01vijay2मेष : ज्यांच्याविषयी तुम्हाला प्रेम आहे त्यांच्याकरिता काहीही करण्याची तुमची तयारी असते. फक्त या नादामध्ये तुमच्याकडून व्यवहार विसरला जाणार नाही याची दक्षता घ्या. व्यापारउद्योगामध्ये कामाचे प्रमाण मनाप्रमाणे राहिल्यामुळे तुम्ही अविरत मेहनत घेत राहाल. अनेक कामे एकाच वेळेला करावीशी वाटतील, पण त्यामुळे गोंधळ उडेल. नोकरीमध्ये एखाद्या विशेष सवलतीकरिता तुमची निवड होईल. घरामध्ये सगळ्यांना खूश करण्याच्या नादामध्ये पसे कुठे आणि कसे खर्च झाले याचा तुम्हाला पत्ता लागणार नाही.

वृषभ :  इतरांना काय वाटेल, याचा विचार करत न बसता तुम्ही तुमच्या पद्धतीने जीवनाचा आस्वाद घ्यायचे ठरवाल. व्यापारउद्योगात गिऱ्हाईकांची येजा मनाप्रमाणे राहील. उलाढाल आणि प्राप्तीचे प्रमाण वाढण्याची खात्री असल्यामुळे तुम्ही मन लावून काम कराल. संस्थेकडून तात्पुरते कर्ज किंवा एखादी विशेष सुविधा तुम्हाला बहाल केली जाईल. कुटुंबातील सदस्यांच्या बाबतीत तुम्ही नेहमीच संवेदनशील असता. या आठवडय़ात त्यांची आवडनिवड जपण्यात तुम्ही भूषण मानाल. एखाद्या घरगुती शुभप्रसंगाची नांदी होईल.

मिथुन :  जेव्हा सभोवतालचा माहोल मौजमजेत असतो, त्यावेळी तुमच्या रसिकतेला उधाण येते. त्यावर कोणीही बंधन घालू शकत नाही. या आठवडय़ात तुम्ही एखाद्या नवीन कल्पनेने भारून गेलेले असाल. व्यापारीवर्गाला त्यांच्या आवडीनिवडीनुसार काम करण्याची संधी मिळेल. नोकरीमध्ये एखाद्या चांगल्या प्रोजेक्टकरिता वरिष्ठ तुमची निवड करतील. अशा कामात तुमच्या बुद्धीला खाद्य मिळेल. घरामध्ये तुमच्या आवडीनिवडीचा तुम्ही कार्यक्रम ठरवाल आणि त्यात इतरांना आग्रहाने सामील करून घ्याल.

कर्क :  वास्तविक पाहता तुमची रास स्वत:पेक्षा इतरांचा जास्त विचार करणारी आहे. पण या आठवडय़ात मात्र तुम्ही तुमच्या इच्छा आकांक्षांच्या बाबतीत आग्रही बनाल. मनामध्ये आलेली गोष्ट तातडीने पूर्ण करण्यावर तुमचा भर राहील. व्यवसायउद्योगात जाहिरात, प्रसिद्धी या माध्यमांचा चांगला उपयोग झाल्याने उलाढाल आणि फायद्याचे प्रमाण वाढेल. नवीन दालनाचे उद्घाटन होईल. नोकरीमध्ये चांगले काम करून वरिष्ठांना तुम्ही खूश कराल. घरामध्ये एखादा सोहळा पार पडण्याची शक्यता आहे.

सिंह :  सध्याचे ग्रहमान तुमच्यावर खूश असल्यामुळे तुमची एखादी दीर्घकाळाची इच्छा पूर्ण झाली तर आश्चर्य नाही. व्यवसायउद्योगात जेवढे जास्त काम तेवढी जास्त कमाई असे समीकरण असल्याने रात्रंदिवस काम करण्याची तुमची तयारी असते. नोकरीमध्ये, तुमच्या संस्थेमध्ये जे फेरफार होतील त्यामुळे तुमची कामाची उमेद वाढेल. घरामधले वातावरण आनंदी आणि उत्साही असेल. एखादे शुभकार्य ठरेल. तरुणांचे विवाह जमतील/ पार पडतील. वाहन किंवा वास्तू खरेदीचे बेत पार पडतील.

कन्या :  सहसा चाकोरीबाहेरचा मार्ग तुम्ही स्वीकारत नाही. व्यापारउद्योगात प्राप्तीचे प्रमाण जरी समाधानकारक असले तरी तुम्हाला मात्र आपण कुठेतरी कमी पडतोय असेच वाटत राहील. मात्र त्यासाठी मोठा धोका पत्करू नका. नोकरीमध्ये प्रत्यक्ष काम कमी, मौजमजा जास्त असा तुमचा प्रकार असेल. सध्याच्या नोकरीमध्ये बदल करण्याचे विचार असतील तर त्याविषयी हालचाली सुरू करा. पण गुप्तता राखा. घरामध्ये मौजमजेचा माहोल राहील. प्रत्येकजण आपापल्या आवडीनिवडीच्या बाबतीत चोखंदळ असेल.

तूळ :  जी गोष्ट बराच काळ तुमच्या मनात आहे ती पूर्ण झाल्याशिवाय तुमच्या जिवाला स्वस्थता लाभणार नाही आणि सभोवतालच्या व्यक्तींनाही तुम्ही शांत बसू देणार नाही. व्यापारउद्योगात भरपूर काम होईल. हातात भरपूर पसे खुळखुळल्याने तुम्ही स्वत:वरच खूश असाल. नोकरीमध्ये तुमच्या मनाप्रमाणे काम करण्याचे स्वातंत्र्य लाभेल. संस्थेकडून एखादी खास सवलत बहाल केली जाईल. नवीन नोकरीच्या शोधात यश मिळेल. घरामध्ये शुभकार्याची नांदी होईल. प्रतिष्ठा वाढवणारी मोठी खरेदी कराल.

वृश्चिक : तुमच्या राशीचे वैशिष्टय़ असे आहे की, तुमच्या कल्पना इतरांपेक्षा वेगळ्याच असतात. या आठवडय़ात बराच काळ ज्या संधीची तुम्ही वाट पाहात होता ती संधी तुमच्याकडे चालून येईल. व्यापारउद्योगात गिऱ्हाईकांकडून चांगले पसे मिळण्याची तुम्हाला खात्री असल्याने कष्टाची पर्वा न करता तुम्ही काम करत राहा. जोडधंद्यातून फायदा होईल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमची एखादी मागणी पूर्ण करतील. काहींना परदेशवारीची संधी मिळेल. घरामध्ये उत्साही वातावरण असेल. प्रत्येक जण आपल्या आवडीनिवडीबाबत चोखंदळ राहील.

धनू : ग्रहमान तुम्हाला चांगले असल्यामुळे ज्या कामात तुम्ही लक्ष घालाल त्या कामात तुम्ही अग्रेसर राहण्याचा प्रयत्न कराल. व्यापारउद्योगात भरपूर काम असल्यामुळे तक्रारीला जागा नसेल. त्यातच एखादी नवीन संधी दृष्टिक्षेपात आल्यामुळे त्याचा फायदा घेण्याचा तुम्हाला मोह होईल. नोकरीमध्ये इतरांपेक्षा जास्त चांगले काम करून तुम्ही एखाद्या बक्षिसाचे मानकरी ठराल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. घरामध्ये एखादा छान बेत ठरेल. त्यामध्ये लहानमोठय़ा व्यक्ती उत्साहाने सहभागी होतील.

मकर : या आठवडय़ात कोणतीही आकडेमोड करत न बसता तुम्ही जीवनाचा आनंद लुटत बसाल. या कारणावरून कदाचित तुमच्यावर थोडीफार टीका होईल, पण तुम्ही त्याला दाद देणार नाही. व्यापारीवर्गाला विविध मार्गाने पसे मिळत राहतील. नोकरीमध्ये वरिष्ठ चालू असलेल्या कामाव्यतिरिक्त वेगळ्या कामासाठी तुमची निवड करतील. बेकार व्यक्तींना काम मिळण्याचे संकेत मिळतील. घरामध्ये प्रतिष्ठा वाढवणारी एखादी खरेदी करण्याचा मोह अनावर होईल. पण त्याकरिता खर्चाचा आकडा फुगू देऊ नका.

कुंभ: एखादी गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे घडल्यामुळे तुम्ही एकदम हलक्याफुलक्या मूडमध्ये असाल. व्यापारउद्योगात तुमच्याकडील विशेष प्रावीण्याला किंवा कौशल्याला मागणी असल्यामुळे एखादे काम तुमच्याकडूनच पूर्ण करून घेण्याकरिता गिऱ्हाईकांचा आग्रह असेल. नोकरीमध्ये इतरांकडून तुम्ही गोडीगुलाबीने काम करून घ्याल. त्यामुळे सगळ्यांना एक सुखद धक्का बसेल. घरामध्ये एखादा विशेष सोहळा संपन्न होईल. मोठय़ा वस्तूची खरेदी करण्याचे बेत ठरतील तर ते संपन्न होतील.

मीन : स्वभावत: तुम्ही प्रेमळ असल्यामुळे ज्या व्यक्ती तुमच्या अवतीभोवती असतात त्यांना सुखीसमाधानी ठेवण्याचा तुम्ही नेहमी प्रयत्न करता. व्यवसायउद्योगात अपेक्षित आणि अनपेक्षित अशी दोन्ही प्रकारची कामे तुम्हाला हाताळावी लागतील. त्यामुळे क्वचित प्रसंगी रात्रीचा दिवसही करावा लागेल. नोकरीमध्ये वरिष्ठांनी सांगितलेली कामे वेळेत आणि बिनचूक करा. घरामध्ये येणाऱ्याजाणाऱ्याचे तुम्ही मोठय़ा उत्साहाने आणि अगत्याने स्वागत कराल.

Story img Loader