महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर राजकीय पेच निर्माण झालेले आपण पाहतोच आहोत. जून महिन्यात गेलेलं मुख्यमंत्रीपद, एकनाथ शिंदे यांनी बाहेर पडत सरकार स्थापन करणं, शिवसेना हे पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह जाणं अशा एका पाठोपाठ एक संकटांची मालिका त्यांच्यासमोर आहेच. अशात ज्योतिषी उल्हास गुप्ते यांनी एक महत्त्वाचा दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्या दिवशी शपथ घेतली तो दिवस त्यांच्यासाठी चांगला नव्हता असं ज्योतिषी उल्हास गुप्ते यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंच्या शपथविधीबद्दल काय म्हटलंय उल्हास गुप्ते यांनी?

मनात नसतानाही मुख्यमंत्रीपद घेण्याचा आग्रह नी त्यानंतर अचानक संकटांची मालिका सुरू झाली. उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तो दिवसही त्यांना फारसा चांगला नव्हता पण त्यावेळेच्या घाईगडबडीत शपथविधी होणे खूप गरजेचे होते. काही गोष्टी आयुष्यात टाळता येत नाहीत, त्यांच्या पत्रिकेत षष्टेश शनि चतुर्थात वक्री अवस्थेत त्यामुळे स्थावर इस्टेटीची भांडणे कोर्टकचेरीच्या पायरीपर्यंत गेली त्यांना त्यातून खूप मनस्ताप झाला.

सिंह राशीमुळेच डगमगले नाहीत उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या प्रश्नांचा भडीमार – त्यात करोना काळ त्यात खूप धावपळ झाली. चतुर्थात गोचरीचे शनी- केतू मानसिक व शारिरीक स्वास्थ बिघडवत होते. कालांतराने पक्षात फूट पडून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर पक्षचिन्ह व शिवसेना पक्षही दूर गेला, अशा करूण अवस्थेत स्वत:ला सावरून ते कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवताना दिसले. त्यांच्या रक्तातील ही धीरोदात्त मानसिकता त्यांच्या सिंह राशीतून प्रकट होते. खरं तर शिवसेना संघटनेला त्यांनी एक वेगळा दर्जा प्राप्त करून दिला. संघटनेचे स्वरुप बदलून राजकारणात त्यांनी उत्तम प्रगती साधली. विविध जातीधर्माची माणसे उद्धवजी ‘आपला माणूस’ म्हणून त्यांच्याकडे पहात होती. ही किमया त्याच्या दशमातील चतुरस्त्र बुधाने केली होती. उद्धव ठाकरे राजकीय प्रवासातून लोकांच्या मनांत पोचले आहेत; त्यांना लोकांच्या मनातून काढणे खूप कठीण असेल. आमदार खासदारापेक्षा त्यांच्यापाठीमागे जी जनशक्ती आहे तीच त्यांची मोठी ताकद ठरेल.

उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी राज्याची सूत्रे हाती घेतली आणि त्यांची वाटचाल सुरू झाली. मार्च २०२० मध्ये आलेल्या कोविड महासाथीने सरकारची परीक्षाच पाहिली. त्यानंतर वेगात घडलेल्या घडामोडींनंतर त्यांचे सरकारही पायउतार झाले. एरवी सरकार पायउतार होणे तसे राजकारणाला काही नवीन नाही. मात्र मोठ्या संख्येने पक्षात उभी फूट पडली आणि मोजकेच आमदार- खासदार आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. याच परिस्थितीविषयी उल्हास गुप्ते यांनी हा दावा केला आहे.

Story img Loader