मेष महत्त्वाचे काम ओळखीअभावी लटकून राहिले असेल तर त्याला चालना मिळेल. व्यापार-उद्योगाच्या कामात एखाद्या संधीचा फायदा उठविण्यापूर्वी त्यातील संभाव्य धोके जाणून घ्यायला विसरू नका. नोकरीच्या ठिकाणी जास्त बढाया मारल्यात तर त्याचा फायदा तुम्हाला नव्हे तर तो वरिष्ठांना मिळेल. घरामध्ये छोटेखानी समारंभ किंवा मेजवानी ठरेल, पण त्यामुळे तुमची दगदग प्रमाणाबाहेर वाढेल आणि खर्च बजेटबाहेर जाईल.
वृषभ कर्तव्य आणि मौजमजा या दोन्हीला तुमच्या दृष्टीने महत्त्व असते, पण या आठवडय़ात मात्र तुमचा कल मौजमजा करण्याकडे असेल. व्यापार-उद्योगातील कामाचा पसारा नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही स्वस्थ बसणार नाही. धनप्राप्ती चांगली राहील. नोकरीमध्ये ज्यातून आपला फायदा आहे, अशा कामाला तुम्ही महत्त्व द्याल. घरामध्ये सर्व जण तुमची स्तुती करतील. तुमचा भाव वधारेल. स्वत:च्या आवडीनिवडी जपण्यात तुम्हाला महत्त्वाचे वाटेल.
मिथुन मौजमजा आणि जीवनातील उदात्त विचार या दोन्ही गोष्टी तुमच्याकडून ऐकायला मिळाल्यामुळे सभोवतालच्या व्यक्तींना तुमच्याविषयी कोडे पडेल. व्यापार-उद्योगात एखादे अचाट-अफाट धाडस करावेसे वाटेल, पण त्या नादात वेडेवाकडे पसे खर्च करू नका. नवीन कामाविषयी बोलणी सुरू होतील. नोकरीमध्ये कामाचे गणित मागे-पुढे होऊ देऊ नका. नाहीतर वरिष्ठांची बोलणी खावी लागतील. घरामध्ये सर्व जण तुमच्या उदार आणि अव्यवहारी स्वभावाचा फायदा उठवतील.
कर्क कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यावर तुम्ही र्सवकष विचार करता, पण या आठवडय़ात तुम्हाला कृती करण्याची घाई असेल. त्यासाठी वेळप्रसंगी तुम्ही धाडस करायलाही तयार व्हाल. व्यापार-उद्योगातील कामाचा व्याप वाढेल. नोकरीच्या ठिकाणी जे तुम्हाला हवे आहे ते मिळविण्याकरिता अधिकारांचा गरवापर करण्याकडे तुमचा कल राहील. बेकार व्यक्तींनी घाईत नवीन नोकरी स्वीकारू नये. घरामधील माहोल आनंदी व उत्साही असेल. मुलांचे लाड कराल.
सिंह मनात बराच काळ तरळत असलेली इच्छा पूर्ण करण्याकरिता जंग जंग पछाडाल, त्यानंतरच तुमचे समाधान होईल. व्यापार-उद्योगात बाजारपेठेत आपली प्रतिमा उंचावण्याकरिता तुम्ही विशेष प्रयत्न कराल. त्याकरिता जाहिरातबाजी आणि प्रसिद्धी माध्यमांचा भरपूर वापर कराल. नोकरीमध्ये तुमच्याकडून नेहमीपेक्षा जास्त काम करून घेण्यासाठी वरिष्ठ तुमची स्तुती करतील. तुम्ही संस्थेकडून मिळणाऱ्या सुविधांचा भरपूर फायदा उठवाल.
कन्या व्यवहार आणि मौजमजा या दोन्ही गोष्टींची या आठवडय़ात तुम्ही सांगड घातल्याचे आंतरिक समाधान तुम्हाला लाभेल. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात कामाची गती वाढल्यामुळे तुमच्या इच्छा-आकांक्षा पल्लवित होतील. पूर्वी केलेल्या कामाची गिऱ्हाईकांकडून प्रशंसा ऐकू येईल. पशाची आवक थोडीफार वाढेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही स्वत:ची पाठ थोपटून घ्याल. घरामध्ये स्वत:च्या आवडीनिवडी जपण्याकरिता बरेच प्रयत्न कराल. त्यासाठी जोडीदाराला खूश ठेवाल.
तूळ जी कामे प्रयत्नांनी साध्य होणार नाहीत ती आता जुन्या ओळखीच्या जोरावर पार पडण्याची शक्यता आहे. कोणतेही काम करताना तुम्ही खूप विचार करता. त्यामानाने कृती कमीच असते. व्यवसाय-उद्योगात मात्र आíथक बाबतीत सतर्क राहणे चांगले. कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. जुनी देणी वेळेत द्या. नोकरीमध्ये तुमचे भविष्यातील बेत कुणाला कळू देऊ नका. तुम्ही स्वत:ची एखादी इच्छा पूर्ण करून घ्याल.
वृश्चिक कधी कधी सभोवतालची परिस्थिती आपल्याला अनुकूल नसते. अशा वेळी ‘इच्छा आहे तेथे मार्ग आहे’ हे एकच धोरण उपयोगी पडते. व्यापारउद्योगातील कामाचे प्रमाण वाढविण्याकरिता एखादे धाडस करणे भाग पडेल. नवीन व्यक्तींशी परिचय झाल्यामुळे नवीन कल्पना सुचतील. नोकरीमध्ये जी गोष्ट तुमच्या मनाला पटलेली आहे ती करण्याकडे तुमचा कल राहील. अशा वेळी इतरांना काय वाटते याचा तुम्ही विचार करणार नाही. घरामध्ये मौजमजेचा माहोल असेल.
धनू तुमची रास ही द्विस्वभावी रास आहे. तुमचा मूड कधी बदलेल ते सांगता येत नाही. या आठवडय़ात तुमचे रागरंग बदलत राहिल्याने समोरच्या व्यक्ती कोडय़ात पडतील. व्यापार-उद्योगात मात्र तुम्ही प्रचंड उत्साहाने काम कराल. केलेल्या कामाचे फळ ताबडतोब मिळावे, अशी तुमची इच्छा असेल. नोकरीमध्ये कोणतीही घोषणा करण्यापेक्षा ‘आधी केले मग सांगितले’ असा पवित्रा तुम्ही ठेवाल. त्याचे सगळ्यांना आश्चर्य वाटेल. घरामध्ये तुमच्या उत्साही स्वभावाचा फायदा घेतील.
मकर या आठवडय़ात नेहमीच्या कामाचा कंटाळा आल्यामुळे तुम्ही त्यात वेळ घालविणे पसंत कराल. व्यापार-उद्योगात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही कागदावरती बरीच आकडेमोड करता. या आठवडय़ात मात्र एखाद्या संधीचा फायदा उठविण्याकरिता ‘आधी कृती मग विचार’ असा प्रकार असेल. नोकरीमध्ये तुमच्या चांगुलपणाचा वरिष्ठ आणि सहकारी फायदा उठवतील, पण तुम्ही त्याच्या बदल्यात कोणतीच अपेक्षा ठेवणार नाही याचे त्यांना आश्चर्य वाटेल.
कुंभ कोणतीही नवीन पद्धत अमलात आणताना तुम्ही बराच विचार करता. पण या आठवडय़ात नवीन गोष्टी स्वीकारताना तुम्ही मागेपुढे पाहणार नाही. त्यातून तुमचा फायदा होईल. व्यापार-उद्योगात चाकोरीबद्ध कामापेक्षा काही वेगळे काम असेल तर त्यामध्ये जातीने लक्ष घालाल. नोकरीमध्ये जे निर्णय तुम्ही विनाकारण लांबवत होता ते तातडीने घ्या. घरामधल्या प्रत्येक कामात तुमचा पुढाकार असेल. मात्र तुम्ही गाजवलेली हुकूमशाही इतरांना पसंत पडणार नाही.
मीन ज्या कामात तुम्ही लक्ष घालता तेथे स्वत:ला झोकून देता. त्यामुळे तुम्हाला कधी कधी उत्सवमूर्ती असे म्हणतात. या आठवडय़ात या गोष्टीचा प्रत्यय येईल. व्यापार-उद्योगात पूर्वी केलेल्या कामाचे फळ मिळेल. तातडीच्या कामाकरिता प्रवास कराल. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या आव्हानात्मक कामगिरीकरिता तुमची निवड होईल. मात्र तेथे अतिउत्साह आवरा. घरातील व्यक्तींबरोबर एखाद्या प्रेक्षणीय स्थळाला भेट होईल. आवडत्या व्यक्तींचा सहवास मिळेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com