मेष ग्रहमान म्हणजे कळतं पण वळत नाही अशी परिस्थिती निर्माण करणारे आहे. कारखानदारांना कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्याकरिता पशांची विशेष तरतूद करावी लागेल. व्यापारीवर्गाला कामाचा व्याप वाढल्यामुळे उसंत मिळणार नाही. नोकरीच्या ठिकाणी जो काम करतो त्याच्याच मागे काम लागते असा अनुभव येईल. घरामधला माहोल आनंदी आणि उत्साही असेल. आवडीची व्यक्ती आजूबाजूला नसल्यामुळे  पोकळी जाणवेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ ग्रहमान तुम्हाला एकदम हलक्याफुलक्या मूडमध्ये ठेवणारे आहे. कोणाला काय वाटते याचा विचार न करता तुम्ही तुमच्याच पद्धतीने वागण्या-बोलण्याचे ठरवाल. व्यवसाय-उद्योगात हाताखालच्या व्यक्तींवरती विश्वास ठेवून त्यांच्यावर काही कामे सोपवा. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या कामाचा तुम्हाला मनस्वी कंटाळा आला असेल तर ते काम तुम्ही टाळण्याचा प्रयत्न कराल. वरिष्ठ मात्र तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाहीत. घरामध्ये काही प्रश्नात तुम्ही जातीने लक्ष घालाल. त्यामुळे अवघड प्रश्नामध्ये मार्ग निघेल.

मिथुन ज्या कामात तुम्ही स्वत: लक्ष घालाल ते काम तुम्ही जलदगतीने उरकाल. पण इतरांवर अवलंबून राहिलात तर भरवशाच्या म्हशीला टोणगा असा अनुभव येण्याची शक्यता आहे. व्यवसाय-उद्योगात बराच काळ चालू असलेले एखादे काम संपुष्टात येईल. त्याऐवजी एखादे नवीन पद्धतीचे काम सुरू करावेसे वाटेल. चालू असलेल्या नोकरीमध्ये संस्थेकडून एखादी विशेष सवलत मिळेल. घरामध्ये सगळ्यांचा मूड मौजमजा करण्याचा असेल, पण प्रत्येकाची विचाराची पद्धत वेगळी असेल.

कर्क फारसे काही काम करायचे नाही असे तुम्ही ठरवाल, पण पुढल्याच क्षणी अशा कामामध्ये गर्क व्हाल की आठवडा कसा गेला हे समजणार नाही. व्यापार-उद्योगात गिऱ्हाइकांच्या अपेक्षा खूप असतील. त्या पूर्ण करण्याकरिता तुम्हाला भरपूर काम करावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ एखाद्या नवीन आणि तातडीच्या कामाकरिता तुमची निवड करतील. तुमचे ठरलेले कार्यक्रम त्यामुळे बिनसतील. घरामध्ये अत्यावश्यक असणारी रंगरंगोटी किंवा सजावट कराल.

सिंह सहसा तुमच्या दिनक्रमामध्ये तुम्ही बदल करायला तयार नसता, पण या आठवडय़ामध्ये ज्या घडामोडी घडतील, त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने काम करावे लागेल. व्यापार-उद्योगात पशाची आवक चांगली असल्यामुळे रात्रीचा दिवस करण्याची तुमची तयारी असेल. नोकरीमध्ये वरिष्ठ ज्या कामातून तुमचा फायदा आहे असे काम तुमच्यावर सोपवतील. घरामध्ये इतरांची मने सांभाळण्याकरिता तुम्हाला तडजोड करावी लागेल.

कन्या सहसा तुम्ही तुमचे विचार उघडपणे व्यक्त करीत नाही, पण या आठवडय़ात तुमच्या भावना तीव्र होतील. जे तुम्हाला वाटते ते तुम्ही स्पष्टपणे इतरांसमोर मांडाल. व्यापार-उद्योगात ज्यांनी तुम्हाला सहकार्य करायचे आश्वासन दिले होते ते शब्द पाळू शकणार नाहीत. पण तुम्ही हाती घेतलेले काम तडीस न्याल. नोकरीमध्ये वरिष्ठ एखादे आमिष दाखवून तुमच्याकडून जादा काम करून घेतील. घरामध्ये कोणाला काय पाहिजे ते लक्षात ठेवून तुम्ही ते देण्याचा प्रयत्न कराल. पण त्यांचे समाधान होईल की नाही याची शंका वाटते.

तूळ कधी कधी जे काम आपल्याला अगदी सोपे वाटते त्या कामात अचानक गुंतागुंत होते. त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न सोडविण्यात बराच वेळ वाया जातो आणि शक्ती खर्च होते. या आठवडय़ात तुम्हाला असा अनुभव येईल. व्यापार-उद्योगात बाजारातील चढउतारांचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला तुमचे धोरण लवचीक ठेवावे लागेल. नोकरीमध्ये सगळीच कामे महत्त्वाची आणि तातडीची असल्यामुळे तुम्हाला मान वर काढता येणार नाही.

वृश्चिक ग्रहमान तुमचा मान आणि प्रतिष्ठा वाढविणारे आहे. व्यापार-उद्योगाच्या ठिकाणी एखादे साहस करून तुम्ही गिऱ्हाइकांचे लक्ष तुमच्याकडे वळवाल. लांबलेली पूर्वीची एखादी ऑर्डर हातात येऊन पडेल. नोकरदार व्यक्तींना अपेक्षित कामामध्ये यश मिळाल्यामुळे त्यांची कॉलर ताठ असेल. ज्यांना बदली हवी असेल त्यांनी लगेच प्रयत्न करावा. घरामध्ये सर्व काही चांगले असेल. पण तुमचा मीपणा इतरांना आवडणार नाही. घरात खरेदी वगरेंचे बेत सगळ्यांना आनंदी व उत्साही बनवतील.

धनू एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला सहजगत्या मिळते तेव्हा त्याची किंमत आपल्याला कळत नाही.  खूप कष्टानंतर एखाद्या अवघड कामामध्ये तुम्ही सफल व्हाल. त्याचा तुम्हाला अभिमान वाटेल. व्यापार-उद्योगात बाजारपेठेतील परिस्थिती तुम्हाला अनुकूल असेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या शब्दाला मान मिळेल. नवीन प्रोजेक्टकरिता वरिष्ठ तुमची निवड करतील.  घरामध्ये ‘मन की खुशी, दिल का राज’ असा तुमचा प्रकार असेल.

मकर एखादी गोष्ट सहजगत्या मिळाली की त्याची किंमत आपल्याला कळत नाही. तीच गोष्ट कष्टाने मिळविली की त्याचे महत्त्व पटते. या आठवडय़ात तुम्ही पूर्वी केलेल्या कामाचे चांगले परिणाम दिसू लागतील. व्यापार-उद्योगात ज्या व्यक्तींनी पूर्वी सहकार्य देण्याचे तुम्हाला कबूल केले होते, त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळेल. पशाची आवक वाढण्याची खात्री वाटेल. नोकरीच्या ठिकाणी कंटाळवाणे काम तुम्ही हातावेगळे कराल.  घरामध्ये आनंद साजरा करायचा असे ठरवाल, पण त्यासाठी जास्त पसे खर्च करणार नाही.

कुंभ ग्रहमान बदलले की सर्व काही बदलते याचा अनुभव देणारा हा आठवडा आहे. गेल्या आठवडय़ापर्यंत ज्या गोष्टी सुरळीतपणे चाललेल्या होत्या त्याला अचानक वेगळी कलाटणी मिळेल. व्यापार-उद्योगात गिऱ्हाइकांची ये-जा वाढल्यामुळे तुम्हाला थोडीही फुरसत मिळणार नाही. खेळते भांडवल वाढविण्याकरिता थोडय़ा काळासाठी कर्ज घ्यावे लागेल. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या अपेक्षा तुम्हीच वाढवून ठेवाल. त्याचा तुम्हाला त्रास होईल. घरामध्ये काही खर्चीक बेत ठरतील.

मीन तुम्ही आनंदी मूडमध्ये असाल. खूप काम करण्याची इच्छा असेल, पण ज्यांच्यावर तुम्ही अवलंबून आहात त्यांचे सहकार्य मिळणार नाही. व्यापार-उद्योगात कामाचा तोटा नसेल. गिऱ्हाइकांच्या गरजेनुसार काम करावे लागेल.  नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या बाबतीमध्ये एखादा विचित्र अनुभव येईल. तुमचे काम तुम्ही वेळेमध्ये पार पाडण्याचा प्रयत्न कराल. घरामध्ये इतरांना तुम्ही कसे खूश ठेवता यावर सर्व गोष्टी अवलंबून असतील.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com