मेष सभोवतालची परिस्थिती खूप जरी चांगली नसली तरी तुमच्या प्रगतीला थोडीफार पूरक आहे. व्यवसाय-उद्योगात कोणतेही बेत निश्चित करण्यापूर्वी स्पर्धकांच्या तयारीचा अंदाज घ्या. जाहिरात आणि प्रसिद्धीचा तुम्हाला उपयोग होईल. कारखानदार नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा विचार करतील. नोकरीत तुमची एखादी कल्पना तुमच्या मनाप्रमाणे अमलात  येईल. घरामध्ये प्रत्यक्ष मदत नाही, पण कोणीतरी तुमच्या भावना जाणून घेतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ तुमची रास प्रयत्नवादी आहे. आता सहजगत्या कोणतेच काम होत नाही असे पाहून तुम्ही जास्त जोमाने काम कराल. व्यापार-उद्योगात फायदा आणि विक्री वाढवण्यासाठी भांडवलाची तरतूद करावी लागेल. ज्यांचा जोडधंदा आहे त्यांना एखादे काम मिळेल. पण अटी जाचक असतील. नोकरीच्या ठिकाणी तुमचे कष्ट प्रमाणाबाहेर वाढतील. घरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम ठरतील, परंतु तुम्हाला मात्र त्याच्या पशाची तजवीज कशी करावी असा प्रश्न पुढे असेल.

मिथुन ज्या कामात अडथळे येत होते, त्यामध्ये हितचिंतकांच्या मदतीमुळे तुम्ही आता प्रगती करू शकाल. व्यापार-उद्योगात बाजारपेठेत एखादी नवीन टूम निघाली असेल तर तिचा उपयोग करून तुमच्या मालाची विक्री आणि उलाढाल वाढवायचे ठरवाल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमचे कौतुक करतील आणि तुमच्याकडून नेहमीपेक्षा जादा काम करून घेतील. घरामध्ये डागडुजी करून ते सजवण्याचा तुमचा बेत असेल. इतर सदस्यांची खुशामत करावी लागेल.

कर्क ‘प्रयत्नांती परमेश्वर’ असे मानणारी तुमची रास आहे. जे काम अवघड असते त्याचा तुम्ही पाठपुरावा करता आणि अखेर त्यात यशस्वी होता. व्यापार-उद्योगात सुरुवातीला कामाचा कंटाळा येईल. पण एकदा तुम्ही कामाला लागल्यावर मोठय़ा उत्साहाने ते काम फत्ते कराल. नोकरीच्या ठिकाणी एखादे नवीन आवडीचे काम तुमच्या वाटय़ाला येईल. घरामध्ये एखादी नवीन आणि नावीन्यपूर्ण कल्पना इतरांच्या डोक्यात तुम्ही घुसवाल. आवडत्या व्यक्तींशी संपर्क साधला जाईल.

सिंह सतत आनंदी आणि उत्साही राहणारी तुमची रास आहे. ज्या ठिकाणी तुम्ही जाता त्या ठिकाणी  इतरांसमोर नवीन कल्पना सादर करून त्यांना तुम्ही खूश ठेवता. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांना नेमके काय पाहिजे आहे त्यांची पाहणी करून त्या दृष्टीने आवश्यक ती जाहिरात आणि प्रसिद्धी कराल. पूर्वीचे हितसंबंध तुम्हाला विशेष उपयोगी पडतील. पशाची आवक चांगली राहील. नोकरीमध्ये एखाद्या मीटिंगमध्ये तुमचा मुद्दा तुम्ही इतरांसमोर प्रभावीपणे मांडाल.

कन्या कोणताही निर्णय/ काम घेण्यापूर्वी त्याच्यावर तुम्ही खूप विचार करता, पण या आठवडय़ात जी गोष्ट तुम्हाला हवी आहे ती मिळविण्याकरिता तुमची धाडस करण्याची तयारी असेल.  व्यापार-उद्योगातील पशाची आवक चांगली राहील. गिऱ्हाईकांना आकर्षति करण्याकरिता जागेचे सुशोभीकरण किंवा खास योजना तयार कराल. नोकरीमध्ये बदल इच्छिणाऱ्यांना चांगले ग्रहमान आहे. चालू असलेल्या नोकरीत तुमच्या गुणांचे चीज होईल. घरामध्ये तुमचे विचार सर्वाना पटतील.

तूळ सहसा कोणताही निर्णय एकदम घ्यायला तुम्ही धजावत नाही. त्यामध्ये खूप वेळ घालवता. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात एखादी नावीन्यपूर्ण कामगिरी करून दाखवावीशी वाटेल.  जाहिरताबाजीचा उपयोग होईल. नोकरीमध्ये तुमच्या विशेष कौशल्याला आणि प्रावीण्याला भरपूर वाव मिळेल.  घरामध्ये साफसफाई आवराआवर आणि रंगरंगोटी याला महत्त्व येईल. एखादी रचनात्मक कल्पना इतरांसमोर मांडाल.

वृश्चिक वेळेची आणि काळाची जशी गरज असते त्याप्रमाणे तुम्ही तुमचा पवित्रा बदलता, पण कोणत्याही परिस्थितीत ठरविलेले काम पूर्ण करता. या तुमच्या गुणांचा आता तुम्हाला उपयोग होईल. व्यापार-उद्योगात खूप काम करावेसे वाटेल. नोकरीमध्ये वरिष्ठ आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रयत्न करतील. तुम्हीही या संधीचा फायदा उठवून स्वत:चा मतलब साध्य करून घ्याल. घरामध्ये स्वत:ची इच्छा पूर्ण करण्याकरिता एखादी युक्ती अमलात आणाल.

धनू गेल्या कित्येक महिन्यात संमिश्र ग्रहमान असल्यामुळे तुम्ही स्वप्न पाहणे सोडून दिले होते. आता तुमच्यातील ही स्वाभाविक प्रवृत्ती पुन्हा एकदा जागृत होईल. व्यवसाय आणि उद्योगाच्या क्षेत्रात काहीतरी भव्यदिव्य करावेसे वाटेल. त्यासंबंधी आवश्यक त्या व्यक्तींना भेटून गाठीभेटी ठरवाल. सरकारी आणि कोर्ट व्यवहारांना गती येईल. नोकरीमध्ये आवडत्या कामांवर तुमची नेमणूक झाल्याने अधिकार गाजविण्याची तुमच्यात खुमखुमी निर्माण होईल.

मकर कोणतेही काम करण्यापूर्वी त्याचे नियोजन करण्यात तुमचा बराच वेळ जातो. पण जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे असते त्या वेळेला तुमच्या हालचालीत तत्परता येते. तशी ती या आठवडय़ात दिसून येईल. व्यवसाय-उद्योगात एखादे मोठे उद्दिष्ट तुमच्या डोळ्यासमोर असेल. त्याकरिता आवश्यक असणाऱ्या माणसाची आणि साधनसामग्रीची तुम्ही व्यवस्था कराल. नोकरीमध्ये वरिष्ठांना खूश करून घ्याल. जुन्या सहकाऱ्यांशी गाठीभेटीचा योग येईल.

कुंभ ग्रहस्थिती फारशी समाधानकारक नाही तरीही मनोधर्य उत्तम राहील. पुढे काहीतरी चांगले घडेल या आशेवर तुम्ही प्रयत्न करीत राहाल. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांना आकर्षति करण्याकरिता जाहिरात आणि प्रसिद्धीचा तुम्हाला उपयोग होईल. पूर्वीच्या ओळखीमुळे एखादे काम मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी अवघड कामात लक्ष घालावे लागेल. त्याचा सुरुवातीला त्रास होईल. घरामध्ये एखादा बेत निश्चित होण्यापूर्वी त्यावर उलटसुलट चर्चा होईल.

मीन स्वप्न आणि सत्य यामध्ये फरक असतो हे आपल्याला माहीत असते. तरीही आपण स्वप्न पाहायचे थांबत नाही. व्यापार-उद्योगात ‘सबसे बडा रुपैया’ हे लक्षात ठेवून फक्ततुमच्या कामाकडे लक्ष ठेवा. गिऱ्हाईकांना सवलत किंवा सूट देताना तुमचा तोटा होणार नाही याची खात्री करा. नोकरीमध्ये सहकारी आणि वरिष्ठ तुमची स्तुती करून त्यांचा फायदा करून घेतील. बेकार व्यक्तींना नोकरीकरिता तडजोड करावी लागेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com