सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष चंद्र-बुधाचा केंद्रयोग हा आपल्यातील कर्तव्यदक्षता जागरूक ठेवणारा योग आहे. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या पाठिंब्यामुळे नव्या कामात रस दाखवाल. सहकारीवर्गाच्या मदतीने निर्णायक प्रश्नांची उत्तरे सापडतील. जोडीदाराची प्रगती उल्लेखनीय असेल. मुलांच्या बाबतीत अतिविचार करू नका. गुडघे आणि कंबर यांचे दुखणे सहन करावे लागेल. पोषक आहारासह व्यायामही आवश्यक!
वृषभ रवी-चंद्राचा केंद्रयोग हा ‘मानसिक स्थिती जपावी’ असे सूचित करणारा योग आहे. सद्य परिस्थितीकडे नव्या दृष्टिकोनातून बघण्याची गरज भासेल. नोकरी-व्यवसायात आपल्या गुणांची कदर होईल. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. वादविवाद टाळा. मुलांच्या चातुर्याला प्रोत्साहन द्याल. वातावरणातील गारवा आणि शरीरातील उष्णता यांचा समतोल ढासळेल. योग्य ती काळजी घ्यावी.
मिथुन चंद्र-नेपच्यूनचा लाभयोग हा नव्या संकल्पना सुचवणारा योग आहे. त्यावर थोडेबहुत काम करून मग अमलात आणता येतील. घाई नसावी. नोकरी-व्यवसायात रखडलेल्या कामांना गती द्याल. नियमांचे पालन काटेकोरपणे कराल. जोडीदाराला त्याचे निर्णय स्वतंत्रपणे घेऊ द्याल. मुलांचा तणाव कमी करण्याचा प्रयत्न कराल. ओटीपोटाचे दुखणे उद्भवेल. पथ्य पाळणे हिताचे ठरेल.
कर्क चंद्र-शनीचा लाभयोग हा भावनांवर नियंत्रण ठेवणारा योग आहे. अडीअडचणीतून मार्ग काढत पुढे जाताना अतिरिक्त ऊर्जा खर्च होईल. नोकरी-व्यवसायात सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास हितशत्रूंचा त्रास जाणवणार नाही. जोडीदाराचा सल्ला मानाल. मुलांच्या हिताचा विचार करताना अस्वस्थ व्हाल. पचनाच्या तक्रारी वाढल्यास औषधोपचार व पथ्य यावर भर द्यावा. विश्रांती आवश्यक!
सिंह चंद्र-मंगळाचा नवपंचमयोग हा उत्साहवर्धक योग आहे. परिस्थितीत हळूहळू बदल होत जाईल. काही बाबतीतील अट्टहास सोडून दिल्याने काम सुरळीतपणे होईल. नोकरी-व्यवसायात सहकारीवर्गाची साथ उल्लेखनीय असेल. मनाविरुद्ध घटनांमुळे होणारी चिडचिड कमी करावी. जोडीदाराचा समंजसपणा कामी येईल. मुलांना जबाबदारीची जाण येईल. रक्तदाब नियंत्रणात ठेवा.
कन्या चंद्र-शुक्राचा केंद्रयोग हा चिकित्सा करणारा योग आहे. काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणेच व्हाव्यात असा आग्रह धराल. नोकरी-व्यवसायात नव्या पद्धतीचा स्वीकार करणे अवघड जाईल. वरिष्ठांना तक्रारीस जागा ठेवू नका. जोडीदाराचे काम वेग घेईल. कौटुंबिक समस्यांवर उपाय सापडेल. डोळय़ासंबंधित आजार-विकार झाल्यास त्याचे लवकरात लवकर निदान होणे आवश्यक!
तूळ मंगळ आणि हर्षल या दोन बलवान ग्रहांचा नवपंचमयोग हा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगतिकारक ठरेल. संशोधनात्मक अभ्यास कराल. नोकरी-व्यवसायातील बऱ्याच खाचाखोचा जाणून घ्याल. जोडीदाराचा अंदाज खरा ठरेल. त्याच्या मेहनतीला फळ मिळेल. मुलांची उन्नती होईल. तळपायाची जळजळ होईल. वातावरणातील बदलाचा योग्य सामना करावा.
वृश्चिक चंद्र-बुधाचा नवपंचमयोग हा मनावर विचारांचा ताबा ठेवणारा योग आहे. सारासार विचार करून निर्णय घ्याल. नोकरी-व्यवसायात नवे विचार, संकल्पना वरिष्ठांपुढे मांडाल. सहकारी वर्गाशी सामंजस्याने वागा. जोडीदाराला आर्थिक नफा होईल. कौटुंबिक वातावरण संमिश्र असेल. मुलांचा कल पाहून सूचना कराव्यात. सर्दी, पडसे, डोकेदुखीचा त्रास जाणवेल. विश्रांती आवश्यक!
धनू चंद्र-शुक्राचा नवपंचमयोग हा नवनिर्मितीला पूरक असलेला योग आहे. राशी स्वामी गुरूच्या साहाय्याने अडकून पडलेली कामे मार्गी लागतील. नोकरी-व्यवसायात आर्थिक गणिते नव्याने मांडाल. वरिष्ठांचाी मर्जी सांभाळाल. सहकारीवर्गाची मदत मिळेल. जोडीदाराचे घरातील व्यवस्थापन उल्लेखनीय असेल. मुलांना मानसिक आधार द्याल. त्वचेची काळजी घ्यावी.
मकर रवी-चंद्राचा लाभयोग हा मानसन्मान देणारा आणि कीर्ती पसरवणारा योग आहे. नोकरी-व्यवसायात सचोटीने आपली मते मांडाल. वरिष्ठांच्या नियमानुसारच आपले पुढचे पाऊल टाकाल. सहकारीवर्गाकडून फारशा अपेक्षा न ठेवणे बरे! जोडीदाराच्या कामाचा मोबदला चांगला मिळेल. बदलती परिस्थिती अंगवळणी पडेल. श्वासाचे विकार बळावतील. थंडीपासून सांभाळा.
कुंभ चंद्र-गुरूचा लाभयोग हा नव्या योजनेसाठी मार्गदर्शक ठरणारा योग आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने पुढचे पाऊल टाकाल. नोकरी-व्यवसायात अडचणींवर मात करून महत्त्वाचे निर्णय घ्याल. वरिष्ठांशी केलेल्या चर्चा यशस्वी होतील. सहकारीवर्गाला योग्य वेळी मदत कराल. जोडीदाराशी वागता बोलताना गैरसमज टाळावा. मुलांच्या कामात वा अभ्यासात अडथळे येतील. डोळे जपा.
मीन चंद्र-मंगळाचा केंद्रयोग हा मानसिक चंचलता वाढवणारा योग आहे. अधीरता वाढेल. संयम राखणे महत्त्वाचे ठरेल. नोकरी-व्यवसायात मनाविरुद्ध घटनांचा बारकाईने विचार कराल. झटकन प्रतिक्रिया व्यक्त करू नका. सहकारी वर्गाचा सल्ला उपयुक्त ठरेल. कुटुंबातील सदस्यांना नव्या संधी उपलब्ध होतील. जोडीदारासह आनंदात वेळ घालवाल. प्रेमाचे बंध दृढ होतील.