मेष ज्या बदलांची नांदी वर्षांच्या सुरुवातीला झाली होती, ते बदल आता नजरेच्या टप्प्यात येतील. त्याची मानसिक तयारी करा. व्यापारउद्योगाच्या क्षेत्रात आवश्यक ते बदल करून ठेवण्याची तुमची तयारी असेल. नोकरीमध्ये तुमच्या गुणांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यासाठी संस्थेकडून एखादा प्रस्ताव दिला जाईल. काहींना परदेशी जाता येईल. नवीन जागेचे बुकिंग केले असल्यास तेथे स्थलांतर होण्याची शक्यता आहे.

वृषभ तुमची रास कुटुंबवत्सल रास असल्यामुळे तुमचे लक्ष नेहमी घरावरती केंद्रित झालेले असते. व्यापार-उद्योगात व्यावसायिक कामांना गती देण्यासाठी जो निर्णय घ्याल, त्याचे भविष्यात काय परिणाम होतील त्याचा नीट विचार करा. नोकरीच्या ठिकाणी स्वत:चे महत्त्व वाढविण्याकरिता वरिष्ठांच्या पुढे पुढे कराल. तुमच्यावरती वरिष्ठ वेगवेगळी कामे सोपवून मोकळे होतील. नवीन नोकरीच्या प्रयत्नात यश मिळेल. घरामध्ये लांबच्या भांवडांसंबधी किंवा मुलांसंबंधी एखादा ठोस निर्णय घ्यावा लागेल.

मिथुन ज्या कामाविषयी तुम्हाला खूप भीती वाटत होती, ते काम आता तुम्ही स्वत:हून हातात घ्याल. सभोवतालच्या व्यक्तींना थोडेसे आश्चर्यच वाटेल. व्यापार-उद्योगात एखादा धडाकेबाज निर्णय घ्याल. परदेश व्यवहार असणाऱ्यांना तेथे फेरफटका करावासा वाटेल. नोकरीच्या ठिकाणी जे काम इतरांना जमलेले नव्हते ते काम वरिष्ठ तुमच्यावर सोपतील. एखादी शक्कल लढवून त्यामध्ये सफल व्हाल. घरात शुभकार्य ठरण्याची शक्यता आहे.

कर्क वास्तविक पाहता तुमची राहणी साधी आहे. व्यापार-उद्योगात कामाचा वेग वाढविण्याकरिता आधुनिक तंत्राचा वापर करावासा वाटेल. त्यानिमित्ताने आवश्यक त्या सुविधा खरेदी कराल. पूर्वीच्या चांगल्या कामामुळे नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. बेकार व्यक्तींना काम मिळेल. ज्यांना नोकरीत बदल करण्याची इच्छा आहे, त्यांना चांगले ग्रहमान आहे.  घरामध्ये तुमचा शब्द खाली पडू देणार नाही. सर्वजण तुमच्यावर खूश असतील.

सिंह पेरल्याशिवाय उगवत नाही, याची आठवण करून देणारे हे ग्रहमान आहे. व्यापार-उद्योगात नेहमीपेक्षा थोडेसे कमी काम असल्यामुळे तुम्ही  चिंतेत पडाल. तुमच्या गरजेइतके पसे सप्ताहाच्या अखेरीपर्यंत मिळतील. नोकरीमध्ये नवीन काम तुम्हाला आवडेल. परंतु पूर्वीचे काम तुमचा पिच्छा सोडणार नाही. एखाद्या सामूहिक कामात तुम्ही पुढाकार घ्याल. घरामध्ये प्रिय व्यक्तींचे मन सांभाळण्याकरिता तुमची तारेवरची कसरत होईल.

कन्या आजकालच्या जगात बहुतांशी इच्छा-आकांक्षा पूर्ण करायला एका गोष्टीची गरज असते, ती म्हणजे ‘एस टॉनिक’ ते तुमच्याकडे असल्यामुळे तुम्ही आनंदी आणि उत्साही दिसाल. व्यापार-उद्योगात जास्त पसे मिळवण्यासाठी ‘आज रोख उद्या उधार’ असे धोरण ठेवाल. मात्र स्वत:च्या गरजा भागवताना खर्चाचा विचार करणार नाही, हे वागणे इतरांना खटकेल. इतर कामे युक्तीने टाळाल. काहीजणांना परेदशी जाण्याची संधी मिळेल. घरात तुम्ही तुमच्या मतलबाकरिता इतरांशी गोड बोलाल. एखाद्या सदस्याला जीवनातील चांगली बातमी कळेल.

तूळ ज्या कामाविषयी आपल्या मनात भीती असते, ते काम व्यवस्थितपणे पार पडल्यावर आपला आत्मविश्वास वाढतो. या आठवडय़ात तुम्ही काहीतरी चांगले काम करून दाखवाल. व्यापार-उद्योगात पशाची आवक वाढल्यामुळे महत्त्वाचे बेत हाती घ्याल. नोकरीच्या ठिकाणी विशिष्ट प्रोजेक्टच्या निमित्ताने तुम्हाला जादा अधिकार मिळतील. ज्यांना नोकरीत बदल करायचा असेल त्यांना चांगले ग्रहमान आहे. घरामध्ये तुम्ही इतरांवर अधिकार गाजवाल त्याचा इतरांना थोडासा राग येईल.

वृश्चिक अत्यंत चिवट आणि चिकट अशी तुमची रास आहे. कठीण परिस्थितीत तुम्ही शांत राहता. आता ग्रहमान चांगले असल्यामुळे गेल्या दोन-तीन महिन्यांत तुम्ही जी गरसोय सहन केलीत त्याची कसर भरून काढायची असे तुम्ही ठरवाल. व्यापार-उद्योगात पुढील चार महिन्यांत प्रगती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींची तयारी करून ठेवाल. नोकरीच्या ठिकाणी लांबलेले प्रोजेक्ट सुरू होण्याची शक्यता दिसू लागेल.  घरातील प्रत्येक कामात तुमचा पुढाकार राहील.

धनू ग्रहमान पेरल्याशिवाय उगवत नाही याची आठवण करून देणारे आहे. जे काम तुम्ही करणार आहात त्याचे फळ तुम्हाला एक-दोन आठवडय़ांनंतर मिळेल. व्यापार-उद्योगात अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करून टाका. सरकारी कामे किंवा कोर्टव्यवहारात विलंब करून चालणार नाही.  नोकरीच्या ठिकाणी एखादे काम इतका वेळ घेईल की बाकी कामे बाजूला ठेवावी लागतील. नवीन नोकरीच्या प्रयत्नांत धीर सोडून चालणार नाही.

मकर जी संधी पुढे आहे त्याचा ताबडतोब फायदा घ्या. जी संधी येणार आहे त्याची वाट बघत बसू नका. व्यापार-उद्योगात नजीकच्या भविष्यात काहीतरी भव्य-दिव्य करावेसे वाटेल. व्यावसायिक जागेचे नूतनीकरण करण्याचा तुमचा इरादा असेल. नोकरीच्या ठिकाणी कामाच्या स्वरूपामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. ज्यांना नवीन नोकरी शोधायची आहे त्यांनी ताबडतोब प्रयत्न करावेत. घरामध्ये प्रत्येक निर्णयामध्ये तुमचे वर्चस्व असेल. त्याचा काही जणांना राग येईल. मुलांच्या प्रगतीचा प्रश्न सुटेल.

कुंभ ग्रहमान तुमची दगदग आणि धावपळ वाढविणारे आहे. जी कामे तुम्ही इतरांवर सोपवली होती त्यामध्ये स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असा अनुभव येईल. त्यामुळे आळस झटकून कामाला लागा. व्यापार-उद्योगात सरकारी कामे आणि कोर्टव्यवहारामध्ये बराच वेळ जाईल. पशाच्या व्यवहारामध्ये काटेकोर राहा. नोकरीच्या ठिकाणी पूर्वी झालेली चूक निस्तरावी लागेल. अनपेक्षित गोष्टी डोके वर काढतील. घरामध्ये तुम्ही दिलेला सल्ला सर्वाना उपयोगी पडेल.

मीन स्वभावत: तुम्ही अत्यंत चंचल आहात, या स्वभावाचा या आठवडय़ात प्रत्यय येईल. व्यापार-उद्योगात कामाचे प्रमाण वाढविण्याकरिता सध्याच्या कार्यपद्धतीत बदल कराल. व्यावसायिक जागेचे सुशोभीकरण करण्याचे विचार मनात येतील. नोकरीमध्ये वरिष्ठांची आज्ञा बदलत राहील. घरामध्ये अचानक पाहुण्यांची हजेरी  लागेल. तुमचे पूर्वी ठरलेले कार्यक्रम बदलावे लागतील.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

Story img Loader