01vijay1मेष ‘कळतं पण वळत नाही’ या म्हणीचा अर्थ आता तुम्हाला एखाद्या निमित्ताने कळेल.  व्यापार-उद्योगात एका नवीन संक्रमणाच्या उंबरठय़ावर येऊन पोहोचलेले असाल. सध्याची कामाची पद्धत बदलावीशी वाटेल. जोडधंद्यामध्ये वाढ करावीशी वाटेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची आज्ञा पाळता पाळता स्वत:ची एखादी इच्छा पूर्ण करून घ्या. घरामध्ये कोणालाही उपदेश न करता त्यांच्या पद्धतीने वागण्याचे स्वातंत्र्य द्याल. त्यामुळे वादविवाद टळतील.

वृषभ नातीगोती आणि हितसंबंध याबाबतीमध्ये तुम्ही नेहमी जागरूक असता. या आठवडय़ात असे हितसंबंध टिकवून ठेवण्यासाठी  तारेवरची कसरत करावी लागेल. व्यापार-उद्योगात भरपूर काम करण्याचा तुमचा मूड असेल. गिऱ्हाईकांना खूश करण्याकरिता  जास्त सवलत किंवा सूट द्यावी लागेल. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या बाबतीत विचित्र अनुभव आल्यामुळे त्यांच्या मदतीशिवाय काम करायचे तुम्ही ठरवाल. घरामध्ये प्रत्येकाची आवडनिवड जपण्याचा प्रयत्न कराल.

मिथुन सतत कामात राहणारी तुमची रास आहे. पण ते काम आणि त्याचे नियोजन आपल्या हातात असावे अशी तुमची इच्छा असते. ती पूर्ण न झाल्याने तुमची थोडीशी चिडचिड होईल.  व्यापार-उद्योगात न आळस करता तुम्ही भरपूर काम कराल. प्राप्तीचे प्रमाण वाढेल, पण ते तुम्हाला कमीच वाटेल. नोकरदार व्यक्तींना स्वत:च्या कामाबरोबर अनुपस्थित सहकाऱ्याचे काम करावे लागेल. घरामध्ये आपुलकीच्या व्यक्तीचा सहवास लाभल्याने त्यांचा मानपान राखाल.

कर्क ‘धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय’ असा अनुभव या आठवडय़ात तुम्हाला येईल. घरामध्ये जास्त लक्ष दिले तर नोकरी-व्यवसायाच्या कामात गडबड गोंधळ उडेल. तरीही तुम्ही घरगुती गोष्टींना प्राधान्य द्याल. व्यापारात रोखीचे व्यवहार कमी आणि उधारीचे व्यवहार जास्त असतील. नोकरीच्या ठिकाणी नेहमीपेक्षा जादा काम करावे लागेल. घरामधल्या व्यक्तींना पूर्वी काही आश्वासन दिले असेल तर ते पूर्ण करावे लागेल. ही बाब थोडीशी महागात पडेल.

सिंह तुमच्या दिलदार स्वभावामुळे इतरांना तुम्ही त्यांच्या गरजेच्या वेळेला मदत करता. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांना खूश जरूर करा. पण त्यासाठी अवाजवी सूट किंवा सवलत देऊ नका. महत्त्वाचे काही सौदे लांबण्याची शक्यता आहे. जोडधंद्यातून फायदा मिळेल. नोकरीच्या ठिकाणी एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर अशी तुमची स्थिती होईल. कोणत्याच कामावर लक्ष केंद्रित करता येणार नाही. घरामध्ये सर्वजण त्यांच्या मतलबापुरता तुमचा उपयोग करून घेतील.

कन्या सहसा सामूहिक किंवा सार्वजनिक कामापासून लांब राहून थोडेसे अलिप्त राहता. पण या आठवडय़ात तुमच्या या स्वभावाविरुद्ध जाऊन तुम्हाला थोडेसे सोशियल बनावे लागेल. व्यापार-उद्योगात बरेच काही करण्याचा तुम्हाला उत्साह असेल.  मात्र आयत्या वेळी तुम्ही हात आखडता घ्याल. नोकरीमध्ये ज्या कामातून तुम्हाला फायदा आहे अशा कामाला प्राधान्य द्याल. तुमचा हा मतलबी स्वभाव सहकाऱ्यांच्या लक्षात येईल. घरामध्ये सर्वजण तुमचे कौतुक करतील.

तूळ बाहेरून तुम्हाला बघणाऱ्या माणसांना तुम्ही खूप उत्साही दिसाल, पण तुमची अडचण काय आहे हे तुम्हालाच माहिती असेल. व्यापार-उद्योगात कामाचा पसारा आणि व्याप्ती चांगली असेल. पण योग्य माणसांची गरहजेरी असल्याने तुमची बरीच धावपळ होईल. इतरांशी जुळवून घ्यावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी केलेल्या कामाचे श्रेय वरिष्ठ लगेच देणार नाही. घरामध्ये जो माणूस काम करतो त्याच्याच मागे काम लागते असा अनुभव येईल.

वृश्चिक ग्रहमान जेव्हा अनुकूल नसते त्या वेळेला तुम्ही तुमचे धोरण लवचीक ठेवता. या आठवडय़ात कितीही अडथळे आले तरी तुम्ही ठरविलेली कामे पूर्ण कराल. व्यापार-उद्योगात काम भरपूर असेल, पण ते पूर्ण करण्याकरिता सभोवतालच्या व्यक्तींना खूश ठेवावे लागेल. धनप्राप्तीत वाद होईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना कामाच्या वेळेला तुमची आठवण येईल, पण गरज संपल्यावर तुमचा विसर पडेल. नवीन नोकरी स्वीकारताना त्यातील अटींचा विचार करा.

धनू जनसंपर्कावर जी कामे अवलंबून आहेत त्यांना ताबडतोब वेग द्या. एखाद्या कारणाने तुमच्या जिद्दी अणि संयमी स्वभावाची या आठवडय़ात परीक्षा होईल. व्यापार-उद्योगात रोखीपेक्षा उधारीचे व्यवहार जास्त असतील. गिऱ्हाईकांना सांभाळून घेण्याकरिता तुम्हाला लवचीक धोरण ठेवावे लागेल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्या कार्यपद्धतीत काही बदल करण्याची शक्यता आहे. घरामध्ये एखाद्या कारणाने काही व्यक्तींचा तुम्हाला सहवास लाभला असेल तर तो आता कमी होईल.

मकर नशिबापेक्षा प्रयत्नांवर जास्त विश्वास ठेवणारी तुमची रास आहे. या मनोवृत्तीचा तुम्हाला उपयोग होईल. व्यापार-उद्योगात कोणत्याही करारावर घाईने शिक्कामोर्तब करू नका. नोकरीमध्ये एखादे अवघड काम तुमच्या वाटय़ाला येईल. त्याचा तुम्ही शेवटपर्यंत पाठपुरावा कराल. जुन्या सहकाऱ्यांशी काही कारणाने ताटातूट होईल. घरामध्ये प्रत्येकाची आवड-निवड जपण्याचा प्रयत्न कराल. या नादात तुमच्या हौसेमौजेवर मुरड घालावी लागेल. मोठय़ा वस्तूंची खरेदी होईल.

कुंभ कधी तुम्ही अतिउत्साही बनाल, तर कधी एकदम निराश दिसाल. सभोवतालच्या व्यक्तींशी तडजोड केली तर सप्ताहाचा आनंद वाढेल. व्यापार-उद्योगात खूप काम करावेसे वाटेल. कामगारांच्या मागण्या आणि गरजा तुम्ही कशा भागवता यावर तुमचे यश अवलंबून असेल. नोकरीच्या ठिकाणी तुमची जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे.  घरामध्ये एखाद्या कारणाने हास्यविनोद करून वातावरण आनंदी बनविण्याचा तुम्ही प्रयत्न कराल.

मीन तुमच्या स्वभावातील वेगवेगळे कंगोरे या आठवडय़ात दिसून येतील. कधी अतिउत्साही बनाल तर कधी विरक्तीची भाषा कराल. सभोवतालच्या व्यक्तींना या वागण्याचा अर्थ लागणार नाही. व्यापार-द्योगात काही कामे लांबवणे भाग पडेल. नवीन कामाचा घाईघाईने श्रीगणेशा कराल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे मूड बदलत राहिल्यामुळे कोणत्या कामाला किती महत्त्व द्यायचे असे तुमच्यापुढे कोडे असेल.  घरामध्ये तुम्ही उत्सवमूर्ती बनाल.

response.lokprabha@expressindia.com

Story img Loader