सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष चंद्र-हर्षलचा नवपंचम योग हा नावीन्यपूर्ण कल्पना सुचवणारा योग आहे. या आठवडय़ात काहीतरी साहस करण्याचा बेत आखाल. नोकरी-व्यवसायात मनोधैर्य वाढल्याने आपली मते ठामपणे मांडाल. वरिष्ठांसह चर्चा यशस्वी होतील. तळपायांचे दुखणे सांभाळावे. जोडीदाराच्या प्रकृतीला आराम पडेल. मुलांची हौसमौज पूर्ण कराल. कौटुंबिक ताण विचारपूर्वक कमी कराल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वृषभ चंद्र-मंगळाचा युती योग हा जोशपूर्ण आणि उत्साहवर्धक असा योग आहे. रखडलेल्या कामांच्या यादीतील एकेक कामे हातावेगळी कराल. नोकरी-व्यवसायात कामाचा वाढता व्याप उत्तम प्रकारे हाताळाल. वाढत्या उष्णतेपासून डोळय़ांची काळजी घ्यावी. जोडीदाराच्या कामावरील त्याचा पगडा चांगला राहील. मुलांच्या बाबतीत त्यांचे शिक्षण आणि अनुभव यांच्यात मेळ बसेल.

मिथुन चंद्र-गुरूचा युती योग हा ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून देणारा योग आहे. समोर आलेली समस्या आपल्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या जोरावर अलगद सोडवाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ आणि सहकारी वर्ग यांच्यातील गैरसमज दूर कराल. उष्णतेच्या विकारांवर वेळेवरच प्रतिबंधात्मक उपाय योजावेत. जोडीदाराच्या कष्टाचे चीज होईल. मुलांची प्रगती समाधानकारक असेल.

कर्क चंद्र-शुक्राचा युती योग हा कलात्मकतेला पुष्टी देणारा योग आहे. परंतु हळवेपणाही वाढू शकतो. भावना आपल्या ताब्यात ठेवाव्यात. मनाविरुद्ध घटनांचा त्रास करून घेऊ नका. नोकरी-व्यवसायात मुत्सद्दीपणाने निर्णय घ्याल. जोडीदाराचा सल्ला मानावा लागेल. नव्या उपक्रमात सहभागी व्हाल. मुलांचे भविष्य उज्ज्वल असेल. मित्रांकडून साहाय्य मिळेल. स्वत:साठी वेळ काढाल.

सिंह चंद्र-नेपच्यूनचा लाभ योग हा स्फूर्तिवर्धक योग आहे. नव्या संकल्पना इतरांपुढे मांडाल. आपल्या उत्साहाने इतरांना प्रेरणा द्याल. उन्हाळी सर्दी आणि घसा धरणे असे त्रास संभवतात. आधीच योग्य ती काळजी घ्यावी. नोकरी-व्यवसायात आपले अभ्यासपूर्वक सादरीकरण प्रभावी ठरेल. जोडीदाराच्या खर्चाचे प्रमाण वाढेल. अनावश्यक खर्च टाळावेत. सामाजिक बांधिलकी जपाल.

कन्या शनी-शुक्राचा युती योग हा भावनांवर नियंत्रण ठेवणारा योग आहे. कला क्षेत्रात चिकाटी आणि सातत्य टिकवण्यासाठी हा योग पूरक ठरेल. युरिन इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. पुरेसे पाणी पिणे आवश्यक! नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या सल्ल्याने पुढे जाल. सहकारी वर्गाकडून मोलाची साथ मिळेल. जोडीदारासह महत्त्वाच्या विषयावर परिणामकारक चर्चा होईल. मुलांबाबतीत योग्य निर्णय घ्याल.

तूळ चंद्र-हर्षलचा लाभ योग हा बुद्धिचातुर्य दाखवणारा योग आहे. वैद्यकीय, संशोधन, तंत्रज्ञान या क्षेत्रांत प्रगती कराल. पायाच्या शिरा, नसा आखडतील. आवश्यक व्यायाम परिणामकारक ठरेल. नोकरी-व्यवसायात सातत्य ठेवून कामे मार्गी लावाल.  सहकारी वर्गाची मदत मिळेल. जोडीदाराच्या शब्दाला वजन येईल. मुलांच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घ्याल. कामाचा ताण वाढेल.

वृश्चिक चंद्र-नेपच्यूनचा युती योग हा स्फूर्तिवर्धक योग आहे. नित्यनेमाच्या गोष्टींमध्ये वैविध्य आणण्याचा प्रयत्न कराल. लेखन, वाचन, चिंतन यात मन रमेल. पोटात आग पडणे, टाचांची जळजळ होणे असे त्रास संभवतात. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या विश्वासास पात्र ठराल. सहकारी वर्गासह वादविवाद टाळावा. जोडीदाराला आर्थिक लाभ होईल.

धनू रवी-चंद्राचा केंद्र योग हा अडचणींतून मार्ग काढत पुढे नेणारा योग आहे. संकटसमयी न डगमगता खंबीरपणे उभे राहाल. पित्त आणि वातविकार बळावतील. पोटऱ्या, मांडय़ा यांच्यात जडत्व येईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी जिंकाल.   जोडीदाराला थकवा जाणवेल. कामाचा ताप आणि व्याप वाढल्याने तणाव येईल. शांत डोक्याने विचार करावा. घाई नको.

मकर चंद्र-बुधाचा लाभ योग हा मनोबल वाढवणारा आणि व्यवहार जपणारा योग आहे. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मोठी झेप घ्याल. उन्हाळी सर्दी आणि कफ यांचा त्रास जाणवेल. नोकरी व्यवसायात वरिष्ठांच्या नाखुशीला सामोरे जावे लागेल. सहकारी वर्गाकडून मदत मिळेल. तत्त्वाला धरूनच योग्य तो निर्णय घ्यावा. मुलांवर आपली मते लादू नका. त्यांचे अंतरंग जाणून घ्यावेत.

कुंभ चंद्र-गुरूचा लाभ योग हा ज्ञानाचा पुरस्कार करणारा योग आहे. वेगळय़ा कार्यक्षेत्रातील ज्ञान संपादन कराल. नवे अनुभव गाठीस जमा होतील. वातविकारांकडे दुर्लक्ष करू नका. नोकरी-व्यवसायात मुद्देसूद बोलण्याचा आणि लेखी दस्तावेजाचा नक्कीच लाभ होणार आहे. मुलांना खूप प्रश्न विचारून भंडावून सोडू नका. त्याचे म्हणणे मात्र ऐकून घ्यावे.

मीन रवी-चंद्राचा लाभ योग हा मेहनतीला फळ देणारा योग आहे. आपल्या कामातील चढउतार पार करून आपले ध्येय गाठाल.  कामाचे नियोजन करावे. पित्त, डोकेदुखीचा त्रास बळावेल.  नोकरी-व्यवसायात परदेशी संस्थांसह कामे कराल. करार कराल. जोडीदाराच्या इच्छा पूर्ण केल्याने समाधान वाटेल. मुलांसाठी अतिरिक्त खर्च कराल.

मराठीतील सर्व भविष्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhavishya 25 to 31 march 2022 rashibhavishya astrology horoscope star sign zodiac sign dd