सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेष : चंद्र बुधाचा समसप्तम योग हा बौद्धिक प्रगतीला पोषक असा योग आहे. कामकाजातील बारकावे योग्य प्रकारे स्मरणात ठेवाल. नोकरी- व्यवसायात वरिष्ठांपुढे आपले मत निर्भीडपणे मांडाल. आपल्या या वागण्याचा इतरांनाही लाभ होईल. सहकारी वर्गाचा विश्वास संपादन कराल. जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण होतील. मुलांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागेल.

वृषभ : चंद्र नेपच्यूनचा समसप्तम योग हा आपल्या भावभावनांना उत्तेजन देणारा योग आहे. नातीगोती जोपासाल. नोकरी- व्यवसायात प्रयत्नांची पराकाष्ठा कराल. मेहनतीचे फळ मिळेल. नव्या संधी खुणावतील. सहकारी वर्गासह विचार जुळतील. जोडीदाराचा त्याच्या कार्यक्षेत्रात विशेष ठसा उमटेल. मुलांचे प्रश्न हसण्यावारी नेऊ नका. त्यांच्या भावना समजून घ्याव्यात.

मिथुन चंद्र गुरूचा नवपंचम योग हा ज्ञानार्जनासाठी पूरक योग आहे. नव्या विषयांचे किंवा ज्यात रस आहे अशा बाबतीतले ज्ञान संपादन कराल. नोकरी- व्यवसायात अतिरिक्त जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. वरिष्ठांकडून पािठबा मिळेल. जोडीदाराची प्रकृती सांभाळावी. एकमेकांना समजून घेतल्याने प्रश्नांची उत्तरे सापडणे सुलभ होईल. मुलांचा विकास होईल.

कर्क : रवी चंद्राचा नवपंचम योग हा मानसन्मान देणारा योग आहे. आपल्या कामाची दखल घेतली जाईल. आपल्यातील त्रुटी दाखवून दिल्यास वाईट वाटून न घेता आपल्यात सुधारणा कराव्यात. वरिष्ठांसह काम करताना अनुभवात भर पडेल. सहकारी वर्गाच्या साथीने मोठे कार्य पूर्ण कराल. कौटुंबिक समस्या अलगद हाताळाल. जोडीदाराचा सल्ला घ्यावा.

सिंह : गुरू चंद्राचा समसप्तम योग हा आर्थिक उन्नतीला प्रोत्साहन देणारा योग आहे. अर्थार्जनाचे नवे मार्ग खुले होतील. नोकरी- व्यवसायात वरिष्ठ अधिकाऱ्यांना मान द्याल. त्यांच्याकडून काही गोष्टी नव्याने शिकायला मिळतील. सहकारी वर्गाला मदतीचा हात पुढे कराल. शैक्षणिक क्षेत्रात पेचप्रसंग निर्माण होतील. धीर सोडू नका. जोडीदाराच्या कामात, जबाबदारीत वाढ होईल.

कन्या : चंद्र शुक्राचा समसप्तम योग हा स्नेहभाव वृिद्धगत करणारा योग आहे. मित्रपरिवार, नातेवाईक आणि शेजारीपाजारी यांच्यासह असलेल्या नात्यात दृढता निर्माण होईल. नोकरी- व्यवसायात वरिष्ठांसह विचारविनिमय कराल. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सर्वसमावेशक दृष्टीने विचार कराल. जोडीदार आपल्या कामाच्या व्यापाने त्रस्त होईल. मुलांचा उत्साह वाढेल.

तूळ : चंद्र बुधाचा नवपंचम योग हा बुद्धीला चालना देणारा योग आहे. नव्या संकल्पना सुचतील. त्या अमलात आणण्यापूर्वी त्यांची व्यावहारिकता तपासून बघाल. नोकरी- व्यवसायात सरकारी कामे लांबणीवर पडतील. मित्रपरिवाराच्या ओळखीने कामाला गती मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांसह चर्चा होतील. त्या लाभदायकही ठरतील. जोडीदार समजुतीने घेईल.

वृश्चिक : चंद्र शनीचा समसप्तम योग हा थोडी उदासीनता देईल; पण त्यावर मात करून आपल्या कामात रस घ्यावा. नोकरी- व्यवसायात वरिष्ठांचा मान ठेवून त्यांच्या मताचे स्वागत कराल. सहकारी वर्गाला नव्या गोष्टींचे प्रशिक्षण द्याल. जोडीदाराच्या कामाच्या व्यापात त्याच्यावरील ताण वाढेल. कौटुंबिक कलह दूर ठेवावेत. समस्यांची मालिका लवकरच खंडित होईल.

धनू :चंद्र हर्षलचा नवपंचम योग हा नावीन्यवर्धक योग आहे. नित्यनेमाच्या गोष्टींमध्ये विविधता आणाल. नोकरी- व्यवसायात महत्त्वाची कामे मार्गी लावाल. वरिष्ठांचा पािठबा मिळाल्याने हुरूप वाढेल. यशाच्या दिशेने वाटचाल कराल. सहकारी वर्गासह शब्द जपून वापरा. जोडीदाराच्या कामाचा त्याला योग्य मोबदला मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

मकर : चंद्र मंगळाचा समसप्तम योग हा आपल्यातील गुणांची कदर करणारा योग आहे. नव्या संधी उपलब्ध होतील. या संधीचे सोने कराल. नोकरी- व्यवसायात आपले विचार ठामपणे मांडाल. याचा संस्थेच्या प्रगतीसाठी नक्कीच लाभ होईल. सहकारी वर्गाकडून फारशा अपेक्षा न ठेवणे बरे! मुलांचा प्रश्न सुटेल. आर्थिक स्थिती सुधारेल. चिंता मिटतील.

कुंभ : चंद्र नेपच्यूनचा नवपंचम योग हा बौद्धिक आणि भावनिक बाबतीत प्रगतीकारक योग आहे. नवनिर्मितीचा आनंद मिळेल. निसर्गाच्या सान्निध्यात मन रमेल. वरिष्ठ आपल्या कामाची दखल घेतील. सहकारी वर्गासह विश्वासाने कामकाज मार्गी लागेल. जोडीदारासोबत मौलिक क्षण व्यतीत कराल. कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीकारक वार्ता येतील.

मीन : चंद्र शुक्राचा समसप्तम योग हा भावनिक पातळीवर तरंग उमटवणारा योग आहे. नोकरी- व्यवसायात सातत्य राखणे कठीण जाईल; परंतु आपल्या ध्येयापासून विचलित होऊ नका. वरिष्ठांचे नियम तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न कराल. सहकारी वर्गाची साथ मिळेल. जोडीदारासह वाद होण्याची शक्यता आहे. त्यात कटुता नसेल. मुलांना मेहनतीचे फळ मिळेल.

मराठीतील सर्व भविष्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astrology horoscope rashibhavishya bhavishya star sign zodiac sign zws