सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष बुध-हर्षलचा केंद्र योग हा बौद्धिक क्षेत्रात प्रगती करणारा योग आहे. परिस्थितीचा सकारात्मकतेने विचार करणे गरजेचे आहे. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतील. सहकारी वर्गाकडून मदत मिळाल्याने कामात लहान-मोठे बदल करणे शक्य होईल. कौटुंबिक बाबींमध्ये शांतपणे विचार करूनच अंतिम निर्णय घ्याल. सांध्यांच्या जवळील शिरा आखडतील.

वृषभ गुरू-चंद्राचा युती योग हा कार्यकौशल्य वाढवणारा योग आहे. हाती घेतलेले काम पूर्ण करताना कामातील बारकावे योग्य प्रकारे टिपाल. नोकरी-व्यवसायात आपले वर्चस्व निर्माण कराल. वरिष्ठांना आपला आधार वाटेल. सहकारी वर्गासह आपुलकीचे नाते दृढ होईल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात त्याच्या कामाचा विशेष प्रभाव दिसेल. मुलांच्या बौद्धिक विकासाकडे लक्ष पुरवाल.

मिथुन रवी-हर्षलचा लाभ योग हा उद्योजक क्षेत्रात विशेष फलदायी ठरेल. संशोधनाला राजमान्यता मिळेल. नोकरी-व्यवसायात  वरिष्ठ आणि सहकारी वर्ग यांच्यातील दुवा बनाल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न ठेवाल. जोडीदाराचा पािठबा मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. धरसोडपणा टाळा. मुलांवरील संस्कार कामी येतील. उष्णतेचे विकार बळावतील. काळजी घ्यावी.

 कर्क बुध-शनीचा युती योग हा कायदेविषयक कामांसाठी महत्त्वपूर्ण योग आहे. नोकरी-व्यवसायात दूरदृष्टीमुळे काही महत्त्वाचे निर्णय घेणे सुलभ होईल. वरिष्ठांच्या विरोधाला सामोरे जावे लागेल. सहकारी वर्गाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न कराल. मुलांचा आत्मविश्वास बळावेल. जोडीदाराच्या कामाची दखल घेतली जाईल. अपचनाच्या तक्रारी वाढल्यास वैद्यकीय सल्ला व उपचार घ्यावेत.

सिंह चंद्र-मंगळाचा युती योग हा ऊर्जावर्धक योग आहे. चंद्राचे कुतूहल, उत्कंठा यांना मंगळाचे धाडस पूरक ठरेल. नोकरी-व्यवसायात  घाईघाईने निर्णय घेऊ नका. वरिष्ठांच्या विश्वासास पात्र ठराल. सहकारी वर्गाकडून झालेल्या चुका दुर्लक्षित करू नका. जोडीदाराची त्याच्या कामातील जबाबदारी वाढेल. मुलांचा उत्साह वाढेल. लचक भरणे, मणका आणि पाठीचे दुखणे असे त्रास उद्भवतील.

कन्या चंद्र-शुक्र या दोन स्त्री ग्रहांचा युती योग हा चिकित्सक वृत्तीत वाढ करणारा योग आहे. या योगामुळे नोकरी-व्यवसायातील बारीकसारीक तपशील तपासून घेतल्याने नुकसान टळेल. सहकारी वर्गाची साथ मोलाची ठरेल. जोडीदाराच्या विचारांना महत्त्व द्याल. मुलांच्या मेहनतीला चांगले फळ मिळेल. संधी निसटून जाण्याची शक्यता आहे. ओटीपोटाचे दुखणे वाढेल.

तूळ गुरू-चंद्राचा लाभ योग हा ज्ञान आणि कला यांचा सुंदर मिलाप घडवणारा योग आहे. बुद्धिमत्तेच्या जोरावर मोठय़ा कठीण प्रसंगातून मार्ग काढत पुढे जाल. नोकरी-व्यवसायात अनुभवातून बरेच शिकायला मिळेल. नातीगोती सांभाळाल. जोडीदाराचा प्रवास प्रगतिकारक असेल. मुलांच्या प्रश्नांची उत्तरे सापडतील. अपचनाच्या त्रासामुळे त्वचेवर पुरळ, लाली उठेल.

वृश्चिक चंद्र-नेपच्यूनचा केंद्र योग हा मनाचे संतुलन दोलायमान करणारा योग आहे. नाजूक क्षणी स्वत:ला जपावे. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा सल्ला मनाविरुद्ध मानावा लागेल. सहकारी वर्गाकडून आधार मिळेल. जोडीदाराचा आत्मविश्वास कामी येईल. कौटुंबिक समस्या हळुवारपणे सोडवा. मुले त्यांच्या भावविश्वात रंगून जातील. उष्णतेचे विकार बळावतील. डोळय़ांची जळजळ होईल.

धनू चंद्र-रवीचा लाभ योग प्रयत्नांना यश देणारा योग आहे. ओळखीच्या व्यक्तींकडून लाभ होतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांना आपला दृष्टिकोन समजावून द्याल. अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मदत मिळेल. जोडीदाराचा सल्ला लाभदायी ठरेल. मुलांच्या भविष्याची तरतूद कराल. दात, डोळे, त्वचा यांची विशेष काळजी घ्यावी. अ‍ॅलर्जी झाल्यास वैद्यकीय औषधोपचार करावा.

मकर चंद्र-बुध युतियोग हा भावनिक आणि वैचारिक गुंता वाढवणारा योग आहे. विवेकी विचार करून भावनांना आवर घालता आला तर सहीसलामत बाहेर पडाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ फारसे मिळणार नाही, पण सहकारी वर्गाची साथ लाभेल. जोडीदाराच्या कामाची दखल घेतली जाईल. मुलांना  कर्तव्याची जाणीव करून द्याल. अतिविचारांनी डोकं शिणेल. विश्रांती घ्यावी.

कुंभ चंद्र-नेपच्यूनचा लाभ योग हा भावनिक संतुलन राखणारा योग आहे. योग्य वेळी योग्य भावना योग्य प्रकारे व्यक्त कराल. नोकरी-व्यवसायात काम वेगाने पुढे सरकेल. वरिष्ठ आपले मत विचारात घेतील. जोडीदारासह एकमत होईल. आनंदाचे क्षण अनुभवाल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडतील. चिंता नसावी. मुलांसह मोकळेपणाने चर्चा कराल. खांदे भरून येतील.

मीन चंद्र-मंगळाचा लाभ योग हा उत्साहवर्धक योग आहे. नव्या विषयांचा अभ्यास कराल. प्रलोभनांपासून प्रयत्नपूर्वक दूर राहा. नोकरी-व्यवसायात मेहनत फळास येईल. वरिष्ठांच्या चिकित्सक प्रश्नांना सामोरे जावे लागेल. सहकारी वर्गाच्या साहाय्याने महत्त्वाची कामे पार पडतील. ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद मिळतील. मुलांवर विश्वास दाखवा. पित्ताशयाचे त्रास उद्भवतील.

Story img Loader