मेष ग्रहमान तुमच्या धाडसी स्वभावाच्या विरुद्ध आहे. तुम्हाला कृतीची घाई असते. पण आता मात्र प्रत्येक गोष्टीत बिचकल्यासारखे वाटेल. अशा वेळी हितचिंतकांचा सल्ला उपयोगी पडेल. व्यापार-उद्योगात मध्यस्थ किंवा अनोळखी व्यक्तीवर अवलंबून राहण्याआधी त्याची विश्वासार्हता पडताळून पाहा. नोकरीमध्ये वरिष्ठ चालू असलेल्या कामाव्यतिरिक्त एखादे वेगळेच काम सांगतील. घरामध्ये वृद्धांच्या गरजा भागविणे आवश्यक होईल.
वृषभ आठवडय़ात एखाद्या भुरळ पाडणाऱ्या कल्पनेने तुम्ही आकर्षति व्हाल. व्यापार-उद्योगात जादा पसे मिळवून देणारी एखादी संधी दृष्टिक्षेपात येईल. पण नंतर लक्षात येईल की, हे सर्व मृगजळ होते. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या हातून चांगले काम करून घेण्यासाठी वरिष्ठ एखादी युक्ती अमलात आणतील. त्याचा अंदाज तुम्हाला सुरुवातीला लागणार नाही. पण काम झाल्यावर लागेल. घरामध्ये माझे तेच खरे असा दृष्टिकोन न ठेवता इतरांचे म्हणणे ऐकून घ्या.
मिथुन तुमच्या व्यक्तिगत इच्छा-आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा वाढविणारे ग्रहमान आहे. व्यापारात नवीन आíथक वर्षांकरिता जास्त पसे कमाविण्याकरिता मोठा प्रकल्प हाती घ्यावासा वाटेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे मत ऐकून घेतल्याशिवाय त्यांच्यासमोर तुमचे मत व्यक्त करू नका. नवीन नोकरीच्या कामात गती येईल. घरामध्ये तुमची कल्पना जरी योग्य नसली तरी त्याचे समर्थन तुम्ही इतरांसमोर ठासून कराल. मोठय़ा व्यक्तींचा सल्ला तुम्हाला उपयोगी पडेल.
कर्क सभोवतालच्या आणि आपुलकीच्या व्यक्तींच्या बाबतीत तुम्ही खूप संवेदनशील असता. त्यांच्या गरजेच्या वेळी तुम्ही धावून जाता आणि आपल्यालाही त्यांनी मदत करावी, अशी तुमची अपेक्षा असते. व्यापार-उद्योगात अचाट अफाट निर्णय घेण्याचा मोह कटाक्षाने टाळा. अनपेक्षित खर्च, बिले भरणे, इ. कारणांमुळे पसे खर्च होतील. नोकरीच्या ठिकाणी स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, याची एखाद्या निमित्ताने तुम्हाला आठवण येईल. प्रकृतीला जमेल तेवढेच काम करा.
सिंह जेव्हा प्रगतीचे अनेक पर्याय एकाच वेळेला उपलब्ध असतात, त्या वेळेला आपली खरी परीक्षा होते; कारण योग्य पर्याय निवडणे थोडेसे कठीण असते. व्यापार-उद्योगात महत्त्वाची कामे शक्यतो आठवडय़ाच्या सुरुवातीला उरका. कायदे व्यवहारात बिनचूक राहा. नोकरीच्या ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त काम स्वीकारावे लागेल. नवीन नोकरीच्या बाबतीत अनुभवी व्यक्तीकडून सल्ला घेतल्याशिवाय निर्णयावर शिक्कामोर्तब करू नका. शारीरिक आजारांकडे लक्ष ठेवा.
कन्या कोणत्या कामाला किती महत्त्व द्यायचे याविषयी मनात शंका ठेवू नका. म्हणजे तुमचे काम चांगले होईल. व्यापार-उद्योगात नवीन प्रयोग करू नका. त्यापेक्षा नेहमीचा सराव असणारी कामे पूर्ण करा. पशाची आवक थोडीशी वाढेल. नोकरीमध्ये कामाचा बोजा कमी करण्यासाठी वरिष्ठ एखाद्या साथीदाराची तुम्हाला मदत देतील. घरामध्ये जरी इतरांना तुमच्याकडून मदत हवी असली तरी तुम्ही ती काही कारणाने करू शकणार नाही त्याचा इतरांना राग येईल.
तूळ कोणतेही काम करण्याकरिता जो मानसिक उत्साह पाहिजे असतो तो तुमच्यामध्ये खूप असेल. परंतु शारीरिक कुवतीचा अंदाज घेतल्याशिवाय कोणतेही काम करू नका. व्यवसाय-उद्योगात अनेक गोष्टी तुम्हाला कराव्याशा वाटतील. पण त्यामध्ये प्रगती केल्यावर बराच भूलभुलया आहे असे लक्षात येईल म्हणून हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नका. नोकरीच्या कामात संयम पाळा. घरामध्ये फक्त महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या.
वृश्चिक परिस्थिती कशीही असो त्यावर शांत चित्ताने विचार करून तुम्ही मार्ग शोधून काढता. या आठवडय़ात या तुमच्या गुणाचा तुम्हाला उपयोग होईल. व्यापार-उद्योगात परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घ्या. पशाच्या बाबतीत काटेकोर राहा. नोकरीमध्ये तुम्ही कोणावर अवलंबून राहिलात तर तुमची गरसोय होईल. त्याऐवजी स्वयंभू राहिलात तर थोडीफार प्रगती दिसेल. घरामध्ये सर्व जण मदतीकरिता तुमच्यावर अवलंबून असतील. पण श्रेय द्यायच्या वेळेला विसरून जातील.
धनू एखादे काम करताना तुम्ही खूप विचार करता; तर कधी कधी नको इतकी घाई करून ते काम संपवून टाकता. या आठवडय़ात दोन्हीचा सुवर्णमध्य गाठणे चांगले. व्यवसाय-उद्योगात बाजारातील परिस्थिती भूलभुलया निर्माण करणारी असेल. तुमची कमाई वाढविण्याकरिता एखादा पर्याय शोधून काढाल. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या सूचनेनुसार वागण्याचे धोरण ठेवा. घरामध्ये इच्छा असूनही तुम्हाला हवा इतका वेळ देता येणार नाही. त्यावरून इतरांचा गरसमज होईल.
मकर एका वेळी प्रगतीचे अनेक पर्याय एकदम खुले होतील. त्यामुळे कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यावे, याकरिता व्यवहारी दृष्टिकोन तुम्हाला उपयोगी पडेल. व्यवसाय-उद्योगात जादा कमाई करण्याच्या लोभाने अनेक डगरींवर हात ठेवण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे एक ना धड भाराभर चिंध्या असा प्रकार होईल. पशांची आवकजावक मागे-पुढे राहील. नोकरीमध्ये सवलतीचा जास्तीत जास्त फायदा उठवण्याकडे तुमचा कल राहील. घरामध्ये एखादे कार्य ठरेल.
कुंभ तुमच्या मनाची द्विधा स्थिती निर्माण करणारे हे ग्रहमान आहे. अनेक कामे उत्साहाने करावीशी वाटतील. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात हातातले काम सोडून नवीन कामात लक्ष घालावेसे वाटेल. पशाच्या लोभाने कुवतीबाहेर जाऊन काम करण्याचा मोह तुम्हाला होईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याकरिता बढाया मारल्यात तर तुमची जबाबदारी वाढेल. घरामध्ये काही मोठे खर्च उभे राहिल्यामुळे पशाची तरतूद करावी लागेल.
मीन अनेक कामे तुमच्यापुढे असतील आणि त्या मानाने वेळ मात्र थोडा असेल. त्यामुळे ‘रात्र थोडी सोंगे फार’ अशी तुमची परिस्थिती होईल. वेळेचे उत्तम नियोजन करा. व्यापार-उद्योगात सगळी कामे एकटय़ाने करण्याऐवजी फक्त महत्त्वाची कामे हाताळा. तातडीच्या कामाकरिता तात्पुरते कर्ज घ्यावे लागेल. नोकरीमध्ये कोणत्या कामाला किती वेळ द्यायचा याचा निर्णय विचारपूर्वक करा. घरामध्ये सगळ्यांची मोट बांधणे जड जाईल. त्यामुळे तुमची चिडचिड होईल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com