरजेचे आहे. कारण एक माणूस सगळ्या आघाडय़ांवर तितक्याच कार्यक्षमतेने काम करू शकत नाही याची तुम्हाला प्रकर्षांने जाणीव होईल. व्यापार-उद्योगात आíथक व्यवहार काटेकोरपणे हाताळा. नोकरीमध्ये वरिष्ठांकडे काम सुपूर्द करताना ते पुन्हा एकदा तपासून पहा. घरामध्ये प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करणे तुम्हाला थोडेसे जड जाईल.

वृश्चिक तुमचे घर आणि करिअर या दोन आघाडय़ांवर उलट-सुलट प्रवाह असल्याने नेमके कशाला आणि किती महत्त्व द्यावे याविषयी तुमच्या मनात संभ्रम असेल. व्यवसाय किंवा उद्योगात  एकदम मोठी गुंतवणूक करू नका. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचा दर्जा, तुमची हुशारी यावर विश्वास ठेवून वरिष्ठ तुमची जबाबदारी वाढवतील. त्याला कसे पुरे पडायचे असा तुमच्यापुढे प्रश्न असेल. घरामध्ये एखाद्या व्यक्तीच्या स्वास्थ्यामुळे किंवा प्रगतीमुळे तुम्ही विचारात पडाल.

धनू संथ पाण्यामध्ये दगड फेकल्यानंतर जसे तरंग उमटतात त्याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये विनाकारण एखाद्या कारणाने अस्वस्थता येईल. व्यापार-उद्योगात नेमका कोणता पर्याय चांगला ठरेल, ते न कळल्यामुळे तुमचा अंदाज चुकण्याची शक्यता आहे. घाईगडबडीत कृती करू नका. नोकरीच्या ठिकाणी काही शंका असेल तर वरिष्ठांकडून त्याचे निराकरण करून घ्या. घरामध्ये आवडत्या व्यक्तींचे मन राखण्याकरिता त्यांच्या कलाने वागावे लागेल.

मकर सर्व ग्रहमान तुमच्या सतत उद्योगी राहण्याच्या स्वभावाला खतपाणी घालणारे आहे. सभोवतालच्या व्यक्तींना तुम्ही वेठीस धराल. व्यापार-उद्योगात एखादे नवीन काम मिळविण्यात सफल व्हाल. जोडधंद्यातून मनाप्रमाणे कमाई होईल. नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाचे काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. पण ते कसे करायचे असा तुमच्यापुढे प्रश्न असेल. विचारपूर्वक कृती करा. घरामध्ये मंगलकार्याची नांदी होईल. तुम्ही मात्र जमाखर्चाचे आकडे मांडाल.

कुंभ जेव्हा काही बदल अचानक होत असतात त्या वेळेला त्यातून काय निष्पन्न होईल याचा आपल्याला अंदाज येत नाही आणि मनाचा गोंधळ उडतो. अशा वेळी विचाराने पुढे जाणे चांगले. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात महत्त्वाची कामे मागे-पुढे झाल्याने तुमची चिडचिड होईल. पण डोके शांत ठेवलेत तर सर्व काही व्यवस्थितपणे पार पडेल. नोकरीमध्ये तुम्हाला काय वाटते याला महत्त्व न देता संस्थेच्या गरजेला महत्त्व द्या. घरामध्ये दोन पिढय़ांतील विचारांची तफावत जाणवेल.

मीन तुमचे काम चांगले होण्यासाठी शांतपणे विचार करून योग्य पर्याय निवडा. व्यापार-उद्योगात तुमची गरज खूप मोठी असल्यामुळे जे पसे मिळतील ते तुम्हाला अपुरेच वाटतील. देणी वेळेत द्या. नोकरीच्या ठिकाणी तुमचा कामाचा झपाटा चांगला असेल. त्याचा फायदा तुमच्यापेक्षा वरिष्ठांना जास्त मिळेल. नवीन नोकरीच्या निवडीबाबत मनात थोडासा गोंधळ असेल. घरामध्ये वडीलधाऱ्या व्यक्तींच्या सूचना तुम्हाला आवडणार नाहीत. पण नाइलाजाने त्याचे पालन करावे लागेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader