विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

मेष –एखाद्या नवीन कल्पनेने तुम्ही या आठवडय़ामध्ये बेफाम व्हाल. त्याकरिता किती पैसे गेले याचा विचारही तुमच्या मनात येणार नाही.  व्यापार-उद्योगात मालाची विक्री आणि उलाढाल वाढेल. कारखानदार व्यक्ती प्रगतीचा एक नवीन उच्चांक प्रस्थापित करतील. नोकरीच्या ठिकाणी केलेले काम नीट तपासून पाहा. छोटी-मोठी चूक राहण्याची शक्यता आहे. घरामध्ये प्रत्येकाची इच्छा पूर्ण करण्याचा तुमचा मानस असेल.

वृषभ –एखादी गोष्ट करायची नाही, असे आपण मनाशी ठरवितो, पण तीच गोष्ट करण्याचा मोह या आठवडय़ात तुम्हाला होण्याची शक्यता आहे. हितचिंतकांचा सल्ला उपयोगी पडेल. व्यापार-उद्योगात एखादे नवीन प्रोजेक्ट तुमचे लक्ष आकर्षति करेल. थोडे काम केल्यानंतर तुमच्या असे लक्षात येईल की यातून आपल्याला फारशी कमाई होणार नाही. नोकरीच्या ठिकाणी तुमची दगदग, धावपळ वाढेल.

मिथुन – अनेक वेळेला तुम्ही व्यवहारी बनायचे ठरवाल, पण आयत्या वेळी तुम्ही एखादी गोष्ट आपल्या मर्यादेबाहेर जाऊन करता. या आठवडय़ात या स्वभावावर नियंत्रण ठेवा. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांच्या गोड बोलण्याला भुलून जाऊ नका. स्वत:चे नुकसान करून घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी कोणत्या कामाला किती महत्त्व द्यायचे हे नीट ठरवा. घरामध्ये हौसेला मोल नसते, याचा अनुभव येईल.

कर्क- इतरांच्या कलाने वागणारी तुमची रास आहे. पण या आठवडय़ात तुमची हट्टी वृत्ती दिसून येईल. जे तुम्हाला पाहिजे आहे ते मिळविण्याकरिता हट्ट कराल. व्यापार-उद्योगामध्ये बाजारातील प्रतिष्ठा वाढविण्याकरिता एखादी युक्ती कराल. सामाजिक संस्थेच्या कार्यामध्ये लक्ष घालाल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला काम संपवायची घाई असेल. पण वरिष्ठ मात्र तुम्हाला मोकळीक देणार नाहीत. घरामध्ये पाहुणचार करताना तुमची दमछाक होईल.

सिंह –आठवडय़ाच्या सुरुवातीला तुम्ही खूप मोठय़ा गप्पा माराल, पण ज्या वेळेला प्रत्यक्ष काम करण्याची वेळ येईल त्या वेळी तुमचा हात आखडता घ्याल. व्यापार-उद्योगात पूर्वीची देणी द्यायची असतील तर त्याला प्राधान्य द्या. नोकरीच्या ठिकाणी ज्या कामात पूर्वी आळस केला होता ते काम तातडीने तुम्हाला पूर्ण करावे लागेल. घरामध्ये वडिलोपार्जति प्रॉपर्टी किंवा नवीन वास्तूविषयी एखादा निर्णय होण्याची शक्यता आहे.

कन्या- ग्रहमान तुमचा आनंद व उत्साह वाढविणारे आहे. ज्या कामाकरिता तुम्ही प्रयत्न करीत होतात ते काम मार्गी लागल्यामुळे तुम्ही चांगल्या मूडमध्ये असाल. व्यापार-उद्योगात एखाद्या नवीन प्रोजेक्टचा श्रीगणेशा होईल. नोकरीच्या ठिकाणी  महत्त्वाचा निर्णय वरिष्ठांच्या परवानगीशिवाय निश्चित करू नका. घरामध्ये आपुलकीच्या व्यक्तीचे पाय लागतील. रक्तदाब किंवा पोटाचे विकार असतील तर योग्य ती काळजी घ्या.

तूळ – तुमचा स्वभाव भिडस्त आहे. कोणालाही नाही म्हणणे जमणार नाही. या आठवडय़ात सर्वाना खूश ठेवण्याचा प्रयत्न कराल. नोकरीमध्ये तुमचा अतिउत्साह आवरा. नाहीतर वरिष्ठ एखादे न आवडणारे काम तुमच्या गळ्यात पाडतील. घरामध्ये एखाद्या समारंभाच्या निमित्ताने छोटय़ा प्रवासाचे योग ठरतील. पाहुण्यांची सरबराई कराल.  प्रिय व्यक्तीला भेटण्याचा आनंद मिळेल.

वृश्चिक-सणाचे दिवस आणि तुमच्या हातामध्ये चार पैसे खुळखुळल्यामुळे तुम्ही आता खूश असाल. आपली एखादी मनोकामना पूर्ण करायचे ठरवाल.  व्यापार-उद्योगात पशाचा ओघ सतत चालू राहिल्यामुळे तुमची कितीही काम करण्याची तयारी असेल. बाजारपेठेमध्ये स्वत:ची प्रतिष्ठा वाढविण्याकरिता तुम्ही एखाद्या कार्यक्रमात भाग घ्याल. नोकरीच्या ठिकाणी संस्थेकडून मिळणाऱ्या सवलतींचा पुरेपूर फायदा उठवाल.

धनू या आठवडय़ात तुमचे ग्रहमान स्फूर्तिदायक आहे. व्यापार-उद्योगाच्या ठिकाणी कितीही काम केले तरी तुम्हाला दमल्यासारखे वाटणार नाही. प्रत्यक्ष पैसे मिळाले नाही तरी त्याची चांगली सोय होईल. बेकार व्यक्तींना नोकरी मिळेल. चालू नोकरीत एखादी जबाबदारी तुम्ही लांबवली असेल तर ती स्वत:हून हातात घ्याल. घरामध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या पाहुण्यांचे आदरातिथ्य कराल. एखाद्या सामूहिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.

मकर-तुमची रास संयमी आहे. कोणताही निर्णय तुम्ही घाईने घेत नाही. पण या आठवडय़ामध्ये स्वत:च्या इच्छापूर्तीकरिता तुम्ही पैसे खर्च कराल वा तयार व्हाल. व्यापार-उद्योगात बाजारपेठेमध्ये आपले महत्त्व वाढवावे या उद्देशाने एखादी सवलत किंवा सूट द्याल. गिऱ्हाईकाकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या परवानगीशिवाय महत्त्वाचा निर्णय अमलात आणू नका.

कुंभ  अनेक विचार आणि अनेक कल्पना मनात घोळत असल्यामुळे कशाला महत्त्व द्यायचे असा तुमच्यापुढे प्रश्न असेल. व्यापार-उद्योगात भरपूर काम असेल. अनोळखी व्यक्तीवर एकदम विश्वास ठेवू नका. नोकरीमध्ये एका वेळी सर्व काम न करता प्रत्येक कामाला न्याय द्या. सहकाऱ्यांशी फटकून न वागता त्यांच्याशी गोड बोला. घरामध्ये तुम्ही सर्व काही चांगले कराल, पण तुमचा हट्ट आणि राग इतरांना आवडणार नाही.

मीन –स्वभावत: तुम्ही खूप संवेदनशील आहात. सभोवतालच्या व्यक्तीच्या वागण्या-बोलण्याचा तुमच्यावर फार पटकन परिणाम होतो. या आठवडय़ात अशा मूडमध्ये असताना कोणतेही वेडेवाकडे निर्णय घेऊ नका. व्यापार-उद्योगातील पैशाची गुंतवणूक विचारपूर्वक करा. नोकरदार व्यक्तींनी वरिष्ठांच्या शब्दाला मान द्यावा. घरामध्ये नवीन वास्तू किंवा वाहन खरेदीचा योग संभवतो.

Story img Loader