सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष चंद्र-शुक्राचा लाभ योग आपल्या आवडीनिवडी जपणारा, आपले छंद जोपासणारा योग आहे. नातीगोती जपाल. नोकरी-व्यवसायात उच्च पद भूषवाल. वरिष्ठांचा पािठबा मिळेल. सहकारी वर्गाशी वाद घालू नका. डोळय़ातून पाणी वा चिकट द्रव पाझरण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे प्रयत्न सफल होतील. मुलांसाठी अधिक खर्च करावा लागेल. कौटुंबिक वातावरण उत्साही आणि आनंदी राहील.
वृषभ चंद्र-शनीचा लाभ योग हा मेहनतीला सातत्याची जोड देणारा योग आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील खाचखळगे प्रकर्षांने ध्यानात घ्याल. उत्सर्जन संस्थेवर अतिरिक्त भार पडेल. शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचा समतोल सांभाळावा. नोकरी-व्यवसायात सहकारी वर्गाकडून कामे करून घेताना खूप मेहनत घ्यावी लागेल. जोडीदाराचे त्याच्या कामातील वर्चस्व वाढेल. नातेवाईकांची मदत मिळेल.
मिथुन चंद्र-नेपच्यूनचा लाभ योग हा मनाची स्थिती दोलायमान करणारा योग आहे. उष्णतेचे विकार बळावतील. थंड प्रकृतीचा आहार घ्यावा. नोकरी-व्यवसायात काटेकोरपणा असणे गरजेचे असेल. वरिष्ठांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. सहकारी वर्गाच्या कामातील त्रुटी सुधारण्याचा प्रयत्न कराल. जोडीदार आपल्या कामात आगेकूच करेल. त्याला नव्या संधी उपलब्ध होतील.
कर्क चंद्र-बुधाचा लाभ योग हा मानसिक आणि वैचारिक समतोल राखणारा असा योग आहे. अशा योगामुळे विचारांची बैठक भक्कम होईल. निर्णय घेताना सुलभता येईल. अतिकामामुळे दमणूक होईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या रागाला सामोरे जावे लागेल. जोडीदाराच्या गुणांना वाव मिळेल. मुलांच्या आवडीनिवडी जपाल. मित्रपरिवाराच्या भेटीगाठी व ज्येष्ठांचा सहवास लाभेल.
सिंह चंद्र-शुक्राचा केंद्र योग प्रेमाचा अधिकार गाजवणारा योग आहे. आपल्या मनाप्रमाणे वागण्यात आनंद मिळेल. संमिश्र हवामानाचा परिणाम आपल्या त्वचेवर होईल. लाल-काळे चट्टे येतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. सहकारी वर्गाची मदत मिळाल्याने कामाला वेग येईल. जोडीदाराच्या कष्टाचे फळ मिळेल. मुलांबाबतच्या निर्णयाचा शांतपणे पुनर्विचार करावा.
कन्या चंद्र-बुधाचा युती योग हा व्यावहारिकतेला भावनिक ओलावा देणारा योग आहे. त्यामुळे नातेसंबंध टिकवून ठेवाल. अपचनाच्या तक्रारी वाढतील. खाण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक भासेल. नोकरी-व्यवसायात समयसूचकता, तारतम्याने नुकसान कसे टाळता येईल याचा विचार कराल. सहकारी वर्गाच्या गुणांचे कौतुक कराल. जोडीदाराला कामाचे नियोजन योग्य प्रकारे करावे लागेल.
तूळ चंद्र-मंगळाचा केंद्र योग धाडसाला आक्रमक स्वरूप देणारा योग आहे. थोडे सबुरीने घ्यावे. त्वचा विकार आणि रक्तदोष वाढतील. औषधोपचार घ्यावेत. नोकरी-व्यवसायात ताणतणाव कमीअधिक प्रमाणात सहन करावा लागेल. सहकारी वर्गाचे अपेक्षित साहाय्य मिळेल. जोडीदाराचा हट्ट पुरवताना दमछाक होईल. मुलांसाठी केलेले प्रयत्न फळास येतील.
वृश्चिक रवी-चंद्राचा लाभ योग हा उत्कर्षकारक आणि यशदायक योग आहे. मेहनतीचे फळ मिळेल. सचोटीची प्रशंसा होईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. सहकारी वर्गावर आपली मुख्य मदार असेल. वाढत्या उष्णतेचे परिणाम अन्नपचन आणि शारीरिक ताकदीवर दिसून येतील. थकवा जाणवेल. मुलांच्या अभ्यासात अडथळे येतील. मित्र-परिवाराची मदत मिळेल.
धनू बुध-शनीचा लाभ योग हा कायदेविषयक चर्चा आणि विचारांत यश देणारा योग आहे. नोकरी-व्यवसायातील कामे कायद्याच्या चाकोरीत राहून पूर्णत्वास न्याल. वरिष्ठ मंडळींकडून याची योग्य ती दखल घेतली जाईल. वात आणि पित्ताचे प्रमाण वाढेल. काळजी घेतल्यास त्रास मर्यादित राहील. जोडीदार आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर यशाच्या दिशेने वाटचाल करेल.
मकर रवी-बुधाचा युती योग हा बुधाचा अस्तदर्शक योग आहे. मान-सन्मान राखण्यासाठी विवेकी विचार बाजूला साराल. आपल्या मतावर अडून राहाल. नोकरी- व्यवसायात नवे धोरण स्वीकाराल. वरिष्ठांचा दृष्टिकोन थोडाबहुत बदलण्यात यश मिळेल. सहकारी वर्गाच्या साथीने हाती घेतलेल्या कामाला गती मिळेल. आर्थिक आढावा घेऊन खर्चाचे नियोजन आखाल.
कुंभ चंद्र-गुरूचा लाभ योग हा आपल्या व्यक्तिमत्त्वातील खासियत खुलावणारा योग आहे. अभ्यासू वृत्तीने समोर आलेल्या परिस्थितीचा साकल्याने विचार कराल. अंतिम निर्णय जाहीर करण्याची घाई करू नका. नोकरी-व्यवसायात संयम उपयुक्त ठरेल. वरिष्ठ आपल्या गुणवत्तेची कदर करतील. उष्णतेमुळे शारीरिक ऊर्जा कमी पडेल. विश्रांतीचीदेखील गरज भासेल.
मीन चंद्र-मंगळाचा लाभ योग हा चंद्राच्या कमजोरीवर मात करणारा योग आहे. बलवान मंगळामुळे धीराने घ्याल. अडचणीतून मार्ग काढत पुढे जाताना मनोबल मिळेल. नोकरी-व्यवसायात सहकारी वर्ग मदत करेल. आपली बाजू ठामपणे मांडायला शिका. मणक्याचा त्रास उद्भवण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या साथीने कौटुंबिक समारंभ यशस्वीरीत्या साजरा कराल.