सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष चंद्र-हर्षलचा लाभ योग हा संशोधनात्मक प्रगतीला पोषक योग आहे. एखाद्या गोष्टीचा नव्याने विचार कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांकडून आवश्यक तो पाठिंबा मिळेल. थोडे सबुरीने घेतल्यास विशेष लाभ मिळतील. सहकारी वर्गाच्या अडचणी समजून घ्याल. त्यांच्यातील गुणांचा गरजेनुसार उपयोग होईल. जोडीदाराच्या कामकाजाला नव्याने उभारी येईल. त्याच्या संकल्पनांना मान्यता मिळेल. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीतील अडथळे दूर होतील. पित्त-अपचन संभवते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वृषभ चंद्र-शुक्राचा नवपंचम योग हा कामातील आकर्षकता वाढवणारा योग आहे. रेखीव मांडणी सर्वाच्या मनात भरेल. नोकरी-व्यवसायात योजलेली कामे वेळेत पूर्ण कराल. अभ्यासात्मक वाचन आणि प्रभावी लेखनाचा चांगला परिणाम होईल. वरिष्ठांचे निर्णय लाभदायक ठरतील. सहकारी वर्गावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण होईल. ताण कमी होईल. जोडीदाराचा चिडचिडा स्वभाव सहन करावा लागेल. मुलांच्या समस्या चर्चेने सुटतील. मणक्याचा खालचा भाग दुखेल. औषधोपचार घ्यावा.

मिथुन चंद्र-नेपच्यूनचा युती योग हा उत्स्फूर्तता देणारा योग आहे. वाचन, लेखन आणि सादरीकरण अत्यंत प्रभावी असेल. नोकरी-व्यवसायात वैचारिक देवाणघेवाण होईल. सभेपुढे वरिष्ठ आपले कौतुक करतील. जबाबदारी वाढल्याचे भान ठेवा. सहकारी वर्गाला आपला आधार वाटेल. गरजवंतांना मदतीचा हात पुढे कराल. जोडीदाराची कामे रखडतील. मुलांच्या कष्टाचे चीज होण्यासाठी त्यांनी धीराने सामोरे जावे. उष्णतेचे विकार बळावतील. ऋतुमानानुसार आहारात बदल आवश्यक!

कर्क बुध-शुक्राचा लाभ योग हा व्यवहार आणि नाती सांभाळणारा योग आहे. बुधाच्या व्यावहारिक दृष्टीला शुक्राच्या कलात्मकतेची जोड मिळेल. नोकरी-व्यवसायात प्रवास लाभदायक ठरेल. नवे करार कराल. ज्येष्ठ वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. सहकारी वर्गाच्या साथीने जबाबदारी पूर्ण कराल. तणावपूर्ण वातावरणात हलकेपणा आणाल. जोडीदार स्वत:च्या कार्यक्षेत्रात विशेष ठसा उमटवेल. मुलांना कर्तव्याची जाण करून द्यावी. साथीजन्य आजार टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी.

सिंह चंद्र-गुरूचा लाभ योग हा ज्ञानवर्धक आणि मार्गदर्शक ठरेल. नोकरी-व्यवसायात विशेष प्रशिक्षण मिळेल. अधिकाराचा योग्य ठिकाणी उपयोग कराल. वरिष्ठांचा पाठिंबा सत्कारणी लावाल. सहकारी वर्गाकडून काम करून घेताना थोडे कठोर व्हावे लागेल. तरीही शब्द जपून वापरावेत. जोडीदाराच्या कामाची पद्धत बदलल्याने वेळेचे गणित जुळायला थोडा काळ जाऊ  द्यावा. मुलांनी आपल्या कामात अधिक मेहनत घ्यावी. उष्णतेमुळे त्वचेचे विकार बळावतील. पाठीचा मणका जपावा.

कन्या चंद्र-बुधाचा समसप्तम योग हा स्मरणशक्तीला पूरक ठरणारा असा योग आहे. बुद्धिमत्तेचे आव्हान पेलण्याची तयारी दाखवाल. नोकरी-व्यवसायात जुन्या ओळखी नव्याने ताज्या होतील. कामाला गती येईल. सहकारी वर्ग सूचनांतील योग्य बारकावे टिपून त्यावर आवश्यक ती कार्यवाही करेल. जोडीदारासह चांगले सूर जुळतील. दोघे मिळून सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. नातेवाईकांसाठी धावपळ कराल. पित्ताशयासंबंधित त्रास वाढेल. पथ्य आणि विश्रांती आवश्यक ठरेल.

तूळ चंद्र-शनीचा केंद्र योग जिद्द निर्माण करणारा योग आहे. चंद्राच्या चंचल वृत्तीला शनी शिस्तीचा बडगा दाखवेल. स्वयंशिस्त अंगी बाणवाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांसह बोलताना योग्य सावधगिरी बाळगावी. सहकारी वर्गाच्या मदतीने कामातील बारकावे चांगल्या प्रकारे हाताळाल. जोडीदाराच्या अतिरिक्त खर्चाला आळा घालावा लागेल. मुलांची प्रगती समाधानकारक राहील. कौटुंबिक वातावरणात उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न कराल. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणे ठीक नाही.

वृश्चिक रवी-चंद्राचा समसप्तम योग हा पौर्णिमेचा बलवान योग आहे. आपल्यातील गुणांची कीर्ती इतरत्र पसरेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मोठय़ा जबाबदाऱ्या स्वीकाराल आणि पूर्ण कराल. सहकारी वर्गाला आर्थिक मदतीची अपेक्षा असेल. एखाद्याला शब्द दिल्यास त्याची पूर्तता करावी. जोडीदाराला त्याच्या कार्यात यश आणि सन्मान मिळेल. मुलांना काही निर्णय हिमतीने घ्यावे लागतील. आपले मार्गदर्शन त्यांना साहाय्यकारी ठरेल. खांदे आणि मान दु:खी संभवते.

धनू चंद्र-मंगळाचा समसप्तम योग हा उत्साह आणि उत्सुकतावर्धक योग आहे. चांगल्या आणि सर्वाच्या हिताच्या गोष्टींचा विशेष आग्रह धराल. नोकरी-व्यवसायात मोठय़ा धीराने इतरांच्या विरोधाला सामोरे जाल. सहकारी वर्गाकडून फारशा अपेक्षा न ठेवता ‘आपला हात जगन्नाथ’ हे तत्त्व अवलंबावे. जोडीदाराच्या कष्टाचे चीज होईल. मुलांना नवे क्षेत्र खुले होईल. नातेवाईकांची मदत मिळेल. डोळ्यांची काळजी घ्यावी. उष्णतेमुळे डोळे चुरचुरणे, लाल होणे संभवते.

मकर मंगळ-गुरूचा नवपंचम योग हा कामात यश आणि उत्साह देणारा योग आहे. मंगळाची ऊर्जा आणि गुरूची सात्त्विकता यांच्यामुळे सत्कार्य घडेल. नोकरी-व्यवसायात आपले म्हणणे इतरांपुढे मांडताना आत्मविश्वासपूर्वक विधाने कराल. नवे करार कराल. सहकाऱ्यांशी हेवेदावे कमी होतील. अपेक्षित गोष्टी घडण्यास अवकाश आहे. धीर धरा. जोडीदाराला कामातील मेख उमजेल. मुलांच्या बाबतीत थोडा धाक आवश्यक ठरेल. रक्तातील घटकांचे प्रमाण कमी-अधिक होण्याची शक्यता!

कुंभ रवी व गुरू या दोन बलाढय़ ग्रहांचा नवपंचम योग हा हाती घेतलेले अनेक संकल्प पूर्ण करण्यात मदत करेल. आपली कीर्ती पसरवेल. नोकरी-व्यवसायात यश मिळेल. अडचणी दूर होतील. वरिष्ठ आणि सहकारी वर्ग यातील दुवा बनाल. आर्थिक बाबतीत महत्त्वाचे निर्णय लांबणीवर पडतील. जोडीदाराच्या कामाची गती मंदावली तरी त्याने सातत्य सोडू नये. मुलांना आपल्या मार्गदर्शनाची गरज भासेल. पथ्य, व्यायाम आणि विश्रांती या त्रिसूत्रीचे पालन करा.

मीन चंद्र-शनीचा लाभ योग हा चिकाटी आणि सातत्य टिकवणारा योग आहे. लहानशा अपयशाने खचून न जाता अधिक मेहनत घ्याल. नोकरी-व्यवसायात आपला निभाव लागण्यासाठी आत्मविश्वासपूर्वक मुद्दे मांडणे आवश्यक आहे. सहकारी वर्गाच्या मदतीने प्रकल्पाचा विशेष अभ्यास कराल. जोडीदाराची साथ चांगली मिळेल. त्याच्या कामातील अडचणींवर तो शिताफीने मात करेल. मुलांच्या भावना समजून घ्याल. उष्णतेचे विकार आणि अपचन यांचा त्रास संभवतो. काळजी घ्यावी.

मराठीतील सर्व भविष्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astrology from 15th to 21st october 2021 rashibhavishya bhavishya zodiac sign astro horoscope