सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष भाग्य स्थानातील चंद्र-शुक्राचा युती योग आपल्यातील काही सुप्त कलागुणांना व्यक्त करणारा योग आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना कुटुंब सदस्यांसह चर्चा कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा सल्ला योग्य ठरेल. सहकारी वर्गाकडून वेळेत काम पूर्ण करून घेणे जिकिरीचे असेल. जोडीदाराच्या कामाचा व्याप वाढेल. मुलांच्या मताचा कौल घ्याल. फुप्फुसाच्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका.

वृषभ चंद्र-बुधाचा युती योग हा बुद्धिमत्तेला आव्हान देणारा योग आहे. भावनांवर नियंत्रण ठेवून आपली बाजू मांडावी लागेल. नोकरी-व्यवसायात सहकारी वर्गाच्या अपेक्षा पूर्ण कराल. जनमानसात  प्रतिमा अधिक उजळेल. जोडीदाराला त्याच्या मेहनतीच्या मानाने पुरेसा मोबदला मिळणार नाही. मुलांची महत्त्वाची कामे रखडतील. रेंगाळतील. रोगप्रतिकारशक्ती वाढवा. थंडीमुळे स्नायू आखडतील.

मिथुन चंद्र-नेपच्यूनचा लाभ योग हा अति भावुक योग आहे. व्यावहारिक तारतम्य राखणे गरजेचे ठरेल. गरजवंतांना मदतीचा हात पुढे कराल. नोकरी-व्यवसायात आपल्या अधिकाराचा उपयोग करून सामाजिक कार्यात विशेष योगदान द्याल. जोडीदारासह असलेले मतभेद सद्य:स्थितीत बाजूला ठेवाल. मुलांच्या हितासाठी स्वत:च्या मनाला मुरड घालाल. त्वचेवर उष्णतेमुळे पुरळ, पुटकुळय़ा होतील.

कर्क चंद्र-बुधाचा लाभ योग हा चंद्राच्या कृतिशीलतेला बुधाच्या बुद्धिमत्तेची झालर देणारा योग आहे. नोकरी-व्यवसायात नावीन्यपूर्ण कामांमध्ये रस घ्याल. वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण कराल. सहकारी वर्गासह वादाचे मुद्दे टाळावेत. जोडीदाराची मेहनत आणि कष्ट वाया जाऊ देऊ नका. मुलांना त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन द्याल. मानसिक दमणूक अधिक होईल.

सिंह चंद्र-मंगळाचा लाभ योग हा चंद्राच्या कुतूहलाला मंगळाच्या ऊर्जेची जोड देणारा योग आहे. हिमतीने, जिद्दीने आगेकूच कराल. ठाम निश्चय केलात तरच ध्येय गाठाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा आपल्यावरील विश्वास खरा ठरवाल. सहकारी वर्गाला मदतीची, आर्थिक साहाय्याची गरज भासेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. मुलांची प्रगती होईल. कामाचा ताण घेऊ नका.

कन्या चंद्र-गुरूचा लाभ योग हा जीवनाच्या शाळेत नवे धडे शिकवणारा योग आहे. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी सांभाळणे कठीण जाईल. जिद्दीने सामोरे जावे. सहकारी वर्गाबाबत कोणताही किंतु मनात ठेवू नका. जोडीदाराच्या सल्ल्यानुसार पुढे गेल्यास मार्ग सापडेल. मुलांच्या शैक्षणिक मार्गातील अडथळे दूर होतील. मांडय़ा, पोटऱ्या भरून येतील. पायात पेटके येतील. थंडीचा परिमाण होईल.

तूळ पंचम स्थानातील चंद्र-गुरूचा युती योग हा नव्या गोष्टी शिकण्यास प्रोत्साहन देणारा योग आहे. योग्य वेळी योग्य तेच निर्णय घेतल्याने फायदेशीर ठरेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या पाठबळामुळे प्रगती कराल. डोक्यावर कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. जोडीदारासह वादविवाद टाळावेत.  मुलांच्या मानसिकतेचा आत्मीयतेने विचार कराल. तळपाय दुखतील.

वृश्चिक चंद्र-नेपच्यूनचा केंद्र योग हा भावनिक गुंतागुंतीची स्थिती निर्माण करणारा योग आहे. त्यामुळे सतर्क राहा. विचार आणि आचरण यांच्यावर लक्ष केंद्रित करा. नोकरी-व्यवसायात  वरिष्ठ अधिकारी आपल्या कामातील कमतरता शोधतील. सहकारी वर्गाचे साहाय्य मिळेल. जोडीदारासह खेळीमेळीचे संबंध राहतील. मुलांचे स्वातंत्र्य कामी येईल. डोळे चुरचुरतील. काळजी घेणे आवश्यक!

धनू चंद्र-मंगळाचा युती योग हा उत्साहवर्धक, स्फूर्तिदायक योग आहे. आपल्यातील गुणांना वाव मिळेल. नोकरी-व्यवसायात उन्नती होईल. न झेपणारी जबाबदारी स्वीकारू नका. सहकारी वर्गाकडून अपेक्षित साहाय्य मिळेल. जोडीदाराच्या आर्थिक गणिताचा मेळ बसेल. मुलांवरील संस्कार त्यांच्या आचरणातून बघायला मिळतील. पित्तामुळे डोकेदुखी सहन करावी लागेल.

मकर चंद्र-शनीचा लाभ योग हा ज्ञान व विज्ञानाचा कलात्मक योग आहे. नव्या कल्पनांना शास्त्रीय आधार मिळेल. नोकरी-व्यवसायात आर्थिक नियोजन चोख सांभाळाल. जोखीम पत्करू नका. सहकारी वर्गाकडून विशेष काळजी घेण्याची गरज आहे. जोडीदाराची भावनिक स्थिती जपावी लागेल. मुलांसाठी अतिरिक्त खर्च कराल. घशाची काळजी घ्यावी.

कुंभ चंद्र-शुक्राचा लाभ योग हा आपल्या मनाप्रमाणे चोखंदळ निवड करणारा योग आहे. निर्णय घेताना सतर्क राहाल. नोकरी-व्यवसायात कामांना गती येईल. प्रकरणे मार्गी लागतील. वरिष्ठांच्या सल्ल्याने पुढे जाल. जोडीदारासह वेळ आनंदात जाईल. कौटुंबिक जबाबदाऱ्या दोघे मिळून पार पाडाल. मुलांच्या समस्यांना वाचा फोडाल. सर्दी-खोकला होईल.

मीन व्ययस्थानातील चंद्र-नेपच्यूनचा युती योग हा मनातील अस्वस्थता वाढवणारा योग आहे. नोकरी-व्यवसायात  जबाबदारी चोख पार पाडाल. वरिष्ठांच्या पसंतीस उतरणे कठीण असले तरी प्रयत्न सोडू नका. सहकारी वर्गावर विसंबून राहू नका. जोडीदाराच्या कामाचा व्याप वाढेल. घरासंबंधित बाब गुंतागुंतीची होईल. मुलांना प्रोत्साहन द्याल. मणका आणि खांदे दुखतील.

Story img Loader